Saturday, 29 April 2017

Mere Photoko ....

                मेरे फोटोको.........


     फोटो काढणे हे आजकाल सर्वसामान्य माणसाला फारच सोपे झाले आहे. उचलला मोबाइल, क्लीचिक... काढला फोटो. वयात आल्यावर जसे सारखे आरशात बघावेसे वाटते ना अगदी तसेच हे फोटो काढण्याचे वेड मोबाईल बाळगणाऱ्यां प्रत्येक हौशी व्यक्तीला असतेच. ज़रा नीट आवरले, इस्त्रीचे किंवा नवे नवे कपडे घातले की लगेच फोटोसेशन सुरू ! मित्राबरोबर किंवा मैत्रीणीबरोबर, प्रेयसी-प्रियकराबरोबर, कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर फोटोसेशनचा,प्रयोग, उद्योग करताना हरएक मोबाइल धारक दिसू लागलाय. मोबाइलवर जोडीदारासोबत स्वत:चा फोटोसुद्धा असावा यासाठी याआधी इतर कोणा मित्राकडे नाहीतर अगदी जवळून कोणी, अगदी  सोम्या गोम्या जरी जात असेल तर,"ज़रा प्लीज् एक फोटो काढणार का ?" असे विचारत त्याचे होती मोबाइल सोपवून फोटो काढला जातो. आतातर  त्यात सेल्फी हां प्रकार या फोटो काढण्याच्या उठाठेवीत जास्तच वाढलाय, इतका की, सेल्फी काढण्याच्या नादात काहींनी तर आपले प्राण गमावले आहेत. पण यातून कोणी काही धड़ा घेतील तर शपथ.  काही शहरात सेल्फी पॉइंट्स उपलब्ध करून दिले जाताहेत. बरं हे तरुण वर्गातच फँड आहे का? तर तसेही नाही. ह्याला कोणतीच वयोमर्यादा नाही. अगदी अजूनही चड्डीत शू करणाऱ्या बाळापासून वयस्कर महा ताऱ्यापर्यंत (म्हातारा  - महातारा - superstar ) फोटो काढण्याचे हे व्यसन लागलेले दिसते. अस्मादिकसुद्धा या वेडातून सुटलेले नाहीत बरं का ! हा सुरवातीचा फोटोच बघा ना. 'आम्ही बिबलाबिब्ली निघालो बरं का पहिल्यांदाच विमानात बसून फॉरीनला' अशी तळटीप टाकून लग्गेच Whats App वर हां सेल्फी आम्ही वेगवेगळ्या ग्रुप्सला, फ्रेन्ड्सना पाठीवला बी ! चक्क इमानात बसून. अगदी फ्लाइट मोड वर जायच्या आधी ! काय ते कवतिक!! काय तो उत्साह !!
     सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, नदीच्या काठापासून समुद्रकाठापर्यंत, झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत, पाखरांपासून घोड़ी गाढवाँपर्यँत, जे जे म्हणून चांगले वाटेल ते निसर्गचित्र, झटाक्कन मोबाइलात बंदिस्त करायचं. अर्थात आमचं निसर्ग सौंदर्य पाहण्याचं वेड मोबाईलपुरतंच मर्यादीत असतं बरं का. सहली, सणा समारंभाचे फोटो तर इतके की अगणितच, म्हणजे त्यांची गणतीच नाही.
     आता मोबाइलमध्ये सातत्याने नवनव्या सुविधा येतच असतात. एडिटिंग, फ्रेम्स अमुक ढमुक. त्यामुळे होतं काय की फोटोला आणखी सजवता येतं. त्याला विनोदी रूपही देता येतं. बाईला मिशा काढणे, पुरुषाचे ओठ रंगवणे, चेहरे हृदबदामाच्या आकाराच्या फुग्यात टाकणे, ब्राइट करणे, क्रॉप करणे आणि असेच अनेक प्रकार फावल्या वेळात करता येतात, केले जातात.
     काही वर्षांपूर्वी फोटो काढायचे म्हणजे फोटोस्टुडिओ शोधावा लागायचा, मग त्या स्टुडिओत जायचं, तिथल्या आरशात आपली छबी न्याहाळून पावडर कंगवा घेऊन चेहरा सजवायचा, वाकडे तिकडे होत पोझेस घेऊन बघायच्या आणि या तयारीनिशी फोटोग्राफरसमोर जायचं. शेवटी तो सांगेल तसेच पोज देत उठाबसायचे. फोटो काढल्यावर आधी किंवा फोटो काढायच्या आधी पैसे चुकते करायचे. "या चार दिवसांनी" तो सांगायचा. नाईलाज. चार दिवसांनी फोटो मिळेलच याची खात्री नसायची. परत जावे लागायचे. पावती जपून ठेवावी लागायची. कारण स्टुडिओत तशी पाटी लिहिलेली असायची, 'पावतीशिवाय फोटो मिळणार नाही'. फोटो मिळायचा. आधी तो पहायची उत्सुकता. उत्सुकतेने फोटो पाहिला की... मनातल्या मनातच पुटपुटायचे, "शी चांगला नाही आला फोटो" !! फ़ोटोग्राफरकडे बघून खोटं खोटं हसत तेथून काढता पाय घ्यायचा. हां अनुभव तुम्हाला आला किंवा नाही हे मला नाही माहीत. लग्नसमारंभाच्या फ़ोटोंचा अल्बम पाहायचा एक सोहळा असायचा. खूप मौज असायची.
     आता.... खटाखट फोटो काढता येतात अगड़ी शेंबड्या पोरालासुद्धा ! काढला फोटो, टाक Whats App वर. करायचा शेयर फेसबुकवर. आणि वाट पाहायची, कोण लाइक करतंय, कोण कमेंट करतंय. कोणाचाही मोबाइल घ्या. ९०/९५ % मोबाइलच्या ग्यालऱ्या फुल्ल झालेल्या असतात. अगदी मेमरी कार्डसुद्धा फुल्ल. आता एवढ्या तस्वीरी काढून काय करायच्या असतात हां प्रश्न आहेच. कधी हुक्की आली की मी मोबाइल सरसावून बायकोचा फोटो काढू लागतो. तिच्या लक्षात आलं की ती खेकसतेच. "सारखे काय फोटो काढायचे ? आणि करायचे काय एवढे फोटो काढून? भिंतीवर काय फ़ोटोफ्रेमची माळ लावायची आहे?" पण मीही खोडसाळ. काढतोच फोटो. नशीब... चिडून ती मोबाइल हिसकावून घेऊन आपटून फोडून टाकत नाही.
     पण मी एवढी वायफळ वाटणारी बडबड तुमच्यासमोर का करतोय असा तुम्हाला प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसं तर फोटो या विषयावर खूप लिहिता येईल, आणि मला खात्री आहे, हे लेखन तुम्ही फाडून टाकणार नाही. पण तूर्तास थोड़ा श्वास घेतो. उगाच प्रस्तावनेचं हे भलं मोठं पाल्हाळ लावून तुम्हाला कंटाळा आणावा असं नाही वाटत. पण काही तरी सांगायचंय ना तुम्हाला...
     तर सांगायचं काय की आता तुम्हाला टप्प्या टप्प्यानं माझ्या मोबाइलवरचे एक दोन एक दोन फोटो पहावे लागणार आहेत. आणि त्यावरची माझी पोपटपंची वाचावी लागणार आहे.
     वाचाल ना ? Please....

पद्मनाभ हिंगे, पुणे. 
२९ एप्रिल २०१७.  

Thursday, 27 April 2017

Vinod Khanna

                                 विनोद खन्ना 
                           देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकारके 


" छिनू ... निकल बाहर... अगर बापका बेटा है तो,
मुकाबला करना है तो सामने आ - मर्दोंकी तरह...
देखूँ तो सही कितना दम है तुझमें ...
तू बाहर आयेगा, या मैं अंदर आऊँ ?
याद रख, इस पिस्तौलमें जितनी गोलियाँ है, एक एक करके तेरे खोपडीके पार कर दूँगा.... 
इस बार मैं जेल नहीं, तुझे मारकर सीधा फाँसीके तख़्तेपर चढ़ जाऊंगा। 

छिनू,
अब ये लड़ाई झगड़ा और अच्छा नहीं लगता। 
छोड़ दे,  ख़तम कर दे ये दुश्मनी। "   

     आजही मला आठवताहेत हे जोशीले संवाद. तो  अंदाज,त्या संवादफेकीतील निर्णायक धमक आणि तरीही ते  वैर, ती सततची खुनशी हाणामारी आता तरी पुरे झाली, बस झाली, आता ती मनाला नकोशी वाटणारी आहे, क्लेश देणारी आहे,  हे सांगणारी समजूतदारीची आर्जव आणि हे सारे दृश्य जिवंतपणे पडद्यावर उभे करणारा तो देखणा दणकट उंचापुरा, त्या जमानातल्या तरुणांचा लाडका अभिनेता,  विनोद खन्ना...
     प्रतिभाशाली,संवेदनशील गीतकार लेखक दिग्दर्शक आदरणीय गुलज़ारसाहेबांच्या 'मेरे अपने' या चित्रपटातले हे खणखणीत संवाद. चित्रपटाचे कथानक, त्यातील तरुणांच्या दोन गटातला जीवघेणा संघर्ष, आणि त्या समर प्रसंगांचं केलेलं उत्तम चित्रण. मीनाकुमारी सारखी समर्थ अभिनेत्री आणि विनोद खन्ना - शत्रुघ्न सिन्हा या दोघा चित्रपट सृष्टीत नव्याने दाखल झालेल्या तगड्या अभिनेत्यांची सुंदर अभिनय जुगलबंदी, ह्या वैशिष्ट्यांमुळे तरुणाईने हां चित्रपट डोक्यावर घेतला. माझ्यासारखे त्या काळातले तरुण या चित्रपटाने आणि त्यातल्या विनोद खन्ना शत्रुघ्न सिन्हा यांच्या अभिनयाने पार  भारावून गेले होते.
     १९७१ मध्ये हां चित्रपट प्रदर्शित झाला. बहकलेल्या भरकटलेल्या युवापिढ़ीतला जळजळीत संघर्ष गुलजारसाहेबांनी मोठया कुशलतेने मेरे अपने मध्ये चित्रित केला होता.. विनोद खन्ना(शाम) आणि शत्रुघ्न सिन्हा(छिनू) हे दोन तगड़े अभिनेते त्यावेळी तरुणांच्या गळ्यातले ताईत झाले होते.

विनोद खन्ना...
      मी एका ठिकाणी वाचलं होतं की, त्या दुर्दैवी ऐतिहासिक फाळणीनंतर, पेशावरला जन्मलेले लहानग्या वयातले विनोदजी आपल्या कुटुंबाबरोबर मुंबईला पोहोचले. कधी मुंबई, कधी दिल्ली, तर कधी नाशिकमध्ये शिक्षण घेत विनोदजी सिडेनहैम कॉलेजमधून कॉमर्स ग्रेजुएट झाले. बोर्डिंग स्कूलमध्ये पाहिलेल्या सोलवा साल आणि मुग़ल ई आज़म या चित्रपटांमुळे ते चित्रपटांच्या प्रेमात पडले.
     १९६८ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते, सुनील दत्त यांच्या 'मन का मींत' या चित्रपटातून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरु झाली. खलनायक, सहनायक आणि नायक असा त्यांचा अभिनय प्रवास सुरु झाला. आजवर त्यांनी १४० हून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या. सच्चा झूठा, मेरा गाँव मेरा देश, या चित्रपटांनी त्यांना आणखी ओळख दिली. मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर ऍंथोनी, हेराफेरी या चित्रपटांमधून त्यांची अमिताभ बच्चन यांचे बरोबर जमलेली जोड़ी प्रेक्षकांना भावली.
     कॉलेज जीवनात मला चित्रपट पाहण्याचे खूप वेड होते. आणि काही चित्रपट आणि त्यातले  निवडक कलाकार ह्यांनी तर कायमच मनावर राज्य केले आहे. आवडलेले चित्रपट दोन दोन, तीन तीनदा तरी पाहिले जायचेच, नव्हे पाहायलाच हवेत असा परिपाठच होता. त्या काळात विनोद खन्ना तर फ़ेवरीटच. कारण तरुण पिढ़ीला आवडणारे देखणे, बलदंड़ व्यक्तिमत्व आणि उत्तम अभिनय.
     विनोदजींचा मला नेहमी आवडणारा आणि माझ्या कायम आठवणीतला एक चित्रपट म्हणजे अचानक. १९७३ मध्ये गुलजारजींनी अचानक हा चित्रपट विनोदजींना घेऊन केला. एका सत्य घटनेवर आधारीत
के. ए.अब्बास यांनी ह्या चित्रपटाची कथा लिहिली होती. अचानक मध्ये मेजर रणजीत खन्ना ही भूमिका विनोदजींनी समर्थपणे साकारली होती. प्रेक्षकांना हा रणजीत खन्ना चटका लावून गेला. मला आजही हा चित्रपट आठवला की डोळ्यासमोर विनोदजींचा घायाळ मेजर डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम. पण अचानक एक दिवस घरी आल्यावर त्याला जे कळतं त्याने तो पुरता घायाळ होतो. पत्नीचा आणि तिच्या प्रियकराचा तो खून करतो. त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. चित्रपटाची कथा वेगाने  सरकतांना मेजर खन्नाला जखमी अवस्थेत इस्पितळात आणले जाते. या  शिक्षा सुनावलेल्या कैदयावर वाचवण्याची जबाबदारी तेथील डॉक्टरांवर येते, कशासाठी तर.... त्याला जिवंत फासावर चढवण्यासाठी !!! विनोदजींनी ही भूमिका अतिशय समरसतेने सादर केली होती.
     विनोद खन्ना यांचा इन्कार हां असाच एक मला आवडलेला आणि आठवणीतला चित्रपट.
     मनात घर केलेला आणि आठवला की, त्यातले प्रसंग झरझर डोळ्यांपुढे उभे राहतात असा विनोदजींचा एक चित्रपट म्हणजे, १९७४ मध्ये आलेला विनोद खन्ना तनुजा  बिंदू यांचा एक सुरेख चित्रपट, इम्तिहान. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मदन सिन्हा. प्रमोद शर्मा या आदर्श आणि सभ्य अशा इतिहासाच्या प्राध्यापकाची भूमिका विनोदजीनी पडद्यावर साकारली होती. मला त्यांची चित्रपटातल्या संवादातली ती वाक्ये अजूनही आठवतात. त्यात ते  विद्यार्थ्यांना सांगतात, की काही लोक वाटेवरून चालताना घसरतात आणि पडतात, काही घसरतात पण  स्वत:ला पडता पडता सावरतात, मात्र माझ्यासारखे वाटेवरून चालतांना घसरतही नाहीत आणि खाली पडतही नाहीत. कारण त्याना स्वत:बद्दल आत्मविश्वास असतो.
     इम्तिहान चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये नव्याने आलेल्या प्राध्यापकाची आणि विद्यार्थ्यांची आहे. कॉलेजचे काही विद्यार्थी अत्यंत बेशिस्त आणि गुंडगिरी करणारे असतात. त्यातला एक राकेश आणि चेअरमनची मुलगी रिटा हे दोघे प्राध्यापक शर्मा आणि प्राचार्यांची मुलगी मधु यांच्यात जुळलेल्या प्रेमावर जळफळत असतात.रिटा प्राध्यापक शर्माना फसवून एका जाळ्यात अडकवते. संकटात फसलेले परंतू दरम्यानच्या काळात विद्यार्थीप्रिय झालेले प्राध्यापक शर्मा न डगमगता आपलं निरपराधित्व सिद्ध करतात. पण सन्मानपूर्वक विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध कॉलेज सोडून निघतात. ह्या प्रसंगावर चित्रित केलेले, मजरूह सुलतानपुरी यांच्या सुंदर शब्दातले, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सुरावटीने सजलेले आणि अर्थातच किशोर कुमार यांनी गायलेले एक सुरेख सुरेल गीत आज सतत माझ्या ओठांवर येते आहे....

रुक जाना नहीं तू कहीं हारके 
काँटोंपे चलते मिलेंगे साये बहारके 
ओ राही ओ राही ओ राही ओ राही 

साथी ना कारवां है, ये तेरा इम्तिहान  है 
यूँही चलाचल दिलके सहारे 
करती है मंजिल तुझको इशारे 
देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकारके

' विनोद खन्ना '....  माझ्या या लाडक्या हिरोच्या दु:खद EXIT वर भावना व्यक्त करतेवेळी या चार आठवणी आज प्रकर्षाने समोर उभ्या राहिल्या, त्या जमेल त्या मोडक्या तोडक्या शब्दांत का होईना पण खरंच मांडाव्याश्या वाटल्या. .  
जीवनात सतत इम्तिहान आहेच. या प्रत्येक इम्तिहानला सामोरं जाण्यासाठी संत कवी लेखक विद्वान् सारेच आपापल्या पद्धतीने सांगत शिकवत असतात. पण  हीच शिकवण आपल्या अभिनयाने कायमची मनावर कोरणारा अभिनेता हाही नकळत जीवनात फार काही मनावर बिंबवून जातो. 
 
आदरांजली श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आपल्या हाती काय आहे. त्यांच्या आत्म्याला शांति आणि सद्गति मिळावी हीच प्रार्थना. 


पद्मनाभ हिंगे, पुणे 
२७ एप्रिल २०१७.







Sunday, 23 April 2017

आकडेमोड

                                            आकडेमोड 


                                        MH 12  9873 --९+८+७+३=२७--२+७=९--अहाहा मस्त !!!
                                       २८-०३-१९५३ -- २+८+०+३+१+९+५+३=३१-३+१=४ हात्तिच्या !!!
                                       नको, असं नको, फक्त २८ घेऊ -- २+८=१ -- झक्कास !
                      Mobile No. 9011012120-- ९+०+१+१+०+१+२+१+२+०=१७--१+७=८, अरारारा-खतरा !!! नको
                      9923193009 -- ९+९+२+३+१+९+३+०+०+९=४५-- ४+५=९, चालेल की, लय भारी !!!!!


माय डिअर फिरेंडस ..नमश्कार,
कहिये क्या सुनेंगे आप ?
आप पूछेंगे ये क्या हो रहा है ??
ही कसली आकडेमोड ? हे आकडे आणि ही  आकडेमोड कशाला खेळताय ?

चलो, आज तुम्हे एक अलग बात सुनाना चाहता हूँ l जो बात सुनाने जा रहेला हूँ, उस्कु समझाणेकेलिये इक तुम्हारे आवडनेवाले एक दो गाणेके बारेमे भी  बताता हूँ l (जरा माफ़ करनेका दोस्तो, अपना हिंदी कच्चा है, क्या l )
हाँ इसमें तो ये एक वो गाना है  ..
अपनी ग्यारंटी है ईस्के उप्पर आप बहोत बार नाचें होंगेच.
लेकिन पहले आपको एक गोष्ट ऐकनी पडेंगी क्या ?
(मैं पहिलेच आपकु बोला था ना की मेरा हिंदी जरा .. क्या बोलते उस्को .. मैं बहोत घाणेरडा बोलता हूँ को क्या बोलते है ?....देखा, इतनी खूबसूरत भाषा है हिंदी, और मुझे ठिकसे बोलणेकुच नहीं आती !!...जाऊन देत मी आयच्या भाषेत बोलतो.)

हां तर, मी काय सांगणार होतो ?

आठवलं...
(आठवले नाही.. आज मला कुठलीही कविता आठवले ली नाही !)

आज काय तारीख बरं ?
२४.०४.२०१७,  म्हणजे २+४+४+२+०+१+७=२०. म्हणजे आजचा शुभांक २ ...
तुम्ही विचाराल हे काय ? गाण्याचे काही सांगणार होता ना ?
थांबा हो, गडबड नका करू. सांगतो, म्हटलं ना.. जरा धीर धरा.
माझ्या एका मित्राची, गब्बूची  ही रोजची आकडेमोड आणि नंतर त्यावरची बडबड.
परवा एका मित्रानं, त्याचं नाव शाणा, मस्तपैकी एक चारचाकी गाडी घेतली.
गब्बूने नेहमीप्रमाणे गाडीच्या नंबरप्लेटवरील आकड्यांची बेरीज केली. जरा गंभीर होऊन गब्बू शाणाला म्हणाला, अरे टोटल ४ होतीये. अशुभ आहे. तुझ्या पहिल्या गाडीच्या नंबरची टोटलही ८ होती. ८ अशुभ आकडा आहे हे तुला सांगूनही तू ऐकलं नाहीस ! तुझा शुभांक १ आहे, हेही मी तुला सांगितलेले विसरलास ?
शाणा गालात हसला. त्याला गब्बू असं विचारणार याची कल्पना होतीच.
शाणा हुशार. म्हणाला, अरे हो, मी पहिल्या गाडीच्या ८ टोटल मध्ये माझ्या मुलाचा २ हा भाग्यांक मिळवला. आणि टोटल झाली १. आणि यावेळी ४ मध्ये मुलीचा ६ हा भाग्यांक मिळवला. झालं की नाही तू म्हणतो त्याप्रमाणे १ ही शुभ टोटल !!
गब्बू गालात गुब्बारे धरून गपगार झाला.
बघितलं.
आपल्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शाणाने दोन गाड्या घेतल्या. पण गब्बूच्या श्रद्धेला न दुखवता त्याची अंधश्रद्धा दूर ठेवणारा शाणा आहे का नाही खराखुरा शहाणा ?
अहो मला सांगा, असे शुभद आकडे कसं काय आपलं कल्याण करणार? आणि ते अशुभ आकडे का म्हणून आपलं वाईट करतील ?
असं असतं तर भरत व्यासांनी, खूप प्रसिद्ध झालेलं हे गाणं "एक दो तीन चार, भैया बनो होशियार .. सबका है कहना अनपढ ना रहना, जाओ गुरुजीके द्वार .." असा  चार हा अशुभ म्हणवला गेलेला आकडा टाकून निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपानदेव या तिघांना उद्देशून मुक्ताबाईच्या तोंडून ऐकवण्यासाठी लिहिलं असतं ?

आता मी म्हटल्याप्रमाणे ज्या गाण्याविषयी मी बोललो होतो
त्या गाण्याचे बघा.

धक धक गर्ल, ओळखता ना तिला ? नक्की ओळखत असाल.
तर ही धक धक गर्ल १३ या पाश्चात्य लोकांना अगदी अशुभ वाटणारा आकडा कसा झक्कास तालासुरात नाचत ठुमकत ऐकवते आणि आपणही त्या गाण्यात ठेक्यात कसे धुंद होऊन जातो ते जरा आठवा.
ते गाणं आठवतंय ना ?
धक धक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित, माहीत असेलच तुम्हाला. 
तर, माधुरी, मोहिनी बनून या गाण्यावर नाच करते आहे.

" एक दो तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारह बारा तेरा..." असं म्हणत, तेरा या तथाकथित अशुभ  आकड्यावर थांबते.
आणि...
आणि तोच तेरा हा आकडा घेत अतिशय आशावादी, सकारात्मक विचार करीत, आनंदात मनातली भावना व्यक्त करते .. तिच्या दूर असलेल्या प्रियकराला आपला आशावाद ऐकवते ..
 काय तर...
"तेरा करूँ...तेरा करू दिन गिन गिनके इंतजार ..
आजा पिया आयी बहार .."

मला तुम्हांला काय सुचवायचं आहे हे नक्कीच कळले असेल. तेवढे वाचक हुशार असतातच.
काही नसतं हो असं काही अशुभ या आकड्यांत.
श्श्शू...
कोणाला सांगू नका हं, मलाही ही सवय होती. मी सुद्धा माझ्या जन्मतारखेची, मोबाईल नंबरची अशीच बेरीज करून काय करायचे ते ठरवायचो. वरची आकडेमोड पाहिली ना ? जाता जाता रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट वरील आकड्यांची झटकन बेरीज करायची. आकडा शुभ असेल तर खुशीत, अशुभ असेल तर उगाचच नाराजी ! आता ही सवय कमी झाली आहे.
सकाळी घराबाहेर पडल्यावर दिसलेली पहिली गाडी महत्वाची. नंबर प्लेटवरच्या आकड्यांची बेरीज १-७-९ असेल तर दिवस मस्त जाणार हा भाबडा आशावाद.
सतरा म्हणजे खतरा, हे डोक्यात ठाण मांडून बसलेले वेड. काय म्हणावं याला ?
एक दिवस सहजच वडलांची आठवण आली. सकाळी ऑफिसला जायच्या आधी, कितीही घाई गडबड झाली तरी व्यवस्थित देवपूजा करणार आणि सतराशे साठ आरत्या अगदी तालासुरात म्हणणार !
कशी काय कुणास ठाऊक, एकदा ते म्हणत असलेल्या मारूतीच्या  आरतीमधले शब्द आठवले.
" सतराणे उड्डाणे हुंकार वदनीं।
करी डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी।
कडाडिले ब्रह्मांड धाकें त्रिभुवनी।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥"
'सत्रा' या शब्दाने सुरुवात झालेली ही आरती मला मारुती रायाची आठवण करून देती झाली. सतराणे या शब्दाचा आरतीमधला अर्थ वेगळा का असेना, पण माझ्या मनातली सतरा या आकड्यांविषयी - शब्दाविषयी वाटणारी नाहक भीती शंका घालवणारी ही मारूतींची आरती मला नव्याने खूपच उपकारक ठरली.
मारुती म्हणजे हनुमान म्हणजे बलभीम. समर्थांनी जणू जाणीव करून दिली की मारुतीराया हा आपल्या मनात आत्मविश्वासाचे रूपात बसलाय.

मंडळी आकडेमोड करायची माझी सवय अजून तशी धुगधुगी असल्यासारखी आहे पण त्यामुळे ४, ८, १३, १७... या खतरा वाटत असलेल्या आकड्यांची भीती मात्र कमी झाली. पटापट आकडेमोड  करीत गणित करायची सवय बरी असते, म्हणून ही सवय असायला हरकत नसावी.
तुम्हांला नाही ना वाटत अशी अशुभ आकड्यांची भीती.

बघा बुवा मला काय सांगायचे ते मी सांगितले. पटलं तर नक्की कळवा.

पद्मनाभ हिंगे,पुणे
२४+०४+२०१७=२०
= २+०=२
हाहाहा..चालतंय की...
तुमचा आणि माझा दिवस मस्तच जाणार..

Wednesday, 12 April 2017

Mai Shayar To Nahee.....

                                                        मैं शायर तो नहीं 

उर्दू भाषा शिकण्याची तशी खूप दिवसांची माझी इच्छा होती. आजही आहे. किती गोड भाषा. खरंच. पण जमतच नाही, याचं फार वाईट वाटतं. हिंदी चित्रपटातली काही उर्दू मिश्रीत गाणी ऐकली की त्यातली शेरोशायरी, शब्दरचना ऐकताना, वाचताना खूप छान वाटतं. ह्या शायर लोकांच्या डोक्यात उसाचे मळेच आहेत, की कल्पनांचे मधुर शब्दकण गोळा करून, आम्हाला कधीच न भेटलेल्या, काही वेगळ्याच जातीच्या मधमाशांनी यांच्या डोक्यातच पोळी बांधली असावी आणि त्यातूनच हे अवीट गोडीचं माधुर्य स्रवत असावं का असं वाटावं इतकी सुंदर रचना ते करत. आजही काही असे गीतकार आहेत.
मी एक उदाहरण देतो. साहिर लुधियानवी यांचं एक गीत मला कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.....
पांव छू लेने दे फुलोंको इनायत होगी l
वरना हमको नहीं, इनको भी शिकायत होगी l
आप जो फूल बिछाये, उन्हे हम ठुकराये l
हमको डर है के ये तौहिन-ए-मुहोब्बत होगी l

"वाह क्या बात है।" इतके सहज शब्द ओठांवर आपोआप येतात. "साला हमको क्यूँ नहीँ लिखने आती ऐसी खूबसूरत शायरी।" ऐसे ओबडधोबड शब्दही मनात येतात.
अर्थात या गीताला तितकीच सुरेल चाल लावणारा संगीतकार आणि गाणाऱ्या त्या स्वर्गीय आवाज लाभलेल्या गायक जोडीचाही सहभाग आहेच म्हणा.  

हे झालं एक उदाहरण. अजून किती तरी  उदाहरणे देता येतील. असंच एक मधुर गीत मला अफाट आवडतं.
त्याबद्दल सांगतो. आवडेल ना की कंटाळाल ?
प्रेम आणि स्त्री सौंदर्य, प्रेमातली व्याकुळता, विरह यावर या शायर मंडळींची प्रतिभा तर अशी काही बहरते की या सुंदर मनोहारी शब्दसागरलहरीत सतत विहार करावा.
सौंदर्य हे मोठं सुंदर, लक्ष विलक्षण विचलीत करणारं. प्रेमात गुंतवणारं. मोहात पाडणारं. पुनःपुन्हा पहात रहावंसं वाटणारं आणि मुग्ध होऊन स्वतःलाही हरवून टाकणारं. हवंहवंसं अगदी सदैव हवंहवंसं वाटणारं....
एखादी सुंदर स्त्री,  अचानक समोर येते. स्वप्नांत नाही ..  साक्षात प्रत्यक्षात....
योगायोगानं तिच्या सुंदर मुखाचं दर्शन होतं. अनुपम रेखीव सौंदर्य. मोहक हालचाल. अप्रतिम पण सात्विक लावण्य. परमेश्वराने हातचं काहीही राखून न ठेवता मोठ्या एकाग्रतेने स्वतःच्या हातानंच जणू एखादं शिल्प साकारावं.
अशा सुंदरीने कथानायकाच्या  नजरेला नजर देताना तिचं लाजून जाणं
आणि  ........

(आणि मी स्वत:ला नायकाच्या रुपात कल्पिले तर खल्लासच  ....

जीभ कोरडी, घसा कोरडा. मग तोंडातून शब्द तो काय फुटणार ?
असंच झालं असावं त्याचं, म्हणजे कथानायकाचं .. पण त्या शायराचं - शकील बदायुनीचं काय सांगावं ! नायकाची ही व्याकुळता त्यांनी अतीव सुंदर शब्दांत मांडली आहे.
त्याच्या हृदयातल्या सगळ्या भावभावनांना मुक्तपणे वाट करून देणारे अनोखे शब्द अत्यंत सुरेल होऊन शकीलजींच्या लेखणीतून बाहेर उतरु लागले ..
ती सुंदर की ते शब्द, त्या कल्पना-भावना सुंदर ! अश्या शंकेला सुद्धा जागा न देता, ती आणि तिच्या सौंदर्याचे वर्णन करणारी शायरी एकमेकासोबत जणू स्वर्गीय सूर घेऊनच वाटचाल करू लागली आणि  कागदावर उतरली......
आणि एका अप्रतिम गीताचा जन्म झाला  ..
हुश्श बाप रे .. याबद्दल बोलताना मला दम लागला खरा .. पण या मेरे मेहबूब मधल्या गीताने मला दिलेला आनंद तुम्हाला सांगताना माझा आनंद मला मात्र सांगता येत नाही. या गीताच्या चार ओळी तुम्हाला वाचायला देतो. तुम्हालाही शकील बदायुनी नामक प्रतिभावान शायराच्या कल्पनेच्या भरारीची कल्पना येऊ शकेल.
कथा नायकाने ते आरस्पानी सौंदर्य एकदाच पाहिलं आणि त्या सौंदर्याच्या प्रेमात तो पडला. ती भेटावी आणि हां विरह संपावा ही भावना, ती  व्याकुळता शकीलजी यांनी किती नज़ाक़तींने मांडली आहे, वाचा तर खरे... मी एखादेच कड़वे देतो.

आणि हो, कधीतरी उरलेली  सहा कड़वी शोधून वाचा आणि हे गाणेही अगदी जरूर ऐका.

मेरे मेहबूब तुझे मेरी मोहोब्बत की कसम
फिर मुझे नर्गिसी आँखोंका सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे ||
ए  मेरे ख्वाब की ताबीर मेरी जान-ए-ग़ज़ल
जिंदगी मेरी तुझे याद किये जाती है
रात दिन मुझको सताता है तसव्वुर तेरा
दिलकी धड़कन तुझे आवाज दिये  जाती है
आ मुझे अपनी सदाओंका सहारा दे दे....


 .. मला स्वतःशी हसताना हिनं पाहिलं. लग्गेच ही प्रश्नाळलीच,
" ऑऑ.. काय खुदखुदताय ? कोणाची येतीय येवढी आठवण ?"
" अगं..बघ ना," 'त्या'काळात मी लिहिलेलं काव्य वाचतोय. त्या शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, शैलेन्द्र, ग.दि.माडगुळकर, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली सुंदर गीतं ऐकली की मलाही वाटायचं, आपणही असं  सुंदर काही लिहावं. निदान प्रयत्न तरी करावा. माझ्या हृदयातला कवी बघ ना काय फुर्फुरत होता.
ऐक ना .."
तोः हे गीत भावनांचे तुझियासवे मी गावे l
      तू माझिया सखे गं साथीत आळवावे llधृll
तोः फुलवीत लाख स्वप्ने मन मोहरून गेले l
      मधु रम्य कल्पनेच्या गगनामधे उडाले l
      मधु शब्द शब्द जुळुनी
      हे प्रीत गीत व्हावे  ll१ll
तो:  हातात हात देई प्रणयांत धुंद होऊ l
       बाहूत येई माझ्या सौख्यात आज न्हाऊ l
       या प्रणय रम्य वेळी
        बाहूत तू असावे  ll२ll
तीः   आले तुझ्याचसाठी हातात हात घे रे l
        राजा प्रियेस वेड्या तू सावरून घे रे l
        वेलीस या तुझ्या रे,
        आधार तूचि व्हावे ll३ll
हसताय ना .. हसा...
 
ट ला ट जोडण्याचा काय आणि किती तो आटापिटा !! बाप रे ... किती टुक्कार लिहायचो मी .. श्शी ..
 मला माझ्यावरच हसू येतंय.." मी काही शायर नाही. सुंदर काव्य करणं हे आपलं काम नाही याची पक्की जाणीव होत राहते....

कधी नव्हे ते बाईसाहेबांनी माझ्या कडे कौतुकाने पाहिले !! म्हणाली. .
"अहो त्यात काय?  बरं लिहिलं होतं की ..आणि आत्ताच्या गाण्यांपेक्षा नक्कीच बरं आहे हो".
'बरं' या तिच्या शब्दामुळे मन खट्टू झालं हो माझं (..निदान तिनं तरी चांगलं म्हणायला हवं होतं !)..
माझ्या काव्याचं सोडा.. पण,  खरंच त्या काळात किती सुंदर शब्दांत गीतकार भावना व्यक्त करायचे.
ठीक आम्हाला नाही जमत सुंदर शायरी करायला, पण वाचायला तर जमेल, ऐकायला तर जमेल.

लग्न झालं, मुलं झाली, ती मोठी झाली की त्या काळातल्या गोड आठवणी किती आनंद देतात, हे जून झालेल्या दांपत्यालाच कळतं बरं ..

पद्मनाभ हिंगे,
पुणे. 
११ एप्रिल २०१७.

Sunday, 9 April 2017

The Sketches drawn by mee....

मी काढलेली चित्रे ......


 
 

 



 







   ... नाही ना खरे वाटत ?


सुप्रभात  🌹🌹🌹🌹

खूप खूप वर्षं झाली या गोष्टीला.
म्हणजे आटपाट नगर होतं-तिथं एक राजा राज्य करत होता-त्याला दोन राण्या होत्या-एक आवडती एक नावडती.
ओय, तुम्हाला काय वाटलं मी गोष्ट सांगतोय ? हाहाहा,  बसले आपला मांडा ठोकून !


हाँ,
तर मी काय म्हणत होतो...
खूप म्हणजे झाली असतील ३५ वर्षे. विरंगुळा म्हणून काही तरी करायचो मी अधून मधून. तिशी च्या उंबरठय़ावर असेन.

बोअर झालात ना. बरं जास्त नाही पीळ देत. डायरेक्ट विषयाला हात घालतो.

माझ्या हाताला आयडियाची कल्पना आली.. दिसला पेपर चालव हात. म्हणजे हातात बॉलपेन असायचं. कागदावर बॉलपेन चालू व्हायचा. बघता बघता शे दीडशे मुक्तहस्त चित्रं झाली. त्यातली काही चित्रे बघितल्यावर लग्नाच्या रुख्वतासाठी पडदे अभ्रे यांच्यावर भरतकामासाठी नेण्यात आली.
मध्यंतरी अचानक एका फाईलमधे खूप सारी चित्रं सापडली, जीर्ण अवस्थेत. विचार केला व्हाट्सएपवर मित्रांना पाठवावीत. जमतील तसे फोटो काढले. मित्रांना म्हटलं, बघा आवडतात का ?
त्यावर कोणाला काही करायचं असेल तर खुश्शाल मागा, असेही सांगितले.

तसं शाळेतल्या चित्रकला तासात जे शिकवले जायचे त्या व्यतिरिक्त वेगळे असे कोणतेही चित्रकलेचे  शिक्षण मी कधीच घेतले नव्हते. आमच्या घरीही तसे चित्रकलेची आवड जोपासणारे कुणीच नव्हते.
शाळा संपली आणि कॉलेजचे खुले प्रांगण दिसू लागले. या काळात अभ्यास कमी आणि इतर उद्योगांकडे लक्ष फार असायचं. क्रिकेट, सिनेमा, कट्ट्यावरच्या गप्पा-नव्हे टवाळक्या, उंडारणे, यातच वेळ जायचा.

कृष्णा कुसुरकर हा माझा एक मित्र खूपच सुंदर चित्र काढायचा. मला त्याची चित्रं, पेंसिलस्केचेस खूप आवडायची.
एकदा कृष्णाने फक्त डोळे वेगळे, फक्त नाक वेगळे अशी चित्रे काढलेला एक कागद मी पाहिला आणि मी प्रभावित झालो. 'मलाही येईल का काढता अशी सुंदर चित्रं ?' असा विचार मनात जोर धरू लागला.
ते वयच असं असतं की तनामनात उत्साह नुसता सळसळत असतो. त्यामुळे फार काळ स्वस्थ बसायला मन तयार नव्हतं. घेतला एक ड्रॉईंग पेपर, एक पेंसिल आणि धडपडीला सुरुवात केली. कसं चित्र काढायचं ? काय  करायचं, याचा कुठलाही गंध नसलेल्या अश्या कामात अडचणी येणार, वेळ लागणार हे ते वय मान्य करायला तयार नव्हतं जणू.
चित्र काढायचे म्हणजे काढायचे. आता ते कोणते ?
त्या गुलाबी काळात सौंदर्याचा शोध पहिला असणार नाही का ? म्हणजे निसर्ग सौंदर्य, निसर्गदत्त सौंदर्य !!
एक सुंदर फोटो पाहिला होता,  त्या काळातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा, तनुजाचा होता तो. प्रयत्न करू लागलो.
खूप वेळ लागला, पण  फोटो पहात पहात पेंसिल चालू लागली आणि हळूहळू चित्र साकारू लागलं. काही दिवसांनी पूर्ण झालं.
चित्र तनुजाचं आहे असं मला जाणवलं. जरा चेहरा ओळखीचा वाटू लागला. म्हणजे काहींनी विचारलं सुद्धा, 'कोण रे ही ?'. मी चाचरत सांगायचो, 'तनुजा'! मग त्यांनाही हे चित्र तनुजाचे असावे असे भासायचे !
माझा आत्मविश्वास थोडा वाढला.
मग डिम्पल भावली. मीनाकुमारीचे चित्र काढावेसे वाटू लागले - काढलेही !
सदाबहार 'देव आनंद' कागदावर अवतरले.
'खामोश',' माझंही चित्र काढायला हवं 'म्हणत शत्रुदादा कागदावर उतरले.
झाली पाच सहा चित्रं बदाबदा.

आता काहीतरी अवघड जरा वेगळं चित्र काढावं असं मनानं घेतलं.

मी काढलेलं, मला स्वतःलाच आवडणारं, अगदी आवर्जून इतरांना दाखवावंसं वाटणारं अजिंठा वेरूळ च्या लेण्यातलं बोधिसत्व पद्मपाणी हे चित्र.
१९७२ मध्ये काढलं होतं मी.
खूप म्हणजे खूपच दिवस लागले होते हे चित्र काढायला.
खूप मन लावून अगदी तल्लीन होऊन मी चित्र काढत राहायचो. मूळचं चित्र बघून काढायला हे अवघड जात होतं. तासंतास काढायचो. मानपाठ एक व्हायची.
कितीतरी वेळा खाडाखोड झाल्याचं आठवतंय. हे चित्र काढणं माझ्यासाठी आव्हान होतं, अन् ते मी केलं पूर्ण!!
हे चित्र मी अनेकांना दाखवलं.
"वा छान" किंवा "मस्त" एवढ्याच पण कोरड्या  प्रतिक्रिया मिळायच्या. चित्र परत हातात मिळायचं इतकंच.
खजील व्हायचो. वाईट वाटायचं. कारण मला सूचना किंवा मार्गदर्शन हवं असायचं. पण ऊहुं..
मग माझं चित्र काढण्यातलं स्वारस्यच गेलं. असो.
खरं म्हणजे मला कल्पना आहे की मी काही चित्रकार नाही. एखाद्या चित्रकाराला अथवा या कलेतील तज्ज्ञ व्यक्तिला ह्या चित्रांमध्ये अनेक चुका दिसतील.
पण होतं खरं असं. माझी चूक म्हणजे नाऊमेद झालो असलो तरी चित्र काढणंच बंद करायला नको होतं. प्रयत्न चालूच ठेवायला हवा होता. पुढेमागे मिळाले असते मार्गदर्शन. जाऊ देत.

माझ्या मित्र मैत्रीणीना मी नेहमी सांगायचा प्रयत्न करत असतो की तुमच्यात काही कला असेल तर ती शोधा स्वतःत आणि त्यात तयार व्हा. दैनंदिन व्याप सांभाळा पण काही चांगलं वेगळं तुमच्यात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्न करत रहा. चांगल्या, तुम्हाला बरं वाटावं म्हणून दिलेल्या प्रतिक्रियांपेक्षा चांगल्या सूचनांची अपेक्षा ठेवा.
आणि असा माझ्यासारखा तुमच्याबाबत कलेतला  interestच निघून गेला असं  कधीही होऊ नये, म्हणून ही पोपटपंची. कारण कलेत स्वतःला हरवून जाण्यात एक निखळ आनंद असतो.

तुमच्यातील सद् गुणांची वृद्धी व्हावी, तुम्हांला चांगलं मार्गदर्शन मिळावं, ही अगदी
प्रामाणिक सदिच्छा.
वाहवत जा पण वाहून जाऊ नका असे सांगताना, आजच्या शुभेच्छा द्यायला मी कसा विसरेन ?

पद्मनाभ हिंगे 
पुणे
१० एप्रिल २०१७  
💃💃💃💃
🌹🌹🌹🌹
 

Monday, 27 March 2017

Thank God...

                                                        ॥ श्री गणेशाय नमः ॥

नमस्कार मित्रांनो,
आज गुढी पाडवा. नवीन हेमलंबीनाम संवत्सराची सुरुवात.
चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९३९.

तुम्हाला, तुमच्या स्नेही कुटुंबियांना सहस्रावधी शुभेच्छा.

आज या नव्या वर्षाचा पहिला दिवस.
एक गंमत सांगू ?
आज २८ मार्च. तुम्ही म्हणाल हो माहीत आहे, 'त्यात वेगळं ते काय? कॅलेंडर बघतो आम्ही !!'
बरोबर आहे तुमचं. पण आज माझ्यासाठी एक विशेष योग आहे.
योगायोगानं, खरंच योगायोगानं, माझ्या जीवनातल्या नव्या वर्षातले आजचे हे माझे पहिले पाऊल.
म्हणजे,
रडायला सुरुवात करून बरोब्बर सहावर चार वर्षे झाली बघा आज मला. सहावर चार म्हणजे चौसष्ट हो. तुम्हाला सहावर चार चौसष्ट हे कळणार नाही असं मला आपलं वाटलं म्हणून ज़रा स्पष्ट करून सांगितलं, इतकंच. लहानपणी, घरी तालासुरात एक ते शंभर आकडे  म्हणत असू याची आठवण झाली. तेंव्हा सहावर पूज्य साठ, सहावर एक एकसष्ट, सहावर दोन बासष्ट, सहावर तीन त्रेसष्ठ असे आम्ही मोठमोठयांदा घोकायचो. असो. तर सांगायचे काय की, रडायची सुरुवात म्हणायचं कारण म्हणजे त्या दिवसापासून जे दिसेल, मनाला हवंहवंसं वाटेल, किंवा माझ्याकडे तुम्ही लक्ष का देत नाही म्हणून रडूनगागून अगदी भोकाड पसरून हट्ट करायचा हीच सवय या दिवसापासून लागलेली. बरं त्यासाठी स्वतः काही करायचं का? ...... तर नाही. आयतं मिळायला हवं ही मानसिकता !!!
तर सांगायचे असे की आम्ही आज चक्क चौसष्ट वर्षे पूर्ण करते झालो. केवढे हे शौर्य, नाहीं का ?
सकाळपासून Whats App / Facebook वर माझं कौतुक मी पहात राहायचं. कोणी भेटून बर्थडे विश देणार. मी म्हणणार मी चौसष्ट वर्षाचा झालो. तो म्हणणार " चल यार 64 is just a number. You are still Young !!! "
मी उगाच विरळ झालेल्या डोईवरच्या धवल केसांवरून हात फिरवणार. कुणीतरी आणलेल्या मिठाईच्या बॉक्स कड़े ओशाळलेल्या नजरेनं पाहणार. याचवेळी डॉक्टरने दिलेला सल्ला मला नेमका आठवणार. 'बस आता गोड खायचं नाही, शुगर लेव्हल मेंटेन करायलाच हवी, ' तिकडून मालकीणबाईसाहेब सल्ला देणार, "आजपासून वाहन चालवावयाचे नाही हो,"
कन्या, चिरंजीव म्हणणार, "गाडीची किल्ली काढून घ्या आणि लपवून ठेवा, आता रायडिंग शायनिंग बस्स झालं." वगैरे वगैरे...
चालायचंच झालं.
हे सगळं खरंच आहे म्हणा, ६४ हा नुसता आकड़ा नाही तर वास्तवातलं माझं वय आहे आणि चुकूनही आता तो ४६ होणार नाही, हे नक्की,
हे मात्र नक्की कळलं आहे की, देवाने आपल्याला जो जीवनपट दिलाय तो आजवर तरी नक्कीच ६४ घरांचा होता. आता ह्या जीवनपटाला किती जादाची घरं बोनस म्हणून मिळणार हे मात्र सर्वस्वी 'त्याच्यावरच' अवलंबून असणार, नाही का ?....
हां, आता ह्या आजवरच्या ६४ घरातली निम्मी घरे पांढरी आणि निम्मी काळी असायला हवी होती. पण, काळी थोडीफार नव्हे तर ज़रा जास्तच रेखाटलेली असावीत असा उगाचच भास होतो मला. पण आपण कशाला एखादं घर चांगलं वाटलं म्हणून त्याला पांढरं म्हणायचं आणि एखादं मनासारखं नाही वाटलं म्हणून त्याला काळं म्हणायचं ? असो, ते काहीही असलं तरी खेळ सोडून पलायन तर करायचं नसतं ना...
खेळायला चांगली आठ प्यादी, सरळ चालणारे दोन हत्ती, तिरके चालणारे दोन उंट साथीला मिळाले. दोन्ही घोड्यांच्या चालीबद्दल काय सांगावे? ह्या सर्वांच्यावर वरताण असणारा तो अतिशहाणा वजीर आणि हो, तो अति अहंकारी एखादेच घर पुढे मागे जाणारा आळशी राजा. सारे आपल्याच तोऱ्यात ह्या जीवनपटावर आजवर खेळत आहेत.
आता बरीचशी प्यादी पटावरून नाहीशी झाली आहेत.
बेफाम आणि विचित्र उधळणारे दोन्ही अबलख घोड़े त्यांच्याच विचित्र धावण्याची खोड मोडल्याने गायब झालेत. वाळवंटात पाण्याची भरपूर साठवण करीत वावटळीतही तिरक्या चालीत फुफाट्याचा,वादळाचा सामना करीत चालणारे दुडक्या चालीचे दोन्ही ऊंट प्रतिस्पर्ध्याने अडकवून ठेवलेत. मात्र संथ पण सरळ चालीचे  दोन्ही हत्ती घेऊन, त्यांच्यावर भिस्त ठेवून वजीर खेळ खेळतोय. माज तर उतरलाय अहंकारी राजाचा. स्वतःला वाचवत केवळ एखादंच घर पुढे मागे जाऊ शकणारा हा राजा अजून किती काळ खेळ खेळणार आहे ते, खेळवण्यात प्रवीण असलेल्या 'त्या वरच्यालाच' माहीत...
पण राजा आता मात्र खूप आनंदी आहे. कारण विचाराल..
कारण त्या सर्वोच्च वरच्या खेळीयाने त्याला दिलेल्या या खेळ खेळण्याच्या संधीने आणि तो आजही खेळू शकतोय या सत्यतेमुळे त्याचे दिल खुष आहे. ती संधी हीच त्याची प्रेरणा आहे,त्याची शक्ती आहे.
'त्या वरच्याचं' रूप कधी पाहिल्याचे नाही आठवत, पण सतत तो आपल्याला क्षणोक्षणी भेटत राहिलाय हे जाणवतंय.  'त्याला' म्हणावंसं वाटतं,
                                             तू असा रे कसा ?
                                             कधी कुणी असूच शकत नाही असा !!
                                             कळलाच नाहीस कधी कसा भेटलास
                                             पण तरीही...
                                             खात्री आहे, तू सतत भेटतच राहिलास
                                             एक मात्र नक्की कळलंय...
                                             कधी एका रुपात दिसतोस
                                             तर कधी वेगळाच असतोस !
                                             कधी Silent तर कधी Violent                                                                                           कधी शिंगावर घेवून दंगा करतोस
                                             कधी हाताची घड़ी नि तोंडावर बोट ठेवतोस
                                             कधी हास्याचे तुषार तर कधी संतापाचे फुत्कार
                                             कधी लाथाडतोस तर कधी करतोस सत्कार !
                                             खरंच असा रे कसा तू ?
                                             माझं म्हणणं एकतोस ना तू ?
                                             कसे रे समजून घ्यायचे तुला ?
                                             आणि तुझ्या अंगीच्या चौसष्ट की---
                                             त्याहून अधिक कला ?
केवळ 'त्याच्या' इच्छेमुळे आणि कुटुंब, स्नेही सोबत्यांच्या प्रेमामुळे आजवर सारं कसं सुसह्य होत गेलं. मी दुःखी आहे, असे कधी वाटलेच नाही. छे छे मी कधी दुःखी नव्हतोच. प्रत्येक क्षण कसा भरभरून देत राहिला. मी समृद्ध झालो की नाही, हे नाही सांगता येणार, पण मी दिवसेंदिवस आनन्दी होत आहे याचा विश्वास वाढतच राहिला. काय म्हणू ? Thank God, धन्यवाद, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सखी, मुले, कुटुंबीय, स्नेहीहितचिंतक, मित्र मैत्रीणींनो... खरंच मनापासून धन्यवाद. कारण आई वडलांच्या नंतर तुमच्या रुपात तर 'तो' मला दर्शन देतो ना.

पद्मनाभ हिंगे,
पुणे. 
चैत्र शुद्ध १, शके १९३९. 
दि. २८ मार्च २०१७.

                                             



Wednesday, 22 March 2017

Maze ghar shubhankar



                                                                      माझे घर शुभंकर
                                           (ओवीच्या चालीत  ... जात्यावर बसून म्हणणार ?  ..
                                             किंवा तुळशीच्या वृन्दावनाजवळ दिवा लावतांना ?
                                             जसे की... 'आली दिवाळी दिवाळी ' .... )

                                           माझे घर शुभंकर शुद्ध संस्कृतीचा श्वास 
                                           कला गीत संगीताचा जेथ नित्य सहवास ॥  माझे घर... 

                                           सानथोर आनंदात येई कौतुकें पाहुणा 
                                           किलबिलाट पाखरांचा वाटे सुखाचा धिंगाणा ॥ माझे घर...

                                           कोपऱ्यात देव्हाऱ्यात बसुनि पाही 'तो' निवांत 
                                           जसे हवे त्याला घर हे असो समाधानी शांत ॥ माझे घर... 

                                           प्रसन्नतेत भारुन भरल्या दिशा दाही मांगल्यात 
                                           वास्तु तथास्तुही म्हणते काही उणे ना सौख्यात ॥ माझे घर...

                                  
                                           पद्मनाभ हिंगे, पुणे...
                                           २३ मार्च २०१७