Friday, 19 May 2017

Please come dear SPARROW...

                                             प्रिय चिमण्यांनो परत फिरूनी या.... 


     नदी काठावर असलेल्या घरात रहायला मिळणे हा माझ्यासाठी एक आनंदयोग. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही वाहनांच्या कलकलाटापासून बरचसे दूर. निवांत आणि शांत वातावरण अवतीभवती असणे आणि तेही आजच्या या प्रदूषणयुक्त गोंगाट असलेल्या दिवसात, हे म्हणजे स्वर्गसुखच की ! घराच्या कुठल्याही खिडकीतून बाहेरचे सुंदर नयनरम्य दृश्य रोज पहायला मिळणे हे भाग्यच नव्हे का ?
     अगदी खळाळते नसले तरी मुठा नदीचे संथ पण थोडेसेतरी वाहते पाणी दिसते. पावसाळ्यात तर ही नदी अगदी दुथडी भरून वाहते. ते पाहण्याची मजा तर काही औरच. दोन्ही काठांवर हिरवाई असतेच, तेही बारा महिने. अजून तरी सुदैवाने इथे काही होतांना दिसत नाही, टचवुड !  मनुष्यप्राण्याचे कुठले अतिक्रमणही नाही. पलिकडच्या तीरावर अगदी शिस्तीत उभी असलेली नारळाची झाड़े  आणि त्यातून हळूच डोकावून पाहणारी (अजून तरी) एखादीच इमारत, इकडून तिकडे लगबगीने उडणारे छोटे मोठे पक्षी, असे या परिसराचे मस्त देखणे रूप रोजचेच पहायला मिळणे हे आपले अद्याप नशीब चांगले असण्याचे लक्षण आहे असेच मी मानतो.
     रोज सकाळी जाग यावी ती पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे. कितीतरी वेगवेगळे पक्षी रोज दिसतात. हिवाळ्यात तर जरा जास्तच वेगळ्या जातीचे, नावं माहीत नसलेले अनेक पक्षी दृष्टीस पडतात. चिमण्यांचं दर्शन मात्र जरा कमीच  झालंय. नाहीच म्हणायचे. कधी कधी येतात त्या वीस वीस पंचवीसच्या घोळक्याने. चिवचिवाट करत, अगदी भुर्र भुर्र करत, परस्परांशी हमरीतुमरीवर येत, एखाद्या  बालवाडीतल्या चिमण्या बालकांसारख्या.
     माझं बालपण तरुणपण कस्बेपुण्यातलं. ते घर तसं मोठं, जुन्या पद्धतीच्या बांधकामातलं. मागच्या अंगणात पेरूचे झाड,  शेजारी एरंडाची भरपूर झाडे.  त्यात कावळ्याचिमण्यांची घरटी असत. वरच्या पत्र्यावरून एखादे कावळ्याचे घरटे दिसायचे. कावळाकावळी एक एक काडी जमवून आणायचे आणि घरटे बांधायचे. काही दिवसांनी घरट्यात तीन चार पिल्लं दिसायची. कुठूनतरी कावळाकावळी यायचे पिलांना खाऊ घालायचे. तेंव्हा त्या पिलांच्या उघड्या चोचीतून दिसणारी गुलाबी तोंडे अजूनही आठवणीत ताजी आहेत.
     रोज सकाळी झाडांवरच्या असंख्य चिमण्यांची धांदल उडालेली ऐकु यायची. परस्परांमध्ये या चिमण्यांची  कोणत्या एवढ्या महत्वाच्या विषयांवर जोरजोरात चर्चा व्हायची कुणास ठाऊक !
     कावळ्यांची कावकाव आणखी ह्या धांदलीत भर पाडायची.

     लहानपणीची ती फेमस गोष्ट मला आठवली. सगळ्या घरातल्या आजीआजोबांना हमखास सांगता येणारी गोष्ट. लहानग्यांना पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी गोष्ट.
     एक होता कावळा आणि एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं.......
मग आम्ही सारी चिमणी बाळं एकदम ओरडायचो .....      मेणाचं.
     एकदा काय झालं, खूप मोठ्ठा पाऊस आला.... आणि कावळ्याचं घर वाहून गेलं...
आणि गोष्ट पुढे नेहमीप्रमाणे चालू रहायची...

     मग कावळा जायचा चिऊताईकड़े आणि म्हणायचा, " चिऊताई चिऊताई दार उघड "
     मग चिऊताई म्हणायची, " थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू देत,"
     असं म्हणत म्हणत गोष्ट शेवटाला यायची.
     चिमणीला काही त्या लब्बाड कावळ्याला घरात घ्यायची इच्छा नसायची. तिला माहीत होते की हा कावळा गोड गोड बोलून घरात येईल आणि माझ्या गोजिरवाण्या पिल्लांना खाऊन टाकेल..
     तरी सुद्धा ती त्याला घरात घ्यायची. कावळा विचारायचा, "मी कुठे बसू ?"
     चिमणी म्हणायची, "बस या तव्यावर"
     तवा असायचा चांगलाच तापलेला. कावळा बसायचा  तव्यावर, आणि.......
     आम्ही सारी बाळे मोठमोठ्यांदा हसत  म्हणायचो, "कशी झाली कावळ्याची फजिती "
      
     उंच उंच उडणारी एखादी घार शेजारच्या उंच इमारतीवर येऊन बसायची. बसून इकडून तिकडे पहात शीळ घालताना दिसायची. घारीची ती दीर्घ शीळ मध्यंतरी खूप दिवसांनी ऐकायला मिळाली. आमच्या समोरच्या घरातल्या पिंजऱ्यातल्या पोपटाच्या वेगवेगळ्या शिट्ट्या ऐकू यायच्या. आजकाल काही हौशी आपल्या घरात रंगीत छोटे छोटे लव्हबर्डस पिंजऱ्यात आणून ठेवतात.
     खंड्या, साळुंक्या, बुलबुल, चित्रबलाक, भारद्धाज हे पक्षी कधी त्या परिसरात पहायला मिळाले नाहीत. ते आता या घरातून नेहमीच पहायला मिळतात. एकदा तर इकडच्या घरात एका बुलबुल पक्ष्याच्या जोडीने आमच्या स्वयंपाक घरातल्या ट्यूब लाइटवर अतिक्रमण केल्याचे आम्हाला दिसले. मग काय,तिचे बाळंतपण, नव्या चिमण्या बालबुलबुलांचे पालन पोषण हे सगळं आम्हाला बघायला मिळाले.
     त्या जुन्या घराच्या आसपास कोंबडयांचा पकपकाट सवयीचा होता. कोंबडा सकाळी अगदी रोजंदारीवर  असल्यासारखा अगदी न चुकता पहाटपासून घसा ताणताणून बांग देत सर्वांना सकाळी लवकर उठवण्याचे आपले पवित्र कर्तव्य चोख पार पाडायचा. या घरी ती बांग ऐकायला नाही येत. आता कोंबड्या दिसतात त्या चिकन सेंटरच्या पिंजऱ्यात किंवा कुणाच्या तरी सायकलच्या हॅन्डल वर दोन्ही पाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत. हताश.
     या घरी हिवाळ्यात कधी कधी दूरवरून पाचगावपर्वतीच्या बाजूने मोराच्या केका ऐकू येतात.

गेल्या वर्षी आम्ही विलायतेला गेलो होतो, लेस्टरच्या एबी (Abbey) पार्कमध्ये अनेक बदकांच्या घोळक्यात दिसणाऱ्या दोनचार हंस पक्ष्यांना पाहून आणि त्यांचा तो डौलदार रुबाब पाहून लताजींनी गायलेले 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक ' हे गदिमांचे गीत आठवले. तिकडे लंडनला हाईड पार्क मध्ये एकाच ठिकाणी अनेक हंस पक्ष्यांचे दर्शन झाले. हां अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता.लंडनला आम्ही विमानतळातून बाहेर आलो. तेंव्हा सहज लक्ष गेले, तर तिथे बस स्टॅंडवर पुष्कळ चिमण्या आरामात इकडून तिकडे बागडत होत्या. खूप दिवसांनी मला एवढ्या चिमण्या दिसत होत्या. 
   
     इथे कावळे दिसतात, घारी दिसतात,  दिसत नाहीत चिमण्या.
     मांगे कुणीतरी एकदा मला सांगितल्याचे आठवते, ज्या परिसरात चिमण्या असतात, तिथल्या वातावरणात प्रदूषण नसते. मी  शहानिशा नाही केली कधी. असेलही तसे. म्हणून तर आज मला राहून राहून एक सारखी आठवण होतेय ती त्या चिमण्यांची. आपल्याकडची चिमणी का बरे रूसली आहे ? खरंच का एवढे प्रदूषण आहे की ते चिमण्यांना मानवणारे  नसावे.
     बाकी सारे पक्षी कुठे ना कुठे तरी बघायला मिळतात. कसब्यातल्या घरी असताना दोन चिमण्या रोज आमच्या ओसरीतल्या तुळईवर असलेल्या आमच्या झोक्याच्या लोखंडी कड्यांवर रात्रभर विश्रांतीसाठी यायच्या. आम्ही कधीच त्यांना हुसकावून द्यायचो नाही. घरांत अगदी बिनधास्त उड्या मारत येतांना या चिमण्यांना कधी आमचं भय नाही वाटायचं. आमच्या घरातल्या एका कोपऱ्यात एक चिमणी अगदी नेहमी घरटे बांधायची. ना तिला आमची परवानगी लागायची, ना आम्हाला तिचे  अतिक्रमण वाटायचे. त्याकाळी ७/१२  उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड असे कोणतेही शब्द मला माहीत नव्हते. त्या चिमण्या पाखरांना  असे काही असते हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. शाळेत पहिली दुसरीत असतांना चिमणीची मी मोठमोठ्यांदा घोकायचो ती एक कविता आज एकदम मला आठवली. सर्वच शब्द नीटसे आठवत नाहीत, जे आठवतात ते असे..त्यात कदाचित माझेही काही शब्द घुसडलेले असू शकतात..

कावळे दादा कावळे दादा
माझा घरटा कोणी नेला
नाही ग बाई चिऊताई
त्याचा माझा संबंध नाही
चिऊताई चिऊताई
माझ्या घरटयात येतेस बाई
मऊ गादी देईन तुला
...........
चिमणीला मग पोपट बोले
का ग तुझे डोळे ओले
काय सांगू बाबा तुला
माझा घरटा कोणी नेला
चिऊताई चिऊताई
माझ्या  पिंजऱ्यात येतेस बाई
गोड पेरू देईन तुला
..... 
तुझा पेरू नक्को मला
मी नाही यायची तुझ्या घराला
.......
चिमणी उडून गेली राना.......

     योगायोग पहा..
आज सकाळी माझ्या एका शाळेतल्या मित्राने आमच्या Whats App groupवर एक मेसेज शेअर केला.

अप्रतिम संदेश  ...

पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. दोघंजणं शब्दं संपल्यासारखे बसून होते.

चिमणा - "सकाळी बोलूयात"
चिमणी - "हो"

रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.चिमणा उत्साहाने  म्हणाला, "निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू." 
तिच्या डोळ्यात पाणी आलं. 
चिमणा - "अग वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत ! चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...
यालाच म्हणतात जगणं.
लिहिणाऱ्याच्या हृदयातल्या भावनेला मनापासून दाद दिली.
   
     माझंही असंच एकदा मी कष्टाने घेतलेले घर हातून रुसून गेले.
     पण रडत बसायला नशीबाने मला सवडच दिली नाही. सारी देव म्हणावीत अशीच माणसे भेटत राहिली. आणि फिरत फिरत मी या नव्या घरी आलो.

     पण चिऊताई फारच स्वाभिमानी. रानावनातून परत येऊन घरटे बांधायला काय हरकत आहे ? पण छे चिमणाबाई तयारच नाही !
     आम्ही तरी तिच्यासाठी कुठली सोय करून ठेवली आहे ?
     
     "चिऊताई, आम्हीच सारे तुला आवाहन करतोय,"
     मुलांना म्हणायला शिकवू पाहतोय.....

    " चिऊताई चिऊताई माझ्या घरट्यात येतेस ? "

     "कावळ्यासारखे लबाडीने आम्ही नाही वागणार तुझ्याशी. 
     पोपटासारखे किंवा लव्हबर्डस सारखे पिंजऱ्यातही अडकवून ठेवणार नाही तुला.
     ७/१२ चा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, तुला विचारणार नाही. 
     नोंदणी मूल्य, बँकेचे कर्ज, अशा कुठल्याही कचाट्यात तुला अडकवणार नाही. 
     मात्र, आमच्या सोसायटीची तुला कायमची मेंबरशिप देण्याची  सर्वांची एकमताने तयारी आहे. 
     आमची दारे, खिडक्या, लॉफ्ट्स, पार्किंग, डक्ट, आसपासच्या छोटेखानी बागा, तुझ्यासाठी एमिनिटीज आहेतच  आणि या सर्व ठिकाणी तुला, तुझ्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना मुक्त प्रवेश राहील. आमच्या सर्व घरांमधल्या बालगोपाळांबरोबर तुझे फोटो आम्ही काढू. किती दिवस झालेत, तू येतच नाहीस म्हटल्यावर इथे तुझा फोटो नाही ना दाखवता आला. तू आल्याशिवाय कसा काढणार, तूच सांग."
      ' चिऊ चिऊ ये दाणा खा पाणी पी ' अशी इथल्या साऱ्या माउलींची हांक तुला ऐकू येतेय ना ?
     ये.... तुला आवडेल आमचा परिसर. 
     आम्ही वाट पाहू ना... "

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
१९ मे २०१७.

No comments:

Post a Comment