'माय नेम इज शीला शिलाकी जवानी !'
ओळखलंत ?
थोडा ताण द्या ना….
नीsssट निरखून पहा….
लाजू नका गडे ….
कोणी ओरडणार नाही….
बाईंकडे इतके निरखून काय पहाता म्हणून कोणी विचारणार नाही
म्हातारीच तर आहे ना ! हां आता ज़रा नीट नेटकी दिसते आहे खरी. व्यवस्थित नट्टा पट्टा केलाय बाईंनी . केस पांढरे दिसत असले तरी नीट चापून चोपून बसवले आहेत. वय जास्त दिसत असलं म्हणून काय झालं, म्हातारीने तोंडाला रंगीत ओष्ठकांडी-लिपस्टिक-लावलीये, पावडर कुंकू केलंय. त्यामुळे चेहरा कसा टवटवीत एकदम फ्रेश दिसतोय. नक्कीच म्हातारी तरुणपणी ज़रा जास्तच दिलखेचक दिसत असावी, नाही का ? तुम्हालासुद्धा असं वाटतंय ना ? ज़रा एनलार्ज करून पहा. काही ओळख पटतेय का ?
अजून नाही ओळखता आलं ? कम्माल आहे
चला, आणखी एक फोटो दाखवतो. पहा.
आज्जीबाई नाचतच आलेली दिसतेय.
आता तरी ओळखलंत का ?
आता ओळखलं असावं बहुतेक तुम्ही.
हा हिरवट अवतार असून असून असणार तरी कोणाचा ?
तुम्ही ओळखलं असेल तर ठीक, नसेल तर मला विचारा.
म्हणजे मीच फोटो दाखवतोय तर मीच सांगणार ना.
तीन वर्षे झाली. ही म्हातारी रंगमंचावर आली ती नाचत नाचत. गिरक्या घेत. मस्त लचकत मुरडत. आणि गाणं कोणतं, तर 'माय नेम इज शीला..शिलाकी जवानी !'
या म्हाताऱ्या शिलाच्या एन्ट्रीवर उपस्थितांनी शिट्ट्या काय वाजवल्या..आरडा ओरडा काय केला, काही विचारू नका. नुसता धिंगाणा….
एंट्रीच जबरदस्त मग शिट्ट्या तर येणारच. म्हातारीला या वयातसुद्धा डिमांड !!
माझ्या तरुण मैत्रिणींनो प्लीज जेलस होऊ नका.
या बाई नसून बाईंच्या वेशात प्रकटलेला पुरुष आहे. आणि 'तो मी नव्हेच' असं मी कधीच म्हणणार नाही.... कारण ती… नाही तो… मीच आहे.
खूप वर्षांनी मी रंगमंचावर आलो ते अश्या स्त्रीवेशात. शाळेत नाट्यवाचनाच्या स्पर्धेत मी भाग घ्यायचो. कॉलेजमधे कधी संधी नाही मिळाली. सुदर्शन केमिकल्स मध्ये असताना भरत नाट्य मंदिराच्या ललित औद्योगिक एकांकिका स्पर्धेत मात्र मला संधी मिळाली. रंगमंचावर येण्यात एक सुरेख आनंद असतो. हा आनंद मला त्यावेळी मिळाला. छोट्या छोट्या भूमिका करायला मिळाल्या, कधी श्रीकृष्णाची मुख्य भूमिकाही करायला मिळाली. दूरदर्शनच्या एका टेलेफिल्ममध्ये एक छोटीशी भूमिका करून छोट्या पडद्यावर झळकायची एक सुप्त इच्छाही पूर्ण झाली. अभिनय करायची खूप हौस होती, फिटली. आजही संधी मिळाली तर मागेपुढे पाहणार नाही.
अशी स्त्रीची भूमिका मात्र प्रथमच साकारायला मिळाली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या स्त्रीपात्राच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांची दाद तर मिळालीच, प्रथम पुरस्कारही मिळाला. प्रपंचाच्या नित्य धबडग्यात थोडासा का होईना हा आनंद उपभोगता आला. या स्त्रीरूपाचं सारं श्रेय मात्र त्या रंगवेशभूषाकाराचंच.
कसबापेठेत पूर्वी राहत असताना ४५-५० वर्षांपूर्वीची एक रंगपंचमी आठवते. रंगपंचमीच्या दिवशी आमच्या गल्लीत मोठा धिंगाणा असायचा. खूप धमाल असायची. एकदा आमच्याच गल्लीतला प्रताप मालेगावकर हा स्त्रीवेशात प्रकटला. सोज्वळ चेहरा, डोईवर पदर, हातात स्वयंवराचा हार घेऊन !! देखण्या चेहऱ्याचे वरदान आणि सडपातळ बांधा यामुळे त्याचे हे स्त्रीरूप पाहण्यासाठी सारी गल्ली गोळा झाली होती. खरोखरीच खूप देखणे रूप होते ते. हा पुरुष आहे हे चटकन कुणालाही कळलेच नाही. जो काही मेकअप होता तो सुद्धा अगदी साधा घरगुती होता. गल्लीतला स्त्रीवर्गसुद्धा तोंडाला पदर लावून हसत होता. मुलींमध्ये तर पुढे कितीतरी दिवस गप्पांत हाच विषय होता. प्रताप पुढे व्यावसायिक नाटकात काम करायचा. त्याचे ते देखणे स्त्रीरूप, ते चालणे, वागणे, लाजणे आजही माझ्या आठवणीत आहे.
गेल्या शतकात बालगंधर्वांचे ते अजरामर शालीन स्त्रीरूप आजही मराठी रसिक मनामध्ये आदरणीय होऊन बसले आहे. अनेक कलाकारांनी आपापल्या कुवतीप्रमाणे स्त्रीभूमिका रंगमंचावर गाजवल्या. रितेश देशमुख हा प्रसिद्ध अभिनेताही एका हिंदी चित्रपटात स्त्रीवेशात फारच सुंदर दिसला होता. ' कुणीतरी येणार येणार गं ' म्हणत नाचणारा सचिन स्त्रीवेशात किती गोड आणि मोहक दिसला होता, हे आठवतंय ना. आताशा छोट्या पडद्यावर काही अभिनेते स्त्रीवेशात अवतरतात. त्यांच्या त्या भूमिकांना ते उत्तम कलाकार असल्याने उत्तम न्यायही देतात. पण तो भडकपणा, अतिरेक सारखा सारखा बघायला नकोसा होतो. मी केलेली शीला आगाऊ होती, खटयाळ होती, मात्र वाहवत गेली नाही. असो.
इथे मी कुठेही समीक्षकाच्या नजरेतून पहात नाही. तो माझा पिंडच नाही. मनातली एक इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद इतरांना वाटला की वाढतो म्हणतात. म्हणून हा आनंदी अनुभव सांगतोय.
पद्मनाभ हिंगे, पुणे.
३० में २०१७.

No comments:
Post a Comment