Monday, 27 March 2017

Thank God...

                                                        ॥ श्री गणेशाय नमः ॥

नमस्कार मित्रांनो,
आज गुढी पाडवा. नवीन हेमलंबीनाम संवत्सराची सुरुवात.
चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९३९.

तुम्हाला, तुमच्या स्नेही कुटुंबियांना सहस्रावधी शुभेच्छा.

आज या नव्या वर्षाचा पहिला दिवस.
एक गंमत सांगू ?
आज २८ मार्च. तुम्ही म्हणाल हो माहीत आहे, 'त्यात वेगळं ते काय? कॅलेंडर बघतो आम्ही !!'
बरोबर आहे तुमचं. पण आज माझ्यासाठी एक विशेष योग आहे.
योगायोगानं, खरंच योगायोगानं, माझ्या जीवनातल्या नव्या वर्षातले आजचे हे माझे पहिले पाऊल.
म्हणजे,
रडायला सुरुवात करून बरोब्बर सहावर चार वर्षे झाली बघा आज मला. सहावर चार म्हणजे चौसष्ट हो. तुम्हाला सहावर चार चौसष्ट हे कळणार नाही असं मला आपलं वाटलं म्हणून ज़रा स्पष्ट करून सांगितलं, इतकंच. लहानपणी, घरी तालासुरात एक ते शंभर आकडे  म्हणत असू याची आठवण झाली. तेंव्हा सहावर पूज्य साठ, सहावर एक एकसष्ट, सहावर दोन बासष्ट, सहावर तीन त्रेसष्ठ असे आम्ही मोठमोठयांदा घोकायचो. असो. तर सांगायचे काय की, रडायची सुरुवात म्हणायचं कारण म्हणजे त्या दिवसापासून जे दिसेल, मनाला हवंहवंसं वाटेल, किंवा माझ्याकडे तुम्ही लक्ष का देत नाही म्हणून रडूनगागून अगदी भोकाड पसरून हट्ट करायचा हीच सवय या दिवसापासून लागलेली. बरं त्यासाठी स्वतः काही करायचं का? ...... तर नाही. आयतं मिळायला हवं ही मानसिकता !!!
तर सांगायचे असे की आम्ही आज चक्क चौसष्ट वर्षे पूर्ण करते झालो. केवढे हे शौर्य, नाहीं का ?
सकाळपासून Whats App / Facebook वर माझं कौतुक मी पहात राहायचं. कोणी भेटून बर्थडे विश देणार. मी म्हणणार मी चौसष्ट वर्षाचा झालो. तो म्हणणार " चल यार 64 is just a number. You are still Young !!! "
मी उगाच विरळ झालेल्या डोईवरच्या धवल केसांवरून हात फिरवणार. कुणीतरी आणलेल्या मिठाईच्या बॉक्स कड़े ओशाळलेल्या नजरेनं पाहणार. याचवेळी डॉक्टरने दिलेला सल्ला मला नेमका आठवणार. 'बस आता गोड खायचं नाही, शुगर लेव्हल मेंटेन करायलाच हवी, ' तिकडून मालकीणबाईसाहेब सल्ला देणार, "आजपासून वाहन चालवावयाचे नाही हो,"
कन्या, चिरंजीव म्हणणार, "गाडीची किल्ली काढून घ्या आणि लपवून ठेवा, आता रायडिंग शायनिंग बस्स झालं." वगैरे वगैरे...
चालायचंच झालं.
हे सगळं खरंच आहे म्हणा, ६४ हा नुसता आकड़ा नाही तर वास्तवातलं माझं वय आहे आणि चुकूनही आता तो ४६ होणार नाही, हे नक्की,
हे मात्र नक्की कळलं आहे की, देवाने आपल्याला जो जीवनपट दिलाय तो आजवर तरी नक्कीच ६४ घरांचा होता. आता ह्या जीवनपटाला किती जादाची घरं बोनस म्हणून मिळणार हे मात्र सर्वस्वी 'त्याच्यावरच' अवलंबून असणार, नाही का ?....
हां, आता ह्या आजवरच्या ६४ घरातली निम्मी घरे पांढरी आणि निम्मी काळी असायला हवी होती. पण, काळी थोडीफार नव्हे तर ज़रा जास्तच रेखाटलेली असावीत असा उगाचच भास होतो मला. पण आपण कशाला एखादं घर चांगलं वाटलं म्हणून त्याला पांढरं म्हणायचं आणि एखादं मनासारखं नाही वाटलं म्हणून त्याला काळं म्हणायचं ? असो, ते काहीही असलं तरी खेळ सोडून पलायन तर करायचं नसतं ना...
खेळायला चांगली आठ प्यादी, सरळ चालणारे दोन हत्ती, तिरके चालणारे दोन उंट साथीला मिळाले. दोन्ही घोड्यांच्या चालीबद्दल काय सांगावे? ह्या सर्वांच्यावर वरताण असणारा तो अतिशहाणा वजीर आणि हो, तो अति अहंकारी एखादेच घर पुढे मागे जाणारा आळशी राजा. सारे आपल्याच तोऱ्यात ह्या जीवनपटावर आजवर खेळत आहेत.
आता बरीचशी प्यादी पटावरून नाहीशी झाली आहेत.
बेफाम आणि विचित्र उधळणारे दोन्ही अबलख घोड़े त्यांच्याच विचित्र धावण्याची खोड मोडल्याने गायब झालेत. वाळवंटात पाण्याची भरपूर साठवण करीत वावटळीतही तिरक्या चालीत फुफाट्याचा,वादळाचा सामना करीत चालणारे दुडक्या चालीचे दोन्ही ऊंट प्रतिस्पर्ध्याने अडकवून ठेवलेत. मात्र संथ पण सरळ चालीचे  दोन्ही हत्ती घेऊन, त्यांच्यावर भिस्त ठेवून वजीर खेळ खेळतोय. माज तर उतरलाय अहंकारी राजाचा. स्वतःला वाचवत केवळ एखादंच घर पुढे मागे जाऊ शकणारा हा राजा अजून किती काळ खेळ खेळणार आहे ते, खेळवण्यात प्रवीण असलेल्या 'त्या वरच्यालाच' माहीत...
पण राजा आता मात्र खूप आनंदी आहे. कारण विचाराल..
कारण त्या सर्वोच्च वरच्या खेळीयाने त्याला दिलेल्या या खेळ खेळण्याच्या संधीने आणि तो आजही खेळू शकतोय या सत्यतेमुळे त्याचे दिल खुष आहे. ती संधी हीच त्याची प्रेरणा आहे,त्याची शक्ती आहे.
'त्या वरच्याचं' रूप कधी पाहिल्याचे नाही आठवत, पण सतत तो आपल्याला क्षणोक्षणी भेटत राहिलाय हे जाणवतंय.  'त्याला' म्हणावंसं वाटतं,
                                             तू असा रे कसा ?
                                             कधी कुणी असूच शकत नाही असा !!
                                             कळलाच नाहीस कधी कसा भेटलास
                                             पण तरीही...
                                             खात्री आहे, तू सतत भेटतच राहिलास
                                             एक मात्र नक्की कळलंय...
                                             कधी एका रुपात दिसतोस
                                             तर कधी वेगळाच असतोस !
                                             कधी Silent तर कधी Violent                                                                                           कधी शिंगावर घेवून दंगा करतोस
                                             कधी हाताची घड़ी नि तोंडावर बोट ठेवतोस
                                             कधी हास्याचे तुषार तर कधी संतापाचे फुत्कार
                                             कधी लाथाडतोस तर कधी करतोस सत्कार !
                                             खरंच असा रे कसा तू ?
                                             माझं म्हणणं एकतोस ना तू ?
                                             कसे रे समजून घ्यायचे तुला ?
                                             आणि तुझ्या अंगीच्या चौसष्ट की---
                                             त्याहून अधिक कला ?
केवळ 'त्याच्या' इच्छेमुळे आणि कुटुंब, स्नेही सोबत्यांच्या प्रेमामुळे आजवर सारं कसं सुसह्य होत गेलं. मी दुःखी आहे, असे कधी वाटलेच नाही. छे छे मी कधी दुःखी नव्हतोच. प्रत्येक क्षण कसा भरभरून देत राहिला. मी समृद्ध झालो की नाही, हे नाही सांगता येणार, पण मी दिवसेंदिवस आनन्दी होत आहे याचा विश्वास वाढतच राहिला. काय म्हणू ? Thank God, धन्यवाद, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सखी, मुले, कुटुंबीय, स्नेहीहितचिंतक, मित्र मैत्रीणींनो... खरंच मनापासून धन्यवाद. कारण आई वडलांच्या नंतर तुमच्या रुपात तर 'तो' मला दर्शन देतो ना.

पद्मनाभ हिंगे,
पुणे. 
चैत्र शुद्ध १, शके १९३९. 
दि. २८ मार्च २०१७.

                                             



Wednesday, 22 March 2017

Maze ghar shubhankar



                                                                      माझे घर शुभंकर
                                           (ओवीच्या चालीत  ... जात्यावर बसून म्हणणार ?  ..
                                             किंवा तुळशीच्या वृन्दावनाजवळ दिवा लावतांना ?
                                             जसे की... 'आली दिवाळी दिवाळी ' .... )

                                           माझे घर शुभंकर शुद्ध संस्कृतीचा श्वास 
                                           कला गीत संगीताचा जेथ नित्य सहवास ॥  माझे घर... 

                                           सानथोर आनंदात येई कौतुकें पाहुणा 
                                           किलबिलाट पाखरांचा वाटे सुखाचा धिंगाणा ॥ माझे घर...

                                           कोपऱ्यात देव्हाऱ्यात बसुनि पाही 'तो' निवांत 
                                           जसे हवे त्याला घर हे असो समाधानी शांत ॥ माझे घर... 

                                           प्रसन्नतेत भारुन भरल्या दिशा दाही मांगल्यात 
                                           वास्तु तथास्तुही म्हणते काही उणे ना सौख्यात ॥ माझे घर...

                                  
                                           पद्मनाभ हिंगे, पुणे...
                                           २३ मार्च २०१७
 
           

Saturday, 18 March 2017

चिट्ठी


चिठ्ठी

ते म्हणाले होते, 
तुझं कर्ज माफ करतो, 
तुझ्या जिंदगानीचं दुर्दैव
आता लवकर साफ करतो ...
मी पाहू लागलो वाट
पहातच राहिलो वाट ...
आणि मग आली कुठलीशी लाट
ते गेले वाहून
अन् त्यांचे शब्द त्यांच्याचबरोबर
गेले गपगार होऊन
.....
मग हे आले ,
ह्यांना त्यांचे ऐकवले, 
हे डोळ्यांनी रडले, 
म्हणाले कळवळून, 
तुझ्या व्यथा आम्हीच जाणतो, 
घाबरू नकोस अन्नदात्या
तुझ्या हातापायात बळ आणतो ..
मला थोडा हुरुप आला, 
घुटमळणा-या जीवात 
थोडा जीव आला.
........
हिवाळा गेला उन्हाळा गेला, 
गेला कसला ?
उन्हाळ्यानं मुक्कामच वाढवला. 
भेगाळलेल्या जमिनीनं
पायांनाही भेगा दिल्या
आता तर .. 
सगळ्याच सावल्याही
गायब झाल्या. 
कसचं काय न् कसचं काय 
नुसताच कट्टीबट्टीचा खेळ झाला
.......
मग दोरालाच माझी दया आली
म्हणाला तुझीमाझी गट्टी
येतो तुझ्या गळाभेटी
चल बांध तुझी वळकटी
पण निघण्याआधी 
जमलंच तर लिहून ठेव
हीच चार ओळींची चिठ्ठी .....
09.12.2015

पद्मनाभ हिंगे

Friday, 17 March 2017

Mulaache boot..

*मुलाचे* *बूट* *आणि* *बापाचे....*

कधी काही सुचलं की मी लगेच असं लिहून काढतो आणि मित्रांना पाठवतो. कुणाला आवडतं कुणाला नाही.
तुम्हांला आवडलं अथवा नाही आवडलं, काहीही असलं तरी जरूर सांगा.
कुणी चुका दाखवल्याशिवाय सुधारणा कशी करणार ?

तर वाचा....जरासं हलकं फुलकं....

''बापाचे जोडे मुलाला बसायला लागले म्हणजे तो आता मोठा झाला', असे काहीसे म्हटले जाते. या उक्तीचा मला दोनदा अनुभव आला.एकदा मी वडलांचे जोडे घातले आणि नंतर माझे जोडे घालून माझं पोरगं, मी आता मोठा झालो, म्हणून मिरवायला लागलं तेव्हा.पहिल्या अनुभवात मी शहाणा झालो असा गोड समज होता पण शहाणपण आलं होतं की नाही ते नव्हतं माहीत. हो, ती विशेष अक्कल आल्याची जाणीव झाली होती.
नंतरच्या अनुभवात खूप वेगळेपण होतं ! नवी पिढी जास्त हुषार, स्मार्ट. तुलनेत नव्या पिढीला जास्त कळते आहे आणि आपण जरा मूर्ख, मागासलेले आहोत हे जाणवलं. नव्या पिढीत मोकळेपणा. नव्या पिढीतील मुलं कशी मस्त धम्माल करतात.
आम्ही बावळट...
छे.आपला हा शुद्ध बावळटपणा घालवायलाच हवा. पण करायचे काय ?
या विचारात कसे काय कोण जाणे आज मुलाचे बूट पायात घातले. अहाहा. कसल्या आनंदात उड्या मारल्या मी !
पण माझ्या ह्या आनंदावर आमची ही नाहीतर कोण टोमणे मारणार हो ?
कुचकट बोललीच..
"म्हटलं लक्ष आहे माझं तुमच्या स्मार्टपणावर ! मुलाचे बूट पायात बसतात, मग आता हिरोगिरी करायला रान मोकळे असे समजू नका.उगाच शायनिंग करायला जाल. कोणी छान छान दिसलं तर नव्याने हे  आलेलं शहाणपण किंवा अक्कल पाजळू नका. जग म्हणेल की नाही माहीत नाही, पण मी मात्र नक्की म्हणेन,
ज्वानीचं झालं कोळसं अन् म्हातारा नाचतोय जणू नव्यानं आलं बाळसं !!
तोच बूट हीनं जणू डोक्यात हाणला.
आणि माझा चक्क पद्ममाठ झाला.
हसा हसा हो तुम्हीही हसा..''

*पद्मनाभ* *हिंगे*
*पुणे*

*१८* *मार्च* *२०१७*

Wednesday, 15 March 2017

Mai Kahee Kavi Na Ban Jaaoo....

                        
                                              मैं कहीं कवी न बन जाऊँ .......
          क्रिकेटचा मणी ।
          बापू नाडकर्णी ॥ 

हे काय ? असे चटकन विचारेल कुणी. तर अशी एक कविता इयत्ता ७ वी मधून ८ वी मध्ये गेलेल्या मला सुचली. त्यावेळी म्हणजे १९६४ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये बापू नाडकर्णी हे एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून लोकप्रिय होते. लहानग्या वयातल्या मला या कवितेसारख्या वाटणाऱ्या ओळी बापू नाडकर्णी यांना पत्र लिहून पाठवावयाश्या वाटल्या. कुणालाही न सांगता एका कागदावर एक पत्र लिहिलं. ते पत्र  आणि या कवितेसारख्या आठ-दहा ओळी मी बापू नाडकर्णी यांना पाठवल्या. पोस्टाच्या पाकिटावर फ़क्त एवढाच पत्ता लिहिला होता - क्रिकेटपटू बापू नाडकर्णी, मुंबई.
खूप दिवसांनी अचानक दुपारी माझी बहीण अलका आणि मामे बहीण विजया (किंवा प्रभा ) मला मोठ्ठयाने आणि आनंदाने हाका मारू लागल्या, ' अरे जयंता (माझे घरातले नाव )तुला नाडकर्णी यांचे पत्र आलंय बघ.' मी आनंदाने उडालोच. पाकिटात माझ्या नावाचे एक पत्र आणि त्यांचा एक फोटो पाहुन मी आनन्दून गेलो होतो. सर्वांना पत्र आणि फोटो दाखवतांना वाटणारा तो आनंद केवढा विलक्षण होता माझ्यासाठी. 'अरे आपला जयंत बघ कविता करतोय,' असे कौतुक होऊ लागले. जमिनीपासून जयंतराव दोन अंगुळे वर हवेत चालू लागले. वा आपल्याला कविता करायला जमतंय.
झालं.... आम्हाला आम्ही कवी होत असल्याचा भास होऊ लागला. मग काय ?
मग काय !!
' चंद्राहून शीतल। पाण्याहून निर्मळ। अशी माझी आई। आहे रे प्रेमळ।।
आईसम प्रेमळ। दैवत दुर्मिळ। आईसारखी असे। आईच केवळ।।
आईच्या मायेला। आईच्या छायेला। नसे दुसरी तोड़। तिच्या वात्सल्याला।। '
या आईवरील कवितेपासून या जयंत नावाच्या नवकवीची कवितेची गाड़ी अशी काही बेफाम सुटली की काही विचारूच नका. विशेष म्हणजे ही कविता त्यावेळी 'रविवार सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाली.
शाळा संपली. आमच्यावेळी अकरावी मॅट्रिक होती. उत्तीर्ण झालो. महाविद्यालयात - म्हणजे कॉलेजमध्ये हो - जाऊ लागलो. कविता करण्याचे खूळच लागले होते. दिसला कागद, लिही कविता.
कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनात 'फिशपॉन्ड' नावाच्या कार्यक्रमात मी, अवतीभवतीच्या नयनमनोहर 'परी'सरातील गोड गुलाबी चेहऱ्यांना दिलेल्या फिशपॉन्डला टाळ्या आणि दाद मिळू लागली. पण हाय रे दैवा, फिशपॉन्ड कुणी लिहिलाय त्याचं नाव गुलदस्त्यातच राहायचं. त्यामुळे या प्रतिभाशाली ! कवीचे नाव कधीच कळू शकलं नाही, याची खदखद मनात राहिलीच.
दांड्या मारून चित्रपट पाहणे, त्यातली रेडिओवर लागणारी मधुर गाणी ऐकता ऐकता लिहून घेणे. तोंडपाठ करणे, अशा काही सवयी अंगवळणी पडू लागल्या होत्या. कित्येक गाण्यांच्या चाली तर मेंदूत घट्ट रुतून बसलेल्या. त्यातून हळूच एके दिवशी एका गाण्याच्या चालीवर तोंडून चार गंमतीदार ओळी बाहेर पडल्या. रेडिओवर एक मराठी गीत लागले होते. ' नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी,' आमची जीभ वळवळलीच. आम्हाला आईचा धाक वाटायचा. गणपतीत चोरुन नाचल्याचे तिला कळले, की जो काही गिरणीचाच जणू पट्टा सुरू व्हायचा की काही बोलायची सोय नसायची. मनातली सारी चिडचिड पोटात गिळून ठेवावी लागे. ही चिडचिड हे गाणे ऐकताना त्यादिवशी विडंबनाचे आणि निषेधाचे रूप घेऊनच बाहेर पडली.
' नाचती पोरं पोरी
नाचती पोरं पोरी ll
उद्याच्या पोटाची काळजी कशाला
आईचा खरपूस मार मिळेल खायाला
लाटण्याचा फटका मग बसेल पाठीवरी ll
कधी कधी हा विडंबन नावाचा प्रकार चावट प्रकारात जायचा. पण त्याला काय करणार. वयच तसं होतं ना.
नोकरीव्यवसाय सुरू झाल्यावर ओघाने मुलाचे आता दोनाचे चार करायलाच हवेत, ह्या धूर्त हेतूने घरच्यांनी त्यांचा धोरणी डाव टाकून जिंकलाही. मग काय ?
पुन्हा तेच ! मग काय हे काय विचारता ? कधी ते लाडिक ईश्य ऐकलंय ? ( आता कुठे मुली ईश्य बिश्य म्हणतात.) लग्नाचा  हां अनुभव मोठाच मधाळ मोहक आणि सुंदर होता. 
अहो काव्य प्रतिभा फुलायला लागली. लागणारच.
कंपनीमधे तसा माझा थोडाफार वट होता. युनियन जनरल सेक्रेटरी असल्याने जरा 'फेमस' होतो. क्वालिटी कंट्रोल लॅबमध्ये माझ्या कामाचा वेग इतरांपेक्षा खूपच चांगला होता. मी कुठे इकडेतिकडे गेलो तरी विभाग प्रमुख मनावर घेत नसत. एकतर युनियन आणि दुसरं तुलनेनं माझं उत्तम काम. मी अचानक गायब झालो की बाकीचे सहकारी समजायचे की हा युनियनच्या कामासाठी गेला असेल किंवा शेजारच्या छोटया गोदामात. शेटें नावाच्या सहकाऱ्यांला मात्र वेगळाच संशय. लॅबशेजारी एक स्वच्छ, आणि फारशी वापरात नसलेली एक रूम होती. याच रूममध्ये मी असणार याची शेटेंला नक्की खात्री असायची. हसत हसत म्हणायचा लगेच, 'चला प्रसुती वेदना सुरू झाल्या वाटतं.' मी लिहीत असल्याचे तो हळूच येऊन पाहायचा.
पक्ष्यांचा कसा विणीचा हंगाम असतो ना, तश्या पटापटा कविता उतरायच्या. पण यात एक महत्वाचं होतं ते असं की मी कविता गणवृत्तात किंवा अक्षरवृत्तात लिहायचा प्रयत्न करायचो. शाळेत शार्दूलविक्रीडित, भुजंगप्रयात, मंदारमाला, पृथ्वी, वसंततिलका अशी वृत्ते शिकलो होतो. धडपड असायची ती कविता वृत्तात बांधायची. अर्थात साहित्य समीक्षकांच्या दृष्टिकोनातून या कवितांना काहीच मूल्य नसणार हे नक्की. साहित्याचा विशेष अभ्यास कधी केलाच नव्हता. कुठल्याच साहित्यिक गप्पाष्टकात कधी हजेरी लावली नव्हती. कविसंमेलनात सादर करण्याच्या लायकीच्या तर या कविता नसणार याची कल्पना होती. तरी आपल्या मित्र नातेवाईकांच्या परिवारात आपण कवी असल्याने 'फेमस' असणं यातच समाधान होतं.  कोणत्या भावनांसाठी कोणते वृत्त वापरायचे हेही कळत नव्हते, आजही कुठे कळते ? मंदारमाला वृत्तात एक सौंदर्यचित्र मांडायचा माझा प्रयत्न असा होता.

' शब्दात राणी तुझे चित्र काढावया यत्न माझा असा चालला ग ।
 नेत्रात त्या बोलक्या भावनांचे कसे चित्र काढू मला सांग ते ग  ॥
 तो केशसंभार त्या गौर रंगास चाफेकळी नाक आरक्त गाला।
 ओठा गुलाबी शराबी मुखा त्या कसा वर्णु मी शब्दचित्रात याला॥
 तू लाघवी चंद्रिका मोहना पौर्णिमा यौवना ते कैसे यात दावू।
 राणी सुवर्णाङ्ग मीनाक्षी चन्द्रानना सांग तू कोणते रंग लावू ॥

कवितांचे विषय मुख्यतः असे स्त्री सौंदर्य, धनप्राप्ती, देशप्रेम, ईश्वरभक्ती, व्यसनमुक्ती असत. (व्यसनमुक्ती हा शब्द त्यावेळी मी वापरला तर मला जवळून ओळखणारे माझे काही मित्र तात्काळ म्हणायचे, च्यायला हे बघा करून करून भागले आणि देवपूजेला लागले) कधी कधी लग्नाच्या मंगलाष्टकांची सुपारी मिळायची ! यातून धनप्राप्ती शून्य ! मी तयार केलेल्या शार्दुलविक्रीडित वृत्तातील मंगलाष्टका लग्नाच्या गर्दीत कोण लक्ष देवून ऐकायचे ? वधूवर त्यांच्या नादांतच. मग बाकीचे काय ऐकणार हो ? आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची झालं. या मंगलाष्टकात वधुवरांची नावे मोठया कौशल्याने वृत्तात चूक होणार नाही याची काळजी घेत बसवावी लागत. वृत्त बिघडू द्यायचे नाही. एक उदाहरण देतो. शार्दुलविक्रीडित वृत्त,..
 म स ज स त त ग...
' सौख्याचा दिन आज हा उगवला आनंद हो जाहला l
 भाग्याचा मुरलीधरास दिन हा सर्वांस आनंद हा ll
 आयुष्यास दिशा नवीन मिळुनी झाला गृहस्थाश्रमी l
 जोडीला अलका सुजाण सजणी काही पडो ना कमी ll '

शाळेमध्ये काही कविता अगदी मुखोद्गत झाल्या होत्या. त्यात लय असायची. शब्द चाल घेऊनच आलेले असायचे.  'क्षणोक्षणी पडे उठे परि बळे  ... ' ही कारुण्यरसप्रधान पृथ्वी वृत्तातली कविता मला फार आवडायची. अगदी तालासुरात मोठ्यांदा म्हणायचो. एकदा त्या विणीच्या हंगामात ही कविता गुणगुणत असतांना सहज शब्द सुचले,

क्षणोक्षणि पड़े तुम्हा गरज हो धनाची सदा ।
धनास्तवहि काळजी पडतसे सदा सर्वदा ॥
कितीक क्षणि हो मुळी न अपुले कुठे चालते ।
धनाविण जगी पुसे नच कुणी जिणे व्यर्थ ते ॥  

दुसरे शब्द होते,

तुझ्या चरणि दे सदा अढळ तू असे स्थान रे ।
चिरंतन तुझी असो मजवरी कृपादृष्टि रे ॥
तुझेच परमेश्वरा सतत मी करी ध्यान रे ।
जरी पतित मी मला जवळ घे कृपावंत रे ॥

यूनियनचा जनरल सेक्रेटरी असताना अनेक कामगारांशी संबंध यायचा. त्यांच्यातील व्यसनाधीनता आणि त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात निर्माण होणाऱ्या नवनव्या समस्या दु:खे पाहून वाईट वाटायचे.
माझेच मी कौतुक नाही सांगत, पण एका अत्यंत शुभंकर क्षणी मनाशी निश्चय केला आणि त्यांनंतर दारुला कधीच स्पर्श केला नाही. आणि आजवर तो पाळला.
नया दौर या चित्रपटातल्या, 'साथी हाथ  बढ़ाना' या गाण्याच्या चालीवर मला एक गाणे सुचले,

दारु पिऊ नका ना
सुन्दर अपुले जीवन तुम्ही
व्यसने नासू नका ना ॥
दिनभर तुम्ही मेहनत करुनि थकुनी येता घरटी
घरटी येता घरच्या साऱ्या चिंता भवती असती
म्हणुनी तुम्ही वैतागुनि का दारु जवळी करता
माहित असुनीं दारु वाईट का जवळी तिज करता ॥
खुशीत असता लागे दारु दु:खातही का दारू
बुडविल मोहित करुनि दारु शरिराचे हे तारू
सोडून दया रे दारू, दारु  एक भयानक वीष
व्यसनातुनी या मुक्त होउनी तोड़ा तिचे पाश ॥

आजवरच्या जीवनात इतके चढउतार  आले की या चढउतारात समस्यांशी सामना करण्यातच खूप वेळ गेला. पण याही कठीण काळात  कोणत्याही तक्रारीविना खंबीरपणे आणि हसतमुख चेहऱ्याने साथ दिली ती अनुराधाने म्हणजे माझ्या पत्नीने. एकदा एका स्नेह्यांच्या मैफिलीत मला  नाव घेण्याचा आग्रह झाला. अनुराधाविषयीच्या   मनात साठलेल्या आदरभावना व्यक्त करतांना मी एक लांबलचक उखाणा घेतला. चाळिशीतच डोईवर पांढऱ्या झालेल्या केसांचे रहस्य उलगडून सांगतांना मी शेवटी म्हणालो, अशी बायको पुढल्या जन्मात नाही मिळाली तर माझे काय होईल या एकाच काळजीने माझे केस पांढरे झालेत. टाळ्या तर मिळाल्याच. पुढे कवितेच्या रुपातल्या या उखाण्याला मी ज़रा असं विस्तारित रूप दिलं,

चैत्र वैशाख बारा महिने असो त्यांच्या नाना त-हां
माझ्या घरी बरसाव्यात श्रावणातल्या प्रेमधारा
ग्रीष्मातला कड़ाका किंवा शिशिरातली थंडीही यावी
प्रफुल्लता वसंतातली गृहलक्ष्मीच्या मुखावर रहावी
प्रभातीची किरणं येताच अंधारानं पळून जावं
शुभेच्छासांवल्या पहात पहात हळूच उन्हानं निघून जावं
शरदाच्या चांदण्यात घर माझं न्हाऊन निघावं
काजळ रात्री ताऱ्यांनीही प्रसन्नतेनं झळकत राहावं
रुसून बसल्या राणीला  मोगरीगजऱ्यानं हळुवार खुलवावं
तिनंच लाजऱ्या कटाक्षानं तिच्या रूसव्याला कोपऱ्यात बसवावं
अशा माझ्या घरात अन्नपूर्णा प्रसन्न राहावी
थकल्या भागल्या जीवाला इथेच सुखाची झोप लागावी
अखंड धडपड करता करता घडल्याही असतील एकादश्या
सुखांनी इथेच तळ ठोकावा हीच आशा हीच मनीषा

खूप काळ गेला, माझ्या मनाला भावेल अशी एकही कविता मला सुचली नाही. लिहिता आली नाही. माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या माणसाची कविता अशी किती हो सुन्दर असणार ? पण माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना ती सुंदरच वाटली. वाटायचं आपल्याही कविता प्रकाशित व्हाव्यात. कविसंमेलनात प्रतिष्ठितांची दाद मिळावी इतका दर्जा तिचा दर्जा असावा.
माझ्या कवितेबद्दल अगदी उमलत्या वयापासून मनात एक इच्छा दडून बसली होती  .....
 " मैं कहीं कवी न बन जाऊँ तेरे प्यारमें ए 'कविता' .... 
अशी कविता प्रत्यक्षात कधी उतरलीच नाही. ती कविता रुसलीच असावी माझ्यावर. कदाचित हां जोड़ीदार आपल्याला शोभणारच नाही म्हणून तिने कधी पाहिलेच नाही माझ्याकडे प्रेमाने! कवितेवर माझं मनापासून प्रेम आहे पण तरीही कवी होण्याचं भाग्य काही माझ्या वाट्याला नाही आलं.
आजही अगदी मनापासून वाटतं की ती यावी, अशी कविता जी सुंदर कल्पनेनं ओथंबून यावी, अगदी भरजरी उपमा अलंकार लेवून, सुवासिक शब्दगजरे घालून.
अजूनही वाट पाहतोच आहे मी...


पद्मनाभ हिंगे,
पुणे 

१६ मार्च २०१७  

Monday, 13 March 2017

Mee-

                                                        ॥ ॐ गं गणपतये नम: ॥

काहीतरी लिहावंसं वाटणं किंवा लिहायची हौस असणं हे माझ्याबाबतीत तसं खूप जुनं, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासूनचं. पण काय लिहायचं, कसं लिहायचं, विषय कोणता निवडायचा ? ही समस्या असायची. बरं कोणाला विचारावं, सल्ला घ्यावा तर आपली चेष्टा होईल की काय अशी भीती वाटायची. सतरावं अठरावं वर्ष म्हणजे तारुण्यातलं ताजं पदार्पण. अवतीभवती सारं छान छान असायचं दिसायचं. ओह पण त्यावर कसं काय लिहिणार ना? आजच्यासारखं थोडंच मोकळं वातावरण होतं तेंव्हा. हो अगदी मुलांसाठीसुद्धा बंधनं असायची ! वडीलधाऱयांचा धाक असायचाच. मग आता लिहायचं तरी कोणत्या विषयावर ? लिहायला तर हवंच. असं हात जोडून स्वस्थ का बसायचं ? एखाद्या विशेष दिवशी जे काही जसं काही जमेल ते लिहायचंच 'ऐसा' निश्चयच केला मनाशी आणि एखादा लेखक असल्याच्या थाटात अस्मादिक वही पेन घेऊन लिहावयास बसले.
बघा काय आणि कसं लिहिलंय ते.. हसायला पूर्ण संमती आहे.


मी.. एकच अक्षरी शब्द. त्यात केवढा तरी अर्थ भरलाय ! तो काय कधी सांगून कळत असतो, वाचून कळत असतो ? छे, तो समजून घ्यावा लागतो. त्याचा अर्थ कुणाला नीटसा कळत नाही, कळला तर सांगता येत नाही. ज्या वाक्यात "मी" हा शब्द आहे, अशी कितीतरी वेगवेगळ्या अर्थांची वाक्ये आढळतील. ' काय बावळट आहे "मी", आपल्या बावळटपणामुळे चूक झाली की उपहासाने "मी" हां शब्द वाक्यात घालतो, तर कधी विनम्रता, विनय दाखविताना "मी" आपला एक सामान्य माणूस, परमेश्वर सारं करतो, "मी" फ़क्त कारणापुरता.' अशाप्रकारे मी वापरला जातो, तर कधी गर्वाने फुगून, "मी" केलं म्हणून तर सारं व्यवस्थित झालं, "मी" नसतो तर कोणालाही काहीही करता आलं नसतं. वगैरे ....
या सर्वप्रकारच्या "मी" मधून "मी स्वतः" कोणता बरे असेन ? जिथं तिथं मीपण दाखवणारा गर्विष्ठ 'मी' मुळीच नाही असं मला आपलं वाटतं. 'मी' वरील कोणता ? हे ठरविणारा मी कोण ? इतर ठरवतील तो 'मी'.....
पण मी कृतघ्न कधीच असणार नाही. माझ्या हातून कदाचित दुसऱ्यानं मजवर केलेल्या उपकाराची परतफेड होणार नाही, पण मी माझ्यावर झालेल्या उपकाराची जाणीव ठेवीनच ठेवीन. उपकाराची परतफेड जाणीवपूर्वक करीत राहीनच राहीन. आणि त्यांच्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करीन की, ' परमेश्वरा त्यांना सुखी ठेव, आनंदीत ठेव, उत्साहीत ठेव. संस्कृतमधे एक श्लोक दहावी अकरावीत असताना आम्हाला होता. त्याचा भावार्थ असा की, ' आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराची वाच्यता कोणाकडेही न करणे आणि दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची मात्र आपण चारचौघात वाच्यता करणे हे असिधाराव्रत फार कठीण असते.' असो.. तर मी सदोदीत कृतज्ञच राहीन.  .......   शुक्र. दि. १ - १ - १९७१। ..


तर अशाप्रकारे काहीतरी लिहिण्याला सुरुवात झाली. तश्या ट ला ट जोडून काही कविता करण्याचा प्रयत्न चालू असायचाच. शाळेच्या वार्षिकात एक चार ओळीची कविता घेऊन मी एका संबंधित शिक्षिकेकडे गेलो होतो, तेंव्हा बाईंनी मला विचारले, "तूच केलीस का रे " मी मोठ्या तोऱ्यात 'हो, मीच लिहिली आहे,' असं उत्तर दिलं. बाईंना ते खटकलं होतं. त्यांनी मला झापलं होतं. तो माज होता की कविता लिहिण्याचा जास्तीचा अभिमान होता, ते आज नाही सांगता येणार. इतर विद्यार्थ्यांपेक्षा कविता लिहू शकणारा मी कोणी वेगळा असल्याची भावना होती, नाही आठवत. पण बाईंच्या त्या झापण्यामुळे आपलं काहीतरी चुकलं आहे, याची मात्र जाणीव झाली. ती जाणीव आजही आहे.
आज सहजच ती जीर्ण होऊ घातलेली वही उघडली आणि पहिल्याच पानावर असलेलं हे टिपण वाचलं. वाटलं, इतरांनाही वाचायला सांगावं, आवडलं तर आवडेलही......

पद्मनाभ हिंगे,
पुणे. 
दि. १४ मार्च २०१७  
 

The 1st attempt on the Blog.

पह्यलं नमन 
स्मरतो गजवदन
निर्विघ्नं कुरु में देव सर्व कार्येषु सर्वदा।

होय....
आज मी प्रथमच माझ्या ब्लॉगवर लिहायचा प्रयत्न करतोय, काही चुकलं तर तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा आहे.

तर वाचकमित्रांनो सप्रेम नमस्कार.
खूप दिवसांपासून आपण आपला स्वत:चा ब्लॉग तयार करून त्यावर आपले विचार लिहावेत असं वाटत होतं. पण ब्लॉग कसा तयार करायचा, त्यासाठी नेमकं काय आणि कसं करावं लागतं ह्याविषयी काहीच माहीत नव्हतं, म्हणजे पूर्ण अज्ञान होतं. पण स्वस्थ बसवत  नव्हतं. शोध घेत होतो की कोणी शिकवेल का मला ?
एकदोघांना विचारलं, त्यांना यात काहीच स्वारस्य नव्हतं. माझाही स्वभाव थोडासा भिडस्त.
मग विचार केला की नेटवर शोधलं तर सापडेल का ?
शोधू लागलो आणि आज 'टेकमराठी'वर प्रशांत क-हाडे नामक सद्गृहस्थाने यूट्यूबवर केलेली शिकवणी अनुसरत गेलो. धन्यवाद प्रशांत गुरूजी.
चला पहिला प्रयत्न तर केलाय, आता लिहायची गोडी वाढू लागली की बरेच विचार मांडता येतील. 
आणि कसंय, केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे. चुकलंच तर वाचकमित्र सांभाळून घेतीलच की. घ्याल ना ? पण एक विनंती आहे, जरूर वाचा. आवडलं का ते सांगा, नाही आवडलं तरी सांगा. काही सूचना करावीशी वाटली तर जरूर करा.
भेटूच परत परत
धन्यवाद

पद्मनाभ हिंगे, 
पुणे
१३ मार्च २०१७