Tuesday, 19 March 2019



                       काय बरं अर्थ काढावा याचा ...

" एका गृहयोजनेच्या नव्यानेच बांधकाम चालू असलेल्या इमारती मधील काही सदनिकांचे काम मी  पाहात होतो. थोडासा नाराज होतो. तिथे रहायला येऊ पाहणाऱ्या काही व्यक्ती आपल्या कुटुंबासह तिथे होत्या. कांही तर तिथे डब्यात आणलेले खात होते. मात्र माझ्या ओळखीच्या असूनही मला कोणी ओळख देत नव्हते. जागेच्या मूळ मालकाची भेट न झाल्याने मी तेथून निघालो. काही क्षणातच माझ्या लक्षात आलं की आपण एका अपरिचित भागात आलोय. सातत्याने आपला मार्ग चुकतोय. परत फिरावे तर आला मार्ग वेगळाच दिसतो, असतो. छोट्या गल्लीबोळातून चालताचालता मुख्य रस्ता शोधूनही सापडत नाही. एका घराच्या दारात असलेल्या महिलेला विचारण्यासाठी पुढे जाऊ लागतो तर एक पुरुष मला  जरा खडसावूनच ' काय पाहिजे '  म्हणून विचारतो ! मी नम्रपणे म्हणतो,
'' मी रस्ता चुकलोय. मला सांगाल का ? ''
तो काहीच उत्तर देत नाही.
तेथील एका छोट्या मुलाला मी विचारतो, '' मुख्य रस्ता कुठे आहे ? '' तेंव्हा तो थोडे काही सांगून त्या रस्त्याकडे घेऊन जाऊ लागतो. पण पुन्हा तेच !
त्या वस्तीतून मला काही बाहेर पडता येत नाही. त्या वस्तीतील सर्व व्यवहार चालू असतात. पण माझ्याकडे कोणाचेच लक्ष नसते. कोणालाही माझ्याशी काहीही देणंघेणंही नसतं. एका क्षणी मला उगाचच असं वाटतं की कोणी माझ्यावर धावून आलं तर मी डोक्यावर हात जोडून एखाद्या  कपोलकल्पित महानायकासारखा  आकाशात उड्डाण करेन. अचानक मला जाणीव होते की आपण अशाप्रकारे मागेही  तीनचार वेळा अपरिचित वस्तीत गेलो होतो, जिथून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. पण कोणीही मला इजा किंवा अपाय वा हल्ला करत नाही.
आणि माझ्या लक्षात येतं की ह्या  विचारातून आपण बाहेर पडावं आणि अर्धवट झोपेतून मी जागा होतो."
ही कोणतीही कपोलकल्पित गूढकथा नाही.
तर सांगायचं काय की, खरंच गेल्या काही महिन्यात मला तीनचार वेळा तरी असें अपरिचित वस्तीत आणि तीही मी राहात असलेल्या शहरातच मी परिचित रस्ता शोधत असल्याचे स्वप्न पडते आहे. प्रत्येक स्वप्नातील वस्ती मात्र एकदम स्वच्छ असते.
एरवी मी ही स्वप्नं विसरूनही गेलो असतो, पण काल पहाटे हे स्वप्न पुन्हा पडले. इतर संदर्भ वेगळे असतील पण परिस्थिती मात्र तीच, एकच समान धागा. तो म्हणजे, ' अनोळखी भागात, अपरिचित वस्तीत गेल्याचीच स्वप्ने ! '
मी हिला, माझ्या पत्नीलाही हे स्वप्न सांगितले.
याचा काय अर्थ असावा ते कोणाला विचारावे किंवा शोधून काढावे असें मला वाटू लागले आहे.
हे स्वप्न मला काही सुचवू पाहतंय का ?
माझ्या आतून मला काही सूचना मिळतेय का ?
मी येणाऱ्या काळात असा गोंधळून कोठे तरी अडकणार आहे का ?
मी सद्यस्थितीत तिथल्या तिथेच घुटमळतोय का ?
असें एक ना अनेक प्रश्न माझ्यासमोर ठाण मांडून उभे राहात आहेत. अर्थातच ही स्वप्नंच  असल्याने मला फारसे विचलित झाल्याचेही वाटत नाही, भीती नाही अथवा दडपणसुध्दा आलेले नाही. माझे कुतूहल मात्र जागे झाले आहे. मी काही फारसा आध्यात्मिक नाही किंवा मानसशास्त्राचा अभ्यासक, चिकित्सक नाही.
माझ्या मित्रांपैकी कोणाला अशा स्वप्न अभ्यासात स्वारस्य असेल,  कोणी जर मला याचा काही अर्थ असल्याचे सांगू शकले तर चालेल मला जाणून घ्यायला. पण चेष्टा नको. खरंच.
अर्थात कोणाला कांही गंभीर धोकादायक असा अर्थ सापडला आणि त्याला तो सांगावासा वाटला तर मला कसे सांगावे,  असा विचार न करता, अथवा माझी काळजी न करता त्यानी जरूर सांगावे. मला कांही त्याचं दडपण येणार नाही. किंवा मी गोंधळूनही जाणार नाही. इतका कांही मी कमकुवत मनाचा नाही.
हे जे वर लिहिलंय ते मी खरंच स्वप्नांत तीन चार वेळा तरी पाह्यलंय.

पद्मनाभ हिंगे
१९ मार्च २०१९