





... नाही ना खरे वाटत ?
सुप्रभात 🌹🌹🌹🌹
खूप खूप वर्षं झाली या गोष्टीला.
म्हणजे आटपाट नगर होतं-तिथं एक राजा राज्य करत होता-त्याला दोन राण्या होत्या-एक आवडती एक नावडती.
ओय, तुम्हाला काय वाटलं मी गोष्ट सांगतोय ? हाहाहा, बसले आपला मांडा ठोकून !
हाँ,
तर मी काय म्हणत होतो...
खूप म्हणजे झाली असतील ३५ वर्षे. विरंगुळा म्हणून काही तरी करायचो मी अधून मधून. तिशी च्या उंबरठय़ावर असेन.
बोअर झालात ना. बरं जास्त नाही पीळ देत. डायरेक्ट विषयाला हात घालतो.
माझ्या हाताला आयडियाची कल्पना आली.. दिसला पेपर चालव हात. म्हणजे हातात बॉलपेन असायचं. कागदावर बॉलपेन चालू व्हायचा. बघता बघता शे दीडशे मुक्तहस्त चित्रं झाली. त्यातली काही चित्रे बघितल्यावर लग्नाच्या रुख्वतासाठी पडदे अभ्रे यांच्यावर भरतकामासाठी नेण्यात आली.
मध्यंतरी अचानक एका फाईलमधे खूप सारी चित्रं सापडली, जीर्ण अवस्थेत. विचार केला व्हाट्सएपवर मित्रांना पाठवावीत. जमतील तसे फोटो काढले. मित्रांना म्हटलं, बघा आवडतात का ?
त्यावर कोणाला काही करायचं असेल तर खुश्शाल मागा, असेही सांगितले.
तसं शाळेतल्या चित्रकला तासात जे शिकवले जायचे त्या व्यतिरिक्त वेगळे असे कोणतेही चित्रकलेचे शिक्षण मी कधीच घेतले नव्हते. आमच्या घरीही तसे चित्रकलेची आवड जोपासणारे कुणीच नव्हते.
शाळा संपली आणि कॉलेजचे खुले प्रांगण दिसू लागले. या काळात अभ्यास कमी आणि इतर उद्योगांकडे लक्ष फार असायचं. क्रिकेट, सिनेमा, कट्ट्यावरच्या गप्पा-नव्हे टवाळक्या, उंडारणे, यातच वेळ जायचा.
कृष्णा कुसुरकर हा माझा एक मित्र खूपच सुंदर चित्र काढायचा. मला त्याची चित्रं, पेंसिलस्केचेस खूप आवडायची.
एकदा कृष्णाने फक्त डोळे वेगळे, फक्त नाक वेगळे अशी चित्रे काढलेला एक कागद मी पाहिला आणि मी प्रभावित झालो. 'मलाही येईल का काढता अशी सुंदर चित्रं ?' असा विचार मनात जोर धरू लागला.
ते वयच असं असतं की तनामनात उत्साह नुसता सळसळत असतो. त्यामुळे फार काळ स्वस्थ बसायला मन तयार नव्हतं. घेतला एक ड्रॉईंग पेपर, एक पेंसिल आणि धडपडीला सुरुवात केली. कसं चित्र काढायचं ? काय करायचं, याचा कुठलाही गंध नसलेल्या अश्या कामात अडचणी येणार, वेळ लागणार हे ते वय मान्य करायला तयार नव्हतं जणू.
चित्र काढायचे म्हणजे काढायचे. आता ते कोणते ?
त्या गुलाबी काळात सौंदर्याचा शोध पहिला असणार नाही का ? म्हणजे निसर्ग सौंदर्य, निसर्गदत्त सौंदर्य !!
एक सुंदर फोटो पाहिला होता, त्या काळातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा, तनुजाचा होता तो. प्रयत्न करू लागलो.
खूप वेळ लागला, पण फोटो पहात पहात पेंसिल चालू लागली आणि हळूहळू चित्र साकारू लागलं. काही दिवसांनी पूर्ण झालं.
चित्र तनुजाचं आहे असं मला जाणवलं. जरा चेहरा ओळखीचा वाटू लागला. म्हणजे काहींनी विचारलं सुद्धा, 'कोण रे ही ?'. मी चाचरत सांगायचो, 'तनुजा'! मग त्यांनाही हे चित्र तनुजाचे असावे असे भासायचे !
माझा आत्मविश्वास थोडा वाढला.
मग डिम्पल भावली. मीनाकुमारीचे चित्र काढावेसे वाटू लागले - काढलेही !
सदाबहार 'देव आनंद' कागदावर अवतरले.
'खामोश',' माझंही चित्र काढायला हवं 'म्हणत शत्रुदादा कागदावर उतरले.
झाली पाच सहा चित्रं बदाबदा.
आता काहीतरी अवघड जरा वेगळं चित्र काढावं असं मनानं घेतलं.
मी काढलेलं, मला स्वतःलाच आवडणारं, अगदी आवर्जून इतरांना दाखवावंसं वाटणारं अजिंठा वेरूळ च्या लेण्यातलं बोधिसत्व पद्मपाणी हे चित्र.
१९७२ मध्ये काढलं होतं मी.
खूप म्हणजे खूपच दिवस लागले होते हे चित्र काढायला.
खूप मन लावून अगदी तल्लीन होऊन मी चित्र काढत राहायचो. मूळचं चित्र बघून काढायला हे अवघड जात होतं. तासंतास काढायचो. मानपाठ एक व्हायची.
कितीतरी वेळा खाडाखोड झाल्याचं आठवतंय. हे चित्र काढणं माझ्यासाठी आव्हान होतं, अन् ते मी केलं पूर्ण!!
हे चित्र मी अनेकांना दाखवलं.
"वा छान" किंवा "मस्त" एवढ्याच पण कोरड्या प्रतिक्रिया मिळायच्या. चित्र परत हातात मिळायचं इतकंच.
खजील व्हायचो. वाईट वाटायचं. कारण मला सूचना किंवा मार्गदर्शन हवं असायचं. पण ऊहुं..
मग माझं चित्र काढण्यातलं स्वारस्यच गेलं. असो.
खरं म्हणजे मला कल्पना आहे की मी काही चित्रकार नाही. एखाद्या चित्रकाराला अथवा या कलेतील तज्ज्ञ व्यक्तिला ह्या चित्रांमध्ये अनेक चुका दिसतील.
पण होतं खरं असं. माझी चूक म्हणजे नाऊमेद झालो असलो तरी चित्र काढणंच बंद करायला नको होतं. प्रयत्न चालूच ठेवायला हवा होता. पुढेमागे मिळाले असते मार्गदर्शन. जाऊ देत.
माझ्या मित्र मैत्रीणीना मी नेहमी सांगायचा प्रयत्न करत असतो की तुमच्यात काही कला असेल तर ती शोधा स्वतःत आणि त्यात तयार व्हा. दैनंदिन व्याप सांभाळा पण काही चांगलं वेगळं तुमच्यात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्न करत रहा. चांगल्या, तुम्हाला बरं वाटावं म्हणून दिलेल्या प्रतिक्रियांपेक्षा चांगल्या सूचनांची अपेक्षा ठेवा.
आणि असा माझ्यासारखा तुमच्याबाबत कलेतला interestच निघून गेला असं कधीही होऊ नये, म्हणून ही पोपटपंची. कारण कलेत स्वतःला हरवून जाण्यात एक निखळ आनंद असतो.
तुमच्यातील सद् गुणांची वृद्धी व्हावी, तुम्हांला चांगलं मार्गदर्शन मिळावं, ही अगदी
प्रामाणिक सदिच्छा.
वाहवत जा पण वाहून जाऊ नका असे सांगताना, आजच्या शुभेच्छा द्यायला मी कसा विसरेन ?
पद्मनाभ हिंगे
पुणे
१० एप्रिल २०१७
💃💃💃💃
🌹🌹🌹🌹



Uttam. Farach chchan
ReplyDeleteलाजवाब
ReplyDelete