Tuesday, 27 March 2018



प्रगतिपुस्तक, मूल्यांकन/स्व मूल्यांकन . . . !!!
(मागील दोन्ही पानांवरून पुढे चालू..... )

आज काय तारीख बरं ? अं अं अं ...  २८ मार्च...... काय विशेष आज ?
आयला, Today, means आज, मी नी, मैंने, यानेकी I have completed चक्क sixty five years, कम्प्लीटली!!!   साठी बुद्धी नाठी झाली, त्यावर डायरेक्ट पांच वर्षे पूर्ण !!
म्हटलं चला बाप्पाला नमस्कार करायला हवा. थोडं बाल्यावस्थेतही जावंसं वाटलं.
नमस्कार केला नि बाप्पाला म्हणालो, " बाप्पा रे बाप्पा, लहानपणी आई वडलांनी शाळेत घातला तेंव्हा जसा होतो ना, तसाच अजूनही मी शाळेतच आहे रे ! (हो घातलाचफटकेसुद्धा खाल्ले असतील ! आता नीटसं आठवत नाही. रडत रडत जायचो एवढं आठवतं अंधुकसं.) तर, बाप्पाला म्हटलं, एकदा तरी दाखव की Result, माझ्या मनासारखा. कित्ती तरी परीक्षा घेतोस, अगदी विसरता ! एकदा तरी प्रगति पुस्तक बघू दे की माझे मला.. "
बिचारा बाप्पा ! त्यालाही दया आली. माझी !! भोळा आहे बिचारा बाप्पा. दाखवतो म्हणाला रिझल्ट लग्गेच या गरीबाला !! (मी आणि गरीब? what a joke ! असंच मत असेल मला पुरतं ओळखणाऱ्यांचं, माहितीये.)

आता पूर्वीसारखं पोस्ट कार्ड वगैरे येत नाही म्हणे. आणि तसा निक्काल कळायला अवकाश आहे. पण देवाला खिशातल्या अख्ख्या बन्द्या रुपयाचं नवं करकरीत टिकलीएवढं नाणं दिलं, डोळे मिटले आणि पाहतो तो काय ! मिटल्या डोळ्यांसमोर लागलं  दिसायला प्रोग्रेस कार्ड !
आता ज़माना बदल गया है | प्रगति पुस्तक नाही म्हणत कोणी, प्रोग्रेस कार्ड म्हणतात. महत्वाचे म्हणजे मार्क्स नसतात आता मिळत, ग्रेड्स मिळतात ग्रेड्स ! टी.व्ही. वरच्या रिआलिटी प्रोग्राम मध्ये सांगतात ना, 
, नि, सा, वरचा सा ( इथे खालच्या 'सा' लाच घसा बसलेला असतो माझा.)
किंवा
डिस्टिंक्शन, मेरिट, जीनियस (आणि कधी सांगतात, तुमचे मार्क्स आज गुलदसत्यात ठेवले आहेत म्हणून.) वगैरे, तश्या पण वेगळ्या ग्रेड्स दिसू लागल्या मला. आणि त्यापुढे गुरुजींचे विशेष शेरे !


प्रगतिपुस्तक मागितल्यामुळे मला आधी पूर्वीसारखे सगळे विषय दिसू लागले.

मराठी -'बी + '-- त्यातल्या त्यात बरे,      हिंदी - 'बी - '    -- कसे बसे,    इंग्रजी - ' ' --- तसे बरेच वाईट !
संस्कृत - 'डी ' -- डफ्फड़ - अगदीच लाज काढली स्वत:ची !!  पदार्थ विज्ञान - '' -- कच्चे,  
सामान्य विज्ञान - ' ' -- लक्षच नसते शिकवितांना !   नागरीक शास्त्र - 'डी ' -- अकलेच्या नावाने शंख - ह्याला कोणी पुण्यात ठेवलायव्यावहारिक गणित - 'डी - ' अजूनही बेरजा-वजाबाक्या करतांना, चार चार वेळा बोटांवर खेळत बसतो, एकूणातच काय बोंब !  

मला वाचवेना, म्हटलं शारीरिक शिक्षण, चित्रकला, हस्त व्यवसाय या विषयांत तरी काही चमक.... पण छे...
सकाळी पी टी च्या तासाला सारख्या जांभया देत असतो. फटके मारावे लागतात, असा शेरा दिसला.
चित्रकलेत गोडी दिसते पण आळशी आहे. संगीत विषयांतही थोड़ी गोडी दिसते, पण ... गायला लागला की गळा दाबावासा वाटतो !
हस्त व्यवसाय - काही करायला सांगितले तरी बोटे मोडत बसतो. एक नंबरचा मेंगळट आहे. नुसता इकडे तिकडे  बघत बसतो

एवढी मनापासून प्रार्थना केली तरी भगवंताने लाजच काढली. खूप म्हणजे खूप वाईट वागतोय देव --बाप्पा माझ्याशी.
बरं, वरच्या वर्गात गेला असं तर नाहीच, घातलाय असंसुद्धा नाही तर, काय सांगू, अहो ढकललाय म्हटलंय !!
कसलाय ना मी ??
बरं पुढे आणखी खूप काही लिहिलेलं दिसलं मला, इतर मूल्यांकन, सल्ला ...
मानसिक आरोग्य -- बरे म्हणायचे.
वर्तणूक -- चावट, मी नाही त्यातली; कड़ी लावा आतली, अशी लब्बाड ! तर कधी कधी अति शहाणा त्याचा बैल रिकामा अशी !!
असेलही थोडाफार सज्जन (म्हणे असेलही ? एवढी हेटाई !!). पण सज्जनपणाचा देखावा वाटावा अशी शंकाच यावी.
आवडी निवडी : काय काय सांगाव्यात ? एक ना धड़ भाराभर चिंध्या.
मानसिक ठेवण : स्वत:ला फार शहाणा समजतो. विशेष अहंकारी आहे.
प्रेमळपणा : काही स्वत:ला हवं असलं की प्रेम फुलून आलेलं दाखवतो. अगदी एखाद्या पक्ष्याचा पिसारा असतो ना तसे. थुईथुई नाचल्यासारखा वागू लागतो. जीभेवर, ओठावर  मध लावून आलाय असं वाटावंबघणारा होतो मग ह्याच्याबाबत कनवाळू ! आणि हा ... एक नंबरचा लंपट कुठला!!
उद्योगशीलता : कागदावर काही तरी खरडतो झालं. कॉलर ताठ करून स्वत:ला लेखक कवी असल्याचे दाखवायचा प्रयत्न करतो. इकडून तिकडून चार शब्द गोळा करून आणतो आणि इतरांना शिक़वायचा प्रयत्न करतो. आजकाल WhatsApp / Facebook वर बराच वेळ घालवतांना दिसतो. कधी कधी ते काय ते, ब्लॉग व्लॉग लिहितो असे सांगत फिरतो. बाकी पोटापाण्यासाठी काही तरी करावंच लागतं म्हणून असतो दहा एक तास घराबाहेर. पण संध्याकाळी फ्रेश दिसतो. म्हणजे फ़ारसे कष्ट करायला लागत नसावेत. चालू आहे झालं. एरवी तसा आळशीच. आजकाल शेतावर काम करतानाचे फोटो, व्हिडिओज टाकत असतो सोशल मीडिआवर अधूनमधून ! असावे खरे कदाचित,चेहरा काळवंडलेला दिसतो त्यावरून.

यशस्वीतेचा आलेख : अनेक वेळा खोल खड्ड्यात पडतो. कोणी दया दाखविली की येतो धडपडत जमिनीवर. बाकी तशी यशस्वी होण्याबाबत आत्तापर्यंत बोंबच.

भगवंता, का रे बाबा असा कठोर झालास माझ्याबाबतीत ? या पतिताला पावन कर की प्लीज...

बहुतेक मी आर्तपणे म्हटलेले 'प्लीज' त्याच्या कानावर पडले असावे. कारण खाली काही विशेष मार्गदर्शनपर शेरा लिहिलेला मला दिसला, तो असा.
ज़रा आत्मपरीक्षण करून स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न केलाच तर येत्या पांच वर्षांत चिरंजीव, अगदी शब्दशः चिरंजीव होणार नसले तरी, डिस्टिंक्शन मात्र नक्की मिळवतील
डिस्टिंक्शन ! काय म्हणायचे काय नेमके?
आत्ता ६५ टक्के आहे, म्हणजे मी सत्तरीत पोहोचेन-पांच वर्षात ? असा अर्थ घ्यायचा ? कम्माल आहे हं बाप्पा तुझी. चांगलाच विनोदी आहेस हं तू माझ्याबाबतीत. माझ्याच आत बसून माझीच थट्टा ? पण ठीक आहे असू देत. तुला पटतंय ना ? मग झालं तर. तूच गाड़ा हाकलतो आहेस माझा, यातच समाधान.

तर मित्रांनो, जे काही थोडंफार लिहिता येतं ते लिहून जे काही स्वत:शी बोललो ते तुम्हांला सांगावं वाटलं. तुम्हाला तर माहीत आहे मी लेखनात किती कच्चा आहे ते. प्रयत्न करतो लिहायचा. मी एक साधा वाचक आहे. ज्ञानोबा - तुकोबा माउलींच्या अभंग ओव्यांचा विशेष वाचक आहे. त्यांच्या ओव्या अभंगातून कितपत कळते ते नाही सांगता येत. कारण माझी तेवढी पोहोच नाही, अभ्यास नाही, लायकी नाही. आणि या महान संतांच्या आभाळाएवढ्या उंचीसमोर मी तर कितीतरी खुजा आहे. पण त्यातल्या त्यात एखादा तुकोबामाउलीचा अभंग समजतोही. त्यांच्या अभंगातली एखादी ओवी तरी आपण सांगावी असं वाटतं. या मनोगताच्या निमित्तानं तुकोबांच्या पुढील अभंगातले आवडलेले हे तीन चरण इथे उदधृत करतो.

संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे | काय म्या गंव्हारे जाणावे हे || विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध | तेथे मज बोध काय कळे || करितो कवित्व बोबड्या उत्तरी | झणी मजवरी  धरा || संत तुकाराम .. अभंग ५५३ - 
सार्थ श्री तुकारामगाथा || 
-- स्वत:च्या अभ्यासाबद्दल महाराज विनयाने म्हणतात, "मी जे काही बोलतो, ते सगळे संतांचे उष्टे बोल आहेत. एरवी मला गांवढळाला काय कळत आहे ? मला विठोबाचे नामदेखील चांगले शुद्ध उच्चारता येत नाही, अशा मला बोध, आत्मबोध काय कळणार? मी जे कवित्व करतो ते माझे बोबडे शब्द आहेत. तेंव्हा तुम्ही माझ्यावर रागावू नका. 

 

पद्मनाभ हिंगे,
पुणे.
२८ मार्च २०१८


Friday, 16 March 2018

एक मुलाखत, अर्थातच काल्पनिक...



ती शहाणी.... 'छे बाई....   आमच्यात नसतं हं असं काही...'
'काय तर म्हणे आज वर्षअखेर आहे, मग करायची का पार्टी !!! ३१ डिसेंबर सारखी !!!!'
'शी शी शी.... रात्री उशिरापर्यंत झिंगायचं आणि नव्या वर्षाला उशिरा उठायचं,  अशा पद्धतीनं का नवीन वर्षाचं स्वागत करायचं ? म्हणे देहभान विसरून जायचं ! स्वत:ला विसरून जायचं ! झिंगाट धम्माल करायची ! नुसता राडा करून टाकायचा ! ऱगाट नाचायचं ! बेधुंद होऊन मज्जा लुटायची !'

ती शहाणी....'करा करा, तुम्ही करा. तुम्हांला काय करायचे ते तुम्ही करा, आम्हांला नाही जमणार. आणि कशाला हव्यात ह्या विदेशी, विलायती सवयी ? आवडतं बरं का आम्हांला आमचं मराठीपण जपायला. आमच्यावर नाही हो असे संस्कार--- हं आता संस्कार हा शब्द उच्चारला की पुरोगामी धावून यायचे अंगावर, तद्दन सनातनी म्हणून हिणवत !....'

दीड शहाणा... 'संस्कार... हे संस्कार संस्कार म्हणजे काय हो ?'

ती शहाणी....'खूप खूप सांगता येईल संस्काराबद्दल....'

दीड शहाणा...'हो का ? एखादं उदाहरण वगैरे... द्याल ?'

ती शहाणी....'हो S S S S  एकच का, पुष्कळ देता येतील.'

दीड शहाणा...'ऐकवता का थोडी फार ? '

ती शहाणी....'म्हणजे असं बघा, चांगली नोकरी करायची, वेळेवर ऑफिसला जायचं, वेळेत घरी यायचं. घरात आरडाओरडा करायचा नाही. मॉम डयाडीच्या PUNCTUALITY चा मुलांसमोर आदर्श असायला हवाच ना. मुलांच्या अभ्यासात, करिअरकडे बारीक नजर ठेवायची. त्यांना क्लासेस लावायचे, एक क्रिकेट किंवा बँडमिंटनचा, गाण्याचा-क्लासिकल, सुगम संगीत, वेस्टर्न म्युझिक, चित्रकलेचा, कराटे ज्युडो, कथ्थक नृत्याचा..., झालंच तर आम्ही दोघे सकाळी नियमाने अगदी पांच मिनिटे का होईना WORK OUT करतो मुलांसमोर, EXERCISE हो..  ' 

दीड शहाणा...'वावावा, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही सकाळी मुलांना काय देता न्याहारीला ?'

ती शहाणी....'न्याहारी, यू मीन ब्रेकफास्ट ?'

दीड शहाणा...'हो तेच ते.  पोहे, शिरा, सांजा, थालीपीठ, दूध इत्यादी .....'

ती शहाणी....'छेछेछे, अहो मुलांना ब्रेडबटर, टोस्ट, बिस्किट्स, सॅन्डविच, मॅगी आवडतं खायला. स्कूलमध्ये लंच असतंच स्कूलतर्फे. मग रात्री आम्ही पिझ्झा मागवतो, चायनीजची फर्माइश असते कधी कधी. मग वीकएंड्ला हॉटेलिंग असतंच. मला माझ्या जॉबमुळे सकाळी जमतच नाही, अगदी स्लाइसला बटर लावायलाही मुलांनाच सांगावं लागतं. आणि त्यांनाही सेल्फहेल्प इज द बेस्ट हेल्प हे शिक़वायलाच हवं ना ?'

दीड शहाणा...'मग वीकएंड्ला ओलं म्हणजे काही विशेष असेलच ना हॉटेलिंगला जाता तर ?'

ती शहाणी....'ओलं म्हणजे यू मीन ड्रिंक्स वगैरे ना ? हो हो, आम्ही घेतो दोघे ... पण अगदी म्हणजे जास्तीत जास्त तीन पेग्ज.'

दीड शहाणा...'मुलांसमोर !!'

ती शहाणी....'हो, पण त्यांच्यासाठी आम्ही कोका कोला, थम्स अप, पेप्सी, स्प्राइट अशी सॉफ्ट ड्रिंक्स ऑर्डर करतो.'

दीड शहाणा...'मग घरी जातांना कसे जाता ? म्हणजे क्याब वगैरे मागवत असाल ना ?

ती शहाणी....'छे हो, क्याब कशाला कधी दोघांच्या बाइक्स घेतो तर कधी छोटी कार. '

दीड शहाणा...'पण मद्य घेऊन गाडी चालवू नये असा नियम आहे ना, मग तो नियम मोडता ?'

ती शहाणी....'चालतं हो. आणि रात्री कोण असतं अडवायला? आणि आडवलं कोणी तर ओळखी कधी येणार कामाला ! अगदीच वाटलं तर एखादी नोट द्यायची हळूच.... '  

दीड शहाणा...'पण मग हे तुमच्या संस्कारांत बसतं ?'

ती शहाणी....'चालतं हो एखादेवेळी, त्यात काय एवढं !'

दीड शहाणा...'बरं, मग तुम्ही संस्कृती वगैरे मानता तर उद्या गुढी पाडव्याला गुढी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारत असाल ना ?'

ती शहाणी....'छे हो, आमच्या घरी नाही करीत आम्ही सणवार साजरे.ते काय म्हणतात ते -अं-- कुलधर्म, कुलाचार. सो ऑर्थोडॉक्स ना. '

दीड शहाणा...'का ? घरात मोठी माणसे, मुलांचे आजी आजोबा ??'

ती शहाणी....'अं अं अं....ती  दोघे वृद्धाश्रमात असतात. कित्ती वेळा सांगितलं त्यांना छान फ्लॅट घेऊन देतो भाड्याने, तिथे रहा म्हणून , तर ऐकतच नाहीत. '

दीड शहाणा...' बरं मग या नव्या वर्षाचा काही संकल्प वगैरे ?'

ती शहाणी....' हो केलाय ना आम्ही दोघांनी. ह्या वर्षी टॉपचं प्रमोशन आणि तेही चांगल्या मोठ्या राइजसह मिळवायचंच. त्यासाठी बॉस वर इम्प्रेशन मारायचं. कधी कधी थोडंसं पॉलिटिक्स खेळावं लागतं. बट यू नो ना इट्स ऑब्वियस ना.. आणि हो, आमचा सी ए बदलायचाय या वर्षी, फार टॅक्स नको हो जायला. आत्ताचा सी ए फारच तत्ववादी आहे हो. हां आता थोड़ा टॅक्स भरायलाच हवा, त्याने एक स्टेटस मिळते. एवढी लोकं टॅक्स बुडवतात आणि सुटून जातात. पण ह्या सी ए  साहेबांना व्यवहार कळतच नाही. याला साधी मेडिकल्सची manage करून आणलेली बिले चालत नाहीत हो. आजकाल कुठे चालतंय असं ?'
  ........ ...... .....
  ..... .... ..... .....
तर तशी ही मुलाखत खूप वाढली असती. पण मलाच ती फारशी वाढवायची नव्हती. आता ही मुलाखत कोणाची घेतली, कधी घेतली, असले फुटकळ प्रश्न वाचक विचारणार नाहीत, हे मला पक्के माहीत आहे. कारण वाचक मोठे हुशार असतात. त्यांना बरोब्बर 'त' वरुन 'ताकभात' ओळखता येतो.
मला एक नक्की  माहिती आहे स्वत:बद्दल, की मी काही पट्टीचा अभ्यासू बेरकी परिपक्व पत्रकार नाही.
मी म्हटलं होतं ना एकदा मागे, मला वाटलं स्वत:शी बोलावं ! म्हणून मी काय केलं, माझ्याच स्वभावातील एका अपरिपक्व तुकड्याला पत्रकार बनवलं, दीड शहाणा म्हणून ! मुलाखत घ्यायची म्हणजे पत्रकारासमोर हवंच ना कोणीतरी ! मग माझ्याच स्वभावातल्या एका लब्बाड प्रतिमेला, नव्हे वृत्ती म्हणूयात का ? तर तिला ती शहाणी म्हणून आणून बसवलं !
चालतंय ना ? असो.

चला उद्या  शालिवाहन शके १९४० विलंबीनाम हे नूतन संवत्सर सुरु होतंय. छान गुढी उभारा, कडूलिंबाच्या पाल्याचे चूर्ण खा, चांगलं असतं आरोग्याला. स्वत:च्यातल्या  देवाला आठवा. स्वत:तल्याच दैत्याचा पराभव करा. आनंदी आणि सकारात्मक रहा. तुम्हां सर्वांना या नवीन वर्षाच्या मणभर शुभेच्छा,  हे नवीन संवत्सर तुम्हाला आरोग्यदायी राहो आणि समृद्धी प्राप्त करून देवो, तुम्हांला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या स्नेही मित्र नातेवाईकांना उत्तम मन:स्वास्थ्य, शरीरस्वास्थ्य, कुटुंबस्वास्थ्य लाभो. सर्वांत मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल तुमच्या मनातला आदर आणि अभिमान अधिकाधिक दृढ होत राहो, अभिजातच असलेल्या मायमराठीचा तुमच्या दैनंदिन व्यवहारातला, घरातला वापर सतत वाढता राहो, तुम्हांला वाचनाची - त्यातल्या त्यात समृद्ध मराठी वाचनाची सवय लागून, हां तुमच्या मुलाबाळां समोर चांगला आदर्श म्हणून उभा राहो, ह्या खरोखर मनापासून शुभेच्छा....

जरूर जरूर वाचा, वाचत रहा आणि आपल्या मित्रांना, स्नेही नातेवाईकांनासुद्धा वाचायला द्या  - अगदी ह्याच शुभेच्छांसह !!

पद्मनाभ प्रभाकर हिंगे,
पुणे.  मिती फाल्गुन वद्य ३०, शके १९३९,
शनिवार दिनांक १७ मार्च २०१८.

Saturday, 10 March 2018

                                       वाटलं मला, बोलावं स्वतःशी !

     कशी काय कुणास ठाऊक आज मला अचानक हुक्की आली, अशीच, स्वतःशीच बोलण्याची ! हसताय काय ? नव्याने प्रेमात पडलेल्या प्रेमाळू माणसांनीच फक्त स्वतःशी बोलावं, असा काही नियम शिरस्ता वगैरे आहे ? बोललो मी स्वत:शी ! वाटलं मला बोलावं स्वतःशी ! कुणाची काही हरकत ?

     नाही म्हणजे मी काही तुमच्यावर रागावलो नाही, आणि ओरडतही नाही. आणि हो, हे असं वाक्य मी बोललो ते मला आत्ताच सुचलंय हो. स्वभाव हो. असतो एखाद्याचा ! तुम्ही कसं समजून घेता -- मला ! हां तुमचा समजूतदारपणा उमदा स्वभाव मी मान्य करायलाच हवा.
आणि करतोय ना !!!  
     पाहिलंत ना. मान्य करतोय मी; तेही उपकार केल्यासारखं. त्यात अपराधीपणापेक्षा उन्मत्तपणाच ठासून भरलेलाय.

     च् च् च् .. बघा, आहे ना. सुरुवात काय केली मी आणि कुठं भरकटत गेलोय मी ! विषय राहिला बाजुलाच. असो. तर मी काय सांगत होतो तुम्हांला, की मला स्वत:शीच बोलण्याची हुक्की आली ! हां आता तुम्ही म्हणाल, 'हे बघा आता ह्याला उपरती झाली. सांगतोय, म्हणे स्वत:शी बोलतो ! जसा काही संतपणा येऊ घातलाय ह्याच्यात ! साधू असल्याचा आव आणू पाहतोय झालं.... '
      हे बघा मी काय सांगतोय ते तुम्हांला ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर गेले उडत !
     ओह.. परत तेच ! क्षमा करा हं... चुकलंच माझं... हे असंच होतं माझं.. माझ्यातला तुसडेपणा असा भस्सकन वर उफाळून येतो.. 
     तुसडेपणा... 
     ह्याबद्दलच तर मला स्वत:शी बोलावं वाटतंय ना ..
     एखादी व्यक्ती समोर येते, कधी घरी येते. आणि का कुणास ठाऊक, मी उगाच चिडचिड करू लागतो. हिडिसफफिडीस करू लागतो. खरंतर त्या व्यक्तीने माझे कधीच काहीच नुकसान केलेले नसते. ती व्यक्ती मला का आवडत नाही, हेही मला सांगता येणार नाही. ती व्यक्ती आल्यावर माझ्यातला हा विक्षिप्त बदल पत्नीच्या मात्र बरोबर लक्षात येतो. त्या व्यक्तीशी मी बोलत नाही. बोललोच तर अगदी तुटक तुटक. ती व्यक्ती गेल्यावर ही म्हणते, ' का हो असा असा राग राग करता एखाद्याचा ? उगाचच !! एखादं माणूस येतं आपल्याकडं ते आपुलकीने, त्याचं एकटेपण विसरण्यासाठी. काहीतरी सांगायचं असतं, कुठंतरी मोकळं व्हायचं असतं. तुम्ही का असे तुसड्यासारखे वागता ? उगाच कानकोंडल्यासारखं होतं. मलाही आणि त्या व्यक्तीलाही .. बोलता,लिहिता असे की अगदी फार प्रेमळ, छान छान गोड गोड शब्दांत, मधाळ भाषेत !'
      हीचं बोलणं अगदी साधं सरळ आणि नेमक्या शब्दांतलं असतं आणि ते बरोबरही असतं. पटतंही. कधीतरी पटकन ती व्यक्ती अचानक समोर येते आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर, माझ्याकडे बघून हसावं की नाही, ओळख दाखवावी का नाही, असे गोंधळलेले भाव दिसतात. मी उद्धटासारखा पुढं निघून जातो,तुसड्यासारखा !

     का बरं हा तुसडेपणा माझ्यात आहे ? तुम्हालाही माझा राग येत असेल, नाही का ? कोण समजतो तरी कोण मी... स्वत:ला ? असे काय मोठं दिव्य केलंय मी ? असं कोणतं एवढं शौर्य गाजवलंय मी ? असा काय मोठा पराक्रम मी केलाय ?
      .... ऐकताय ना तुम्ही, हे माझं स्वत:शी चाललेलं बोलणं ?
      म्हणून वाटतं मला बोलावं स्वतःशी ! शोधावीत स्वतःतली वैगुण्ये ! अजून आहेत तरी किती माझ्यात दुर्गुण ? इतके दिवस का नाही वाटलं मला स्वतःशी बोलायला ? माझ्यातल्या कोणकोणत्या दुर्गुणांमुळे माझं किती नुकसान झालं असेल ? किती जणांच्या आपुलकीला मी पारखा झालो असेल, माझ्या या तुसडेपणामुळे ? कितीतरी  माणसांना मला जोड़ता आलं असतं. स्वार्थासाठी नाही, मैत्रीसाठी तरी !
     ठरवलंय आता, बोलायचं स्वत:शी. रोज घडणाऱ्या स्वत:बद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल थोड़ावेळ का होईना बोलायचं स्वत:शी ! तटस्थपणे.

पद्मनाभ हिंगे,
पुणे. 
     

Tuesday, 5 September 2017

              ऐसी अक्षरे : संत साहित्य परिचय विशेषांक - जुलै ऑगस्ट २०१७.
       बेलवलकर हे नाव १९६०च्या दशकापासून पुण्याच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रात प्रसिद्ध आहे.
प्रत्येक घर शुभंकर, हे ब्रीदवाक्य मनात कायम करीत एकामागोमाग एक असे अनेक लहान मोठे गृहप्रकल्प गेल्या पाच दशकांत बेलवलकर गृह उद्योगाने बांधून पूर्ण केले. आपल्या गृह प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबाशी आपले नाते कायम मैत्रीपूर्ण रहावे या उद्देशाने कै. शरदचंद्र बेलवलकर यांनी ऐसी अक्षरी हा अनोखा साहित्यिक उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला आता चौदा वर्षे पूर्ण झाली. माझे सद् भाग्य म्हणजे ऐसी अक्षरेच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. मला माहीत नाही मी ही जबाबदारी कितपत नीट सांभाळू शकतोय.  हे माझ्या अत्यंत आवडीचे काम करण्यात मला अतिशय आनंद मिळतो.
        ऐसी अक्षरेचा संत साहित्य परिचय विशेषांक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा अंक विनामूल्य आहे. वाचकांना अंक बेलवलकर हौसिंग कंपनीच्या एरंडवणे-पुणे येथील निर्मिती एमिनंस, मेहेंदळे गॅरेजजवळच्या व्हेज अभिषेक वरील कार्यालयात रविवार आणि सुटीचा दिवस सोडून सकाळी ११.००  ते सायंकाळी ६.०० मिळू शकेल.

पद्मनाभ हिंगे
संपादक.
 


Monday, 17 July 2017

शंकासुर आणि माझ्या संयमाची कसौटी ....

                          शंकासूर आणि माझ्या संयमाची कसौटी .... 

        नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रभातफेरीसाठी म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो.  मुख्य दार ओढलं आणि कुलुप लावलं. परत येतांना दूध वगैरे काही आणायचं नव्हतं म्हणून सोबत  पैश्याचे पाकीट घेतले नाही, कशाला उगाच हवंय म्हणून ! पैश्याच्या  पाकिटाची आठवण येताच मनात का कुणास ठाऊक; पण एकदम एक शंका आली. काल आपण दुकानात गेलो, पाकीट काउंटरवर ठेवल्याचे आठवले. दुकानदाराला कार्ड दिले, पावती झाली, दोन्ही पिशव्या घेतल्या. नंतर आपण काउंटरवर ठेवलेले पाकीट उचलून खिश्यात नक्की  ठेवले ना ? अर्ध्या जिन्यातून माघारी वळावे असे वाटत असतांनाच पावले मात्र आपोआप जिना उतरून रस्ता चालू लागली. पाकिटाविषयीची ही शंका मात्र सतत पाठलाग करु लागली. असेल, ठेवले असेल रोजच्या ऑफिस ब्यागेत. काल पावसामुळे पाकीट, घड्याळ, मोबाईल भिजू नये म्हणून सारं ब्यागेत ठेवल्याचे पक्के आठवत होते. बायकोलाही सुट्टे पैसे दिल्याचे आठवत होते. त्यावेळी ब्यागेतूनच पाकीट काढल्याचे आठवत होते. नंतर दुकानात जाण्यासाठी बाहेर पडलो, तेंव्हा सकाळी फिरायला जायचीच ट्रैक पैंट घातली होती. तीच आता फिरायला जातांना घातली आहे. मग आता खिश्यात पाकीट तर नाही. दुसऱ्या दाराला लटकवलेल्या प्यान्टच्या खिश्यात ठेवले असेल का ? आपण काल खरंच का पाकीट नीट काढून ठेवले होते ? विसरलो तर नाही ना दुकानात !!
       धस्स झालं.
       मी माझ्या याच विचारांच्या तन्द्रीत चालत होतो. जिना उतरता उतरताच मागे फिरून, दार उघडून पहायला हवे होते. बायको काय बोलते आहे याकडे माझे लक्षच नव्हते. नशीब मनात चाललेली ही खळबळ तिच्या नजरेस आली नाही. उजाडलेले नसल्यामुळे आणि नेहमीच दोन पावले चालताना तिच्यापुढे असल्याने तिला काही  समजलं नाही. बरं मनातली ही खळबळ बायकोला सांगायची पंचाईत. मनातल्या मनातच तिचा अनेक भावनांनी युक्त असलेला चेहरा दिसू लागला असता. तिच्या तोंडून कोण कोणते  शब्द बाहेर येतील, ते काही सांगणे अवघड झाले असते.
" अहो किती वेंधळे आहात तुम्ही ? किती पैसे होते पाकिटात ?"
" नशीब फार नव्हते गं, असतील हजार एक रुपये... "
" अहो पण तुम्ही असे कसे विसरलात ? मी विसरले असते तर किती बोलला असता तुम्ही ? अक्कलच नाही, (माझ्याकडे बघत हे शब्द तिने असे काही ठसक्यात उच्चारले असते की.... अप्रत्यक्ष मलाच दूषणे द्यायची घेतली जाणारी संधी, ती  कशाला वाया जाऊ द्यायची, असा साधा सरळ पण मुत्सद्दी डाव तिने साधला असता.  ती का सोडेल म्हणा अशी आयतीच चालून आलेली संधी ?!!) पैश्याची किंमतच नाही, मी कष्टाने कमवून आणायचे आणि तुला तर याची थोडीशीसुद्धा जाणीव नसावी...." " आता ते दुकान उघडणार केंव्हा ? तुम्ही विचारणार केंव्हा ? आणि तो सापडलं असेल तर देणार का परत ? सतराशेसाठ चौकश्या करेल....  मी परवा नुसते विचारले की भिशीतल्या मैत्रिणींच्या बरोबर ट्रीपला जाऊ का ? तर केवढे लेक्चर ऐकवलेत मला, बाई बाई !!"
माझं नशीब, अजून तरी काही बोललो नव्हतो हिच्याशी याबाबत. नाहीतर पाकीट मरू दे, पण प्रश्न आवर, असं झालं असतं.
एक तर पाकीट दुकानात विसरलेले असेल की काय या शंकेने मनात घर केलेले. त्यात हजारेक रुपयेच असले  तरी पाकिटात डेबिट कार्ड-(पिन नंबर चा कागद पाकिटात नव्हता ना चुकून राहिलेला ! नाही, तो लगेच कागद फाडून टाकला होता...!) पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेंस, माझे नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ दहा पंधरा फोटोज़, असा साराच ऐवज ... अरे देवा......कोणा हुशार चोरट्याच्या हाती लागले नसेल ना ! नाहीतर ते Whats app वर अधून मधून मेसेजेस येतात--अमुक अमुक करू नका, तुमची व्यक्तिगत माहिती मिळवून त्याचा बेकायदेशीर वापर केला जाऊ शकतो !!! बाप रे........
       अर्धवट मागे फिरायचे म्हणजे बायकोच्या शंभर प्रश्नांना तोंड द्यावे लागणार. निर्विकार चेहरा ठेवून मनातल्या मनात मी स्वत:ला सकाळी सकाळी शिव्या द्यायला लागलो. 'मूर्ख माणसा, कसला बावळट आहेस तू ! साधं पाकीट जपता येत नाही. झालं, तुमचं आता तुमचं वय झालं. हरी हरी करायचे दिवस आले. आता बसा घरी. अक्कल नाही, अन् म्हणे पगार वाढवा, बोनस द्या आणि वर प्रमोशन करा. लायकी तरी आहे का रे तुझी बिनडोका ?' मनात एवढी खळबळ उडाली होती पण अत्यंत कौशल्याने हिच्या समोर माझा निर्विकार-- कुठे काय ? काहीच झाले नाही, असा बथ्थड चेहरा ठेवणं मला जमत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. मी स्वतःवर याही संभ्रमित अवस्थेत खुश झालो होतो. मी नेहमी सर्वांना अगदी आवर्जून सांगत असतो की बाबांनो भरपूर वाचन करा. पण नवरोबाचा चेहरा वाचून क्षणार्धात त्याच्या डोक्यात काय चालले आहे हे ओळखू शकणाऱ्या माझ्या बायकोचे हे  कौशल्य अफलातून आहे याचा मी अनेक वेळा चांगलाच अनुभव घेतलाय....  विशेषकरून एखाद्या लग्नसमारंभात स्वत:च्या नटण्यामुरडण्याकड़े लक्ष द्यायचे-मिरवायचे की नवरा नेमका कुठे बघतोय, कुणाशी बोलायचा प्रयत्न करतोय याकडे हिने लक्ष द्यायचे ? .. आरश्यासमोर उभं राहून जरा जास्त क्रीम किंवा पावडर लावतांना दिसलो की चुकून हिच्याकडे लक्ष जावं आणि हीनं म्हणावं, " हूं चालू द्या चालू दया, नटा..." असा उपहास करावा.... कल्पना करा, आज मात्र मी किती कौशल्याने मनातला गोंधळ हिच्यापासून लपवून ठेवलाय. माझं मलाच कौतुक वाटत होतं.
       कधी एकदा घरी पोहोचतोय असे झाले. भरा भरा पायही उचलत नाहीत राणीसरकार. आता काय तर म्हणे, " दोन चकरा मारूयात नानानानी पार्कात ! " तोंड वळवून ओठातल्या ओठातच पुटपुटलो. " काय म्हणालात ?" "अं...कुठं काय ?" कसाबसा उत्तरलो. चरफडण्यापलीकडे काय करू शकत होतो मी ? आपला विसराळूपणा की गाढवपणा, मूर्खपणा की बिनडोकपणा, nonsenseपणा की बेजबाबदारपणा यावर मनातल्या मनात चर्चा किंवा वितंडवाद करत बसायला कुठे काही सुचत होते ?
       "जरा पाच मिन्टे बसा बाकावर !" हिची ऑर्डर.. निर्विकार चेहरा ठेवून आतल्या आत चरफडलो. बसलो.
       "आज डब्याला काय भाजी करू ?"
       "कुठलीही कर ".. जमेल तितक्या शांतपणे मी उद्गारलो.
       "काय त्याच त्याच भाज्या करायच्या मेलं ... काल भेंडी झाली. भरल्या वांग्याची करायची तर वेळ लागेल. चार भेंड्या आहेत कालच्या, त्याच करते. चालेल ना ?" असं तिनं विचारलं खरं, पण तिचा निर्णय आधीच झाला होता. 'बरं आता निघू या का' असं विचारणं म्हणजे, ' आ बैल मुझे मार !!!! ' इथं हृदय धडधडत होतं धडाधडा.
रक्तदाब वाढतोय की काय असे भास होऊ लागले. पण एखाद्या कसबी अभिनेत्याच्या कौशल्याने चेहरा निर्विकार ठेवण्यात मला जमलं होतं...आता इतक्या वर्षांचा बायकोसमोर थंड डोक्याने वावरण्याचा अनुभव कामी आला होता. थोडी जरी चेहऱ्यावर खळबळ दिसली असती ना, तरी तिने झटक्यात शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका ठेवली असती. आणि डोळ्यात असंख्य छड्या मारायला उतावीळ झाल्या असत्या तिच्या बोचऱ्या नजरेतून. Experienced husband असल्याचे मला कोण कौतुक वाटले...क्षणभरच. तीसुद्धा Experienced wife आहेच की !
       'अगं चल लवकर माझी आई !!! Sorry माझ्या मुलांची आई. ' मी मनातल्या मनात उत्तरलो आणि चुकीची दुरुस्तीही केली. तिने मात्र तिचा वेळ व्यवस्थित घेतलाच. माझं नशीब थोर. वाटेत कोणी हिला भेटले नाही, गप्पा मारायला. इथे माझ्या डोक्यातला शंकासूर अक्राळविक्राळ रूप धारण करू लागला होता.
       आलो बुवा एकदाचा घराजवळ ! हुश्श... नेहमीच्या संथपणानेच जिना चढून वर आलो. झपकन कुलुप उघडलं, तडक बेडरूम मधे गेलो. दारावर लटकवलेल्या  पैंटीचा खिसा चाचपला, 'थॅंक गॉड'... पाकीट होतं. सारं टेंशन गेलं. चेहरा फुलला.....
       " का हो सापडलं का ? काय हवं होतं ते ?" .... आणि माझ्या संयम कौशल्याच्या कौतुकाचा फुगा फुस्स झाला...

पद्मनाभ हिंगे, पुणे.
१८ जुलै २०१७
 

Friday, 23 June 2017

ऐसी अक्षरे

                                      
                            ऐसी अक्षरेचा वृत्तपत्रीय साहित्य विशेषांक


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते 
 ऐसी अक्षरेचा वृत्तपत्रीय साहित्य विशेषांक नुकताच प्रकाशित झाला
  
ऐसी अक्षरेच्या या वृत्तपत्रीय साहित्य विशेषांकाच्या 'आमचे दोन शब्द' या संपादकीय लेखामधील काही भाग... 

                                            
                                            खिंचो न कमानको न तलवार निकालो | 
                                            जब तोप मुक़ाबिल है तो अखबार निकालो || 

     शाळेमध्ये असताना घरी तरुण भारत, मराठा, केसरी बरोबरच कधी मार्मिक यायचा. मार्मिकमधल्या मोठ्या मिश्किल शब्दातल्या अशा या दोन ओळी आवडायच्या. त्या नेहमी वाचल्या जायच्या, त्याही त्या शायरीच्या लहेजातच. अगदी आपोआपच त्यात आवेशही यायचा. त्याचा अर्थ त्यावेळी कळत नव्हता. वर्तमानपत्रे वाचायची. त्यातल्या ठळक बातम्यांचे मथळे वाचायचे. त्या वयाला साजेशा, भावणाऱ्या, स्वारस्य वाटणाऱ्या बातम्या वाचायच्या. व्यंगचित्रे पाहायची. ह्या रोजच्या नित्यनेमाच्या गोष्टी होत्या. काही घरांमधून वडीलधारी व्यक्ती मुलांकडून वर्तमानपत्रे वाचून घ्यायची. उद्देश अनेक असायचे. मुलांना वाचनाची सवय होणे, मोठ्यांदा वाचताना शब्दोच्चार सुस्पष्ट करता येणे. दैनंदिन ताज्या घडामोडींची माहिती होणे.  नव्या शब्दांची ओळख होणे. नव्या विषयांची माहिती मिळणे. असे एक ना अनेक गोष्टींची माहिती मिळवणे हा एक संस्कारच म्हणायचा अशी पद्धत होती. शाळेच्या अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन म्हणून पुस्तकवाचन आणि वर्तमानपत्रवाचन या महत्वाच्या बाबी असायच्या. काही विशेष बातम्यांची, माहितीची कात्रणे काढून वहीत चिकटविणे हाही सुटीतला उद्योग असायचा. मी १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाचे वेळी आलेल्या भारतीय जवानांच्या शौर्यकथांची वर्तमानपत्रातील कात्रणे कापून खूप वर्षे जपून ठेवली होती. यात परमवीरचक्र विजेता 'अब्दुल हमीद 'च्या शौर्याच्या बातमीचे कात्रण कित्येक वर्षे मी जपून ठेवले होते. याचबरोबर अपोलो ८ नंतरच्या चांद्रयान मोहिमेतील अनेक कात्रणे मी जपून ठेवली होती.
     लहानपणापासूनच सकाळी वर्तमानपत्र वाचण्याची सवय मला लागलेली. एकदा, 'आजचा अग्रलेख काय आहे रे ?' असा प्रश्न माझ्या मामाने मला विचारला होता. अग्रलेख म्हणजे काय आणि कोणता असतो याची मला माहिती नव्हती. पण मोठी माणसे अग्रलेख वाचण्याला फार महत्व द्यायची हे त्यावेळी लक्षात आले. 'अरेच्चा तुम्ही अग्रलेख वाचत नाही ' असा मामाचा सूर होता आणि त्याचबरोबर अग्रलेख वाचायला हवा अशी त्याने शब्दांत न सांगता दिलेली सूचना होती. पुढे हळूहळू अग्रलेखाचे महत्व कळू लागले आणि मार्मिक मधल्या वर दिलेल्या शायरीतल्या दोन्ही ओळींचे महत्व उमगू लागले. 'बातम्या शिळ्या झाल्या ' असे म्हटले जाते ते कळू लागल्यावर अग्रलेखाचे मात्र तसेच असते असे नाही, हेही कळू लागले कारण ते एखाद्या घटनेवरचे महत्वाचे भाष्य असते. वर्तमानपत्राचे आयुष्य त्या त्या दिवसापुरतेच. पुढे त्याची रद्दी. अशीच एकूण भावना. ठराविक साच्याच्या शिळ्या होणाऱ्या बातम्या सोडल्या तर वर्तमानपत्रांनी उत्तम ललित वैचारिक साहित्यसुद्धा वाचकांसमोर नेहमीच ठेवले आहे. असंख्य वाचक वर्तमानपत्रातल्या बातम्यांची अथवा त्यांना आवडलेल्या लेखांची कात्रणे कापून अतिशय व्यवस्थित जपून ठेवतात.... ..                                                                                   
                           ऐसी अक्षरे च्या वृत्तपत्रीय साहित्य विशेषांकाच्या संपादकीयातून.. ..

  
ऐसी अक्षरे या नियतकालिकाविषयी थोडेसे.... 


     ऐसी अक्षरे या नियतकालिकास येत्या ऑगस्टमध्ये  १४ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीमधल्या दिग्गज लेखकांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले उत्तम निवडक पूर्वप्रकाशित साहित्य ऐसी अक्षरेच्या अंकात पुन्हा प्रकाशित केले जाते. ऐसी अक्षरेचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे ऐसी अक्षरेचा प्रत्येक अंक विनामूल्य असतो.
     गेल्या १४ वर्षात ऐसी अक्षरेचे अनेक विशेषांक प्रकाशित झाले. कौशल इनामदार, सुबोध भावे, गिरीश कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, जितेंद्र जोशी या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलावंतांनी काही अंकांचे अतिथी संपादक म्हणून आपला सहभाग नोंदवला 
     ऐसी  अक्षरेचे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गौरव विशेषांक, डॉ. जयंत नारळीकर सन्मान विशेषांक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचविसावी जयंती आणि  जागतिक महिला दिन याचे औचित्य साधून प्रकाशित झालेला आत्मोद्धार विशेषांक, साहित्य आणि चित्रपट माध्यमांतर विशेषांक असेही काही उत्तम अंक प्रकाशित झाले आणि रसिक वाचकांच्या ते पसंतीस उतरले.. 

  
   
 ऐसी अक्षरे हवा असल्यास आपण पुढील कार्यालयात संपर्क साधून अंक घेऊन जावा. अंक विनामूल्यच आहे.         
ऐसी  अक्षरे, द्वारा, बेलवलकर हाउसिंग कंपनी, निर्मिती एमिनन्स, चौथा मजला, ११७५/, एरंडवन,         मेहेंदळे गॅरेज जवळ, व्हेज अभिषेक हॉटेलच्या वर, पुणे . दूरभाष... ०२०२५४५१६१०/२५४५६२००

वेबसाईट : www.belvalkarhousing.com 
अंकाची सॉफ्ट कॉपी हवी असल्यास, pphinge@belvalkarhousing.com वर मेल आयडी पाठवावा. 

पद्मनाभ हिंगे,
संपादक,
ऐसी अक्षरे

 

Thursday, 22 June 2017

Aisee Akshare...

मुख़्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते 
ऐसी अक्षरेच्या विशेषांकाचे प्रकाशन.

मंगळवार २0 जूनचा दिवस अविस्मरणीय होता.  ऐसी अक्षरे चा मे / जून २०१७ चा अंक वृत्तपत्रीय साहित्यावर करू या, असे समीर बेलवलकर यांनी सुचवले. आणि हा वेगळा विषयच अशा साहित्याच्या शोधमार्गावर घेऊन निघाला.                               अंक कसा असावा, याविषयी ह्या विषयातल्या अनुभवी व्यक्तिंशी संपर्क साधला. लोकसत्तेचे श्री. मुकुंद संगोराम, सकाळचे श्री. मल्हार अरणकल्ले, महाराष्ट्र टाइम्सचे श्री. श्रीपाद ब्रह्मे यांचे बरोबर चर्चा केली. ज्येष्ठ पत्रकार श्री. ह. मो.मराठे, सकाळचे श्री. विजय सबनीस यांची मदत झाली.
अंकाने आकार घेतला आणि या अंकाचे एका मोठया व्यक्तीच्या हस्ते प्रकाशन करायचे ठरले.
राजेश दामले यांनी नेहमीच्या उत्साहाने कामास सुरुवात केली.
पुण्याच्या आमदार मा. सौ.मेधाताई कुलकर्णी यांनी पाठपुरावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली.

मंत्रालयात मुख्यमंत्री साहेबांच्या दालनांत गेलो तर तिथे सारीच मोठमोठी मंडळी देवेंद्रजी यांच्या भेटीसाठी तिष्ठत बसलेली होती.
मंत्री, खासदार, आमदार, यांच्याबरोबर थांबलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना पाहिल्यावर आपल्याला प्रकाशनासाठी वेळ मिळणार का अशी धाकधुक वाटत होती.
मुख्यमंत्री देवेंद्रजी आले आणि म्हणाले, "चला अंकाचे प्रकाशन करू या ! "
उत्साह आणि आनंद या दोन्ही भावनांनी मनात झालेल्या गर्दीत आपोआप आवश्यक हालचाली होऊ लागल्या.

तिथे जमलेल्या साऱ्या मंत्री, आमदार, खासदार, आणि काही महत्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तिंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी, मखमली वेष्टणात बांधून ठेवलेले ऐसी अक्षरेचे अंक बाहेर काढले आणि आम्हां प्रत्येकाच्या हातात अंक देत या विशेषांकाचे प्रकाशन केले. झटपट फोटोग्राफरने या अविस्मरणीय सोहळ्याचे फोटो काढलेही.
नंतर आम्ही शिक्षण मंत्री मा. विनोदजी तावडे यांच्या दालनांत गेलो तिथेही गर्दी.
विनोदजींना अंक दिला.
Image may contain: 6 people, people smiling, people standing  
ऐसी अक्षरेच्या या अंकात विविध मराठी वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेले ललित वैचारिक साहित्य घेतले आहे. लो.बाळ गंगाधर टिळक यांचे केसरीमधील दोन लेख या अंकात आहेत. इ.स. १८९५ मधल्या केसरीच्या अग्रलेखात लोकमान्यांनी शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीत आपले विचार मांडले होते. तर १९०५ च्या केसरीच्या अग्रलेखातले लोकमान्यांचे मराठी भाषेविषयीचे परखड विचार आजच्या काळात किती महत्वाचे आहेत हे लक्षात येते. हा अंक वाचनीय आहे. तरुणांनी जरूर  वाचावा. 

ह्या सुन्दर अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  व्हावे, हा माझ्यासाठी विलक्षण आनंदाचा योग आहे.  असे काही क्षण अनुभवांयला मिळणे हे सुख ऐसी अक्षरेने दिले. गेली चौदा वर्षे अव्याहत चालू असलेला हा आगळावेगळा उपक्रम आहे. 

मस्त्त वाटतंय.
हा आनंद मित्रांना शेअर करायलाच हवा ना.

ऐसी अक्षरे चा अंक विनामूल्य असतो. 

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
२२ जून २०१७.