Tuesday, 30 May 2017

'माय नेम इज शीला शिलाकी जवानी !'



'माय नेम इज शीला शिलाकी जवानी !'

      
   ओळखलंत

     थोडा ताण द्या ना…. 
     नीsss निरखून पहा….
     लाजू नका गडे ….
     कोणी ओरडणार नाही….  
     बाईंकडे इतके निरखून काय पहाता म्हणून कोणी विचारणार नाही
   म्हातारीच तर आहे ना ! हां आता ज़रा नीट नेटकी दिसते आहे खरी. व्यवस्थित नट्टा पट्टा केलाय बाईंनी . केस पांढरे दिसत असले तरी नीट चापून चोपून बसवले  आहेत. वय जास्त दिसत असलं म्हणून काय झालं, म्हातारीने तोंडाला रंगीत ओष्ठकांडी-लिपस्टिक-लावलीये, पावडर कुंकू केलंय. त्यामुळे चेहरा कसा टवटवीत एकदम फ्रेश दिसतोय. नक्कीच म्हातारी तरुणपणी ज़रा जास्तच दिलखेचक दिसत असावी, नाही का ? तुम्हालासुद्धा असं वाटतंय ना ? ज़रा एनलार्ज करून पहा. काही ओळख पटतेय का ?  
अजून नाही ओळखता आलं ? कम्माल आहे 
                                                 
                                                
                         
                    चला, आणखी एक फोटो दाखवतो. पहा.                                            


                       आज्जीबाई नाचतच आलेली दिसतेय.
  आता तरी ओळखलंत का ?
    आता ओळखलं असावं बहुतेक तुम्ही.
    हा हिरवट अवतार असून असून असणार तरी कोणाचा ?
    तुम्ही ओळखलं असेल तर ठीक, नसेल तर मला विचारा.
    म्हणजे मीच फोटो दाखवतोय तर मीच सांगणार ना.
          तीन वर्षे झाली. ही म्हातारी रंगमंचावर आली ती नाचत नाचत. गिरक्या घेत. मस्त लचकत मुरडत. आणि गाणं कोणतं, तर  'माय नेम इज शीला..शिलाकी जवानी !'
          या म्हाताऱ्या शिलाच्या एन्ट्रीवर उपस्थितांनी शिट्ट्या काय वाजवल्या..आरडा ओरडा काय केला, काही विचारू  नका. नुसता धिंगाणा….
          एंट्रीच  जबरदस्त मग शिट्ट्या तर येणारच. म्हातारीला या वयातसुद्धा डिमांड !!
          माझ्या तरुण मैत्रिणींनो प्लीज जेलस होऊ नका.
           या बाई नसून बाईंच्या वेशात प्रकटलेला पुरुष आहे. आणि 'तो मी नव्हेच' असं मी कधीच म्हणणार नाही....  कारण तीनाही तोमीच आहे.  
          खूप वर्षांनी मी रंगमंचावर आलो ते अश्या स्त्रीवेशात. शाळेत नाट्यवाचनाच्या स्पर्धेत मी भाग घ्यायचो. कॉलेजमधे कधी संधी नाही मिळाली. सुदर्शन केमिकल्स मध्ये असताना भरत नाट्य मंदिराच्या ललित औद्योगिक एकांकिका स्पर्धेत मात्र मला संधी मिळाली. रंगमंचावर येण्यात एक सुरेख आनंद असतो. हा आनंद मला त्यावेळी मिळाला. छोट्या छोट्या भूमिका करायला मिळाल्या, कधी श्रीकृष्णाची मुख्य भूमिकाही करायला मिळाली. दूरदर्शनच्या एका टेलेफिल्ममध्ये एक छोटीशी भूमिका करून छोट्या पडद्यावर झळकायची एक सुप्त इच्छाही पूर्ण झाली. अभिनय करायची खूप हौस होती, फिटली. आजही संधी मिळाली तर मागेपुढे पाहणार नाही.
          अशी स्त्रीची भूमिका मात्र प्रथमच साकारायला मिळाली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या स्त्रीपात्राच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांची दाद तर मिळालीच, प्रथम पुरस्कारही मिळाला. प्रपंचाच्या नित्य धबडग्यात थोडासा का होईना हा आनंद उपभोगता आला. या स्त्रीरूपाचं सारं श्रेय मात्र त्या रंगवेशभूषाकाराचंच.
           कसबापेठेत पूर्वी राहत असताना ४५-५० वर्षांपूर्वीची एक रंगपंचमी आठवते. रंगपंचमीच्या दिवशी आमच्या गल्लीत मोठा धिंगाणा असायचा. खूप धमाल असायची. एकदा आमच्याच गल्लीतला प्रताप मालेगावकर हा स्त्रीवेशात प्रकटला. सोज्वळ चेहरा, डोईवर पदर, हातात स्वयंवराचा हार घेऊन !! देखण्या चेहऱ्याचे वरदान आणि सडपातळ बांधा यामुळे त्याचे हे स्त्रीरूप पाहण्यासाठी सारी गल्ली गोळा झाली होती. खरोखरीच खूप देखणे रूप होते ते. हा पुरुष आहे हे चटकन कुणालाही कळलेच नाही. जो काही मेकअप होता तो सुद्धा अगदी साधा घरगुती होता. गल्लीतला स्त्रीवर्गसुद्धा तोंडाला पदर लावून हसत होता. मुलींमध्ये तर पुढे कितीतरी दिवस गप्पांत हाच विषय होता. प्रताप पुढे व्यावसायिक नाटकात काम करायचा. त्याचे ते देखणे स्त्रीरूप, ते चालणे, वागणे, लाजणे आजही माझ्या आठवणीत आहे.
          गेल्या शतकात बालगंधर्वांचे ते अजरामर शालीन स्त्रीरूप आजही मराठी रसिक मनामध्ये आदरणीय होऊन बसले आहे. अनेक कलाकारांनी आपापल्या कुवतीप्रमाणे स्त्रीभूमिका रंगमंचावर गाजवल्या. रितेश देशमुख हा प्रसिद्ध अभिनेताही एका हिंदी चित्रपटात स्त्रीवेशात फारच सुंदर दिसला होता. ' कुणीतरी येणार येणार गं ' म्हणत नाचणारा सचिन स्त्रीवेशात किती गोड आणि मोहक दिसला होता, हे आठवतंय ना. आताशा छोट्या पडद्यावर काही अभिनेते स्त्रीवेशात अवतरतात. त्यांच्या त्या भूमिकांना ते उत्तम कलाकार असल्याने उत्तम न्यायही देतात. पण तो भडकपणा, अतिरेक सारखा सारखा बघायला नकोसा होतो. मी केलेली शीला आगाऊ होती, खटयाळ होती, मात्र वाहवत गेली नाही. असो.
           इथे मी कुठेही समीक्षकाच्या नजरेतून पहात नाही. तो माझा पिंडच नाही. मनातली एक इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद इतरांना वाटला की वाढतो म्हणतात. म्हणून हा आनंदी अनुभव सांगतोय.

पद्मनाभ हिंगे, पुणे
३० में २०१७.
     
          
          

           





Monday, 22 May 2017

COME ON FRIENDS LET US......

                     हा निरागस निसर्ग कोपायची आपण वाट पाहत बसायचे का ?




वाटतोय ना पहावासा....
वाटतोय ना जवळपास हवाहवासा....
याच्या सावलीत बसावेसे वाटतेय ना....
सूरपारंब्या खेळायची हौस....
भागवावीशी  वाटतेय ना....



(परवा गावी गेलो होतो,तेंव्हा काढला हा फोटो)
 

 
     ह्याला बघताच, कुणी धावले... ह्याच्या पारंब्या पकडून झोका घेऊ लागले... कुणी झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागले... तर प्रौढांनी याच्या पारावर ठाण मांडून, 'चला आमचा फोटो काढ़ा' म्हणून ऑर्डर सोडली.

     किती सुंदर बहरलाय ना हा डेरेदार वड..
    
     काढू या का थोडीशी सवड...घेऊ या का खांद्यावर पाण्याची कावड.... लावूया का प्रत्येकाने एक एक रोपटे..
     वाढलेल्या उन्हाच्या झळा... सांगताहेत; संपत आलाय उन्हाळा... आलाय की दाराशी पावसाळा...
अगदी परवा परवाच तर आभाळातल्या ढगांनी आरडून ओरडून सांगितलं की... आणि भरीसभर म्हणून विजांनीसुद्धा थयथय नाचत कडकडाट करीत डोक्यात लक्ख प्रकाश पाडलाच की... आठवतंय ना... मग आता उगाच वेळ कशाला घालवायचा ??
     थेंबाथेंबातून पावसाच्या... उत्साहाचे सजीव कोंब फुटतील... घामाच्या अन पावसाच्या थेंबाथेंबांची... छोटीमोठी तळी साठतील....तहानलेली झाड़े वेली, पक्षी प्राणी पाणी  पिउन तृप्त होतील.
     तळ्या तळ्याच्या काठाने... लावू या चिंच आंबा पिंपळ वड... खुलवूया फुलवूया गारव्यात या...जीवन जगण्याची खरी आवड......

      चिमणी पाखरांची गर्दी होईल....

      खरं सांगू का.... ही काही एकट्यानेच घ्यायची जबाबदारी नाही...

     कमी झालेल्या प्राणवायुने प्राण तर अगदी कंठाशी येऊ घातलेत....असे इथे या डेरेदार वृक्षाखाली याल तेंव्हा शुद्ध हवेचा घमघमाट वाढलेला आहे हे कळेल....सावलीसावलीत प्रसन्नता वाढल्याची जाणीव होईल.... पोराबाळांच्या सुखद दंग्याला ऊत येईल.... तापलेला संतापलेला सूर्य याच्या गच्च भरलेल्या पानापानातून डोकावत, तुम्हाला हुडकून काढता काढता थकून पश्चिम घरात विश्रांती घ्यायला निघून जाईल...रात्रभराच्या विश्रांतीमुळे सूर्याचाही तुमच्यावरचा राग कमी होईल.... आणि नव्या सकाळी नव्या उत्साहाने तोही तुम्हाआम्हाला नवी ऊर्जा देईल....
     अहो...ऐकलंत का....
     अगं.... मी काय म्हणतोय...
     बाबा....
     आई....
चिमणाजी, चिमणाबाई, पप्पा, मम्मी, डार्लिंग... ताई, माई, अक्का, पप्या, पम्प्या झंप्या...
साहेब,सर, म्याडम, चिकुली,छकुली,छोट्या,गोट्या,बंटी, सोन्या,सोनुली....ओय ब्यूटी... अबे ओ हॅंडसम...
आता विचार कशाचा करताय ?
विचार करीत बसायची वेळ गेलीये..आता आचार-कृती करायची वेळ आली आहे...  हे आपल्या प्रत्येकाचेच काम आहे...किमान एक तरी झाड़ लावायला हवे..... एक तरी झाड जगवायला हवे...

हा निरागस निसर्ग कोपायची आपण वाट पाहत बसायचे का?

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
२२ मे २०१७.

Friday, 19 May 2017

Please come dear SPARROW...

                                             प्रिय चिमण्यांनो परत फिरूनी या.... 


     नदी काठावर असलेल्या घरात रहायला मिळणे हा माझ्यासाठी एक आनंदयोग. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही वाहनांच्या कलकलाटापासून बरचसे दूर. निवांत आणि शांत वातावरण अवतीभवती असणे आणि तेही आजच्या या प्रदूषणयुक्त गोंगाट असलेल्या दिवसात, हे म्हणजे स्वर्गसुखच की ! घराच्या कुठल्याही खिडकीतून बाहेरचे सुंदर नयनरम्य दृश्य रोज पहायला मिळणे हे भाग्यच नव्हे का ?
     अगदी खळाळते नसले तरी मुठा नदीचे संथ पण थोडेसेतरी वाहते पाणी दिसते. पावसाळ्यात तर ही नदी अगदी दुथडी भरून वाहते. ते पाहण्याची मजा तर काही औरच. दोन्ही काठांवर हिरवाई असतेच, तेही बारा महिने. अजून तरी सुदैवाने इथे काही होतांना दिसत नाही, टचवुड !  मनुष्यप्राण्याचे कुठले अतिक्रमणही नाही. पलिकडच्या तीरावर अगदी शिस्तीत उभी असलेली नारळाची झाड़े  आणि त्यातून हळूच डोकावून पाहणारी (अजून तरी) एखादीच इमारत, इकडून तिकडे लगबगीने उडणारे छोटे मोठे पक्षी, असे या परिसराचे मस्त देखणे रूप रोजचेच पहायला मिळणे हे आपले अद्याप नशीब चांगले असण्याचे लक्षण आहे असेच मी मानतो.
     रोज सकाळी जाग यावी ती पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे. कितीतरी वेगवेगळे पक्षी रोज दिसतात. हिवाळ्यात तर जरा जास्तच वेगळ्या जातीचे, नावं माहीत नसलेले अनेक पक्षी दृष्टीस पडतात. चिमण्यांचं दर्शन मात्र जरा कमीच  झालंय. नाहीच म्हणायचे. कधी कधी येतात त्या वीस वीस पंचवीसच्या घोळक्याने. चिवचिवाट करत, अगदी भुर्र भुर्र करत, परस्परांशी हमरीतुमरीवर येत, एखाद्या  बालवाडीतल्या चिमण्या बालकांसारख्या.
     माझं बालपण तरुणपण कस्बेपुण्यातलं. ते घर तसं मोठं, जुन्या पद्धतीच्या बांधकामातलं. मागच्या अंगणात पेरूचे झाड,  शेजारी एरंडाची भरपूर झाडे.  त्यात कावळ्याचिमण्यांची घरटी असत. वरच्या पत्र्यावरून एखादे कावळ्याचे घरटे दिसायचे. कावळाकावळी एक एक काडी जमवून आणायचे आणि घरटे बांधायचे. काही दिवसांनी घरट्यात तीन चार पिल्लं दिसायची. कुठूनतरी कावळाकावळी यायचे पिलांना खाऊ घालायचे. तेंव्हा त्या पिलांच्या उघड्या चोचीतून दिसणारी गुलाबी तोंडे अजूनही आठवणीत ताजी आहेत.
     रोज सकाळी झाडांवरच्या असंख्य चिमण्यांची धांदल उडालेली ऐकु यायची. परस्परांमध्ये या चिमण्यांची  कोणत्या एवढ्या महत्वाच्या विषयांवर जोरजोरात चर्चा व्हायची कुणास ठाऊक !
     कावळ्यांची कावकाव आणखी ह्या धांदलीत भर पाडायची.

     लहानपणीची ती फेमस गोष्ट मला आठवली. सगळ्या घरातल्या आजीआजोबांना हमखास सांगता येणारी गोष्ट. लहानग्यांना पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी गोष्ट.
     एक होता कावळा आणि एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं.......
मग आम्ही सारी चिमणी बाळं एकदम ओरडायचो .....      मेणाचं.
     एकदा काय झालं, खूप मोठ्ठा पाऊस आला.... आणि कावळ्याचं घर वाहून गेलं...
आणि गोष्ट पुढे नेहमीप्रमाणे चालू रहायची...

     मग कावळा जायचा चिऊताईकड़े आणि म्हणायचा, " चिऊताई चिऊताई दार उघड "
     मग चिऊताई म्हणायची, " थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू देत,"
     असं म्हणत म्हणत गोष्ट शेवटाला यायची.
     चिमणीला काही त्या लब्बाड कावळ्याला घरात घ्यायची इच्छा नसायची. तिला माहीत होते की हा कावळा गोड गोड बोलून घरात येईल आणि माझ्या गोजिरवाण्या पिल्लांना खाऊन टाकेल..
     तरी सुद्धा ती त्याला घरात घ्यायची. कावळा विचारायचा, "मी कुठे बसू ?"
     चिमणी म्हणायची, "बस या तव्यावर"
     तवा असायचा चांगलाच तापलेला. कावळा बसायचा  तव्यावर, आणि.......
     आम्ही सारी बाळे मोठमोठ्यांदा हसत  म्हणायचो, "कशी झाली कावळ्याची फजिती "
      
     उंच उंच उडणारी एखादी घार शेजारच्या उंच इमारतीवर येऊन बसायची. बसून इकडून तिकडे पहात शीळ घालताना दिसायची. घारीची ती दीर्घ शीळ मध्यंतरी खूप दिवसांनी ऐकायला मिळाली. आमच्या समोरच्या घरातल्या पिंजऱ्यातल्या पोपटाच्या वेगवेगळ्या शिट्ट्या ऐकू यायच्या. आजकाल काही हौशी आपल्या घरात रंगीत छोटे छोटे लव्हबर्डस पिंजऱ्यात आणून ठेवतात.
     खंड्या, साळुंक्या, बुलबुल, चित्रबलाक, भारद्धाज हे पक्षी कधी त्या परिसरात पहायला मिळाले नाहीत. ते आता या घरातून नेहमीच पहायला मिळतात. एकदा तर इकडच्या घरात एका बुलबुल पक्ष्याच्या जोडीने आमच्या स्वयंपाक घरातल्या ट्यूब लाइटवर अतिक्रमण केल्याचे आम्हाला दिसले. मग काय,तिचे बाळंतपण, नव्या चिमण्या बालबुलबुलांचे पालन पोषण हे सगळं आम्हाला बघायला मिळाले.
     त्या जुन्या घराच्या आसपास कोंबडयांचा पकपकाट सवयीचा होता. कोंबडा सकाळी अगदी रोजंदारीवर  असल्यासारखा अगदी न चुकता पहाटपासून घसा ताणताणून बांग देत सर्वांना सकाळी लवकर उठवण्याचे आपले पवित्र कर्तव्य चोख पार पाडायचा. या घरी ती बांग ऐकायला नाही येत. आता कोंबड्या दिसतात त्या चिकन सेंटरच्या पिंजऱ्यात किंवा कुणाच्या तरी सायकलच्या हॅन्डल वर दोन्ही पाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत. हताश.
     या घरी हिवाळ्यात कधी कधी दूरवरून पाचगावपर्वतीच्या बाजूने मोराच्या केका ऐकू येतात.

गेल्या वर्षी आम्ही विलायतेला गेलो होतो, लेस्टरच्या एबी (Abbey) पार्कमध्ये अनेक बदकांच्या घोळक्यात दिसणाऱ्या दोनचार हंस पक्ष्यांना पाहून आणि त्यांचा तो डौलदार रुबाब पाहून लताजींनी गायलेले 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक ' हे गदिमांचे गीत आठवले. तिकडे लंडनला हाईड पार्क मध्ये एकाच ठिकाणी अनेक हंस पक्ष्यांचे दर्शन झाले. हां अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता.लंडनला आम्ही विमानतळातून बाहेर आलो. तेंव्हा सहज लक्ष गेले, तर तिथे बस स्टॅंडवर पुष्कळ चिमण्या आरामात इकडून तिकडे बागडत होत्या. खूप दिवसांनी मला एवढ्या चिमण्या दिसत होत्या. 
   
     इथे कावळे दिसतात, घारी दिसतात,  दिसत नाहीत चिमण्या.
     मांगे कुणीतरी एकदा मला सांगितल्याचे आठवते, ज्या परिसरात चिमण्या असतात, तिथल्या वातावरणात प्रदूषण नसते. मी  शहानिशा नाही केली कधी. असेलही तसे. म्हणून तर आज मला राहून राहून एक सारखी आठवण होतेय ती त्या चिमण्यांची. आपल्याकडची चिमणी का बरे रूसली आहे ? खरंच का एवढे प्रदूषण आहे की ते चिमण्यांना मानवणारे  नसावे.
     बाकी सारे पक्षी कुठे ना कुठे तरी बघायला मिळतात. कसब्यातल्या घरी असताना दोन चिमण्या रोज आमच्या ओसरीतल्या तुळईवर असलेल्या आमच्या झोक्याच्या लोखंडी कड्यांवर रात्रभर विश्रांतीसाठी यायच्या. आम्ही कधीच त्यांना हुसकावून द्यायचो नाही. घरांत अगदी बिनधास्त उड्या मारत येतांना या चिमण्यांना कधी आमचं भय नाही वाटायचं. आमच्या घरातल्या एका कोपऱ्यात एक चिमणी अगदी नेहमी घरटे बांधायची. ना तिला आमची परवानगी लागायची, ना आम्हाला तिचे  अतिक्रमण वाटायचे. त्याकाळी ७/१२  उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड असे कोणतेही शब्द मला माहीत नव्हते. त्या चिमण्या पाखरांना  असे काही असते हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. शाळेत पहिली दुसरीत असतांना चिमणीची मी मोठमोठ्यांदा घोकायचो ती एक कविता आज एकदम मला आठवली. सर्वच शब्द नीटसे आठवत नाहीत, जे आठवतात ते असे..त्यात कदाचित माझेही काही शब्द घुसडलेले असू शकतात..

कावळे दादा कावळे दादा
माझा घरटा कोणी नेला
नाही ग बाई चिऊताई
त्याचा माझा संबंध नाही
चिऊताई चिऊताई
माझ्या घरटयात येतेस बाई
मऊ गादी देईन तुला
...........
चिमणीला मग पोपट बोले
का ग तुझे डोळे ओले
काय सांगू बाबा तुला
माझा घरटा कोणी नेला
चिऊताई चिऊताई
माझ्या  पिंजऱ्यात येतेस बाई
गोड पेरू देईन तुला
..... 
तुझा पेरू नक्को मला
मी नाही यायची तुझ्या घराला
.......
चिमणी उडून गेली राना.......

     योगायोग पहा..
आज सकाळी माझ्या एका शाळेतल्या मित्राने आमच्या Whats App groupवर एक मेसेज शेअर केला.

अप्रतिम संदेश  ...

पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. दोघंजणं शब्दं संपल्यासारखे बसून होते.

चिमणा - "सकाळी बोलूयात"
चिमणी - "हो"

रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.चिमणा उत्साहाने  म्हणाला, "निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू." 
तिच्या डोळ्यात पाणी आलं. 
चिमणा - "अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत ! चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...
यालाच म्हणतात जगणं.
लिहिणाऱ्याच्या हृदयातल्या भावनेला मनापासून दाद दिली.
   
     माझंही असंच एकदा मी कष्टाने घेतलेले घर हातून रुसून गेले.
     पण रडत बसायला नशीबाने मला सवडच दिली नाही. सारी देव म्हणावीत अशीच माणसे भेटत राहिली. आणि फिरत फिरत मी या नव्या घरी आलो.

     पण चिऊताई फारच स्वाभिमानी. रानावनातून परत येऊन घरटे बांधायला काय हरकत आहे ? पण छे चिमणाबाई तयारच नाही !
     आम्ही तरी तिच्यासाठी कुठली सोय करून ठेवली आहे ?
     
     "चिऊताई, आम्हीच सारे तुला आवाहन करतोय,"
     मुलांना म्हणायला शिकवू पाहतोय.....

    " चिऊताई चिऊताई माझ्या घरट्यात येतेस ? "

     "कावळ्यासारखे लबाडीने आम्ही नाही वागणार तुझ्याशी. 
     पोपटासारखे किंवा लव्हबर्डस सारखे पिंजऱ्यातही अडकवून ठेवणार नाही तुला.
     ७/१२ चा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, तुला विचारणार नाही. 
     नोंदणी मूल्य, बँकेचे कर्ज, अशा कुठल्याही कचाट्यात तुला अडकवणार नाही. 
     मात्र, आमच्या सोसायटीची तुला कायमची मेंबरशिप देण्याची  सर्वांची एकमताने तयारी आहे. 
     आमची दारे, खिडक्या, लॉफ्ट्स, पार्किंग, डक्ट, आसपासच्या छोटेखानी बागा, तुझ्यासाठी एमिनिटीज आहेतच  आणि या सर्व ठिकाणी तुला, तुझ्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना मुक्त प्रवेश राहील. आमच्या सर्व घरांमधल्या बालगोपाळांबरोबर तुझे फोटो आम्ही काढू. किती दिवस झालेत, तू येतच नाहीस म्हटल्यावर इथे तुझा फोटो नाही ना दाखवता आला. तू आल्याशिवाय कसा काढणार, तूच सांग."
      ' चिऊ चिऊ ये दाणा खा पाणी पी ' अशी इथल्या साऱ्या माउलींची हांक तुला ऐकू येतेय ना ?
     ये.... तुला आवडेल आमचा परिसर. 
     आम्ही वाट पाहू ना... "

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
१९ मे २०१७.

Friday, 12 May 2017

aajachee dainandinee


                            आजची दैनंदिनी 
          
          मी चक्क चकणा - चिकना नव्हे - चकणा हेकणा झालोय.
     दचकू नका आणि का म्हणून काय विचारताय ?
     माझा डावा डोळा आणि उजवा डोळा दोघेही एकाच वेळी दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवता ठेवता  आपल्यातले समांतर अंतर गमावून एकमेकांपासून जरा दूर सरकलेत !!!
     खरं नाही ना वाटत ? बघा ना दोन्ही एकमेकांपासून समान्तर अंतर राखूंन असले तरी त्यांच्या  दृष्टीतला समतोल व्यवस्थित होता. आता   बेशिस्तीमुळे दुरावा वाढलाय असंच मला वाटतंय !
     रस्त्यावर उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या कचरा पेट्या, बेबंद अतिक्रमणामुळे आणि स्वैर वृत्तीने वागणाऱ्या  सुबुद्ध मनुष्य स्वभावामुळे होत असलेली प्रगती की अधोगती पाहणारे हे माझे दोन्ही डोळे स्वतःची मूळ जागा सोडून जरा ऐसपैस झालेत. आजूबाजूची बेशिस्त, बेजबाबदार वृत्ती याचा वैताग वैताग आलाय. त्यामु़ळे चिडचिड,आदळआपट वाढली आहे.
     सकाळी कामावर निघावे तर गाडी चालवणे म्हणजे कसरत झाली आहे. रोजचाच आटापिटा करावा लागतोय. उजवीकडून वेगाने ओव्हरटेक करणारी वाहने पाहू की झपकन विरुद्ध दिशेने येत डावीकडून जाणारी वाहने यांच्या होणाऱ्या अचानक आक्रमणाकडे लक्ष ठेवू ?  हिरव्या दिव्याच्या सिग्नलची वाट पहात उभं राहावं तर मागून टॅहॅ टॅहॅ करणारी कलेजात जाणारी, हापिसात जाणारी, शिणिमाला जाणारी, त्ये शापिंग की काय  म्हणत्यात त्याला जाणारी, जणू मागे वाघ लागलाय की काय असं वाटावं इतकी घाई झालेली, की घाईची लागल्यागत वाहने चालवणारी बुद्धिमान म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात राहणारी माणसं, मगरूर चिडका त्रासिक चेहरा करून मजकडे पाहू लागतात. सिग्नल तोडणारे वाहनचालक, कॉर्नरला गाडी लावून निवांत गप्पा मारणारे, तिथेच अतिक्रमण करुन ऐसपैस बसलेल्या भाजी किंवा फळे विक्रेत्याकडून घासाघीस करीत उभे असलेले ग्राहक पाहिले की चिडावं रडावं की निराश व्हावं असा प्रश्न पडतो. सावकाश मधून जाणारी वाहने, सुसाट वेगाने नागमोडी वळणे घेत पळणारी वाहने , स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही  जीवावर उदार होणारी मस्तवाल माजोर्डी माणसं. वाहतुकीचे सर्व नियम संकेत तुडवणारे वाहनचालक पाहिले की चिडचिड होते.   मनाला वाटले की थांबावे, स्पीड कमी करावा, थोडेसे  वाहन बाजूला घेऊन बसल्या बसल्या  पायाने साइड स्टॅंड लावून कुठेही कशीही गाडी पार्क करावी, असे वागणारी माणसं पाहिली की वाटतं आपण गेल्या जन्मी असं काय पाप केलंय की, हे सारं सहन करणं आपल्याच नशिबी यावं.
     गेल्या वर्षी विलायतेला गेलो होतोतेंव्हा तिथली शिस्त, नागरीक म्हणून व्यवस्थित जबाबदारी पाळणारे लहानमोठे सर्व रहिवासी पाहिले तेंव्हा किती बरं वाटलं होतं.
     कुठेही कचरा दिसणार नाही. वाहनांची सतत वर्दळ असते. अगदी भरपूर वाहने रस्त्यावरून धावत असतात. पण लाल दिवा लागला की स्टॉप लाईनच्या मागेच वाहने उभी राहतात. हिरवा दिवा लागल्या- शिवाय कुठलेही वाहन पुढे निघत नाही. मागून कोणी हॉर्न वाजवत नाही. पादचारी रस्ता ओलांडायचा असेल तर त्या ठिकाणी असलेल्या यंत्रावरील पुशबटण दाबून हिरवा दिवा लागण्याची वाट पाहतो. तेथे लाल दिवा असेल तर पादचारी असो वा नसो, गाडी हिरवा दिवा लागेपर्यंत थांबते.  एकदा लंडनहून मध्यरात्री लेस्टरला जाताना चारपांच ठिकाणी सिग्नलला आमची गाड़ी थांबली. आमच्या मागेपुढेही काही गाडया हिरवा सिग्नल लागेपर्यंत थांबल्या होत्या. आणि विशेष म्हणजे, डाव्या उजव्या बाजूने जाणारे एकही वाहन नव्हते ! आमच्या लाईनमधल्या गाड्या त्या त्या चालकांनी पुढे दामटल्या असत्या तरी पुढे कुठेही लपून बसलेला ट्रेफिक हवालदार दिसत नव्हता. घाई सर्वांना असतेच पण कोणीही वाहतुकीचे नियम तोडत नाही. नव्हे त्यांच्या अंगातच शिस्त भिनलेली आहे. तिकडे विलायतेला मला कोणत्याच रस्त्यावर कुठलेही होर्डिन्ग दिसले नाही. कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाचे अनधिकृत बोर्ड दिसले नाहीत.वरात, मिरवणूक नजरेस पडली नाही. चालता चालता एखादा छोटासा चार पाच वर्षांचा मुलगा फूटपाथवर धावत येतो हातातला कागद, चॉकलेटचे रॅपर लीटर बॉक्समधे टाकतो. कमाल म्हणजे मला रस्त्यावर वाहतूक नियमन करणारा एकही पोलीस कर्मचारी आढळला नाही.  फोटोत पहा शिस्त आणि स्वच्छतासुद्धा.
     खूप काही सांगायचं आहे पण  तुम्ही म्हणाल 'हा शहाणा कुठं फारीनला गेला अन् आम्हांला शहाणपण शिकवायला लागला'; असो.
     आम्ही इंग्रजांचे पोशाख जवळ केले, भाषा अवगत केली, खूप सवयी घेतल्या. चमच्याने  खाण्याच्या सवयी घेतल्या. पण हाय...
त्यांची शिस्त, स्वच्छता नाही घेतली, आपल्या शहरावरचे देशावरचे प्रेम आणि स्वतःची जबाबदारी यात कोणतीच गल्लत इथला लहानापासून मोठया पर्यंतचा नागरीक करत नाही.
गेले काही दिवस मी Whats App / Facebook वर मनातली भोवतालच्या या सतत बिघडत चाललेल्या  परिस्थितीबद्दलची ही खदखद, चिडचिड जमेल त्या शब्दांत, थोडया तिरकस तिरसट खोचक पद्धतीने व्यक्त करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतोय. जसे की,

 'अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्याकडून मी वस्तु विकत घेणार नाही, असा निश्चय ग्राहकाने केला तर ?'

'मला मनापासून वाटतंय, मी हेल्मेट घालायला पाहिजे...
पण मला ओशाळायला होतं..
लहानपणापासून सगळेच सांगतात की..तुला डोकंच नाही...'

     थोडेफार लाईक्स मिळतात, स्माईली येतात बस्स. पण गांभीर्य कुठे दिसत नाही.

     परवा, आजूबाजूच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीबाबत मनातली चलबिचल व्यक्त करण्यासाठी  'मोरू ' नावाने पुन्हा एकदा मनाने शाळेत गेलो, शाळेत तुमच्यासारखे अवतीभवती अनेक मित्र आपापल्या बाकांवर बसलेले दिसले.

मोरू....(कल्पनेतला मी-झोपेतला मी-आजच्या जमान्यातला मी )
बापाच्या वरच्या पट्टितल्या हाकेने मोरू नाईलाजाने उठला.
"कार्ट्या..कालचा गृहपाठ (एक्च्युअली होमवर्क म्हणायला हवं होतं)कोण तुझा आजा करणार आहे?" आवाजाची पट्टी खाली यायचं नाव घेत नव्हती. "शिस्त म्हणून नाही कार्ट्याला ! खुशाल लोळतोय अंथरुणात. चल आटप आणि घे दप्तर. आणि लिही निबंध. कशावर लिहायचा होता ?"
उठला बिच्चारा मोरू. कसाबसा आवरुन बसला.घेतली वही गृहपाठाची आणि लागला खरडायला...
आणि लिहिला गृहपाठ. बघा वाचून.
'सुप्रभात गुरुजी. (तुम्हीच गुरूजी-तुम्हीच विद्यार्थी मित्र)

(माझ्या निबंधाचा विषय आहे...)
'आजची सकाळ'
     आज नेहमीप्रमाणे उजाडले. बाबांच्या आरडाओरडीने जाग आली. खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसले अंधाराच्या गादीवर प्रकाश आळोखे पिळोखे देत उठून बसू लागला होताबाबांच्या कर्कश्श आवाजामुळे खिडकीतून कित्येक दिवसांनी दिसलेल्या दोन तीन चिमण्या उडून गेल्या होत्या. समोरच्या घराच्या खिडकीवर निलाजरी कबुतरं स्वतःभोवती गिरक्या घेत घुटमळताना दिसत होती. खिडकीत टांगलेल्या कुंडीतली तुळस नियमित पाणी न मिळाल्याने मान टाकून कशीबशी उभी होती. बाबा टीव्ही समोर बसून एकसारखे चॅनेल बदलत होते. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. आम्हा मुलांना मात्र ओरडा आणि बाबांच्या टीव्हीचा आवाज मोठा! आई तिकडे मोबाईलवर खेळत होती आणि स्वत:शीच हसत होती. माझ्याकडे तिचे लक्षच नव्हते! वाहनांचा खडखडाट वाढला होता. टाकीतल्या  पाण्याची धार  बारीक झाल्याची बिल्डिंगीतली बोंबाबोंब ऐकू येऊ लागली होती. टीव्हीच्या आवाजामुळे बाबांना बहुधा ऐकू येत नव्हते.                बाबांसमोर प्रगतीपुस्तक सहीला ठेवून चार दिवस झाले. निबंध कसा लिहायचा यासाठी बाबांना मी कालपासून तीनचारदा विचारले. मला वाटले बाबा सांगतील की चल लिही. 'आज सकाळी मी लवकर उठलो, शौचमुखमार्जन करून देवासमोर बाबांनी शिकवलेले स्तोत्र म्हटले. मग मी सूर्यनमस्कार घातले आणि दूध पिउन अभ्यासाला बसलो.!'.... पण तसे काही केले नाही. पुढे सांगता येईल ऐसे काही नाही. बस्स आज एवढेच लिहिता आले.'
तुमचा विद्यार्थी,
मोरू
(उर्फ पद्मनाभ)
असो. 

       अगदी प्रत्येकाने-जोपर्यंत आपण स्वत: जाणीवपूर्वक नियमांचे पालन करणार नाही तोपर्यंत
वाहतूक सुरळीत होणार नाही-मी कचरा सार्वजनिक जागेत टाकेन, तोवर कचऱ्याचे ढीग वाढतच जाणार-हे लक्षात घेऊन व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात स्वयंशिस्तीने वागायचे ठरवले तर परिस्थितीत सुधारणा होईल.     
     आज आशेचा एक किरण अनुभवायला मिळाला, खूप बरे वाटले. एखादी का होईना व्यक्ती सकाळच्या घाईगर्दीच्या वेळेत वाहतुकीचे नियम पाळताना दिसली. झालं काय, माझ्यापुढे एक स्कूटर(बहुधा एमएच १२ .. ७२३७)लाल सिग्नल असल्याने उभी होती. मला दत्तवाडीकडून म्हात्रे पुलाकडे जायचे होते. डाव्या उजव्या बाजूचे लाल दिवे लागले आणि आमच्या आजूबाजूची सारीच वाहने जणू पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखी छू: म्हणावी तशी सुसाटली. माझ्यापुढचा शिरस्त्राण(हेलमेट)घातलेला आणि मागे कुमारवयीन मुलगा असलेला, स्कूटरवाला स्टॉपलाइनच्या अलीकडेच अजूनही थांबलेला होता! हिरवा लाइट लागल्यावर तो निघाला आणि मीही ! वाटलं होतं जाता जाता बोलावं, पण घाई असते ना. ठीक आहे. या कड़क उन्हाळ्यात ही गोष्ट एक थंडगार झुळूक आणि आशेचा सकारात्मक किरण दाखवणारी वाटली. 

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
दिनांक:१२.०५.२०१७