Sunday 5 February 2023

आज देवानं ....

 आज देवानं सगळ्यांची मनं व्यापून टाकली। 


मीही तीर्थक्षेत्री जाण्यासाठी सगळ्या कामांना दांडी मारली। 


गच्च गच्च भरलेल्या, 

ओसंडून अवघडलेल्या, ट्रॅव्हल्यांमधून भक्तमंडळी टच्च भरलेली। 

जाता जाता दिसत होती भक्तीरसांतनं थबथबलेली। 


आज देवानं सगळ्यांची मनं व्यापून टाकली। 


मज़ल दर मज़ल करत आमची स्वारी, तीर्थक्षेत्री एकदाची पोहोचली। 


पाहिलं तर काय, 'अब बब', तीर्थक्षेत्री, अमाप गर्दी उसळलेली। 

स्टॉलं काय, न् हातगाड्या काय, न् पथारीवाल्यांची हीss धांदल उडालेली। 


कॉर्नरच्या शेठजीनं म्हणे सारी देवाची  चित्रे चढ्या भावात विकून टाकलेली। 


पलीकडच्या हलवायानं सारी शिळावळ, प्रसादाच्या मिठाईबरोबर विकून टाकलेली। 


शेवटच्या स्टॉलवरच्या फुलवाल्यानं पाणी मारमारून ठेवलेली सारी ताजी फुलं दामदुपटीनं विकून टाकलेली।


देवळावरच्या भोंग्यांनी भक्तिगीतं कर्कश्श आवाजात गाऊन स्पर्धाच जणू लावलेली।


कॅसेट विक्रेत्यानं भक्ती कॅसेटी अवाच्या सवा भावानं विकून बक्कळ माया कमावून घेतलेली।  


काय किती कसे वर्णन करू, सारी भाविक जन्ता भक्तिसागरात बुडून गेलेली।


कुणी रडताना, 

कुणी अंगात आलेलं दाखवताना,

कुणी नवस फेडताना, 

कुणी नवस बोलताना, 

कुणी साकडं घालताना, 

देवालाच लालूच दाखवताना,

दानपेटीत नोटाच नोटा कोंबताना,

सारं पहात पहात, देवाचं माझ्याकडे लक्ष वळावं म्हणून मीही काय करावं?

विचारात पडलो। 

भांबावलो..

पाहून‌ देवाच्या दराऱ्याला..

देवभक्तांच्या अत्युत्साहालाच घाबरलो !!


इतक्यात, देवाची जेवायची वेळ झाली। 

स्स .. दार बंद

अहो लांबून आलोय ..

दोन मिनिटं..



'लवकर येण्याची घाई म्हणे करता नाही आली !!!'

आता थांबा..

रेटारेटीत

मारा बोंबा..

खेटाखेटीत.


दार बंद देव्हाऱ्याचं..

कधी ते उघडायचं..

देवाला मी भेटायला आल्याचं; 

ते कधी हो कळायचं?


आधीच पाहिली होती मी आल्या आल्या तीर्थक्षेत्री, खूप मोठी रांग देव दर्शनाला उभी राहिलेली। 


माझी तर आज गात्रंन् गात्रं भक्तिरसात बुडालेली। 


घड्याळ पाहिलं न् मध्यस्थाला ..

दोन मागत होता, नोटा.. !!

घासाघीस केली.. सक्सेसफुली !!

पाचशेची नोट देऊन टाकली। 


तासाभरात क्षणभरच, देवासमोर, आमची स्वारी उभी राहिली। 

कुणीतरी माझं मानगूट धरून माझं मुंडकं आपटलं..

धोपटल्यासारखं 

करीत पाठीवर थोपटलं..

चला .. आटपा..


क्षणभरच, हो.. 

क्षणभरच,

देवाची मूर्ती मला पाहून कुत्सितपणे हसलेली भासली।


चिडलेला, 

कंटाळलेला,

संतापलेला, 

देव हळहळता वाटला। 

'सगळीकडे माझाच-देवपणाचा बाजार मांडलेला।'

असं काहीसं पुटपुटताना भासला। 


श्रद्धाळू जन्तेला, ना जाणे कुठला आजार झालेला।


बाहेर आलो,

घामात घामेजून गेलेलो..


चला काही खरेदी करू..

कळसाला तरी नीट पाहू..


रस्त्यावर देव विकणारा मूर्त्या मांडून बसलेला। 


शंभरला मूर्ती देतो म्हटला, पन्नासला मागितली, परवडत नाही म्हटला। 


प्रसादाचे द्रोण दिसले,

त्यातले अन्नकण अस्ताव्यस्त सांडलेले..

कुत्र्या पक्षांच्या भांडणात 

विस्कटलेले,

काही कचऱ्यात गेलेले

काही अनवधानाने माझ्याच 

पायाखाली !! कचरा.. !!

ढीगच्या ढीग कचऱ्याचे..

कुणी कधी निस्तरायचे?


रात्री निघालो, तीर्थक्षेत्रातून. 

केवढा शीण तो, ढाब्यावर बसलो।

मी गेलेलो होतो थकून, 

माझ्याकडे पाहून

पोऱ्या म्हटला खेकसून, 

अंगठा वर करून !!


'साहेब कुठली आणू..?' 


स्वत:शीच हसलो..

भरून पावलो....


किती हो पुण्यवान मी, 

कितीतरी पुण्ये पदरात पडली,

कारण..

आज देवानं सगळ्यांचीच मनं व्यापून टाकलेली !! 


पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे,

सुसंस्कृत पुण्यातून..

Saturday 4 February 2023

खुश झाली मजवर माझी धरती..

 खुश झाली मजवर माझी धरती


       पावसानं ओढ धरली की, शेतीचं सारं नियोजन पूर्ण फसतं. यंदा मृग, आर्द्रा आदी पावसाची खरीप हंगामातली नक्षत्रं कोरडी गेली. 

       पाऊस का रुसला; देव जाणे! पीक घ्यायचं तर ओल नाही! पाऊस कधी पडणार? वाफसा आलेला कधी कळणार? मन जरा खट्टुच झालं होतं. जून जुलै हे ऐन पावसाचे महिने ठणठणीत कोरडे गेले. आषाढाचा महिना आशा लावून परस्पर निघून गेला होता. आमच्या मांडवगणच्या चारी बाजूंनी जोरदार पाऊस झाल्याच्या, होत असल्याच्या, बातम्या आल्या. गावाच्या भोवताली चारही बाजूला पाणीच पाणी आणि मांडवगण म्हणजे जणू काही एखादं कोरडं ठणठणीत बेटच!

       खरीपाच्या हंगामात कुठलीच पेरणी करता आली नाही. हंगाम वायाच गेला. सारी झाडं बिचारी आसुसलेली! कोरड्या नजरेनं पावसाची वाट पाहत होती. जे काही विहिरीत थोडं पाणी आहे ते थोडं थोडं देऊन जगवायचं त्यांना, ते केलंही! किती आवडीनं उत्साहानं लावली ही झाडं. कितीसं पुरणार त्यांना हे पाणी. त्यांना बिचाऱ्यांना वाचाही नाही की सांगावं बुवा, "घसा कोरडा पडलाय हो. कुणी पाणी देता का पाणी!" 

       आणि...  प्रार्थना ऐकली वरूण देवानं !! पाऊस आला, पडला. घर गळलं आणि गळलेलं अवसान पुन्हा उभं राहिलं.

       थोडा कांदा पेरला, हरभरा पेरला, गहू पेरला, ज्वारी पेरली. शेवग्यानं पुन्हा उभारी धरली. पेरूच्या पानांना झळाळी आली, सीताफळ, मोबाईल मध्ये पाहून हसू लागले. अजून पीक वाढतंय, दाणा धरायला वेळही लागेल.

       दोन वर्षे डाळिंब रुसलं होतं, आमच्यावर नाही हो, ढगाळ वातावरणावर! मग विचार केला आणि एक वर्षाची डाळिंबाला विश्रांतीसाठी सुट्टी देऊन टाकली.

       सकाळी, मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो... 

       हो, मला माहीत आहे, 'सकाळी, मॉर्निंग वॉक..' असं बोलून जोक टाकला, तसा तो शिळा झाला आहे. असो. 

       ते जाऊ देत. प्रत्येक वावरात जाता जाता साऱ्या पिकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली. आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यानं त्यांची प्रसन्न छबी टिपण्याचं काम सुरू केलंही. हळूहळू काही शब्दही गप्पा मारायला आले. चला, जरा ऐकूयात शब्दांच्या गप्पा..!!

       


   गहू आला तो आला उगवून वरती

   खुश झाली मजवर माझी धरती


   हरभरा भरभर आला

   घाट्यांनी गच्च भरलेला

   कांदा पात ती हिरवीगार

   खाली कांदा तो भरदार

   पाहून आले मोठे मोती

   डोळ्यांतून टपटप गळती

   हसू फुटले हो माझ्या गालावरती

   खुश झाली मजवर माझी धरती


   सीताफळ मारी डोळा

   पेरूचे वय जणू सोळा

   ज्वारीची कणसे डुलती

   वाऱ्याच्या सूरांवरती

   जीव जडला हो शेवगा फुलांवरती

   खुश झाली मजवर माझी धरती


   आला पौष महिना जवळी

   बहार घेण्या लगबग सगळी

   झाली वर्षाची विश्रांती

   फुलण्याही आतुरली ती 

   डाळिंबे वाट पहाती

   जीर्ण पाने ती झरझर गळुनी जाती

   मग येईल हो अनारकली फुलून वरती

   खुश झाली मजवर माझी धरती..


       तर, अशा गप्पा ऐकल्या शब्दांच्या..



पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे,

पुण्याला निघता निघता..

शुभकृतनाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु. 

मिती : मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी, शके १९४४.

गुरुवार, दिनांक : १५ डिसेंबर २०२२

Tuesday 31 January 2023

इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र.

 इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र


       'इश्य' .. हा डाळिंबी ओठांतून आलेला अतीव मधाळ शब्द ज्यांनी आपल्या आयुष्यात ऐकला असेल, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. ज्यांना हे भाग्यच मिळालं नाही ते मात्र करंटेच म्हणायचे. इतका रसरशीत मंत्रमुग्ध करणारा शब्द, आला कसा, कुठून, म्हणजे त्याची व्युत्पत्ति काय याचा शोध घ्यावा म्हणून मी माझ्या बुद्धिला आवाहन केलं.

       झालं. बुद्धिने शोधकामाला सुरुवात केली. आता तातडीने आपल्याला विश्वकोश कोठे मिळणार, याची बुद्धिला कल्पना होतीच. ती सरळ बोटांत उतरली आणि तिनं मला आंतरजालात नेऊन सोडलं. आंतरजाल, I mean internet. बरीच खटपट शोधाशोध केली. इश्यच्या ऐवजी सालं इश्क़ इश्क़ हाच शब्द दिसू लागला. 

"इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया

वरना हम भी आदमी थे काम के"

असाच 'मिर्ज़ा ग़ालिबचा' शेर सारखा चोंबड्यासारखा डोकवायचा! चिडचिड झाली हो. या इश्क़ तला शेवटचा क़ शेवटी कुचकामीच करणारा असेल तर उपयोग काय? एकवेळ वाहवत गेलो तरी चालेल, पण वाहून जाण्यात काय अर्थ? नाही का!आम्हांस 'कर्माचं' महत्व महाभारत काळापासून सांगितलं जातंय. मग निकम्मा कुचकामी होऊन कसं चालेल!

       त्यात मध्येच 'ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़' हे रफीच्या आवाजातले शब्द ऐकू आले. पण आमचं ठरलं होतं ना, आम्ही साहिर लुधियानवीला तोडक्या मोडक्या हिंदीत बजावून सांगितलं, "बाबा रे, तुम्हारी इस उर्दू बोलीमें भलेही ख़ूबसूरत मिठ्ठास हो, लेकिन हमें 'ना तो कारवां की तलाश है।' हम बस हमारे 'इश्य' शब्द की व्युत्पत्ति जानना चाहते है।" बिचारा शांतच झाला!

      मग अस्मादिकांनी म्हणजे मी, आम्ही! कसंय विश्वकोश वगैरे जडजाल शब्द वापरून व्याकरण, व्युत्पत्ति शोधण्याची शर्थ करणारी व्यक्ती विद्वान असणार ना! म्हणून स्वत:ला आदरार्थी संबोधून सांगण्याचा जरा बळेच प्रयत्न केला, इतकंच.

       हे बघा, म्हणून काही कुणी आम्हांस 'विद्वान आहात' असा उपरोधिक टोमणा मारू नये. आम्ही करतोय ना प्रयत्न, 'इश्य' शब्दाची व्युत्पत्ति शोधण्याचा!

       'धुंडाळले आम्ही जाल ते आंतरीचे ।

       हाय ना काही मिळाले, शल्य बोचले अंतरीचे !!'

       'शुक्रिया शुक्रिया'

       च्यायला, बुद्धिला म्हटलं, चल जाऊ दे. आपण काय निकम्मे, कच्चे, कुचकामी आहोत की काय! आपणच तयार करूयात 'इश्य' शब्दाची व्युत्पत्ति! एक त्रैराशिक मांडलं. 

       ज्याअर्थी इश्य शब्दाची व्युत्पत्ति, जगद्विख्यात आंतरजालात सापडली नाही,

       त्याअर्थी हा शब्द कोहिनूर हिऱ्यासारखा आंतरजालाला दुर्मिळ झाला असेल! 

       माऊली, ज्ञानेश्वर माऊली, क्षमा करा, तुमच्या ओवीचा आधार घेऊन अभिमानाने सांगतो,

      " इये मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळु करी। घेणे देणे सुखचि बरी। हो देई या जना।।"

       माझी ही माय मराठी मूळचीच अभिजात आहे, समृद्ध आहे. या नगरीचा कायम रहिवासी असण्याचा मला सार्थ अभिमान आहे.

       प्रस्तावना फार बोजड रेंगाळलेली कंटाळवाणी होऊ नये.  आवरतं घेतो. कारण 'इश्य' हा शब्द इतका मधुर आहे की त्यातली गोडी अवीट, हवीहवीशी वाटायला हवी. प्रस्तावनेचं आख्यान बेचव व्हायला नको.

       कुणी 'इश्श' म्हणतं. मी ऐकला वाचलेला हा शब्द 'इश्य' असा आहे. 'मुळात 'इश' या शब्दांतच 'य'च्चयावत सुख ठासून भरलंय. श अर्धाच असायला हवा. तो गोडसा आलेला अर्धामुर्धा शहारा व्यक्त करतो. 'य' हा यशस्वीतेतला पहिला शब्द. ईश्वरीय सात्विक शृंगारिकतेच्या पदार्पणातला मोहक हवाहवासा वाटणारा शहारा, जो या यशातल्या पहिल्या पायरीचा सुखदानुभवी इशारा देणारा अप्रतिम शब्द. या शब्दाचा उच्चार अत्यंत नाजुकश्या डाळिंबी ओठांतून बाहेर पडतांना मोगऱ्या सारख्या मोहक स्वच्छ सुगंधी दंतकळ्यांतून अवचित बाहेर पडतो. आधीच तो जिव्हेचं अमृतमयी माधुर्य घेऊन जिव्हेवरच नाचताना बाहेर पडण्यासाठी अधीर झालेला असतो! आणि अवखळपणे निसटतोच. 

       अर्जुनाने भलेही पाण्यात पाहून वर न पाहतां, धनुष्याला बाण लावून प्रत्यंचा ओढत मत्स्यभेद केला असेल. पण कदाचित त्याआधी त्या सौंदर्यवती कोमलांगी द्रौपदीच्या धनुष्याकृती भ्रुकुटीमध्यातून सुटलेल्या नयनबाणाच्या अग्रावर आरुढ झालेल्या 'इश्य' नावाच्या मोहिनी मंत्राचा त्या नयनबाणावर सलज्ज अभिषेक नक्कीच झाला असला पाहिजे. 

       मला महाभारत मालिकेतील सर्व धनुर्धरांच्या प्रतिमा दिसू लागल्या. आकाशाकडे बाणाला दिशा देत, डोळे मिटून काहीतरी मंत्र पुटपुटत, अग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, पवनास्त्र सोडणाऱ्या दिग्विजयी धनुर्धारांना केवळ अर्धोन्मिलीत नेत्रांतून हळुवार 'इश्य' मंत्राचा उच्चार करीत मनमोहक सुंदरीने सोडलेल्या ह्या घायाळास्त्राने कितीही पोलादी पहाडी छाती असलेला अगदी पाषाणहृदयी धनुर्धर घायाळ होणारच.

       तर असा 'इश्य' या शब्दाचा अर्थ आणि त्याची व्युत्पत्ति शोधण्याचा आमचा प्रयत्न आवडला असेलच. अजून खूप काही सांगणार होतो. पण म्हटलं बघूयात आपल्याला नेमक्या निवडक शब्दांतून 'इश्य' उलगडून दाखवता येतंय का ते!


इतकेच मला लिहितांना 'इश्य' हे कळले होते।

'इश्य'नेच केली सुटका आंतरजालने छळले होते।।


       म्हणून म्हटलं..

"इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र.."


पद्मनाभ प्रभाकर हिंगे,

मुंबई.


०७ जानेवारी २०२२

सकाळी ११.१०.

Monday 30 January 2023

अजून खूप काही..

 कटू आठवणींना अडगळीतच ढकलायचं असतं

उगाच नुसतं दु:ख उगाळत कधी बसायचं नसतं


सुखद वारा, वावटळ घेऊन आला तर, गोंधळायचं नसतं

देव नेहमीच परीक्षा पहात असतो, आपण सज्ज रहायचं असतं


सुखाचे शब्द दृष्टावतही येतात, दुर्लक्षित करायचे असतात

खवचट बोलणे, टिकेचे टोमणे विसरूनच जायचे असतात


प्रेमाची, मदतीला धावून येणारी माणसं बांधून ठेवायची

कटकट्या, टवाळी करणाऱ्यांची दखल तरी का घ्यायची


वाट आपली, जगणं आपलं, कष्ट आपले, समस्या आपल्या, 

बघून घ्यायच्या आपणच आपल्या

का सहन करायच्या टपल्या


म्हणतात ना, 'मान सांगावा जनात

अपमान ठेवावा मनात'

'आपलीही वेळ येतेच की', हेच तर राहू द्यायचे ध्यानात.


शक्यतो वर्तनानं, बोलण्यानं आपण कधी चुकायचं नसतं

झालीच चूक, क्षमा मागून, प्रकरण मिटवून टाकायचं असतं


उन्हाळी पावसाळी हिवाळी, जसे ऋतु निसर्गाचे

रात्री नंतर दिवस जसा, नियम असेच जगायचे


अजून खूप काही....


Yours पॅडी.


पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

30 जानेवारी 2023

दे .. दणादण

 उदास वाटायला लागलं की 'श्रीहरी' चं दास व्हायचं

कंटाळवाणं वाटायला लागलं की, पोथी, पुस्तक वाचायचं


कमकुवतपणा वाटायला लागला की प्रार्थना करायची

धीर धरला की फळं मिळतात, मग जिद्दच का सोडायची


धूर कोंदटला की आपण नाही का दूर पळत जातो

घास शिळा आंबूस झाला की आपण टाकूनच देतो


अनुभवातनंच तर खूप काही शिकायला मिळतं

पाय घट्ट रोवून उभं राहिलं‌ की जगायचं कसं, कळतं


'सर सलामत तो पगडी पचास' कधी ऐकलं असशील ना 

वार चुकवलेच नाही तर फटकेच खात बसशील ना


मुंगी होऊन साखर खावी, माशी होऊन मध साठवावं

धाकटं व्हावं, निगरगट्ट व्हावं, गोड बोलून साधून घ्यावं


कळला का सुखाचा मंत्र तुला, पडली का गालावर खळी

हसत हसत सामोरं जायचं, हसलीस ना, आता दे टाळी


पुन्हा एकदा..

येडं म्हण, गधडं म्हण, पद्या म्हण,  पॅडी म्हण.

उगाच कुणी वाटी गेलं तर मात्र .. दे दणादण.


पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

दिनांक : 30 जानेवारी 2023

Saturday 28 January 2023

किती कविता कराव्यात तरी..

 किती कविता कराव्यात तरी...


       सकाळी १० वाजता ऑफिससाठी बाहेर पडायचं. संध्याकाळी गोडीच्या ओढीनं घरी यावं तर कुलूप !!

       हिचं काय तर म्हणे, संध्याकाळी नानानानी पार्कात कट्ट्यावर मैत्रिणींना भेटायचं. 

नाव Morning Walkचं,

तेही संध्याकाळचं !! 

 

       आजकाल तर काय...

निमित्त हळदीकुंकूवाचं,

निमित्त बोर न्हाणाचं

काल तर हद्दच !! मॅडमचं...

१० वाजून गेल्यावर दर्शन होतं व्हायचं.

मला सांगा, मग मी काय करायचं?


येतात माझे मग 'सवंगडी ..'

कुणी सोमरसाच्या सुरया घेऊन येतं !

कुणी मधाचे, अमृताचे कलश घेऊन येतं !

कुणी रंगीले, कुठून कुठून रंगांचे डबे घेऊन येतं !

कुणी गुलाब, मोगरा, जाई, जुई, चाफा अशी फुलं घेऊन येतं !

कुणी तर पर्फ्युमचे फवारे घेऊन येतं !!

वातावरण कसं मोहक, 

नशिलं, रंगीन, शृंगारिक, सुगंधी.

आणि बरं का हे माझे सवंगडी

फेर काय धरतात,

नाच काय करतात,

गाणी काय गातात,

कविता काय करतात..


कविता करण्यासाठी,

त्यात नेमक्या ठिकाणी येऊन बसण्यासाठी

हसत खेळत खुलवण्यासाठी..


हे 'सवंगडी', माझ्या मैत्रिणीने, प्रतिभेने पाठवलेले.. छान छान 'शब्द' हो...



आणि दार उघडून ही आत येते,

अजून जेवला नाहीत?

अजून झोपला नाहीत?

मोबाईल मध्ये डोकं घालून बसलात?


हसलात...?


आता अग कविता आली होती..

कुणासाठी?

अग तुझ्यासाठी ..

हॅट..

हॅट काय हॅट... ऐक 

मी बळं बळं ऐकवतो..



   'किती कविता कराव्यात तरी  

   त्यात काही तू बसत नाहीस

   शब्द शब्द शोधून काढतो पण 

   नेमके काही ठसत नाहीत


   किती नक्षत्रांना ओढून आणलं

   किती अप्सरांना शोधून आणलं‌

   कुणीच तुझ्या पंक्तीत शोभून   

   काही दिसत नाही

   किती कविता कराव्यात तरी 

   त्यात काही तू बसत नाहीस


   गुलाब मोगरा रोजचेच दिसतात

   जाई जुई सारेच सुगंधित करतात

   'शाल्मली' जिथे उभी तिथे,   

   फूलच कुठले उठून दिसत नाही

   किती कविता कराव्यात तरी

   त्यात काही तू बसत नाहीस


   लाडूपेढ्यांची मिरासदारी माझ्यापुढे

   आंबा मधाची मक्तेदारी माझ्यापुढे 

   काय धिंगाणा घालणार

   कितीवेळ भुलवणार


   'शाल्मली' तुझ्या गोडव्यापुढे  

   काहीच मला रुचत नाही

   किती कविता कराव्यात तरी  

   त्यात काही तू बसत नाहीस


   मोठ्या कवींचे शब्द शोधून 

   काढले

   कवितेत तुझ्यावर वापरून

   पाहिले

   कानामनावर आठवणीतही

   काही उमटलंच नाही

   वापरलेले, घुसवले पण,

   त्यांचा प्रभाव काही पडत नाही

   किती कविता कराव्यात तरी

   त्यात काही तू बसत नाहीस


   बस आता मी इथेच थांबतो

   फक्त तुझ्याकडे पहात राहतो

   कुठल्याच उपमानाने तुझ्या  

   रुपाचं वर्णन करता येत नाही

   किती कविता कराव्यात तरी   

   त्यात काही तू बसत नाहीस




पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

पुणे.

दिनांक : २८ जानेवारी २०२३

रात्रौ ठिक १०.०० वाजता.

कल्पनाच मी केली नव्हती..

 कल्पनाच मी केली नव्हती..


   'शाल्मली..'


   तुझा चिकटपणा

   तुझा चिवटपणा

   तुझा कडवटपणा

   याची कधी माहितीच मला    

   नव्हती..


   तुझं नाजुकपण

   तुझं देखणेपण

   तुझं स्त्रीपण

   यापलिकडे मी तुला कल्पिलीच

   नव्हती..


   तुझा कणखरपणा

   तुझा बाणेदारपणा

   तुझा करारी बाणा

   याची दखल मी कधी घेतलीच

   नव्हती..


   मोहक पदलालित्यात

   येत डौलात 

   सात पावलात

   व्यापून टाकशील संसार, कुवत 

   तुझी कळलीच नव्हती..


पण झालं...

   ...ते चांगलंच झालं

   नशीबच जणू,

   पूर्वजन्मीचं पुण्यच फळा आलं


   'वज्रादपि कठोराणी 

   मृदुनी कुसुमादपि..'


   तरीही निर्मळ, वागण्यात

   संसारगाडा हाकण्यात

   चिंतामुक्त ठेवण्यात

   अशी एखादी कोमला सुंदरी 

   असू शकेल जीवनसाथी, 

   अशी तुझी ओळख मलाच काय 

   कुणाला झालीच नसती..


   मुंगी होऊन साखर गोळा  

   केलीस

   मक्षिका होत मध आणू  

   लागलीस

   सुरेख संसार करीत राहिलीस

   निवड तुझी चुकलीही असेल

   माझी निवड चुकली नव्हती..


   

   माझ्या सुखद जीवनाची आखणी देवानंच तर

   केली नव्हती...



पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

पुणे.


दिनांक : २८ जानेवारी २०२३