Wednesday, 15 March 2017

Mai Kahee Kavi Na Ban Jaaoo....

                        
                                              मैं कहीं कवी न बन जाऊँ .......
          क्रिकेटचा मणी ।
          बापू नाडकर्णी ॥ 

हे काय ? असे चटकन विचारेल कुणी. तर अशी एक कविता इयत्ता ७ वी मधून ८ वी मध्ये गेलेल्या मला सुचली. त्यावेळी म्हणजे १९६४ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये बापू नाडकर्णी हे एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून लोकप्रिय होते. लहानग्या वयातल्या मला या कवितेसारख्या वाटणाऱ्या ओळी बापू नाडकर्णी यांना पत्र लिहून पाठवावयाश्या वाटल्या. कुणालाही न सांगता एका कागदावर एक पत्र लिहिलं. ते पत्र  आणि या कवितेसारख्या आठ-दहा ओळी मी बापू नाडकर्णी यांना पाठवल्या. पोस्टाच्या पाकिटावर फ़क्त एवढाच पत्ता लिहिला होता - क्रिकेटपटू बापू नाडकर्णी, मुंबई.
खूप दिवसांनी अचानक दुपारी माझी बहीण अलका आणि मामे बहीण विजया (किंवा प्रभा ) मला मोठ्ठयाने आणि आनंदाने हाका मारू लागल्या, ' अरे जयंता (माझे घरातले नाव )तुला नाडकर्णी यांचे पत्र आलंय बघ.' मी आनंदाने उडालोच. पाकिटात माझ्या नावाचे एक पत्र आणि त्यांचा एक फोटो पाहुन मी आनन्दून गेलो होतो. सर्वांना पत्र आणि फोटो दाखवतांना वाटणारा तो आनंद केवढा विलक्षण होता माझ्यासाठी. 'अरे आपला जयंत बघ कविता करतोय,' असे कौतुक होऊ लागले. जमिनीपासून जयंतराव दोन अंगुळे वर हवेत चालू लागले. वा आपल्याला कविता करायला जमतंय.
झालं.... आम्हाला आम्ही कवी होत असल्याचा भास होऊ लागला. मग काय ?
मग काय !!
' चंद्राहून शीतल। पाण्याहून निर्मळ। अशी माझी आई। आहे रे प्रेमळ।।
आईसम प्रेमळ। दैवत दुर्मिळ। आईसारखी असे। आईच केवळ।।
आईच्या मायेला। आईच्या छायेला। नसे दुसरी तोड़। तिच्या वात्सल्याला।। '
या आईवरील कवितेपासून या जयंत नावाच्या नवकवीची कवितेची गाड़ी अशी काही बेफाम सुटली की काही विचारूच नका. विशेष म्हणजे ही कविता त्यावेळी 'रविवार सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाली.
शाळा संपली. आमच्यावेळी अकरावी मॅट्रिक होती. उत्तीर्ण झालो. महाविद्यालयात - म्हणजे कॉलेजमध्ये हो - जाऊ लागलो. कविता करण्याचे खूळच लागले होते. दिसला कागद, लिही कविता.
कॉलेज मध्ये स्नेहसंमेलनात 'फिशपॉन्ड' नावाच्या कार्यक्रमात मी, अवतीभवतीच्या नयनमनोहर 'परी'सरातील गोड गुलाबी चेहऱ्यांना दिलेल्या फिशपॉन्डला टाळ्या आणि दाद मिळू लागली. पण हाय रे दैवा, फिशपॉन्ड कुणी लिहिलाय त्याचं नाव गुलदस्त्यातच राहायचं. त्यामुळे या प्रतिभाशाली ! कवीचे नाव कधीच कळू शकलं नाही, याची खदखद मनात राहिलीच.
दांड्या मारून चित्रपट पाहणे, त्यातली रेडिओवर लागणारी मधुर गाणी ऐकता ऐकता लिहून घेणे. तोंडपाठ करणे, अशा काही सवयी अंगवळणी पडू लागल्या होत्या. कित्येक गाण्यांच्या चाली तर मेंदूत घट्ट रुतून बसलेल्या. त्यातून हळूच एके दिवशी एका गाण्याच्या चालीवर तोंडून चार गंमतीदार ओळी बाहेर पडल्या. रेडिओवर एक मराठी गीत लागले होते. ' नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी,' आमची जीभ वळवळलीच. आम्हाला आईचा धाक वाटायचा. गणपतीत चोरुन नाचल्याचे तिला कळले, की जो काही गिरणीचाच जणू पट्टा सुरू व्हायचा की काही बोलायची सोय नसायची. मनातली सारी चिडचिड पोटात गिळून ठेवावी लागे. ही चिडचिड हे गाणे ऐकताना त्यादिवशी विडंबनाचे आणि निषेधाचे रूप घेऊनच बाहेर पडली.
' नाचती पोरं पोरी
नाचती पोरं पोरी ll
उद्याच्या पोटाची काळजी कशाला
आईचा खरपूस मार मिळेल खायाला
लाटण्याचा फटका मग बसेल पाठीवरी ll
कधी कधी हा विडंबन नावाचा प्रकार चावट प्रकारात जायचा. पण त्याला काय करणार. वयच तसं होतं ना.
नोकरीव्यवसाय सुरू झाल्यावर ओघाने मुलाचे आता दोनाचे चार करायलाच हवेत, ह्या धूर्त हेतूने घरच्यांनी त्यांचा धोरणी डाव टाकून जिंकलाही. मग काय ?
पुन्हा तेच ! मग काय हे काय विचारता ? कधी ते लाडिक ईश्य ऐकलंय ? ( आता कुठे मुली ईश्य बिश्य म्हणतात.) लग्नाचा  हां अनुभव मोठाच मधाळ मोहक आणि सुंदर होता. 
अहो काव्य प्रतिभा फुलायला लागली. लागणारच.
कंपनीमधे तसा माझा थोडाफार वट होता. युनियन जनरल सेक्रेटरी असल्याने जरा 'फेमस' होतो. क्वालिटी कंट्रोल लॅबमध्ये माझ्या कामाचा वेग इतरांपेक्षा खूपच चांगला होता. मी कुठे इकडेतिकडे गेलो तरी विभाग प्रमुख मनावर घेत नसत. एकतर युनियन आणि दुसरं तुलनेनं माझं उत्तम काम. मी अचानक गायब झालो की बाकीचे सहकारी समजायचे की हा युनियनच्या कामासाठी गेला असेल किंवा शेजारच्या छोटया गोदामात. शेटें नावाच्या सहकाऱ्यांला मात्र वेगळाच संशय. लॅबशेजारी एक स्वच्छ, आणि फारशी वापरात नसलेली एक रूम होती. याच रूममध्ये मी असणार याची शेटेंला नक्की खात्री असायची. हसत हसत म्हणायचा लगेच, 'चला प्रसुती वेदना सुरू झाल्या वाटतं.' मी लिहीत असल्याचे तो हळूच येऊन पाहायचा.
पक्ष्यांचा कसा विणीचा हंगाम असतो ना, तश्या पटापटा कविता उतरायच्या. पण यात एक महत्वाचं होतं ते असं की मी कविता गणवृत्तात किंवा अक्षरवृत्तात लिहायचा प्रयत्न करायचो. शाळेत शार्दूलविक्रीडित, भुजंगप्रयात, मंदारमाला, पृथ्वी, वसंततिलका अशी वृत्ते शिकलो होतो. धडपड असायची ती कविता वृत्तात बांधायची. अर्थात साहित्य समीक्षकांच्या दृष्टिकोनातून या कवितांना काहीच मूल्य नसणार हे नक्की. साहित्याचा विशेष अभ्यास कधी केलाच नव्हता. कुठल्याच साहित्यिक गप्पाष्टकात कधी हजेरी लावली नव्हती. कविसंमेलनात सादर करण्याच्या लायकीच्या तर या कविता नसणार याची कल्पना होती. तरी आपल्या मित्र नातेवाईकांच्या परिवारात आपण कवी असल्याने 'फेमस' असणं यातच समाधान होतं.  कोणत्या भावनांसाठी कोणते वृत्त वापरायचे हेही कळत नव्हते, आजही कुठे कळते ? मंदारमाला वृत्तात एक सौंदर्यचित्र मांडायचा माझा प्रयत्न असा होता.

' शब्दात राणी तुझे चित्र काढावया यत्न माझा असा चालला ग ।
 नेत्रात त्या बोलक्या भावनांचे कसे चित्र काढू मला सांग ते ग  ॥
 तो केशसंभार त्या गौर रंगास चाफेकळी नाक आरक्त गाला।
 ओठा गुलाबी शराबी मुखा त्या कसा वर्णु मी शब्दचित्रात याला॥
 तू लाघवी चंद्रिका मोहना पौर्णिमा यौवना ते कैसे यात दावू।
 राणी सुवर्णाङ्ग मीनाक्षी चन्द्रानना सांग तू कोणते रंग लावू ॥

कवितांचे विषय मुख्यतः असे स्त्री सौंदर्य, धनप्राप्ती, देशप्रेम, ईश्वरभक्ती, व्यसनमुक्ती असत. (व्यसनमुक्ती हा शब्द त्यावेळी मी वापरला तर मला जवळून ओळखणारे माझे काही मित्र तात्काळ म्हणायचे, च्यायला हे बघा करून करून भागले आणि देवपूजेला लागले) कधी कधी लग्नाच्या मंगलाष्टकांची सुपारी मिळायची ! यातून धनप्राप्ती शून्य ! मी तयार केलेल्या शार्दुलविक्रीडित वृत्तातील मंगलाष्टका लग्नाच्या गर्दीत कोण लक्ष देवून ऐकायचे ? वधूवर त्यांच्या नादांतच. मग बाकीचे काय ऐकणार हो ? आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची झालं. या मंगलाष्टकात वधुवरांची नावे मोठया कौशल्याने वृत्तात चूक होणार नाही याची काळजी घेत बसवावी लागत. वृत्त बिघडू द्यायचे नाही. एक उदाहरण देतो. शार्दुलविक्रीडित वृत्त,..
 म स ज स त त ग...
' सौख्याचा दिन आज हा उगवला आनंद हो जाहला l
 भाग्याचा मुरलीधरास दिन हा सर्वांस आनंद हा ll
 आयुष्यास दिशा नवीन मिळुनी झाला गृहस्थाश्रमी l
 जोडीला अलका सुजाण सजणी काही पडो ना कमी ll '

शाळेमध्ये काही कविता अगदी मुखोद्गत झाल्या होत्या. त्यात लय असायची. शब्द चाल घेऊनच आलेले असायचे.  'क्षणोक्षणी पडे उठे परि बळे  ... ' ही कारुण्यरसप्रधान पृथ्वी वृत्तातली कविता मला फार आवडायची. अगदी तालासुरात मोठ्यांदा म्हणायचो. एकदा त्या विणीच्या हंगामात ही कविता गुणगुणत असतांना सहज शब्द सुचले,

क्षणोक्षणि पड़े तुम्हा गरज हो धनाची सदा ।
धनास्तवहि काळजी पडतसे सदा सर्वदा ॥
कितीक क्षणि हो मुळी न अपुले कुठे चालते ।
धनाविण जगी पुसे नच कुणी जिणे व्यर्थ ते ॥  

दुसरे शब्द होते,

तुझ्या चरणि दे सदा अढळ तू असे स्थान रे ।
चिरंतन तुझी असो मजवरी कृपादृष्टि रे ॥
तुझेच परमेश्वरा सतत मी करी ध्यान रे ।
जरी पतित मी मला जवळ घे कृपावंत रे ॥

यूनियनचा जनरल सेक्रेटरी असताना अनेक कामगारांशी संबंध यायचा. त्यांच्यातील व्यसनाधीनता आणि त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात निर्माण होणाऱ्या नवनव्या समस्या दु:खे पाहून वाईट वाटायचे.
माझेच मी कौतुक नाही सांगत, पण एका अत्यंत शुभंकर क्षणी मनाशी निश्चय केला आणि त्यांनंतर दारुला कधीच स्पर्श केला नाही. आणि आजवर तो पाळला.
नया दौर या चित्रपटातल्या, 'साथी हाथ  बढ़ाना' या गाण्याच्या चालीवर मला एक गाणे सुचले,

दारु पिऊ नका ना
सुन्दर अपुले जीवन तुम्ही
व्यसने नासू नका ना ॥
दिनभर तुम्ही मेहनत करुनि थकुनी येता घरटी
घरटी येता घरच्या साऱ्या चिंता भवती असती
म्हणुनी तुम्ही वैतागुनि का दारु जवळी करता
माहित असुनीं दारु वाईट का जवळी तिज करता ॥
खुशीत असता लागे दारु दु:खातही का दारू
बुडविल मोहित करुनि दारु शरिराचे हे तारू
सोडून दया रे दारू, दारु  एक भयानक वीष
व्यसनातुनी या मुक्त होउनी तोड़ा तिचे पाश ॥

आजवरच्या जीवनात इतके चढउतार  आले की या चढउतारात समस्यांशी सामना करण्यातच खूप वेळ गेला. पण याही कठीण काळात  कोणत्याही तक्रारीविना खंबीरपणे आणि हसतमुख चेहऱ्याने साथ दिली ती अनुराधाने म्हणजे माझ्या पत्नीने. एकदा एका स्नेह्यांच्या मैफिलीत मला  नाव घेण्याचा आग्रह झाला. अनुराधाविषयीच्या   मनात साठलेल्या आदरभावना व्यक्त करतांना मी एक लांबलचक उखाणा घेतला. चाळिशीतच डोईवर पांढऱ्या झालेल्या केसांचे रहस्य उलगडून सांगतांना मी शेवटी म्हणालो, अशी बायको पुढल्या जन्मात नाही मिळाली तर माझे काय होईल या एकाच काळजीने माझे केस पांढरे झालेत. टाळ्या तर मिळाल्याच. पुढे कवितेच्या रुपातल्या या उखाण्याला मी ज़रा असं विस्तारित रूप दिलं,

चैत्र वैशाख बारा महिने असो त्यांच्या नाना त-हां
माझ्या घरी बरसाव्यात श्रावणातल्या प्रेमधारा
ग्रीष्मातला कड़ाका किंवा शिशिरातली थंडीही यावी
प्रफुल्लता वसंतातली गृहलक्ष्मीच्या मुखावर रहावी
प्रभातीची किरणं येताच अंधारानं पळून जावं
शुभेच्छासांवल्या पहात पहात हळूच उन्हानं निघून जावं
शरदाच्या चांदण्यात घर माझं न्हाऊन निघावं
काजळ रात्री ताऱ्यांनीही प्रसन्नतेनं झळकत राहावं
रुसून बसल्या राणीला  मोगरीगजऱ्यानं हळुवार खुलवावं
तिनंच लाजऱ्या कटाक्षानं तिच्या रूसव्याला कोपऱ्यात बसवावं
अशा माझ्या घरात अन्नपूर्णा प्रसन्न राहावी
थकल्या भागल्या जीवाला इथेच सुखाची झोप लागावी
अखंड धडपड करता करता घडल्याही असतील एकादश्या
सुखांनी इथेच तळ ठोकावा हीच आशा हीच मनीषा

खूप काळ गेला, माझ्या मनाला भावेल अशी एकही कविता मला सुचली नाही. लिहिता आली नाही. माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या माणसाची कविता अशी किती हो सुन्दर असणार ? पण माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना ती सुंदरच वाटली. वाटायचं आपल्याही कविता प्रकाशित व्हाव्यात. कविसंमेलनात प्रतिष्ठितांची दाद मिळावी इतका दर्जा तिचा दर्जा असावा.
माझ्या कवितेबद्दल अगदी उमलत्या वयापासून मनात एक इच्छा दडून बसली होती  .....
 " मैं कहीं कवी न बन जाऊँ तेरे प्यारमें ए 'कविता' .... 
अशी कविता प्रत्यक्षात कधी उतरलीच नाही. ती कविता रुसलीच असावी माझ्यावर. कदाचित हां जोड़ीदार आपल्याला शोभणारच नाही म्हणून तिने कधी पाहिलेच नाही माझ्याकडे प्रेमाने! कवितेवर माझं मनापासून प्रेम आहे पण तरीही कवी होण्याचं भाग्य काही माझ्या वाट्याला नाही आलं.
आजही अगदी मनापासून वाटतं की ती यावी, अशी कविता जी सुंदर कल्पनेनं ओथंबून यावी, अगदी भरजरी उपमा अलंकार लेवून, सुवासिक शब्दगजरे घालून.
अजूनही वाट पाहतोच आहे मी...


पद्मनाभ हिंगे,
पुणे 

१६ मार्च २०१७  

2 comments:

  1. बस एक बार फिर...मै तेरे प्यार मे....

    ReplyDelete