एक मुलाखत, अर्थातच काल्पनिक...
ती शहाणी.... 'छे बाई.... आमच्यात नसतं हं असं काही...'
'काय तर म्हणे आज वर्षअखेर आहे, मग करायची का पार्टी !!! ३१ डिसेंबर सारखी !!!!'
'शी शी शी.... रात्री उशिरापर्यंत झिंगायचं आणि नव्या वर्षाला उशिरा उठायचं, अशा पद्धतीनं का नवीन वर्षाचं स्वागत करायचं ? म्हणे देहभान विसरून जायचं ! स्वत:ला विसरून जायचं ! झिंगाट धम्माल करायची ! नुसता राडा करून टाकायचा ! ऱगाट नाचायचं ! बेधुंद होऊन मज्जा लुटायची !'
ती शहाणी....'करा करा, तुम्ही करा. तुम्हांला काय करायचे ते तुम्ही करा, आम्हांला नाही जमणार. आणि कशाला हव्यात ह्या विदेशी, विलायती सवयी ? आवडतं बरं का आम्हांला आमचं मराठीपण जपायला. आमच्यावर नाही हो असे संस्कार--- हं आता संस्कार हा शब्द उच्चारला की पुरोगामी धावून यायचे अंगावर, तद्दन सनातनी म्हणून हिणवत !....'
दीड शहाणा... 'संस्कार... हे संस्कार संस्कार म्हणजे काय हो ?'
ती शहाणी....'खूप खूप सांगता येईल संस्काराबद्दल....'
दीड शहाणा...'हो का ? एखादं उदाहरण वगैरे... द्याल ?'
ती शहाणी....'हो S S S S एकच का, पुष्कळ देता येतील.'
दीड शहाणा...'ऐकवता का थोडी फार ? '
ती शहाणी....'म्हणजे असं बघा, चांगली नोकरी करायची, वेळेवर ऑफिसला जायचं, वेळेत घरी यायचं. घरात आरडाओरडा करायचा नाही. मॉम डयाडीच्या PUNCTUALITY चा मुलांसमोर आदर्श असायला हवाच ना. मुलांच्या अभ्यासात, करिअरकडे बारीक नजर ठेवायची. त्यांना क्लासेस लावायचे, एक क्रिकेट किंवा बँडमिंटनचा, गाण्याचा-क्लासिकल, सुगम संगीत, वेस्टर्न म्युझिक, चित्रकलेचा, कराटे ज्युडो, कथ्थक नृत्याचा..., झालंच तर आम्ही दोघे सकाळी नियमाने अगदी पांच मिनिटे का होईना WORK OUT करतो मुलांसमोर, EXERCISE हो.. '
दीड शहाणा...'वावावा, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही सकाळी मुलांना काय देता न्याहारीला ?'
ती शहाणी....'न्याहारी, यू मीन ब्रेकफास्ट ?'
दीड शहाणा...'हो तेच ते. पोहे, शिरा, सांजा, थालीपीठ, दूध इत्यादी .....'
ती शहाणी....'छेछेछे, अहो मुलांना ब्रेडबटर, टोस्ट, बिस्किट्स, सॅन्डविच, मॅगी आवडतं खायला. स्कूलमध्ये लंच असतंच स्कूलतर्फे. मग रात्री आम्ही पिझ्झा मागवतो, चायनीजची फर्माइश असते कधी कधी. मग वीकएंड्ला हॉटेलिंग असतंच. मला माझ्या जॉबमुळे सकाळी जमतच नाही, अगदी स्लाइसला बटर लावायलाही मुलांनाच सांगावं लागतं. आणि त्यांनाही सेल्फहेल्प इज द बेस्ट हेल्प हे शिक़वायलाच हवं ना ?'
दीड शहाणा...'मग वीकएंड्ला ओलं म्हणजे काही विशेष असेलच ना हॉटेलिंगला जाता तर ?'
ती शहाणी....'ओलं म्हणजे यू मीन ड्रिंक्स वगैरे ना ? हो हो, आम्ही घेतो दोघे ... पण अगदी म्हणजे जास्तीत जास्त तीन पेग्ज.'
दीड शहाणा...'मुलांसमोर !!'
ती शहाणी....'हो, पण त्यांच्यासाठी आम्ही कोका कोला, थम्स अप, पेप्सी, स्प्राइट अशी सॉफ्ट ड्रिंक्स ऑर्डर करतो.'
दीड शहाणा...'मग घरी जातांना कसे जाता ? म्हणजे क्याब वगैरे मागवत असाल ना ?
ती शहाणी....'छे हो, क्याब कशाला कधी दोघांच्या बाइक्स घेतो तर कधी छोटी कार. '
दीड शहाणा...'पण मद्य घेऊन गाडी चालवू नये असा नियम आहे ना, मग तो नियम मोडता ?'
ती शहाणी....'चालतं हो. आणि रात्री कोण असतं अडवायला? आणि आडवलं कोणी तर ओळखी कधी येणार कामाला ! अगदीच वाटलं तर एखादी नोट द्यायची हळूच.... '
दीड शहाणा...'पण मग हे तुमच्या संस्कारांत बसतं ?'
ती शहाणी....'चालतं हो एखादेवेळी, त्यात काय एवढं !'
दीड शहाणा...'बरं, मग तुम्ही संस्कृती वगैरे मानता तर उद्या गुढी पाडव्याला गुढी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारत असाल ना ?'
ती शहाणी....'छे हो, आमच्या घरी नाही करीत आम्ही सणवार साजरे.ते काय म्हणतात ते -अं-- कुलधर्म, कुलाचार. सो ऑर्थोडॉक्स ना. '
दीड शहाणा...'का ? घरात मोठी माणसे, मुलांचे आजी आजोबा ??'
ती शहाणी....'अं अं अं....ती दोघे वृद्धाश्रमात असतात. कित्ती वेळा सांगितलं त्यांना छान फ्लॅट घेऊन देतो भाड्याने, तिथे रहा म्हणून , तर ऐकतच नाहीत. '
दीड शहाणा...' बरं मग या नव्या वर्षाचा काही संकल्प वगैरे ?'
ती शहाणी....' हो केलाय ना आम्ही दोघांनी. ह्या वर्षी टॉपचं प्रमोशन आणि तेही चांगल्या मोठ्या राइजसह मिळवायचंच. त्यासाठी बॉस वर इम्प्रेशन मारायचं. कधी कधी थोडंसं पॉलिटिक्स खेळावं लागतं. बट यू नो ना इट्स ऑब्वियस ना.. आणि हो, आमचा सी ए बदलायचाय या वर्षी, फार टॅक्स नको हो जायला. आत्ताचा सी ए फारच तत्ववादी आहे हो. हां आता थोड़ा टॅक्स भरायलाच हवा, त्याने एक स्टेटस मिळते. एवढी लोकं टॅक्स बुडवतात आणि सुटून जातात. पण ह्या सी ए साहेबांना व्यवहार कळतच नाही. याला साधी मेडिकल्सची manage करून आणलेली बिले चालत नाहीत हो. आजकाल कुठे चालतंय असं ?'
........ ...... .....
..... .... ..... .....
तर तशी ही मुलाखत खूप वाढली असती. पण मलाच ती फारशी वाढवायची नव्हती. आता ही मुलाखत कोणाची घेतली, कधी घेतली, असले फुटकळ प्रश्न वाचक विचारणार नाहीत, हे मला पक्के माहीत आहे. कारण वाचक मोठे हुशार असतात. त्यांना बरोब्बर 'त' वरुन 'ताकभात' ओळखता येतो.
मला एक नक्की माहिती आहे स्वत:बद्दल, की मी काही पट्टीचा अभ्यासू बेरकी परिपक्व पत्रकार नाही.
मी म्हटलं होतं ना एकदा मागे, मला वाटलं स्वत:शी बोलावं ! म्हणून मी काय केलं, माझ्याच स्वभावातील एका अपरिपक्व तुकड्याला पत्रकार बनवलं, दीड शहाणा म्हणून ! मुलाखत घ्यायची म्हणजे पत्रकारासमोर हवंच ना कोणीतरी ! मग माझ्याच स्वभावातल्या एका लब्बाड प्रतिमेला, नव्हे वृत्ती म्हणूयात का ? तर तिला ती शहाणी म्हणून आणून बसवलं !
चालतंय ना ? असो.
चला उद्या शालिवाहन शके १९४० विलंबीनाम हे नूतन संवत्सर सुरु होतंय. छान गुढी उभारा, कडूलिंबाच्या पाल्याचे चूर्ण खा, चांगलं असतं आरोग्याला. स्वत:च्यातल्या देवाला आठवा. स्वत:तल्याच दैत्याचा पराभव करा. आनंदी आणि सकारात्मक रहा. तुम्हां सर्वांना या नवीन वर्षाच्या मणभर शुभेच्छा, हे नवीन संवत्सर तुम्हाला आरोग्यदायी राहो आणि समृद्धी प्राप्त करून देवो, तुम्हांला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या स्नेही मित्र नातेवाईकांना उत्तम मन:स्वास्थ्य, शरीरस्वास्थ्य, कुटुंबस्वास्थ्य लाभो. सर्वांत मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल तुमच्या मनातला आदर आणि अभिमान अधिकाधिक दृढ होत राहो, अभिजातच असलेल्या मायमराठीचा तुमच्या दैनंदिन व्यवहारातला, घरातला वापर सतत वाढता राहो, तुम्हांला वाचनाची - त्यातल्या त्यात समृद्ध मराठी वाचनाची सवय लागून, हां तुमच्या मुलाबाळां समोर चांगला आदर्श म्हणून उभा राहो, ह्या खरोखर मनापासून शुभेच्छा....
जरूर जरूर वाचा, वाचत रहा आणि आपल्या मित्रांना, स्नेही नातेवाईकांनासुद्धा वाचायला द्या - अगदी ह्याच शुभेच्छांसह !!
पद्मनाभ प्रभाकर हिंगे,
पुणे. मिती फाल्गुन वद्य ३०, शके १९३९,
शनिवार दिनांक १७ मार्च २०१८.
समाजातील रुढी व चालींवर अगदी चमचमीत व खुमासदार भाष्य. भावले रे भावले. छान हातोटी.
ReplyDelete