🌙अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे...💞
मिळेल तेव्हा अवतीभवतीचं अवकाश हातातल्या नारदयंत्रात (मोबाईल हँडसेट..सध्यातरी मला हा मराठी प्रतिशब्द म्हणून वापरावासा वाटला!) असलेल्या भिंगचित्र पकडणाऱ्या पटलावर नोंदवून ठेवण्याची मला सवयच लागली आहे ! (भाषेचं जरा अतिच होतंय का?..पण होऊ देत.)
वेळ:सायंकाळी ६.५५. स्थळ:-आमच्या मांडवगण येथील शेतातली नव्याने विकसित होत असलेली फळबाग.
माझं सहजच वर आभाळात लक्ष गेलं. अत्यंत रेखीव कोरीव अशी ही चंद्रकोर दिसली. सवयीने हाताची बोटं सरसावलीच. मनाला भावलेल्या या चंद्रकोरीचं माझ्या नारदयंत्रानं टिपलेलं छायाचित्र कुशल छायाचित्रकाराच्या योग्यतेचं नसलं तरी ते मला भावलेलं, मी काढलेलं असल्यानं या चंद्रकोरीच्या चित्राला काहीतरी समर्पक शीर्षक देऊन तुम्हां स्नेही सोबत्यांना पाठवण्याची घाईच झाली. कधी एकदा पाठवतोय असं झालं. गंमत म्हणजे ह्या चंद्रकोरीला पाहताच मधाळ आठवणींच्या डोहातून उसळून वर आलेल्या एका भावगीताचा मुखडा सहजच स्म्रृतीपटलावर उमटला...
" अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे.."
चंद्रकोरीच्या खाली लग्गेच ही ओळ टाकाविशी वाटली.
शालेय विद्यार्थीदशेत असताना आकाशवाणीवर नेहमी लागणाऱ्या या मधुर भावगीताच्या साऱ्याच ओळी पुन्हा शोधाव्याश्या वाटल्या. सारं गीत आठवणीतल्या गाण्यांतून शोधलं, सापडलं. ध्वनिमुद्रित गीत पुन:पुन्हा ऐकलं.
संजीवनी मराठ्यांच्या शब्दांतून, कृष्णाची वाट पाहणाऱ्या राधेची तगमग फार गोड प्रतीत झाली आहे. ही तगमग पाहून राधेची सखी तिला विचारतेय, ' अगंबाई, अशी का उसासे सोडते आहेस? आणि हे काय! कळ्यांची माळ कुस्करून का टाकलीस? अशी हरिवरती का बरे रुसलीस? '
इथं राधेच्या ह्या रुसण्याला मोठा गोड शब्द वापरलाय.. 'मधुरुसवा.'
'राधे, कंसदमनार्थ हरी मथुरेला गेलेत ना. आत्ता येतील ते विजयरथात बसून. पंचारतीची तयारी कर.'
संजीवनी मराठे यांच्या शब्दांना यशवंत देवांनी लावलेली मधुर चाल आणि या शब्दांना या चालीत मधुबाला जव्हेरी यांनी उत्तम गात दिलेला न्याय आजही हे भावगीत ५०-६० वर्षांनी सुद्धा पुन्हा ऐकावेसे वाटणे आणि ह्या आनंदात तुम्हां मित्रांनाही सामील करून घ्यावेसे वाटणे, हे सारे त्या शब्दांची, स्वरांची ताकदच नाही काय?
कधी निवांत वेळी शक्य झाल्यास हा गोडवा जरुर अनुभवा. फार काय लिहिणार? या गोड चंद्रकोरीच्या निमित्ताने ह्या गीताची झालेली आठवण माझ्या बाळबोध शब्दांत तुम्हांसमोर ठेवली.
पद्मनाभ हिंगे. मांडवगण.
बुधवार, १७ मार्च २०२१.
No comments:
Post a Comment