ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
शाळेतल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता कशा घोकंपट्टी करीत पाठ झालेल्या असायच्या. पण त्यांचं रसग्रहण करा, असं परिक्षेत आलं की मती कुंठित व्हायची. जागच्या जागी अडेलतट्टू सारखी खिळून राह्यची. शिकवता शिकवता गुरुजींनी किंवा बाईंनी विचारलं की, सांगा, कविला यातून काय सुचवायचंय? असा प्रश्न आला की, भले मोठ्ठे प्रश्नचिन्ह समोर उभे राहिलेले दिसायचे!
पण कुणी शहाण्या अभ्यासू व्यक्तीनं कविता समजावून सांगितली की मग मात्र लक्षात राहायची. त्या कवितेला कुणी चाल लावून म्हणू लागलं की कविता आपोआप समजू लागायची.
आणि मग कुणी विश्शेष व्यक्ती भेटली की कविता करायची खुमखुमी यायची. कविता करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या यमक जुळवणीसाठी आम्ही तर कित्येक कागदं कित्येकदा टरकावली सुद्धा. तासनतास लिहिल्यावर कळायचं, हे काही आपल्या कुवतीचं काम नाही! गड्या हा आपला प्रांत नाही. मग उधारउसनवार, चित्रपट गीतांची!
सांगायचं काय की, ते भलेभले नामवंत कवी, विंदा करंदीकर, ग्रेस, वसंत बापट, कुसुमाग्रज यांच्या कवितांचा अर्थ कुणी समजावून सांगितला की डोक्यात कविता घुसायची. खरं बोलून टाकायला काय हरकत आहे, नाही का?
कुसुमाग्रजांचा, रसयात्रा, हा कविता संग्रह कालपरवापासून घेऊन बसलोय. कविता वाचली की मागील शंकर वैद्य यांची टिप वाचायची. स्वतः शंकर वैद्य कवी. त्यामुळे समजून घ्यायला सोप्पं जातं. मुळात कुसुमाग्रजांच्या कवितेवर स्वतःचं काही भाष्य करण्याची आमची योग्यता, पात्रता नाही, पण वाचता वाचता समोर बातम्या चालू होत्या आणि योगायोगानं त्यातील ती मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांतून गावाकडे पायी जाणाऱ्या प्रवासी मजुरांची छायाचित्रे, चित्रफीत दाखवली जात होती. पुस्तकातल्या पानावर कुसुमाग्रजांची ' शेवटचे पान ' ही कविता होती. कडवं होतं,
' जाणारच का - सुखात जा तर
बाग मोहरो तव वाटेवर
माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून
प्रवासी, पहा जरा परतून '
वास्तविक, ह्या कवितेत कुसुमाग्रजांनी ध्येयवादी पुरुषावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. इथे नेमक्या याच ओळी या कोरोनामुळे आपल्या गावी परतणाऱ्या या मजुरांना लागू पडत असल्याचं जाणवलं.
*रसयात्रा* मध्ये कुसुमाग्रजांच्या निवडक ७९ कविता आहेत. यांत तुम्हांआम्हांला माहीत असलेल्या कविता आहेत. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा,' 'वेडात मराठे वीर दौडले सात, 'नवलाख तळपती दीप विजेचे येथ,' 'रण काय भयानक लोळे आग जळात! आदळती, वळती, आवळती क्रोधात, जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व आषाढघनाशी झुंजे वादळवात!' ही 'अहि-नकुल' - साप मुंगसाच्या जीवघेण्या लढतीची कविता, 'जालियनवाला बाग' अशा प्रसिद्ध कविता आहेत.
'की स्वर्गातुन कोसळलेला, सूड-समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान '
या ' कोलंबसाचे गर्वगीत ' कवितेतील कडवे वाचताना सद्यस्थिती चटकन डोळ्यांसमोर आली. कवितेच्या शेवटाला आलेल्या प्रेरणा देणाऱ्या कडव्यातील ओळी, सतत मनातल्या मनात घोळू लागल्या.
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा ..."
कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता साऱ्यांना सदैव प्रेरणा देणारी आहे. ही कविता या कविता संग्रहात नाही, परंतु आजच्या परिस्थितीनं घायाळ झालेल्यांना नैतिक बळ देणारी आहे, म्हणून इथे उद्धृत करतो.
लॉकडाऊन चार उद्यापासून सुरू होतंय. अजून किती दिवस हातावर हात ठेवून बसायचंय याची कोणी आजतरी कल्पना करु शकत नाही. रुतलेला आयुष्याचा गाडा बाहेर काढायला शरीरात आणि मनात बळ असायला हवं.
' मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा '
कित्येकांना असं बळ देणारं पण कोणी तरी हवं.
बेलवलकर गृहनिर्माण
१७ मे २०२०
No comments:
Post a Comment