इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र
'इश्य' .. हा डाळिंबी ओठांतून आलेला अतीव मधाळ शब्द ज्यांनी आपल्या आयुष्यात ऐकला असेल, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. ज्यांना हे भाग्यच मिळालं नाही ते मात्र करंटेच म्हणायचे. इतका रसरशीत मंत्रमुग्ध करणारा शब्द, आला कसा, कुठून, म्हणजे त्याची व्युत्पत्ति काय याचा शोध घ्यावा म्हणून मी माझ्या बुद्धिला आवाहन केलं.
झालं. बुद्धिने शोधकामाला सुरुवात केली. आता तातडीने आपल्याला विश्वकोश कोठे मिळणार, याची बुद्धिला कल्पना होतीच. ती सरळ बोटांत उतरली आणि तिनं मला आंतरजालात नेऊन सोडलं. आंतरजाल, I mean internet. बरीच खटपट शोधाशोध केली. इश्यच्या ऐवजी सालं इश्क़ इश्क़ हाच शब्द दिसू लागला.
"इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वरना हम भी आदमी थे काम के"
असाच 'मिर्ज़ा ग़ालिबचा' शेर सारखा चोंबड्यासारखा डोकवायचा! चिडचिड झाली हो. या इश्क़ तला शेवटचा क़ शेवटी कुचकामीच करणारा असेल तर उपयोग काय? एकवेळ वाहवत गेलो तरी चालेल, पण वाहून जाण्यात काय अर्थ? नाही का!आम्हांस 'कर्माचं' महत्व महाभारत काळापासून सांगितलं जातंय. मग निकम्मा कुचकामी होऊन कसं चालेल!
त्यात मध्येच 'ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़' हे रफीच्या आवाजातले शब्द ऐकू आले. पण आमचं ठरलं होतं ना, आम्ही साहिर लुधियानवीला तोडक्या मोडक्या हिंदीत बजावून सांगितलं, "बाबा रे, तुम्हारी इस उर्दू बोलीमें भलेही ख़ूबसूरत मिठ्ठास हो, लेकिन हमें 'ना तो कारवां की तलाश है।' हम बस हमारे 'इश्य' शब्द की व्युत्पत्ति जानना चाहते है।" बिचारा शांतच झाला!
मग अस्मादिकांनी म्हणजे मी, आम्ही! कसंय विश्वकोश वगैरे जडजाल शब्द वापरून व्याकरण, व्युत्पत्ति शोधण्याची शर्थ करणारी व्यक्ती विद्वान असणार ना! म्हणून स्वत:ला आदरार्थी संबोधून सांगण्याचा जरा बळेच प्रयत्न केला, इतकंच.
हे बघा, म्हणून काही कुणी आम्हांस 'विद्वान आहात' असा उपरोधिक टोमणा मारू नये. आम्ही करतोय ना प्रयत्न, 'इश्य' शब्दाची व्युत्पत्ति शोधण्याचा!
'धुंडाळले आम्ही जाल ते आंतरीचे ।
हाय ना काही मिळाले, शल्य बोचले अंतरीचे !!'
'शुक्रिया शुक्रिया'
च्यायला, बुद्धिला म्हटलं, चल जाऊ दे. आपण काय निकम्मे, कच्चे, कुचकामी आहोत की काय! आपणच तयार करूयात 'इश्य' शब्दाची व्युत्पत्ति! एक त्रैराशिक मांडलं.
ज्याअर्थी इश्य शब्दाची व्युत्पत्ति, जगद्विख्यात आंतरजालात सापडली नाही,
त्याअर्थी हा शब्द कोहिनूर हिऱ्यासारखा आंतरजालाला दुर्मिळ झाला असेल!
माऊली, ज्ञानेश्वर माऊली, क्षमा करा, तुमच्या ओवीचा आधार घेऊन अभिमानाने सांगतो,
" इये मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळु करी। घेणे देणे सुखचि बरी। हो देई या जना।।"
माझी ही माय मराठी मूळचीच अभिजात आहे, समृद्ध आहे. या नगरीचा कायम रहिवासी असण्याचा मला सार्थ अभिमान आहे.
प्रस्तावना फार बोजड रेंगाळलेली कंटाळवाणी होऊ नये. आवरतं घेतो. कारण 'इश्य' हा शब्द इतका मधुर आहे की त्यातली गोडी अवीट, हवीहवीशी वाटायला हवी. प्रस्तावनेचं आख्यान बेचव व्हायला नको.
कुणी 'इश्श' म्हणतं. मी ऐकला वाचलेला हा शब्द 'इश्य' असा आहे. 'मुळात 'इश' या शब्दांतच 'य'च्चयावत सुख ठासून भरलंय. श अर्धाच असायला हवा. तो गोडसा आलेला अर्धामुर्धा शहारा व्यक्त करतो. 'य' हा यशस्वीतेतला पहिला शब्द. ईश्वरीय सात्विक शृंगारिकतेच्या पदार्पणातला मोहक हवाहवासा वाटणारा शहारा, जो या यशातल्या पहिल्या पायरीचा सुखदानुभवी इशारा देणारा अप्रतिम शब्द. या शब्दाचा उच्चार अत्यंत नाजुकश्या डाळिंबी ओठांतून बाहेर पडतांना मोगऱ्या सारख्या मोहक स्वच्छ सुगंधी दंतकळ्यांतून अवचित बाहेर पडतो. आधीच तो जिव्हेचं अमृतमयी माधुर्य घेऊन जिव्हेवरच नाचताना बाहेर पडण्यासाठी अधीर झालेला असतो! आणि अवखळपणे निसटतोच.
अर्जुनाने भलेही पाण्यात पाहून वर न पाहतां, धनुष्याला बाण लावून प्रत्यंचा ओढत मत्स्यभेद केला असेल. पण कदाचित त्याआधी त्या सौंदर्यवती कोमलांगी द्रौपदीच्या धनुष्याकृती भ्रुकुटीमध्यातून सुटलेल्या नयनबाणाच्या अग्रावर आरुढ झालेल्या 'इश्य' नावाच्या मोहिनी मंत्राचा त्या नयनबाणावर सलज्ज अभिषेक नक्कीच झाला असला पाहिजे.
मला महाभारत मालिकेतील सर्व धनुर्धरांच्या प्रतिमा दिसू लागल्या. आकाशाकडे बाणाला दिशा देत, डोळे मिटून काहीतरी मंत्र पुटपुटत, अग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, पवनास्त्र सोडणाऱ्या दिग्विजयी धनुर्धारांना केवळ अर्धोन्मिलीत नेत्रांतून हळुवार 'इश्य' मंत्राचा उच्चार करीत मनमोहक सुंदरीने सोडलेल्या ह्या घायाळास्त्राने कितीही पोलादी पहाडी छाती असलेला अगदी पाषाणहृदयी धनुर्धर घायाळ होणारच.
तर असा 'इश्य' या शब्दाचा अर्थ आणि त्याची व्युत्पत्ति शोधण्याचा आमचा प्रयत्न आवडला असेलच. अजून खूप काही सांगणार होतो. पण म्हटलं बघूयात आपल्याला नेमक्या निवडक शब्दांतून 'इश्य' उलगडून दाखवता येतंय का ते!
इतकेच मला लिहितांना 'इश्य' हे कळले होते।
'इश्य'नेच केली सुटका आंतरजालने छळले होते।।
म्हणून म्हटलं..
"इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र.."
पद्मनाभ प्रभाकर हिंगे,
मुंबई.
०७ जानेवारी २०२२
सकाळी ११.१०.
No comments:
Post a Comment