मुख़्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते
ऐसी अक्षरेच्या विशेषांकाचे प्रकाशन.
मंगळवार २0 जूनचा दिवस अविस्मरणीय होता. ऐसी अक्षरे चा मे / जून २०१७ चा अंक वृत्तपत्रीय साहित्यावर करू या, असे
समीर बेलवलकर यांनी सुचवले. आणि हा वेगळा विषयच अशा साहित्याच्या
शोधमार्गावर घेऊन निघाला. अंक कसा असावा, याविषयी ह्या विषयातल्या अनुभवी व्यक्तिंशी संपर्क
साधला. लोकसत्तेचे श्री. मुकुंद संगोराम, सकाळचे श्री. मल्हार अरणकल्ले, महाराष्ट्र
टाइम्सचे श्री. श्रीपाद ब्रह्मे यांचे बरोबर चर्चा केली. ज्येष्ठ पत्रकार श्री. ह.
मो.मराठे, सकाळचे श्री. विजय सबनीस यांची मदत झाली.अंकाने आकार घेतला आणि या अंकाचे एका मोठया व्यक्तीच्या हस्ते प्रकाशन करायचे ठरले.
राजेश दामले यांनी नेहमीच्या उत्साहाने कामास सुरुवात केली.
पुण्याच्या आमदार मा. सौ.मेधाताई कुलकर्णी यांनी पाठपुरावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली.
मंत्रालयात मुख्यमंत्री साहेबांच्या दालनांत गेलो तर तिथे सारीच मोठमोठी मंडळी देवेंद्रजी यांच्या भेटीसाठी तिष्ठत बसलेली होती.
मंत्री, खासदार, आमदार, यांच्याबरोबर थांबलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना पाहिल्यावर आपल्याला प्रकाशनासाठी वेळ मिळणार का अशी धाकधुक वाटत होती.
मुख्यमंत्री देवेंद्रजी आले आणि म्हणाले, "चला अंकाचे प्रकाशन करू या ! "
उत्साह आणि आनंद या दोन्ही भावनांनी मनात झालेल्या गर्दीत आपोआप आवश्यक हालचाली होऊ लागल्या.
तिथे जमलेल्या साऱ्या मंत्री, आमदार, खासदार, आणि काही महत्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तिंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी, मखमली वेष्टणात बांधून ठेवलेले ऐसी अक्षरेचे अंक बाहेर काढले आणि आम्हां प्रत्येकाच्या हातात अंक देत या विशेषांकाचे प्रकाशन केले. झटपट फोटोग्राफरने या अविस्मरणीय सोहळ्याचे फोटो काढलेही.
नंतर आम्ही शिक्षण मंत्री मा. विनोदजी तावडे यांच्या दालनांत गेलो तिथेही गर्दी. विनोदजींना अंक दिला.
ऐसी अक्षरेच्या या अंकात विविध मराठी वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेले ललित वैचारिक साहित्य घेतले आहे. लो.बाळ गंगाधर टिळक यांचे केसरीमधील दोन लेख या अंकात आहेत. इ.स. १८९५ मधल्या केसरीच्या अग्रलेखात लोकमान्यांनी शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीत आपले विचार मांडले होते. तर १९०५ च्या केसरीच्या अग्रलेखातले लोकमान्यांचे मराठी भाषेविषयीचे परखड विचार आजच्या काळात किती महत्वाचे आहेत हे लक्षात येते. हा अंक वाचनीय आहे. तरुणांनी जरूर वाचावा.
ह्या सुन्दर अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, हा माझ्यासाठी विलक्षण आनंदाचा योग आहे. असे काही क्षण अनुभवांयला मिळणे हे सुख ऐसी अक्षरेने दिले. गेली चौदा वर्षे अव्याहत चालू असलेला हा आगळावेगळा उपक्रम आहे.
मस्त्त वाटतंय.
हा आनंद मित्रांना शेअर करायलाच हवा ना.
ऐसी अक्षरे चा अंक विनामूल्य असतो.
पद्मनाभ हिंगे, पुणे.
२२ जून २०१७.
No comments:
Post a Comment