Sunday, 5 February 2023

आज देवानं ....

 आज देवानं सगळ्यांची मनं व्यापून टाकली। 


मीही तीर्थक्षेत्री जाण्यासाठी सगळ्या कामांना दांडी मारली। 


गच्च गच्च भरलेल्या, 

ओसंडून अवघडलेल्या, ट्रॅव्हल्यांमधून भक्तमंडळी टच्च भरलेली। 

जाता जाता दिसत होती भक्तीरसांतनं थबथबलेली। 


आज देवानं सगळ्यांची मनं व्यापून टाकली। 


मज़ल दर मज़ल करत आमची स्वारी, तीर्थक्षेत्री एकदाची पोहोचली। 


पाहिलं तर काय, 'अब बब', तीर्थक्षेत्री, अमाप गर्दी उसळलेली। 

स्टॉलं काय, न् हातगाड्या काय, न् पथारीवाल्यांची हीss धांदल उडालेली। 


कॉर्नरच्या शेठजीनं म्हणे सारी देवाची  चित्रे चढ्या भावात विकून टाकलेली। 


पलीकडच्या हलवायानं सारी शिळावळ, प्रसादाच्या मिठाईबरोबर विकून टाकलेली। 


शेवटच्या स्टॉलवरच्या फुलवाल्यानं पाणी मारमारून ठेवलेली सारी ताजी फुलं दामदुपटीनं विकून टाकलेली।


देवळावरच्या भोंग्यांनी भक्तिगीतं कर्कश्श आवाजात गाऊन स्पर्धाच जणू लावलेली।


कॅसेट विक्रेत्यानं भक्ती कॅसेटी अवाच्या सवा भावानं विकून बक्कळ माया कमावून घेतलेली।  


काय किती कसे वर्णन करू, सारी भाविक जन्ता भक्तिसागरात बुडून गेलेली।


कुणी रडताना, 

कुणी अंगात आलेलं दाखवताना,

कुणी नवस फेडताना, 

कुणी नवस बोलताना, 

कुणी साकडं घालताना, 

देवालाच लालूच दाखवताना,

दानपेटीत नोटाच नोटा कोंबताना,

सारं पहात पहात, देवाचं माझ्याकडे लक्ष वळावं म्हणून मीही काय करावं?

विचारात पडलो। 

भांबावलो..

पाहून‌ देवाच्या दराऱ्याला..

देवभक्तांच्या अत्युत्साहालाच घाबरलो !!


इतक्यात, देवाची जेवायची वेळ झाली। 

स्स .. दार बंद

अहो लांबून आलोय ..

दोन मिनिटं..



'लवकर येण्याची घाई म्हणे करता नाही आली !!!'

आता थांबा..

रेटारेटीत

मारा बोंबा..

खेटाखेटीत.


दार बंद देव्हाऱ्याचं..

कधी ते उघडायचं..

देवाला मी भेटायला आल्याचं; 

ते कधी हो कळायचं?


आधीच पाहिली होती मी आल्या आल्या तीर्थक्षेत्री, खूप मोठी रांग देव दर्शनाला उभी राहिलेली। 


माझी तर आज गात्रंन् गात्रं भक्तिरसात बुडालेली। 


घड्याळ पाहिलं न् मध्यस्थाला ..

दोन मागत होता, नोटा.. !!

घासाघीस केली.. सक्सेसफुली !!

पाचशेची नोट देऊन टाकली। 


तासाभरात क्षणभरच, देवासमोर, आमची स्वारी उभी राहिली। 

कुणीतरी माझं मानगूट धरून माझं मुंडकं आपटलं..

धोपटल्यासारखं 

करीत पाठीवर थोपटलं..

चला .. आटपा..


क्षणभरच, हो.. 

क्षणभरच,

देवाची मूर्ती मला पाहून कुत्सितपणे हसलेली भासली।


चिडलेला, 

कंटाळलेला,

संतापलेला, 

देव हळहळता वाटला। 

'सगळीकडे माझाच-देवपणाचा बाजार मांडलेला।'

असं काहीसं पुटपुटताना भासला। 


श्रद्धाळू जन्तेला, ना जाणे कुठला आजार झालेला।


बाहेर आलो,

घामात घामेजून गेलेलो..


चला काही खरेदी करू..

कळसाला तरी नीट पाहू..


रस्त्यावर देव विकणारा मूर्त्या मांडून बसलेला। 


शंभरला मूर्ती देतो म्हटला, पन्नासला मागितली, परवडत नाही म्हटला। 


प्रसादाचे द्रोण दिसले,

त्यातले अन्नकण अस्ताव्यस्त सांडलेले..

कुत्र्या पक्षांच्या भांडणात 

विस्कटलेले,

काही कचऱ्यात गेलेले

काही अनवधानाने माझ्याच 

पायाखाली !! कचरा.. !!

ढीगच्या ढीग कचऱ्याचे..

कुणी कधी निस्तरायचे?


रात्री निघालो, तीर्थक्षेत्रातून. 

केवढा शीण तो, ढाब्यावर बसलो।

मी गेलेलो होतो थकून, 

माझ्याकडे पाहून

पोऱ्या म्हटला खेकसून, 

अंगठा वर करून !!


'साहेब कुठली आणू..?' 


स्वत:शीच हसलो..

भरून पावलो....


किती हो पुण्यवान मी, 

कितीतरी पुण्ये पदरात पडली,

कारण..

आज देवानं सगळ्यांचीच मनं व्यापून टाकलेली !! 


पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे,

सुसंस्कृत पुण्यातून..

Saturday, 4 February 2023

खुश झाली मजवर माझी धरती..

 खुश झाली मजवर माझी धरती


       पावसानं ओढ धरली की, शेतीचं सारं नियोजन पूर्ण फसतं. यंदा मृग, आर्द्रा आदी पावसाची खरीप हंगामातली नक्षत्रं कोरडी गेली. 

       पाऊस का रुसला; देव जाणे! पीक घ्यायचं तर ओल नाही! पाऊस कधी पडणार? वाफसा आलेला कधी कळणार? मन जरा खट्टुच झालं होतं. जून जुलै हे ऐन पावसाचे महिने ठणठणीत कोरडे गेले. आषाढाचा महिना आशा लावून परस्पर निघून गेला होता. आमच्या मांडवगणच्या चारी बाजूंनी जोरदार पाऊस झाल्याच्या, होत असल्याच्या, बातम्या आल्या. गावाच्या भोवताली चारही बाजूला पाणीच पाणी आणि मांडवगण म्हणजे जणू काही एखादं कोरडं ठणठणीत बेटच!

       खरीपाच्या हंगामात कुठलीच पेरणी करता आली नाही. हंगाम वायाच गेला. सारी झाडं बिचारी आसुसलेली! कोरड्या नजरेनं पावसाची वाट पाहत होती. जे काही विहिरीत थोडं पाणी आहे ते थोडं थोडं देऊन जगवायचं त्यांना, ते केलंही! किती आवडीनं उत्साहानं लावली ही झाडं. कितीसं पुरणार त्यांना हे पाणी. त्यांना बिचाऱ्यांना वाचाही नाही की सांगावं बुवा, "घसा कोरडा पडलाय हो. कुणी पाणी देता का पाणी!" 

       आणि...  प्रार्थना ऐकली वरूण देवानं !! पाऊस आला, पडला. घर गळलं आणि गळलेलं अवसान पुन्हा उभं राहिलं.

       थोडा कांदा पेरला, हरभरा पेरला, गहू पेरला, ज्वारी पेरली. शेवग्यानं पुन्हा उभारी धरली. पेरूच्या पानांना झळाळी आली, सीताफळ, मोबाईल मध्ये पाहून हसू लागले. अजून पीक वाढतंय, दाणा धरायला वेळही लागेल.

       दोन वर्षे डाळिंब रुसलं होतं, आमच्यावर नाही हो, ढगाळ वातावरणावर! मग विचार केला आणि एक वर्षाची डाळिंबाला विश्रांतीसाठी सुट्टी देऊन टाकली.

       सकाळी, मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो... 

       हो, मला माहीत आहे, 'सकाळी, मॉर्निंग वॉक..' असं बोलून जोक टाकला, तसा तो शिळा झाला आहे. असो. 

       ते जाऊ देत. प्रत्येक वावरात जाता जाता साऱ्या पिकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली. आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यानं त्यांची प्रसन्न छबी टिपण्याचं काम सुरू केलंही. हळूहळू काही शब्दही गप्पा मारायला आले. चला, जरा ऐकूयात शब्दांच्या गप्पा..!!

       


   गहू आला तो आला उगवून वरती

   खुश झाली मजवर माझी धरती


   हरभरा भरभर आला

   घाट्यांनी गच्च भरलेला

   कांदा पात ती हिरवीगार

   खाली कांदा तो भरदार

   पाहून आले मोठे मोती

   डोळ्यांतून टपटप गळती

   हसू फुटले हो माझ्या गालावरती

   खुश झाली मजवर माझी धरती


   सीताफळ मारी डोळा

   पेरूचे वय जणू सोळा

   ज्वारीची कणसे डुलती

   वाऱ्याच्या सूरांवरती

   जीव जडला हो शेवगा फुलांवरती

   खुश झाली मजवर माझी धरती


   आला पौष महिना जवळी

   बहार घेण्या लगबग सगळी

   झाली वर्षाची विश्रांती

   फुलण्याही आतुरली ती 

   डाळिंबे वाट पहाती

   जीर्ण पाने ती झरझर गळुनी जाती

   मग येईल हो अनारकली फुलून वरती

   खुश झाली मजवर माझी धरती..


       तर, अशा गप्पा ऐकल्या शब्दांच्या..



पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे,

पुण्याला निघता निघता..

शुभकृतनाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतु. 

मिती : मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी, शके १९४४.

गुरुवार, दिनांक : १५ डिसेंबर २०२२

Tuesday, 31 January 2023

इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र.

 इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र


       'इश्य' .. हा डाळिंबी ओठांतून आलेला अतीव मधाळ शब्द ज्यांनी आपल्या आयुष्यात ऐकला असेल, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. ज्यांना हे भाग्यच मिळालं नाही ते मात्र करंटेच म्हणायचे. इतका रसरशीत मंत्रमुग्ध करणारा शब्द, आला कसा, कुठून, म्हणजे त्याची व्युत्पत्ति काय याचा शोध घ्यावा म्हणून मी माझ्या बुद्धिला आवाहन केलं.

       झालं. बुद्धिने शोधकामाला सुरुवात केली. आता तातडीने आपल्याला विश्वकोश कोठे मिळणार, याची बुद्धिला कल्पना होतीच. ती सरळ बोटांत उतरली आणि तिनं मला आंतरजालात नेऊन सोडलं. आंतरजाल, I mean internet. बरीच खटपट शोधाशोध केली. इश्यच्या ऐवजी सालं इश्क़ इश्क़ हाच शब्द दिसू लागला. 

"इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया

वरना हम भी आदमी थे काम के"

असाच 'मिर्ज़ा ग़ालिबचा' शेर सारखा चोंबड्यासारखा डोकवायचा! चिडचिड झाली हो. या इश्क़ तला शेवटचा क़ शेवटी कुचकामीच करणारा असेल तर उपयोग काय? एकवेळ वाहवत गेलो तरी चालेल, पण वाहून जाण्यात काय अर्थ? नाही का!आम्हांस 'कर्माचं' महत्व महाभारत काळापासून सांगितलं जातंय. मग निकम्मा कुचकामी होऊन कसं चालेल!

       त्यात मध्येच 'ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़' हे रफीच्या आवाजातले शब्द ऐकू आले. पण आमचं ठरलं होतं ना, आम्ही साहिर लुधियानवीला तोडक्या मोडक्या हिंदीत बजावून सांगितलं, "बाबा रे, तुम्हारी इस उर्दू बोलीमें भलेही ख़ूबसूरत मिठ्ठास हो, लेकिन हमें 'ना तो कारवां की तलाश है।' हम बस हमारे 'इश्य' शब्द की व्युत्पत्ति जानना चाहते है।" बिचारा शांतच झाला!

      मग अस्मादिकांनी म्हणजे मी, आम्ही! कसंय विश्वकोश वगैरे जडजाल शब्द वापरून व्याकरण, व्युत्पत्ति शोधण्याची शर्थ करणारी व्यक्ती विद्वान असणार ना! म्हणून स्वत:ला आदरार्थी संबोधून सांगण्याचा जरा बळेच प्रयत्न केला, इतकंच.

       हे बघा, म्हणून काही कुणी आम्हांस 'विद्वान आहात' असा उपरोधिक टोमणा मारू नये. आम्ही करतोय ना प्रयत्न, 'इश्य' शब्दाची व्युत्पत्ति शोधण्याचा!

       'धुंडाळले आम्ही जाल ते आंतरीचे ।

       हाय ना काही मिळाले, शल्य बोचले अंतरीचे !!'

       'शुक्रिया शुक्रिया'

       च्यायला, बुद्धिला म्हटलं, चल जाऊ दे. आपण काय निकम्मे, कच्चे, कुचकामी आहोत की काय! आपणच तयार करूयात 'इश्य' शब्दाची व्युत्पत्ति! एक त्रैराशिक मांडलं. 

       ज्याअर्थी इश्य शब्दाची व्युत्पत्ति, जगद्विख्यात आंतरजालात सापडली नाही,

       त्याअर्थी हा शब्द कोहिनूर हिऱ्यासारखा आंतरजालाला दुर्मिळ झाला असेल! 

       माऊली, ज्ञानेश्वर माऊली, क्षमा करा, तुमच्या ओवीचा आधार घेऊन अभिमानाने सांगतो,

      " इये मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळु करी। घेणे देणे सुखचि बरी। हो देई या जना।।"

       माझी ही माय मराठी मूळचीच अभिजात आहे, समृद्ध आहे. या नगरीचा कायम रहिवासी असण्याचा मला सार्थ अभिमान आहे.

       प्रस्तावना फार बोजड रेंगाळलेली कंटाळवाणी होऊ नये.  आवरतं घेतो. कारण 'इश्य' हा शब्द इतका मधुर आहे की त्यातली गोडी अवीट, हवीहवीशी वाटायला हवी. प्रस्तावनेचं आख्यान बेचव व्हायला नको.

       कुणी 'इश्श' म्हणतं. मी ऐकला वाचलेला हा शब्द 'इश्य' असा आहे. 'मुळात 'इश' या शब्दांतच 'य'च्चयावत सुख ठासून भरलंय. श अर्धाच असायला हवा. तो गोडसा आलेला अर्धामुर्धा शहारा व्यक्त करतो. 'य' हा यशस्वीतेतला पहिला शब्द. ईश्वरीय सात्विक शृंगारिकतेच्या पदार्पणातला मोहक हवाहवासा वाटणारा शहारा, जो या यशातल्या पहिल्या पायरीचा सुखदानुभवी इशारा देणारा अप्रतिम शब्द. या शब्दाचा उच्चार अत्यंत नाजुकश्या डाळिंबी ओठांतून बाहेर पडतांना मोगऱ्या सारख्या मोहक स्वच्छ सुगंधी दंतकळ्यांतून अवचित बाहेर पडतो. आधीच तो जिव्हेचं अमृतमयी माधुर्य घेऊन जिव्हेवरच नाचताना बाहेर पडण्यासाठी अधीर झालेला असतो! आणि अवखळपणे निसटतोच. 

       अर्जुनाने भलेही पाण्यात पाहून वर न पाहतां, धनुष्याला बाण लावून प्रत्यंचा ओढत मत्स्यभेद केला असेल. पण कदाचित त्याआधी त्या सौंदर्यवती कोमलांगी द्रौपदीच्या धनुष्याकृती भ्रुकुटीमध्यातून सुटलेल्या नयनबाणाच्या अग्रावर आरुढ झालेल्या 'इश्य' नावाच्या मोहिनी मंत्राचा त्या नयनबाणावर सलज्ज अभिषेक नक्कीच झाला असला पाहिजे. 

       मला महाभारत मालिकेतील सर्व धनुर्धरांच्या प्रतिमा दिसू लागल्या. आकाशाकडे बाणाला दिशा देत, डोळे मिटून काहीतरी मंत्र पुटपुटत, अग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, पवनास्त्र सोडणाऱ्या दिग्विजयी धनुर्धारांना केवळ अर्धोन्मिलीत नेत्रांतून हळुवार 'इश्य' मंत्राचा उच्चार करीत मनमोहक सुंदरीने सोडलेल्या ह्या घायाळास्त्राने कितीही पोलादी पहाडी छाती असलेला अगदी पाषाणहृदयी धनुर्धर घायाळ होणारच.

       तर असा 'इश्य' या शब्दाचा अर्थ आणि त्याची व्युत्पत्ति शोधण्याचा आमचा प्रयत्न आवडला असेलच. अजून खूप काही सांगणार होतो. पण म्हटलं बघूयात आपल्याला नेमक्या निवडक शब्दांतून 'इश्य' उलगडून दाखवता येतंय का ते!


इतकेच मला लिहितांना 'इश्य' हे कळले होते।

'इश्य'नेच केली सुटका आंतरजालने छळले होते।।


       म्हणून म्हटलं..

"इश्य - अडीच अक्षरांचे घायाळास्त्र.."


पद्मनाभ प्रभाकर हिंगे,

मुंबई.


०७ जानेवारी २०२२

सकाळी ११.१०.

Monday, 30 January 2023

अजून खूप काही..

 कटू आठवणींना अडगळीतच ढकलायचं असतं

उगाच नुसतं दु:ख उगाळत कधी बसायचं नसतं


सुखद वारा, वावटळ घेऊन आला तर, गोंधळायचं नसतं

देव नेहमीच परीक्षा पहात असतो, आपण सज्ज रहायचं असतं


सुखाचे शब्द दृष्टावतही येतात, दुर्लक्षित करायचे असतात

खवचट बोलणे, टिकेचे टोमणे विसरूनच जायचे असतात


प्रेमाची, मदतीला धावून येणारी माणसं बांधून ठेवायची

कटकट्या, टवाळी करणाऱ्यांची दखल तरी का घ्यायची


वाट आपली, जगणं आपलं, कष्ट आपले, समस्या आपल्या, 

बघून घ्यायच्या आपणच आपल्या

का सहन करायच्या टपल्या


म्हणतात ना, 'मान सांगावा जनात

अपमान ठेवावा मनात'

'आपलीही वेळ येतेच की', हेच तर राहू द्यायचे ध्यानात.


शक्यतो वर्तनानं, बोलण्यानं आपण कधी चुकायचं नसतं

झालीच चूक, क्षमा मागून, प्रकरण मिटवून टाकायचं असतं


उन्हाळी पावसाळी हिवाळी, जसे ऋतु निसर्गाचे

रात्री नंतर दिवस जसा, नियम असेच जगायचे


अजून खूप काही....


Yours पॅडी.


पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

30 जानेवारी 2023

दे .. दणादण

 उदास वाटायला लागलं की 'श्रीहरी' चं दास व्हायचं

कंटाळवाणं वाटायला लागलं की, पोथी, पुस्तक वाचायचं


कमकुवतपणा वाटायला लागला की प्रार्थना करायची

धीर धरला की फळं मिळतात, मग जिद्दच का सोडायची


धूर कोंदटला की आपण नाही का दूर पळत जातो

घास शिळा आंबूस झाला की आपण टाकूनच देतो


अनुभवातनंच तर खूप काही शिकायला मिळतं

पाय घट्ट रोवून उभं राहिलं‌ की जगायचं कसं, कळतं


'सर सलामत तो पगडी पचास' कधी ऐकलं असशील ना 

वार चुकवलेच नाही तर फटकेच खात बसशील ना


मुंगी होऊन साखर खावी, माशी होऊन मध साठवावं

धाकटं व्हावं, निगरगट्ट व्हावं, गोड बोलून साधून घ्यावं


कळला का सुखाचा मंत्र तुला, पडली का गालावर खळी

हसत हसत सामोरं जायचं, हसलीस ना, आता दे टाळी


पुन्हा एकदा..

येडं म्हण, गधडं म्हण, पद्या म्हण,  पॅडी म्हण.

उगाच कुणी वाटी गेलं तर मात्र .. दे दणादण.


पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

दिनांक : 30 जानेवारी 2023

Saturday, 28 January 2023

किती कविता कराव्यात तरी..

 किती कविता कराव्यात तरी...


       सकाळी १० वाजता ऑफिससाठी बाहेर पडायचं. संध्याकाळी गोडीच्या ओढीनं घरी यावं तर कुलूप !!

       हिचं काय तर म्हणे, संध्याकाळी नानानानी पार्कात कट्ट्यावर मैत्रिणींना भेटायचं. 

नाव Morning Walkचं,

तेही संध्याकाळचं !! 

 

       आजकाल तर काय...

निमित्त हळदीकुंकूवाचं,

निमित्त बोर न्हाणाचं

काल तर हद्दच !! मॅडमचं...

१० वाजून गेल्यावर दर्शन होतं व्हायचं.

मला सांगा, मग मी काय करायचं?


येतात माझे मग 'सवंगडी ..'

कुणी सोमरसाच्या सुरया घेऊन येतं !

कुणी मधाचे, अमृताचे कलश घेऊन येतं !

कुणी रंगीले, कुठून कुठून रंगांचे डबे घेऊन येतं !

कुणी गुलाब, मोगरा, जाई, जुई, चाफा अशी फुलं घेऊन येतं !

कुणी तर पर्फ्युमचे फवारे घेऊन येतं !!

वातावरण कसं मोहक, 

नशिलं, रंगीन, शृंगारिक, सुगंधी.

आणि बरं का हे माझे सवंगडी

फेर काय धरतात,

नाच काय करतात,

गाणी काय गातात,

कविता काय करतात..


कविता करण्यासाठी,

त्यात नेमक्या ठिकाणी येऊन बसण्यासाठी

हसत खेळत खुलवण्यासाठी..


हे 'सवंगडी', माझ्या मैत्रिणीने, प्रतिभेने पाठवलेले.. छान छान 'शब्द' हो...



आणि दार उघडून ही आत येते,

अजून जेवला नाहीत?

अजून झोपला नाहीत?

मोबाईल मध्ये डोकं घालून बसलात?


हसलात...?


आता अग कविता आली होती..

कुणासाठी?

अग तुझ्यासाठी ..

हॅट..

हॅट काय हॅट... ऐक 

मी बळं बळं ऐकवतो..



   'किती कविता कराव्यात तरी  

   त्यात काही तू बसत नाहीस

   शब्द शब्द शोधून काढतो पण 

   नेमके काही ठसत नाहीत


   किती नक्षत्रांना ओढून आणलं

   किती अप्सरांना शोधून आणलं‌

   कुणीच तुझ्या पंक्तीत शोभून   

   काही दिसत नाही

   किती कविता कराव्यात तरी 

   त्यात काही तू बसत नाहीस


   गुलाब मोगरा रोजचेच दिसतात

   जाई जुई सारेच सुगंधित करतात

   'शाल्मली' जिथे उभी तिथे,   

   फूलच कुठले उठून दिसत नाही

   किती कविता कराव्यात तरी

   त्यात काही तू बसत नाहीस


   लाडूपेढ्यांची मिरासदारी माझ्यापुढे

   आंबा मधाची मक्तेदारी माझ्यापुढे 

   काय धिंगाणा घालणार

   कितीवेळ भुलवणार


   'शाल्मली' तुझ्या गोडव्यापुढे  

   काहीच मला रुचत नाही

   किती कविता कराव्यात तरी  

   त्यात काही तू बसत नाहीस


   मोठ्या कवींचे शब्द शोधून 

   काढले

   कवितेत तुझ्यावर वापरून

   पाहिले

   कानामनावर आठवणीतही

   काही उमटलंच नाही

   वापरलेले, घुसवले पण,

   त्यांचा प्रभाव काही पडत नाही

   किती कविता कराव्यात तरी

   त्यात काही तू बसत नाहीस


   बस आता मी इथेच थांबतो

   फक्त तुझ्याकडे पहात राहतो

   कुठल्याच उपमानाने तुझ्या  

   रुपाचं वर्णन करता येत नाही

   किती कविता कराव्यात तरी   

   त्यात काही तू बसत नाहीस




पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

पुणे.

दिनांक : २८ जानेवारी २०२३

रात्रौ ठिक १०.०० वाजता.

कल्पनाच मी केली नव्हती..

 कल्पनाच मी केली नव्हती..


   'शाल्मली..'


   तुझा चिकटपणा

   तुझा चिवटपणा

   तुझा कडवटपणा

   याची कधी माहितीच मला    

   नव्हती..


   तुझं नाजुकपण

   तुझं देखणेपण

   तुझं स्त्रीपण

   यापलिकडे मी तुला कल्पिलीच

   नव्हती..


   तुझा कणखरपणा

   तुझा बाणेदारपणा

   तुझा करारी बाणा

   याची दखल मी कधी घेतलीच

   नव्हती..


   मोहक पदलालित्यात

   येत डौलात 

   सात पावलात

   व्यापून टाकशील संसार, कुवत 

   तुझी कळलीच नव्हती..


पण झालं...

   ...ते चांगलंच झालं

   नशीबच जणू,

   पूर्वजन्मीचं पुण्यच फळा आलं


   'वज्रादपि कठोराणी 

   मृदुनी कुसुमादपि..'


   तरीही निर्मळ, वागण्यात

   संसारगाडा हाकण्यात

   चिंतामुक्त ठेवण्यात

   अशी एखादी कोमला सुंदरी 

   असू शकेल जीवनसाथी, 

   अशी तुझी ओळख मलाच काय 

   कुणाला झालीच नसती..


   मुंगी होऊन साखर गोळा  

   केलीस

   मक्षिका होत मध आणू  

   लागलीस

   सुरेख संसार करीत राहिलीस

   निवड तुझी चुकलीही असेल

   माझी निवड चुकली नव्हती..


   

   माझ्या सुखद जीवनाची आखणी देवानंच तर

   केली नव्हती...



पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

पुणे.


दिनांक : २८ जानेवारी २०२३

Friday, 27 January 2023

विरह जरी तो असो गोडसा

 विरह जरी तो असो गोडसा


       ती दूर असते. मी एकांतात एकटा होतो. तिचेच विचार, तिचीच गोड छबी, कायमचीच असली तरी विरह तो विरहच. ती येणारच असते. मला एकटं विचारात गढलेलं पाहून त्या चंद्राला का उगाच माझ्या साथसोबतीला यावं वाटलं? त्याला कसं कळलं, मी तिच्याच विचारात आहे म्हणून?



   विचार तिचा मनी आला

   तो चंद्रच उतरून आला!


   विचारातच धुंद झालो मी

   हा उगाच का तळमळलेला

   तू का रे उतरून आला?


   का गरज वाटली त्याला

   यावे माझ्या मदतीला

   तो चंद्रच उतरून आला!


   निवांत अशा रातीला

   आठविता मी तिजला

   तो चंद्रच उतरून आला!


   ते क्षण मधुर सोबतीचे

   जागवी मम कवी मनाला

   तो चंद्रच उतरून आला!


   जरी विरह असा मज जाचे

   निश्चिती पुरती मजला

   येईल लवकरी ती भेटीला!


   ती कवितेत माझ्या येता

   का गरज तुझी रे मजला

   हट्टाने का उतरून आला!


   मनपटलावरी दर्शन 'ती' चे

   तो मधुकण पाहता टिपलेला

   तो नाराज मज दिसलेला!


   का वाटले कवितेत मी घेईन

   म्हणूनच का रे आला

   ती हृदयात रे नित्य वस्तीला


   उपमान ना तव मी योजेन

   सह उपमेया मम राणीला

   तू उगाच का उतरून आला!


   ती हळुच गाली हसली

   जळफळाट त्याचा झाला

   जा रे, गरज तुझी आकाशाला!


   तिच्या गाली लाली चढली

   गडबडून हा पुरता गेला

   म्हटले तरी का थांबलेला!


   'ही कोण सुंदरी एवढी

   खिजवून राहिली मजला'

   तो प्रश्न विचारी मजला!


   दुर्लक्षिले मी त्याला पुरते

   मी लक्ष देऊ कशाला

   तो गांगरूनीया गेला!


   ती येईल लवकर जवळी

   म्हटले, कडकडून भेटायाला

   तो कोमेजुनिया गेला!


   संपता प्रतीक्षा माझी

   का विचारू मग मी तुजला

   हिरमोडच त्याचा झाला!


   आता काय तुझी रे उपमा

   कामाची नाही मजला

   तो ढगाआड निघुनी गेला

   तो चंद्रच निघुनी गेला!


  तरी खोड न त्याची जिरलेली

  भाळी कोर लाल होउनी बसला

  ठसा उमटवुनी राहीला!




पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

पुणे

मिती : माघ शुद्ध पंचमी शके १९४४.

तू आलीस का ?

 अंगात नुसता आळस भरलाय

आळसाने वाढत वाढत कळस केलाय

काय म्हणू..

आळसाचा नुसता कळस झालाय


उठावंसं वाटेना

झोपावंसंही वाटेना

आळोखे पिळोखे द्यावेसे वाटेना


जाऊ देत, कुठं जायचं चालायला

कंटाळा आलाय, बसून रहायला


वाचावंसं वाटत नाही

लिहावंसं वाटत नाही

काही काही करावंसं वाटत नाही


विचार करायचा कंटाळा

बोलायचा कंटाळा

ऐकायचाही कंटाळा

कामाचा तर कंटाळाच कंटाळा


हरी असेल का कुणी

तहान लागली, पाणी देईल कुणी

भूक लागली, ताट वाढून आणेल का कुणी


कामधाम काही नको

हसायला, रुसायलाही नको

चिडायला नको

रागवायलाही नको


आळसाने असा 

उच्छाद मांडावा तरी का न् कसा

आळशी असूनही,

आळस एवढा क्रियाशील झाला तरी कसा


---------------------

---------------------

---------------------


हे हे हे ... हे .. काय ?

हे काय होतंय

अंगात वारं संचारतंय

कोणत्या उत्साहाचं वारं शिरतंय

कोण येतंय

कोण येतंय

कोण .. कोण खुदुखुदू हसतंय 

हा धुंद सुगंध कुठला

बांगड्यांचा मंजुळ नाद कुठला


ती आली का...

शाल्मली तू ... तू आलीस का...


.............................



पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे

पुणे.

Thursday, 18 March 2021

अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे

 🌙अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे...💞


      मिळेल तेव्हा अवतीभवतीचं अवकाश हातातल्या नारदयंत्रात (मोबाईल हँडसेट..सध्यातरी मला हा मराठी प्रतिशब्द म्हणून वापरावासा वाटला!) असलेल्या भिंगचित्र पकडणाऱ्या पटलावर नोंदवून ठेवण्याची मला सवयच लागली आहे ! (भाषेचं जरा अतिच होतंय का?..पण होऊ देत.)

     वेळ:सायंकाळी ६.५५. स्थळ:-आमच्या मांडवगण येथील शेतातली नव्याने विकसित होत असलेली फळबाग.

    माझं सहजच वर आभाळात लक्ष गेलं. अत्यंत रेखीव कोरीव अशी ही चंद्रकोर दिसली. सवयीने हाताची बोटं सरसावलीच. मनाला भावलेल्या या चंद्रकोरीचं माझ्या नारदयंत्रानं टिपलेलं छायाचित्र कुशल छायाचित्रकाराच्या योग्यतेचं नसलं तरी ते मला भावलेलं, मी काढलेलं असल्यानं या चंद्रकोरीच्या चित्राला काहीतरी समर्पक शीर्षक देऊन तुम्हां स्नेही सोबत्यांना पाठवण्याची घाईच  झाली. कधी एकदा पाठवतोय असं झालं. गंमत म्हणजे ह्या चंद्रकोरीला पाहताच मधाळ आठवणींच्या डोहातून उसळून वर आलेल्या एका भावगीताचा मुखडा सहजच स्म्रृतीपटलावर उमटला...

" अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे.." 

चंद्रकोरीच्या खाली लग्गेच ही ओळ टाकाविशी वाटली. 

     शालेय विद्यार्थीदशेत असताना आकाशवाणीवर नेहमी लागणाऱ्या या मधुर भावगीताच्या  साऱ्याच ओळी पुन्हा शोधाव्याश्या वाटल्या. सारं गीत आठवणीतल्या गाण्यांतून शोधलं, सापडलं. ध्वनिमुद्रित गीत पुन:पुन्हा ऐकलं. 

      संजीवनी मराठ्यांच्या शब्दांतून, कृष्णाची वाट पाहणाऱ्या राधेची तगमग फार गोड प्रतीत झाली आहे. ही तगमग पाहून राधेची सखी तिला विचारतेय, ' अगंबाई, अशी का उसासे सोडते आहेस? आणि हे काय! कळ्यांची माळ कुस्करून का टाकलीस? अशी हरिवरती का बरे रुसलीस? ' 

    इथं राधेच्या ह्या रुसण्याला मोठा गोड शब्द वापरलाय..  'मधुरुसवा.'

     'राधे, कंसदमनार्थ हरी मथुरेला गेलेत ना. आत्ता येतील ते विजयरथात बसून. पंचारतीची तयारी कर.'

     संजीवनी मराठे यांच्या शब्दांना यशवंत देवांनी लावलेली मधुर चाल आणि या शब्दांना या चालीत मधुबाला जव्हेरी यांनी उत्तम गात दिलेला न्याय आजही हे भावगीत ५०-६० वर्षांनी सुद्धा पुन्हा ऐकावेसे वाटणे आणि ह्या आनंदात तुम्हां मित्रांनाही सामील करून घ्यावेसे वाटणे, हे सारे त्या शब्दांची, स्वरांची ताकदच नाही काय? 

     कधी निवांत वेळी शक्य झाल्यास हा गोडवा जरुर अनुभवा. फार काय लिहिणार? या गोड चंद्रकोरीच्या निमित्ताने ह्या गीताची झालेली आठवण माझ्या बाळबोध शब्दांत तुम्हांसमोर ठेवली.


पद्मनाभ हिंगे. मांडवगण.

बुधवार, १७ मार्च २०२१.

Thursday, 27 August 2020

पुस्तक परिचय ५१

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     शाळेतल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता कशा घोकंपट्टी करीत पाठ झालेल्या असायच्या. पण त्यांचं रसग्रहण करा, असं परिक्षेत आलं की मती कुंठित व्हायची. जागच्या जागी अडेलतट्टू सारखी खिळून राह्यची. शिकवता शिकवता गुरुजींनी किंवा बाईंनी विचारलं की, सांगा, कविला यातून काय सुचवायचंय? असा प्रश्न आला की, भले मोठ्ठे प्रश्नचिन्ह समोर उभे राहिलेले दिसायचे! 

     पण कुणी शहाण्या अभ्यासू व्यक्तीनं कविता समजावून सांगितली की मग मात्र लक्षात राहायची. त्या कवितेला कुणी चाल लावून म्हणू लागलं की कविता आपोआप समजू लागायची. 

     आणि मग कुणी विश्शेष व्यक्ती भेटली की कविता करायची खुमखुमी यायची. कविता करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या यमक जुळवणीसाठी आम्ही तर कित्येक कागदं कित्येकदा टरकावली सुद्धा. तासनतास लिहिल्यावर कळायचं, हे काही आपल्या कुवतीचं काम नाही! गड्या हा आपला प्रांत नाही. मग उधारउसनवार, चित्रपट गीतांची! 

     सांगायचं काय की, ते भलेभले नामवंत कवी, विंदा करंदीकर, ग्रेस, वसंत बापट, कुसुमाग्रज यांच्या कवितांचा अर्थ कुणी समजावून सांगितला की डोक्यात कविता घुसायची. खरं बोलून टाकायला काय हरकत आहे, नाही का? 

    कुसुमाग्रजांचा, रसयात्रा, हा कविता संग्रह कालपरवापासून घेऊन बसलोय. कविता वाचली की मागील शंकर वैद्य यांची टिप वाचायची. स्वतः शंकर वैद्य कवी. त्यामुळे समजून घ्यायला सोप्पं जातं. मुळात कुसुमाग्रजांच्या कवितेवर स्वतःचं काही भाष्य करण्याची आमची योग्यता, पात्रता नाही, पण वाचता वाचता समोर बातम्या चालू होत्या आणि योगायोगानं त्यातील ती मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांतून गावाकडे पायी जाणाऱ्या प्रवासी मजुरांची छायाचित्रे, चित्रफीत दाखवली जात होती. पुस्तकातल्या पानावर कुसुमाग्रजांची ' शेवटचे पान ' ही कविता होती. कडवं होतं, 

    ' जाणारच का - सुखात जा तर

      बाग मोहरो तव वाटेवर

माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून  

      प्रवासी, पहा जरा परतून ' 

   वास्तविक, ह्या कवितेत कुसुमाग्रजांनी ध्येयवादी पुरुषावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. इथे नेमक्या याच ओळी या कोरोनामुळे आपल्या गावी परतणाऱ्या या मजुरांना लागू पडत असल्याचं जाणवलं.

   *रसयात्रा* मध्ये कुसुमाग्रजांच्या निवडक ७९ कविता आहेत. यांत तुम्हांआम्हांला माहीत असलेल्या कविता आहेत. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा,' 'वेडात मराठे वीर दौडले सात, 'नवलाख तळपती दीप विजेचे येथ,' 'रण काय भयानक लोळे आग जळात! आदळती, वळती, आवळती क्रोधात, जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व आषाढघनाशी झुंजे वादळवात!' ही 'अहि-नकुल' - साप मुंगसाच्या जीवघेण्या लढतीची कविता, 'जालियनवाला बाग' अशा प्रसिद्ध कविता आहेत.

 'की स्वर्गातुन कोसळलेला,  सूड-समाधान 

         मिळाया प्रमत्त सैतान 

  जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती 

         करी हे तांडव थैमान ' 

या ' कोलंबसाचे गर्वगीत ' कवितेतील कडवे वाचताना सद्यस्थिती चटकन डोळ्यांसमोर आली. कवितेच्या शेवटाला आलेल्या प्रेरणा देणाऱ्या कडव्यातील ओळी, सतत मनातल्या मनात घोळू लागल्या.

 "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा ..."

    कुसुमाग्रजांची 'कणा'  ही कविता साऱ्यांना सदैव प्रेरणा देणारी आहे. ही कविता या कविता संग्रहात नाही, परंतु आजच्या परिस्थितीनं घायाळ झालेल्यांना नैतिक बळ देणारी आहे, म्हणून इथे उद्धृत करतो.

लॉकडाऊन चार उद्यापासून सुरू होतंय. अजून किती दिवस हातावर हात ठेवून बसायचंय याची कोणी आजतरी कल्पना करु शकत नाही. रुतलेला आयुष्याचा गाडा बाहेर काढायला शरीरात आणि मनात बळ असायला हवं.


    ' मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा 

     पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ' 

     कित्येकांना असं बळ देणारं पण कोणी तरी हवं.

   

बेलवलकर गृहनिर्माण

१७ मे २०२०

Wednesday, 26 August 2020

पुस्तक परिचय ५०

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


   रंगभूमीचा राजहंस तो, 

   उचलती रमणी ज्याचा नखरा 

   पोषाखाच्या माशूक तऱ्हा 


   कुंदकळ्याची नाजुक वेणी 

   ऐशी अधरी दंत श्रेणी

   मानलचक ती तर जिवघेणी 

   भोळी खुळी रंगात गवसती.

             ...कवि माधव ज्युलियन

     नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचं हे नेमकं, देखणं, लोभस, यथार्थ वर्णन. बालगंधर्वांचा रंगमंचावरील मोहक सहज सुंदर वावर म्हणजे, स्त्रीला लाजवील असा सौंदर्याचा आविष्कार. ही सुंदर लोभस मूर्ती महाराष्ट्राला, मराठी रंगभूमी आणि संगीतक्षेत्राला ईश्वराकडून मिळालेली अभूतपूर्व, अद्भुत देणगी! आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, "गेल्या दहा हजार वर्षांत बालगंधर्वांसारखा महान कलावंत झाला नाही!"

    गंधर्वगाथा ह्या  बालगंधर्वांवरील भा.द.खेर यांच्या कादंबरीतून समोर आलेले बालगंधर्व, त्यांच्या जीवनातील अनेक घटना उलगडून सांगतात. या कादंबरीत बालगंधर्वांविषयी पुष्कळशी माहिती रसिकांना वाचायला मिळते.

    मूळचे देशपांडे हे राजहंस कसे झाले याची एक मनोरंजक कथा या कादंबरीत येते. बालगंधर्वांच्या बालपणापासूनच्या अनेक आठवणींसह लेखकाने,  *गंधर्वगाथा* या पुस्तकात साऱ्या पासष्टहून अधिक प्रकरणांत बालगंधर्वांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. हा जीवनपट बालगंधर्व यांच्याचं स्वकथनातून वाचकांपर्यंत आणला आहे. त्यामुळे स्वतः बालगंधर्व हेच आपल्याशी बोलत असल्याचा आनंद अनुभव वाचकाला मिळतो. 

    अतीव गोड गळा लाभलेल्या छोट्या नारायणाचे गाणे लोकमान्य मोठया तद्रुपतेने ऐकताना नारायणाच्या चुलत्याना म्हणाले, " किती रे सुरेख गायला हा! याला ' बालगंधर्व ' म्हणावं लागेल! "

     बालगंधर्व यांच्या गाण्यावर केवळ भारतीयच श्रोते नाही तर, परदेशी श्रोतेही त्यांच्या गोड गाण्यावर प्रसन्न होत असत. स्टनिस्लावस्की या रशियन माणसानं बालगंधर्वांचं गाणं ऐकून म्हटलं आहे की, ' संगीत नटाचं सारं कर्तृत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असतं. माणसाचं स्वरयंत्र कमालीचं नाजुक आणि संवेदनशील असतं. तसं बालगंधर्वांचं होतं!'  

    बालगंधर्वांनी आयुष्यात वैभव आणि विपन्नावस्था दोन्हींचा अनुभव घेतला. प्रा.व.दि.कुलकर्णी त्यांच्या विषयी लिहितात -- ' ऐन वैभवाच्या काळात बालगंधर्व कधी मिजासखोर बनले नाहीत की विपन्नावस्थेत हीनदीन झाले नाहीत.' 

    बालगंधर्वांचा नाट्यमंचावर प्रवेश झाला आणि त्यांच्या गाण्याचा, स्त्रीवेशातील सौंदर्याचा आणि अभिनयाचा रसिक प्रेक्षकांवरचा प्रभाव वाढू लागला. त्यांचं नाव सर्वच महाराष्ट्रात गाजू लागलं. काकासाहेब खाडिलकरांनी बालगंधर्वांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं त्यांचं पहिलं नाटक ' मानापमान ' शंभर टक्के चांगलं वठल्यानं त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. नवं गंधर्वयुग सुरू झालं होतं. मात्र याच नाट्यप्रयोगाच्या पहिल्याच खेळाचे दिवशी बालगंधर्वांच्या तान्ह्या कन्येच्या मृत्युनं गंधर्वांना मोठाच धक्का बसला. अशा अतिअवघड प्रसंगीसुद्धा त्यांनी नाटकाचा पूर्ण प्रयोग सादर केला होता.  

    गंधर्वगाथा वाचताना त्यात प्रेक्षकांच्या साद प्रतिसादाचे उल्लेख जीवनातील चढ उतार कसे असतात ते किती आनंद आणि वेदना देतात त्याची पुढील उदाहरणे आपल्याला अंतर्मुख करतात.


     ' दूरदूरचे प्रेक्षक आमच्यावर सुवर्णालंकारांचा वर्षाव करीत असत आणि तिकिटं मागत असत. त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना तिकिटं मिळणं दुरापास्त होऊ लागलं. बाहेरगावाचे प्रेक्षक तारेनं तिकिटांसाठी पैसे पाठवू लागले. आमच्या सव्वादोन महिन्यातील विदर्भाच्या मुक्कामात बावन्न हजार रुपये उत्पन्न झालं. लोक गंमतीनं म्हणू लागले, ' बालगंधर्व आमची अमरावती लुटून नेणार असं दिसतंय!' 

    ' सारे प्रेक्षक रंगमंचावर चढून ओरडू लागले, "कुठाय ती कान्होपात्रा? आम्हांला तिचं दर्शन घ्यायचंय!" गलका वाढत चालला. म्यानेजर गोंधळून गेले. मी (बालगंधर्व) कान्होपात्रेच्या वेषातच स्टेजवर आलो. साऱ्या प्रेक्षकांनी कान्होपात्रेच्या पायावर डोकं टेकलं!' मी बोलतच होतो, 'अहो हे काय करता? मी कान्होपात्रा नाही!' प्रेक्षकातून एवढेच शब्द आले, ' आमचं काम झालं! आम्ही चाललो!' 

     ' काळानं किती उलटसुलट करून टाकलं होतं? पूर्वी प्रेक्षकांचे माझ्या वाटेकडे डोळे लागून राहिलेले असत. आता माझे डोळे श्रोत्यांकडे लागलेले होते. पूर्वी मी रंगपटाकडे जाताना मला बघण्यासाठी प्रेक्षक दुतर्फा गर्दीत करून उभे राहात असत. आणि मी श्रोत्यांना बघण्यासाठी इथे बसलो आहे. पण एकही श्रोता माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हता!' 


    वाचक मित्रांनो, जीवन हे असंच आहे. माणूस सामान्य असो वा कीर्तीच्या शिखरावर जाऊन आलेला असो. काळ उन्हाळी पावसाळीचे अनुभव देतोच. आपलंच बघा ना. सारेच घरात अडकून पडलोय, कंटाळून गेलोय. पण अशासारख्या अवस्था कोणाला चुकल्यात. आपणच समजायचं आपल्याला गरुडपंखांचं वरदान मिळालंय. आता नाही पण वेळ येताच पुन्हा त्या पंखांत बळ येईल आणि आपण उड्डाण करू.

      वेळ येईल तेव्हाच, पण नक्की येईल! तोपर्यंत *गंधर्वगाथा* सारखी अशी सुंदर पुस्तकं, चरित्रं वाचत राहू या. 


बेलवलकर गृहनिर्माण

१६ मे २०२०

Tuesday, 25 August 2020

पुस्तक परिचय ४९

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


   ' कला हा एक महत्वाचा मानवी व्यापार आहे. वाणी हे जसे विचारांच्या देवघेवीचे साधन, तसे कला हे भावनाप्रदानाचे साधन आहे. 

    ती खरी कला, की जी सद्भावना निर्माण करते.

    ज्या कलाकृतीमुळे हृदयात भावना उचंबळत नाही, ती कलाकृती खरी जिवंत कलाच नव्हे. ते कलेचे सोंग आहे. ती खोटी कला आहे.' 

    

             कला म्हणजे काय?


लिओ टॉलस्टॉय यांच्या व्हॉट इज आर्ट ?

- या पुस्तकाच्या साने गुरुजी यांनी मराठीत केलेल्या अनुवादात कला म्हणजे काय, या विषयी लिहिलेला उपरोक्त विचार, हा या महत्वाच्या ग्रंथाचे साने गुरुजींनी दिलेले थोडक्यात सार होय.

    १९३४ साली साने गुरुजी जेव्हा धुळे येथील तुरुंगात होते तेव्हा गुरुजींनी टॉलस्टॉय यांच्या या ग्रंथाचे भाषांतर करण्यास सुरुवात केली. 

      या ग्रंथाच्या प्रस्तावनेत गुरुजींनी त्यांना टॉलस्टॉय यांचे सर्वच ग्रंथ आवडत असल्याचे नमूद केले आहे. ' कला म्हणजे काय? ' हा महर्षी टॉलस्टॉय यांचा सर्वांत महत्वाचा ग्रंथ असून जवळजवळ ४० वर्षे टॉलस्टॉय या विषयाचे मनन करीत होते. टॉलस्टॉय यांनी कलेवरची, सौंदर्यशास्त्रावरची, साऱ्या युरोपियन भाषांतील प्रमुख पुस्तके वाचली. टॉलस्टॉय यांचे सांगणे आहे की, "ग्रंथ एकदा वाचा, दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा. पहिल्याने वाचल्यावर जे समजले असेल, त्याच्या प्रकाशात दुसऱ्यांदा वाचा; त्या वाचलेल्या प्रकाशात पुन्हा वाचा. असे करीत गेले म्हणजे ग्रंथकाराचे खरे हृदय तुम्हांला सापडेल. एकदाच वाचून तुम्हांला कल्पना नीट आली नाही तर कंटाळू नका."

     या पुस्तकाच्या पहिल्या भागात, सौंदर्यविषयक प्रक्रियांचा सारांश, सौंदर्यावर उभारलेल्या कलेच्या व्याख्या, कला : सुखासाठी का धर्मासाठी ? कला हृदयस्पर्शी केव्हा होईल? भविष्यकालीन कला, या आणि अशा एकोणीस विविध प्रकरणात चर्चा केलेली असून, दुसऱ्या भागात पॉर्लेझच्या कादंबरीची प्रस्तावना, शाळेतील मुले व कला,  असे पाच विषय आहेत.

    पुस्तकात ठळकपणे नमूद केलेले पुढील काही विचार कलाप्रेमी वाचकांनी आपल्या स्मरण नोंदवहीत जरूर नोंदवून ठेवावेत, असे आहेत.

    "स्वतःला जो पूर्वी अनुभव आला, तोच अनुभव स्वतःमध्ये पुन्हा जागृत करून मग रेखा, रंग, गती, सूर, शब्द, हावभाव इत्यादी साधनांच्या द्वारा तोच अनुभव दुसऱ्यांनाही अनुभवावयास लावावयाचे, दुसऱ्यांनाही तोच तितकाच उत्कट असा अनुभव आणून द्यावयाचा हे कलेचे काम आहे."

     "कला हे मानवांचे हृदयैक्य करणारे, ऐकात्म्य करणारे बलवान साधन आहे, कलेने आपणांस दुसऱ्यांसही स्वतःच्या भावनांत मिळवून घेता येते. म्हणूनच व्यक्ती किंवा समाज यांच्या उन्नतीसाठी कला अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जीवनात कलेचे फार महत्व आहे." 


     खरं तर एक तरी अंगी असावी आणि ती जीवापाड जपत विकसित करीत राहावे असं आम्हांला नेहमीच वाटतं. नसेल आपल्यात कला, तर एखाद्या कलेचा किंवा समोर येणाऱ्या प्रत्येक कलेचा, त्या कलेची निर्मिती करणाऱ्या कलाकाराचा आदर करीत, रसास्वाद घ्यायला शिकावे.

    चित्रकला, संगीत, साहित्यलेखन, कथन, अभिनय, क्रीडा या सर्वच कलांमधून आनंद मिळतो. अनेक अडथळ्यांना तोंड देत यशस्वी जीवन जगण्याची आणि त्यातून समाधान मिळवण्याची सुद्धा एक कला आहे. अनेक अडथळे कुशलतेने पार करीत ध्येयाप्रत पोहोचणे ही कला ज्याला जमली तो सदासर्वदा आनंदी राहील. 


      लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागानंतर येणारा चौथा भाग काय नवीनपण घेऊन येत अनुभव देणार आहे हे आज उद्या कळेलच. घाटातून, बोगद्यातून प्रवास करताना चालक संयमाने वाहन चालवत असेल तर हे अडथळे सहज पार करीत इष्ट गावी सुरक्षित पोहोचेल. तसंच आहे या सध्याच्या संकटकाळाचं. यातून लवकरच तावून सुलाखून आपण बाहेर पडणार आहोत ही उमेद बाळगू या, दुसऱ्यांतही उमेद जागवू या. 

     शुभेच्छा. खूप शुभेच्छा..

              ॥ शुभं भवतु ॥ 


बेलवलकर गृहनिर्माण

१४ मे २०२०

Monday, 24 August 2020

पुस्तक परिचय ४८

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     

      ' बाराचे टोल देऊन भिंतीवरचं घड्याळ शांतपणे किटकिट करीत काट्यांना पुढं पुढं ढकलत होतं. पंधरा वीस मिनिटं होऊन गेली होती. बाहेर ऊन मी म्हणत होतं. अंगणातलं वाळवण उलट पुलट करीत काकी मनाशीच बोलत होत्या, ' बाईss, काय हे ऊन!' ओसरीत पंख्याखाली खुर्ची टाकून काकांचं पुस्तक वाचन चालू होतं. अधून मधून डोळे मिटल्यासारखे करत ते हळूच एखादी डुलकी खात होते. ' झोप येतेय तर आत जाऊन पडा..' अशा काकींच्या आवाजाला,' छे छे झोपलो नाहीये, वाचून  डोळ्यांना ताण येऊ नये म्हणून डोळे मिटले होते. तसंही मी दुपारी झोपत नाही हे माहिताय ना ? ' प्रत्युत्तर देत काकांनी परत पुस्तकात डोकं खुपसलं ...' 

    

       साधारण अशी सुरुवात म्हणजे एखाद्या कथासंग्रहातल्या कुठल्यातरी एखाद्या कथेची सुरुवात हे समजतं. कथा रंगवत, परिच्छेद पांगवत, एखाद्या मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबात आता लेखक काहीतरी घडवून आणणार आणि आणि तुम्हांआम्हां वाचकांना आनंद देणार! 

     प्रत्येक लेखकाची गोष्ट सांगण्याची आपली आपली पद्धत असते. 'जी.ए.कुलकर्णी' जरा गूढतेकडे जाणार. 'द.मा.मिरासदार' त्यांच्या श्टायलित हसरे शब्द पेरीत कथा पुढं नेणार. 'शंकर पाटलां' ची खेड्यातली गोष्ट गावरान शब्दांत खुलत जाणार.'व्यंकटेश माडगूळकर' आणखी वेगळ्याच धाटणीची मांडणी करीत पुढं काय होतंय या उत्सुकतेत तुम्हांला अलगद गुंतवणार. 

    कुणाच्या कथेची प्रकृती गंभीर, कुणाची रानवट, कुणाची खुद्खुदवणारी वाक्यपेरणी. कुणाची भाषा गुलाबी शब्दांची, प्रेमशृंगाराची, तर कुणाची जीवनसार सांगणारी.कुणाच्या दीर्घ तर कुणाच्या लघुकथा. 

      कथावाचन तसं मस्तच. कादंबरी सारखं प्रत्येक प्रकरण उत्कंठा वाढवीत शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लांबण यात नसतं. कथेचं कसं असतं, तिच्यात कादंबरीसारखी असंख्य वळणं घेत, अनेक उपकथानकं जोडत जाणारी तऱ्हा नसते! कथा रंगत रंगवत नेत नेत चटकन शेवटाला जाणारी. पण वाचकाला खिळवून ठेवणं ही मात्र कथालेखकाच्या प्रतिभेची करामत.

     प्रत्येक लेखकाची बदलत जाणारी भाषाशैली, मांडणी पद्धत वेगवेगळी. मराठी कथात पहा ना, वैदर्भीय कथाकाराची भाषाशैली वेगळी, सोलापुरी लेखक लिहिताना वेगळ्या भाषाशैलीत गोष्ट सांगणार. कोल्हापुरी कुठंतरी पायतानानं हाणणार. पुणेरी शुद्ध तुपातले शब्द लिहित, इतरांकडे तुच्छतेनं कटाक्ष टाकतच कथा लिहिणार. कोकणी मालवणी कानांत एवढे गोड शब्द ओतणार की, वाचक असं मस्त आपल्याला बोलता येईल का याचा विचार करीत वाचत राहणार! 

       गंधर्व ह्या बाळकृष्ण प्रभूदेसाई यांच्या कथासंग्रहातल्या कथांची शैली ही कोकणी कडे जाणारी.

       उण्यापुऱ्या छत्तीस सदतीस वर्षांचं अल्प आयुष्य लाभलेल्या प्रभुदेसाई यांचा साधारण सत्तरच्या दशकातला हा कथासंग्रह. गंधर्व, अतिथी, शाळेचे दिवस, श्राद्ध, शांतवन, मास्तरांची यात्रा, पांगारा, नग्न पेटती उन्हे, शिवकळा, भटवाडी या दहा कथांचा यात समावेश आहे. मौज, दीपावली, सत्यकथा, साधना या दिवाळी अंकांमधून निवडलेल्या या कथा. 

      मंडळी, या कथांमधील माणसांचं जीवन आपल्या दैनंदिन आयुष्याशी जुळणारं असो नसो, त्यातल्या माणसांचे स्वभाव आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या माणसांसारखे वा त्यांच्या स्वभावाच्या जवळ जाणारे असू शकतातही. त्यांची दु:खं, वेदना, समस्या, इच्छा या लेखक त्याच्या त्याच्या ताकतीनुसार शब्दबद्ध करीत असतो. या कथा कधी विरंगुळा देतात तर कधी चिंतनही करायला लावतात. 

     गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या लंब्याचवड्या सक्तीच्या सुट्टीने आपल्याला काही बरे वाईट अनुभव दिले असतील. ते कितपत मनाला लावून घ्यायचे वा आठवणीत जपून ठेवायचे हे आपल्यावर आहे.

      हळूहळू आभाळ मोकळं होऊ पाहतंय. आशेचे किरण काळा पडदा भेदून येतील असं जाणवू लागलंय. मुळात बेशिस्त असलेले बेशिस्तासारखेच वागणार हे लक्षात ठेवून त्यांच्यापासून चार हात म्हणजे जवळपास दोन मीटर दूर राहून आपण आपली काळजी घेऊन स्वतःला सांभाळू. ' असंगाशी संग प्राणांशी गाठ ' नकोय. अशीही सवय लागलीच आहे शिस्तीची-स्वच्छतेची, तर ती कायम ठेवू. आमच्या शुभेच्छा आहेतच.


बेलवलकर गृहनिर्माण

१३ मे २०२०

Sunday, 23 August 2020

पुस्तक परिचय ४७

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     

 ' देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देवालयी 

   देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई..' 

     का कुणास ठाऊक, पण सकाळपासून कानामनांत हेच भक्तिगीत घुमतंय. या भक्तिगीतावरून अनेक विचार आज मनात येऊ लागले.

     आपल्या भारतीय संस्कृतीत एवढे देव आहेत ना तेवढे पाश्चात्य देशांतल्या काही देशांची मिळून  लोकसंख्याही नसेल! 

     देवाच्या प्रार्थनेसाठी जेवढी स्तोत्रे आपल्याकडे उपलब्ध असतील ना तेवढे भारतेतर देशांत तत्वज्ञानाचे ग्रंथ तरी असतील की नाही कोण जाणे!

     आता, या स्तोत्रांमध्ये साहित्य असतं का? असा प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचं नाही, किंवा असा कोणताही वाद आम्हांला उत्पन्न करायचा नाही, तर..

     ' देव - ईश्वर - भगवंत ' नावाच्या विभागात प्रार्थनेच्या माध्यमातून लिहिलं गेलेलं, संतांच्या ओव्या, अभंग, भक्तिगीतं, भारूडं असं विविध प्रकार असलेलं साहित्य याबद्दल काही जे आवर्जून सांगावंसं वाटतं त्याबद्दल बोलायचं आहे.

     भारतीय संस्कृतीत गद्य स्वरूपात प्रार्थना आमच्या ऐकिवात पाहण्यात नाहीत. (चित्रपटातल्या देवाला दम देणाऱ्या गद्य प्रार्थनांबद्दल आम्हांला काहीही भाष्य करावयाचे नाही..) मात्र, बहुतेक सर्व प्रार्थना या काव्यबद्ध असतात. काव्यबद्ध मधला 'बद्ध' हा शब्द नियमाला अनुसरूनच हे संतकाव्य असते असा अर्थ दर्शवितो. मागील एका वृत्तदर्पण नावाच्या पुस्तकाबद्दल सांगताना ओवी, अभंगादी रचनांमध्ये काय नियम असतात, हे त्यात सांगितले आहे.

      ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा, गोरोबा, एकनाथ, समर्थ रामदास, जनाबाई, मुक्ताई, बहिणाई या अत्यंत उच्च प्रतिभेच्या संतांनी रचलेल्या रचना पहा, हवं तर अभ्यासा.

    संत चोखोबा जेव्हा म्हणतात की, ' ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ नदी डोंगी परि जळ नोहे डोंगे। काय भुललासी वरलिया रंगे॥ चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ ' तेव्हा या काव्याचा अर्थ जाणून घेतला की लक्षात येतं ते,  तात्कालिन कनिष्ठ आणि उपेक्षित समाजांतसुद्धा किती उच्च प्रतिभा होती. ह्या आणि अशा रचनांमध्ये गेयता असते. संतवाणी-अभंगवाणी तुमच्या कानावर पडत असेलच.

      डॉ.मुकुंद दातार यांनी लिहिलेलं एकनाथांची बोधवाणी हे पुस्तक वाचत असताना कळलं की एकनाथांची साहित्यसंपदा किती मोठी आहे. डॉ.दातार लिहितात, 'संतश्रेष्ठ एकनाथांनी, आपल्या ६६ वर्षांच्या जीवनक्रमात विपुल आणि विविध प्रकारची वाङ्मय निर्मिती केली. नाथांनी भागवतापासून भारुडांपर्यंत वाङ्मयसंपदा-काव्यसृष्टी निर्माण केली. त्यात स्फुट कविता, आध्यात्मिक चरित्रपर, आख्यानपर प्रकरणे, भाष्यग्रंथ  आहेत. नाथांची एकूण काव्यसंपदा म्हणजे एका अर्थाने, साहित्य संपदेचा ' नाथसागर ' च आहे! एकनाथांची ग्रंथांतर्गत असणारी, ओवीसंख्या पन्नास हजार आहे, तर त्यांची अभंगसंख्या चार हजारांहून अधिक आहे.' 

     नाथांची भारूडं सुंदर रूपकात्मक आहेत. व्यवहारातील उदाहरण देताना एकनाथ एखाद्या सुनेच्यामुखी 'सत्वर पाव ग मला ..' सारखी भारूडं घालतात. यातून श्रोत्यांचं मनोरंजन करीत सहज बोध करतात.' अहंकाररुपी सासरा, देहबुद्धीरुपी सासू, द्वेष आणि अविवेकरुपी नवरा यातून मला मोकळं कर,' अशा पद्धतीनं लोकांना ते समजावतात! 

     एकनाथांची बोधवाणी या पुस्तकात छोटी छोटीशी ५३ प्रकरणे चर्चिली आहेत, जी सर्व सामान्यांना चटकन समजतात! 

       वास्तविक, संतांची शिकवण ही काही उतारवयात समजून घेण्याची गोष्ट नाही तर परिपक्वतेकडे वाटचाल करण्यासाठी जितक्या लवकर आपण या शिकवणीला समजून घेऊ, तितकी ही शिकवण समाधानी जीवनप्रवासासाठी उत्तम ठरत राहील आणि जीवनात आनंद समाधान मिळत राहील. 

      ऐसी अक्षरेचा २०१७ मधील एक विशेषांक संत साहित्य परिचय विशेषांक म्हणून आम्ही प्रकाशित केला होता. संतसाहित्य कसे जीवनमार्गदर्शक असते हे थोडक्यात समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता.

      वाचक मित्रांनो, गेले कित्येक दिवस टीव्ही, मोबाईल, घरातले खेळ, स्वयंपाक, गप्पाटप्पा, क्वचित वैताग, कंटाळा, थोडे वाचन करत करत आपण सारेच १७ मे ची वाट पहात आहोत. कीर्तन ऐकणे हेही टीव्ही वर शक्य असते. शक्य झाल्यास एखादा अभंग ओवी जरूर वाचून ऐकून पहा. त्याचीही गोडी लागेल. छान वाटेल.

     

बेलवलकर गृहनिर्माण

१२ मे २०२०

Saturday, 22 August 2020

पुस्तक परिचय ४६

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


       ' इतर दासदासींपेक्षा तिला महाराणीबद्दल वेगळंच काही माहीत आहे. मंजिरी स्वतःच्या अशा भावनेच्या कोषात शिरली की स्वप्नात असल्यासारखी दिसायची. मंद, झोपाळू हसू तिच्या चेहऱ्यावर असायचं. महाराणीचे केस आणि ती- यापलीकडचं मग काहीच तिला महत्वाचं नसायचं. पहिल्या दिवशी ते मोकळे भरपूर केस तिनं जेव्हा हातात घेतले, तेव्हा ती अगदी सळसळून गेली. नुकती न्हालेली, ताज्या त्वचेची, अगदी अनलंकृत अशी एक प्रौढ स्त्री. तिचे सावळे उघडे खांदे, मोकळी उंच मान, पाठीची खोल पन्हळ आणि कमरेच्या वस्त्रापर्यंत पसरुन रुळणारे ते सुगंधी काळेभोर केस. मंजिरी आपल्या स्वामिनीच्या तशा पाठमोऱ्या अस्तित्वावर लोभावून गेली. त्या केसांच्या स्पर्शानं सुखावली....' 

     महाराणी द्रौपदीच्या प्रौढ वयातल्या केसांचं हे मोहक वर्णन वाचताना समोर प्रकट होऊ पाहतं ते द्रौपदीच्या तारुण्यातलं विलोभनीय रुप! 

     एखाद्या विलक्षण स्त्रीच्या उतार वयातल्या सौंदर्याचं असंही वर्णन होऊ शकतं? 

    हे सामर्थ्य असतं त्या समर्थ लेखणीचं.

      -----

      ' होय रे श्रीरंगा, मी अजून खेळते जुने खेळ. लहानपणचे सगळे खेळ म्हातारपणी पुन्हा खेळावेसे वाटतात बघ. मी अजून कधी तरी सूर्य बुडाल्यावर जाते यमुनेवर. पाणी आणायचं नसतं आता. नुसतीच जाते. कदंबाखाली बसते थोडा वेळ. डोळे मिटले तिथे बसून, की वाटतं, कुठून तरी सख्यांचा आवाज येईल ' साई सुट्ट्यो ' म्हणून. मग मी उठेन.त्यांना शोधत जाईन इकडे तिकडे आणि अचानक एखाद्या झाडामागून तूच पकडशील माझा हात, ओढून घेशील आणि नेशील तिकडे वेळूंमध्ये. सख्या वेड्या लपलेल्या तशाच. माझी चाहूल घेत...' 

     ' राधेs' कृष्णानं अतिकोवळेपणानं तिच्या गालाला स्पर्श केला.

     ' मला कळतं रे की, असे भास होणं बरं नव्हे. पण कधी कधी वाटतं की, अशा भासांच्या खेळात तेवढी मी खरीखुरी जगते. तिथल्या तेवढ्या आनंदावर इतर सगळं तरून जातं. तुला नाही रे कधी असं होत? ' 

     उतार वयातली तारुण्यातल्या आठवणीत रमलेली राधा डोळ्यांसमोर आणायची. तिच्या ह्या आठवणीतून हळुवार बाहेर काढत उतारवयातल्या या दुराव्याच्या व्यथा जाणून घ्यायच्या आणि नेमक्या शब्दांत मांडायच्या. प्रतिभेबरहुकूम लेखणीला लिहितं करायचं ही तर सिद्धहस्त साहित्यिकाची हातोटी! 

      ------

     " माझ्या मनाला शांती कधी मिळेल हो ? तडफड संपेल कधी ? " कुंती सौम्य हसली. ओंजळीत तोंड लपवून गदगदणारी द्रौपदी तिनं त्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. अन् तशी तिची कल्पनाही केली नव्हती. पण तिला तिच्या रडण्याचं नवल वाटलं नाही. समजुतीच्या स्वरात ती म्हणाली, 

      "शांतीचं दुसरं नाव बाईच्या लेखी बरेचदा ' समर्पण ' असतं, हे तुला माहीत आहे ? मागचा-पुढचा विचार न करता कशावर तरी ओवाळून टाकायचं स्वतःला, आणि तृप्त होऊन संपूनच जायचं. तू अशी संपणारी नाहीस. सरळपणे कशाचाच स्वीकार स्वतःला संपवत केला नाहीस तू. तुला तुझं स्वत्व राखणं ही गोष्ट फार थोर आहे बये, पण कायमची अशांत ठेवणारी आहे. तुझी सुटका नाही तडफडण्यातून."

     ------

     द्रौपदी, राधा, कुंती या तीन महाभारतकालीन स्त्रियांच्या तीन व्यथा-कहाण्या, अतिशय संयमी भाषेत येतात, डॉ.अरुणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा या पुस्तकात.

      

      ऐसी अक्षरेसाठी गेल्या दीड दशकांहून अधिक काळ अभिमानास्पद अशा अनेक आठवणींनी भरून गेलाय आणि हा उपक्रम आपल्याच नादात बहरून आलाय. याचं कारण म्हणजे अनेक सिद्धहस्त साहित्यिकांची विविध निमित्ताने उपस्थिती, सहभाग आणि त्यांच्या साहित्याची प्रेरणा.

     डॉ.अरुणा ढेरे आणि ऐसी अक्षरे यांचे नाते असेच, अगदी जिव्हाळ्याचे. 

     

    २०१९ च्या जानेवारीत यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अरुणा ढेरे यांची एकमताने निवड झाली. या निमित्ताने आम्ही ऐसी अक्षरेचा डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे गौरव विशेषांक एका देखण्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केला होता. त्यावेळी अरुणाताईंच्या विनम्रतेचं दर्शन झालं आणि 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या उक्तीचा अनुभव आला.

    

     लॉकडाऊन-३मुळे वैतागून गेलेल्या आपणा सर्वांनाच अरुणाताईंचं,  त्यांच्या 'अर्ध्यावाटेवर' कथासंग्रहातल्या ह्या उताऱ्यातलं हे स्वप्न नवी प्रेरणा देईल.  

       " मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच दूर क्षितिजावर कुठेतरी एक स्वप्न दिसत असतं. त्याचा वेध घेऊन आपण पुढे पुढे जात असतो. असं दूरस्थ स्वप्न आपल्याला हुरहूर लावतं. अस्वस्थ, असमाधानी ठेवतं, पण तेच आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असतं. त्या स्वप्नासाठीच रोज सकाळी आपण झोपेतून जागे होतो. निदान मी तरी तशी होते. रोज सकाळी मला जाग येते ती याच विचारानं, की अजूनही काहीतरी अनपेक्षित, अभूतपूर्व, सुंदर, अद्भुत घडणार आहे. लवकरच, कदाचित आजदेखील!"


बेलवलकर गृहनिर्माण

११ मे २०२०

Friday, 21 August 2020

पुस्तक परिचय ४५

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     अनेक पांढरपेशी व्यक्ती आपल्या व्यावसायिक जीवनात उदंड पैसे साठवून ठेवतात. इथं बचत, तिथं मुदत ठेवी, विमा, शेअर्स, मुच्युअल फंड, पेन्शन फंड इत्यादी इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात. का? तर, भविष्याची चिंता! करोत बापडे! 

      काळजी करु नका, आज या पुस्तक चर्चेत गुंतवणूकविशेष हे सदर नाही, कोणतेही या विषयातले अर्थगुंतवणुकीचे पुस्तक आम्ही सुचविणार नाही.       

     आर्थिक गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांना स्वतःलाच पैसे कुठे गुंतवावेत याचा शोध घेता येतो. त्यांना हा असा सल्ला देण्याची काहीच गरज नाही, हे स्वानुभवावरून आम्ही सांगतो.                        आम्ही मात्र भविष्यकालीन गुंतवणूक उत्तमोत्तम ग्रंथखरेदीत  करून ठेवली आहे, यात नित्य भर पडतच असते. 

     एक सल्ला मात्र आम्ही विनामूल्य देऊ इच्छितो. दैनंदिन जीवनात मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत काय वाचावं? कोणती पुस्तकं आज विकत घेऊन ठेवावीत? कोणत्या पुस्तकात आपल्याला साठवून ठेवता येईल असे विचारधन मिळेल? वाचनसंस्कृती कशी जतन करता येईल? आपल्या मुलाबाळांवर कोणत्या पुस्तकांच्या वाचनाने उत्तम संस्कार होतील ? यादी मोठी आहे. हे विचारधन अमूल्य आहे. त्याची किंमत करणं अवघड आहे, म्हणून सल्ला विनामूल्य.

     तुम्हांला म्हणून सांगतो, मोकळ्या वेळेत आम्ही ग्रंथविक्री भांडारात जाण्याची सवय लावून घेतली, त्याचं मधुर फळ आज या लॉकडाऊनच्या काळात आम्हाला  चाखता येतंय. 

      आमच्या कुवतीनुसार पुस्तकपेढीइतकी खूप जरी नाही, तरी बरीच पुस्तकसंपदा गाठीशी असल्याचं समाधान आहे. या पुस्तकसंपत्तीमुळे अनेक भावनांचा रसास्वाद घेत आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची संजीवनी आम्हांला मिळाली आहे. एखाद्या उदासवेळी, अशी वेळ येतच नाही, कारण वाचनानं आम्हांला कायम उत्साही ठेवण्याची शक्ती दिली आहे; तरी पण, एखाद्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथाकादंबरीच्या वाचनानं आम्हाला डोळ्यांतल्या अश्रूंना वाट करून देता येणं शक्य होतं. 

     खळखळून हसणं ही आमच्या कार्यालयातल्या जॉलीवूड संघटनेची मुख्य अट. कारण आम्ही सारे उत्तम विनोदी पुस्तकंवाचनप्रेमी आहोतच. गंभीर, सकस अभिवाचन हे आमच्या वाचनधर्मातलं एक महत्वाचं धर्मतत्व आहे. 

    असो. हे सांगायचं कारण म्हणजे, पुस्तककपाट उघडलं की, आज काय वाचायचा मूड आहे त्यावरून आपोआपच बोटं पुस्तकं निवडतात. 

     आज निवडलेलं पुस्तक आहे, सुप्रसिद्ध कवयित्री आणि कथालेखिका, नीरजा लिखित चिंतन-शलाका

      ऐसी अक्षरेचा वृत्तपत्रातील  साहित्य या विशेषांकासाठी आम्ही जेव्हा उत्तम साहित्याच्या शोधात होतो, त्यावेळी हे पुस्तक आम्हांला मिळाले. लोकसत्ता या प्रमुख आणि प्रसिद्ध वृत्तपत्रातल्या साहित्य संस्कृती या सदरात दोन हजार एक च्या दरम्यान प्रकाशित झालेले ४२ लेख या ललित लेख संग्रहात आहेत. 

    लोकसत्तामधील अनेक साहित्यिक सदरे वाचनीय आणि संग्रहणीय असतात. अनेक मान्यवर साहित्यिक या वृत्तपत्रासाठी लिहितात. 

      चिंतन-शलाका या पुस्तकात नीरजा यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत.

       विसाव्या शतकातल्या मराठीतल्या समृद्ध साहित्याच्या वारश्याचा परामर्श घेत लेखिकेनं नव्या सहस्रकातल्या नव्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे, ' गेल्या सहस्रकानं दिलेला समृद्ध वारसा घेऊनच आपल्याला पुढं जायचं आहे. या नवीन सहस्रकावर आपल्या नावाचा ठसा उमटवायचा आहे. अशा वेळी आज सर्व सृजनशील लेखककवींवर एक मोठी जबाबदारी आली आहे असं मला वाटतं. ही जबाबदारी साधीसुधी नाही.' 

    सारेच लेख वाचनीय, चिंतनीय आहेत. वृत्तपत्रातील सदरात असल्याने लेखाला शब्दसंख्येचं बंधन असतं. त्या चौकटीत राहून आपले विचार नेमके मांडण्याचा लेखिकेने चांगला प्रयत्न केला आहे.

     उठेल हो लवकरच लॉकडाऊन. गाडी मूळपदावर यायला वेळ लागेल. तोवर जे चांगले हाती येईल त्या साहित्याचे जरूर वाचन करा. वाचन संस्कार वाया जात नाहीत. 

      आज रविवार आहे. पुढच्या रविवार पर्यंत परिस्थितीत पुष्कळ सुधारणा होईल अशी आशा व्यक्त करु या आणि मे सतरा नंतर खतरा दूर होत जाईल अशी अपेक्षा ठेवू या. तोवर, 


हम भी है, तुम भी हो, 

दोनों है .....

अपनेही घरोंमें ...


बेलवलकर गृहनिर्माण

१० मे २०२०

Thursday, 20 August 2020

पुस्तक परिचय ४४

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


      गेल्या शेसव्वाशे वर्षांत मराठी  साहित्यातील असंख्य पुस्तके प्रकाशित झाली. काही पुस्तकांच्या नशिबी एकच आवृत्ती होती तर काही पुस्तकांवर वाचकांच्या एवढ्या उड्या पडल्या की त्या पुस्तकांच्या अनेको आवृत्ती काढाव्या लागल्या. 

      एखाद्या ग्रंथालयात गेल्यावर वाचनसंस्कृतीत नव्याने पदार्पण करणाऱ्याला, विशेषतः नव्या पिढीतल्या उमद्या, चिकित्सक वृत्तीच्या वाचकाला, नेमकं कोणतं पुस्तक वाचावं असा प्रश्न पडू शकतो. १६-१७ वर्षांपूर्वीपासून ऐसी अक्षरेच्या माध्यमातून आम्ही सुरेख, सुंदर, उद्बोधक असे साहित्य नेमके निवडून वाचकांस देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

      सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ऐसी अक्षरेच्या एका वेगळ्याच विषयावरील विशेषांकाचे प्रकाशन लांबणीवर पडले आहे. मात्र वाचकांस या लॉकडाऊन नंतर कोणती पुस्तके आवर्जून वाचायला हवीत याविषयी २८ मार्च पासून रोज आम्ही एका नव्या पुस्तकाची ओळख करून देत आहोत. समीक्षणात्मक ओळख करून न देता त्या पुस्तकातली काही उत्तम वाक्ये, प्रसंगांची थोडक्यात माहिती देऊन, काव्य संग्रह असेल तर काही कवितांतील एखादे कडवे लिहून पुस्तकाची ओळख आम्ही करून देत आहोत.

     आज जो काव्यसंग्रह,  वाचनात विशेष गोडी असलेल्या, काव्यप्रेमी आणि चिकित्सक वृत्तीच्या वाचकांसाठी सुचवू इच्छित आहोत, त्याचं नाव आहे, 

बाळ सीताराम मर्ढेकरांची कविता

     मराठी साहित्यात विशेष रुची असणाऱ्या, अभ्यासू वृत्तीच्या वाचकांना मर्ढेकर या मोठया कवीची नक्की ओळख असेल. मर्ढेकर म्हटलं की त्यांच्या त्या कवितेची पहिली ओळ तात्काळ आठवते. ' पिपांत मेले ओल्या उंदीर; ...' कविता पूर्ण वाचली की त्यातील किड्यामकोड्यासारखे जीवन जगणाऱ्यांची व्यथा कळते.

  'पिपांत मेले ओल्या उंदीर;

   माना पडल्या, मुरगळल्याविण;

    ओठांवरती ओठ मिळाले;

    माना पडल्या, आसक्तीविण.

 गरिब बिचारे बिळांत जगले, 

 पिपांत मेले उचकी देऊन;

       दिवस सांडला घाऱ्या डोळी 

       गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

   जगायची पण सक्ती आहे;

   मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे, 

काचेचे पण; 

                         मधाळ पोळे 

             ओठांवरती जमले तेही 

             बेकलाइटी, बेकलाइटी ! 

        ओठांवरती ओठ लागले ;

        पिपांत उंदिर न्हाले ! न्हाले !'

                   *बा. सी. मर्ढेकर* 


   काही कविता समजत नाहीत, दुर्बोध वाटतात. अशा कविता जरा एकाहून अधिकवेळा वाचल्या तर त्यातील अर्थ उमगू लागतो. 

    या पुस्तकाच्या शेवटी शेवटी मर्ढेकर म्हणतात, 

    " शब्दांवर थोडी हुकमत असली आणि लय तोंडवळणी पडली म्हणजे लिहिणं फारसं कठीण नसतं.त्यापलीकडे काही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्यांचं मत अनुकूल पडलं नाही तर लेखकानं योग्य तो बोध घ्यावा. पण ' भूमिके ' चा टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचं सोंग घ्यायला लावणं हा त्यावर तोडगा खास नाही."

     या कोरोनाच्या निमित्ताने थोडंसं अंतर्मुख होऊन चिंतन केलं तर लक्षात येतं की, माणूस लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, काळा वा गोरा, प्रगत देशातील असो वा मागास देशातील, अमेरिकन-युरोपियन पाश्चात्य असो आफ्रिकन- आशियाई असो, 'इस कोरोनाने किसीको भी नहीं छोडा...' मर्ढेकरांची यातील एक मोठी कविता वाचताना लक्षात येतं..., 

   ' मी एक मुंगी, हा एक मुंगी, 

     तो एक मुंगी, तू एक मुंगी, 

     ही एक मुंगी, ती एक मुंगी,            

     पांच एथल्या, पांच फिरंगी ....


     अशा एथल्या संसारांत

     जगण्याचाही चुकला पाढा;

     आणि शेवटी परिस्थितीचा 

     गळ्या खालती उतरे काढा.' 

कवितेच्या शेवटी मर्ढेकर लिहितात ...

' --सर्वे जन्तु रुटिना:। सर्वे जन्तु निराशया:।सर्वे छिद्राणि पंचन्तु। मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत्॥ ' 


या कवितेच्या निर्मितीच्या वेळी असलेली सामाजिक परिस्थिती पाहून मर्ढेकरांनी ही कविता लिहिली असेल. 


     आपण मात्र सारेच सध्याच्या संकट काळात आशावादी राहून पुनःपुन्हा म्हणू या,


"सर्वेsपि सुखिनः सन्तु।

    सर्वे सन्तु निरामया:। 

      सर्वे भद्राणि पश्यन्तु। 

        मा कश्चिद् दु:खमाप्नुयात ॥"


बेलवलकर गृहनिर्माण

९ मे २०२०

Wednesday, 19 August 2020

पुस्तक परिचय ४३

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


      ' आता ती सारे विभ्रम विसरली होती.स्वतःला विसरली होती. तिचा निवारा तिला मिळाला होता....' 

      एखाद्या कथेत शोभणारा हा मजकूर असावा असं वाटतं ना? चला, पुढे वाचू या.

      ' ....याच झाडांचा पाला तिच्या बाळांना पोसणार होता. दुसरे कुठले अन्न त्यांना आवडणार नव्हते, मानवणार नव्हते. तिने सारी हालचाल थांबवली. फांदीवर डोके टेकले. तिथून ते आता ती कधीच उचलणार नव्हती. आणि मग प्राणपणाने तिने, जिला ती डोळ्यांनी कधीच पाहू शकणार नव्हती, त्या संततीचे आवाहन केले. पांढऱ्या अंड्यांच्या रांगा सरकत-सरकत तिच्या अंगांतून येऊन फांदीवर स्थिरावू लागल्या आणि त्या अंड्यांच्या ठिपक्यांनी अतीव चमत्कारिक आकृती त्या अकराच्या घटकेवर रेखाटून ठेवल्या. अदृश्य आणि तरी कधीही पुसल्या न जाणाऱ्या अशा.' 

      हे वर्णन आहे फुलपाखराच्या मादीचे! आणि लेखाचे नाव आहे 'फिकट पिवळे पीस' 

      ' त्या सावल्यांनी त्या आंब्याच्या झाडाभोवती आपला लहरी, विक्षिप्त पण मनोहर फेर धरला होता. जाणारायेणारांच्या अंगावर त्या कशा उडून बसत होत्या. फिरून जमिनीवर घसरून पडत होत्या.' 

      हे असे ' सावल्यांचे ' निरीक्षण करणे आणि लीलया शब्दबद्ध करणे, मोठया उत्सुकतेने वाचक पुढे काय या उत्कंठेने वाचत राहील अशी सुंदर मांडणी करणे हे असामान्य प्रतिभेचेच काम असणार यात शंकाच नाही. 

      ' सकाळी अकराची ' वेळ असो, ' सोनेरी उन्हाची तिरीप '  असो, ' ढगाच्या आत सावल्या पडल्याने एक चमत्कारिक नाटकच त्या पडक्या चिमुकल्या घरात चाललेले भासत होते,' ..हे  सावल्यांविषयीचे वर्णन असो. हे सारे तुमच्या आमच्या समोर चालणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी. या साऱ्या घडामोडींकडे आपलं कधी लक्षही जात नाही! पण इतकं बारीक सारीक निरीक्षण करीत त्याची सुसंगत वर्णनं शब्दबद्ध करणं हे फक्त अजोड प्रतिभाशक्तीचंच काम असू शकतं. आम्हांला तर वाटतं, ' ही जी लेखणी आहे, ती जर मिळाली तर सरळ देव्हाऱ्यात ठेवून रोज श्रद्धेनं पुजावी!'  

     भावमुद्रा हा दुर्गा भागवत यांचा ललित लेख संग्रह वाचताना मनात याच भावना उमटल्या. 

      दुर्गाबाईंची साहित्य निर्मिती मोठी आहे. जो विषय घेतील त्यावरील त्यांचं संशोधन, चिंतन आणि त्यावरील त्यांच्या विचारांची विविध बारकाव्यांसह यथास्थित मांडणी वाचक असो वा अभ्यासक यांच्यासाठी उत्कृष्ट उदाहरणेच. 

     ऐसी अक्षरेमध्ये आम्ही दुर्गाबाईंचे पोरकी पोरे, चैत्रसखा वैशाख, संसाराच्या उंबरठ्यावर, उनपाऊस, सवाष्ण, तुळस असं साहित्य वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करून त्यांच्या लेखनाचा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.  

     भावमुद्रामध्ये पाहुणी हा, अतुल शरीरसौष्ठव आणि आरोग्य असून, दुर्दम्य जीवनासक्ती असूनही आपल्या देहाला व मनाला पूर्णपणे आत्मकेंद्रित करून निर्मितीच्या साऱ्या साऱ्या क्षेत्रापासून कसोशीने अलिप्त राहणाऱ्या, अति क्षुद्र आणि तरीही अद्भुत असे व्यक्तिमत्व असलेल्या, दोनदा विधवा झालेल्या इंदिराबाई नावाच्या एकाच व्यक्तीत कसं पहायला मिळतं हे, आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वीचं एक नामी उदाहरण देणारा लेख वाचनीय आहे. दुर्गाबाईंचा प्रत्येक लेख वाचनीय कसा होतो हे पाहण्यासाठी भावमुद्रा जरूर वाचावं.

     

बेलवलकर गृहनिर्माण

८ मे २०२०

Tuesday, 18 August 2020

पुस्तक परिचय ४२

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     आमचं शिक्षण तसं मराठी माध्यमातूनच झालं. अवांतर वाचन मराठीच असायचं. शाळेच्या ग्रंथालयात जे काही वाचू ते मराठी. त्यामुळे इंग्रजी वाचन इंग्रजी विषयाच्या अभ्यासापुरतं. तसे ' टारझन ' या मालिकेचे दहा अनुवादीत भाग शाळेच्या ग्रंथालयात वाचून काढले होते. पण ते इंग्रजीतून नसल्याने, त्याविषयी काय बोलणार? 

      पुढे महाविद्यालयात गेल्यानंतर अवतीभवती सगळीच इंग्रजाळलेली कार्टी! सारखी आपली कॉन्व्हेंटी इंग्रजी बोलायची. पंचाईत व्हायची हो. आता ही सारी कार्टी अगदी शुद्ध इंग्रजी बोलायची की रेटून बोलायची हे कळायच्या आत पुढचं वाक्य टाकायची! कसं का असेना आपल्याला असं फडाफडाफडाफडा इंग्रजी बोलता यायला पाहिजे, हे मनानं ठरवलं होतं. कोणी म्हटलं इंग्रजी वाचन करायला हवं. मग मस्तपैकी ब्रिटिश कौन्सिल ग्रंथालयाची पायरी चढलो आणि सभासद फी भरली. 

      गल्लीत आलो, तेव्हा एका करंट्यानं विचारलं, ' मग आज कॉलेजला गेला होताsssस की, कुठला पिक्चर टाकला?' आम्ही छाती काढून बोललो, 'कॉलेजलाच जातो, पिक्चरला नाही! आणि हो, आज ब्रिटिश कौन्सिलची मेंबरशिप घ्यायला गेलो होतो. समजलं?'  

      ब्रिटिश कौन्सिलमधून कोणती पुस्तकं घ्यायची वाचायला हे कुठं कळत होतं? काऊंटरवरची बाई अशी झोकात इंग्रजी बोलायची की त त प प व्हायचं! त्यात एखादी कडक श्टायलिश पोरगी तिला विचारायची, ' Excuse me mam, where can I get Arthur Conan Doyle  section ? ' बोंबला! त्यात आम्ही पक्के तात्या! तिच्याकडे ती कशी इंग्रजी बोलते हे शिक्षण म्हणून पाहात बसायचीही सोय नसायची! उगाच इंग्रजीत अंगावर यायची! ' काय बघतूस रं माज्याकडं..इंग्रजीत सांगू का!' असं म्हणणारी आर्चीपण नव्हती त्या काळी! काही दिवस गेलो खरे ब्रिटिश कौन्सिलमध्ये. पण आमचा फुगा फुटला होता. 

      सांगायचं काय की, इंग्रजी वाचन शून्य. मग कुठला  शेक्सपियर, कुठला जेम्स ह्याडली चेस, कुठला सॉमरसेट मॉम अन् कुठला ऑर्थर कॉनन डायल? आणि डिक्शनरी घेऊन कधी वाचणार आम्ही, ऑथेल्लो, शेरलॉक होम्स? कौन्सिलमधले चाळीस पन्नास पानी वर्तमान पत्र नुसतं हातात धरून चाळत बसायचो... गेले ते दिवस ...

      एकदा सहज एका पुस्तकप्रदर्शनात गेलो असता, तिथे ऑर्थर कॉनन डायलच्या शेरलॉक होम्स कथांचे मराठीत अनुवाद केलेले पुस्तक दिसले .... झ..ड..प घातली. हयगय न्हाय. जेव्हा जमेल तेव्हा घ्यावं वाचून. म्हणजे कोणी कधी चर्चा केलीच इंग्रजी लेखकांची तर आपल्याला काहीच बोलता येऊ नये, असं नको व्हायला! असो...

     आता बोलू या ऑर्थर कॉनन डायलच्या, ' मेमॉयर्स ऑफ शेरलॉक होम्स ' या कथासंग्रहाविषयी.  मराठीमध्ये *विवेक जोशी* यांनी या कथा अनुवादीत केल्या आहेत. शेरलॉक होम्स हे ऑर्थर कॉनन डायल यांचं मुख्य पात्र. होम्स एक अत्यंत हुशार गुप्तहेर. या कथासंग्रहात डायल यांनी होम्सच्या कामगिरीवर लिहिलेल्या, सिल्व्हर ब्लेझ, यलो फेस, स्टॉक ब्रोकर्स क्लार्क, ग्लोरिया स्कॉट, मसग्रेव्ह रिच्युअल, रिगेट स्क्वायर, रेसिडेंट पेशंट अशा अकरा अनुवादीत कथा घेतल्या आहेत. 

      मराठीत बाबूराव अर्नाळकर, एस.एम.काशीकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप, द.पां.खांबेटे, रत्नाकर मतकरी अशा अनेक दिग्गज लेखकांनी गुप्त हेर कथा, रहस्यकथा, गूढ कथा लिहिल्या आहेत. अशा कथा लिहिणाऱ्या लेखकांच्या कल्पनाशक्तीचं नेहमी कौतुक करावंसं वाटतं. एक छोटे कथानक सुचल्यावर मोठया कौशल्याने हे कथानक खुलवण्याची, फुलवण्याची सुंदर किमया आपल्या कथेत ते करतात. गुप्तहेर किंवा रहस्यकथांमध्ये वाचकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्याचं सामर्थ्य या लेखकांत होते. अशा कथांचा नायक हा नेहमीच चाणाक्ष, धाडसी, उत्तम आणि बिनचूक तर्क करणाराच असतो. इतरांच्या लक्षात न आलेल्या अथवा दुर्लक्ष केलेल्या साध्या सोप्या घटनांचे धागेदोरे घेऊन कथानायक अत्यंत हुशारीने निर्णयाप्रत येतो. 

      आमची जशी ब्रिटिश कौन्सिलच्या मेंबरशिपमुळे झालेली फजिती झाली, तशी या उत्तम गुप्तहेर असलेल्या  शेरलॉक होम्सच्या फजितीची एक कथाही या पुस्तकात वाचायला मिळाली.

       मेमॉयर्स ऑफ शेरलॉक होम्सच्या मूळ इंग्रजी कथा आम्ही कधीच वाचल्या नव्हत्या. ऑर्थर कॉनन डायलचं नाव मात्र अनेक वेळा अनेकांच्या तोंडून उत्तम लेखक म्हणून ऐकलं होतंच. मराठीतल्या गुप्तहेर कथा,  रहस्य कथा वाचण्याची आवड होतीच. साधारण शंभर पानांच्या आतबाहेर असलेल्या झुंजार कथा, धनंजयकथा, गरुडकथा, सागरकथा असलेलं पुस्तक दोन अडीच तासांत वाचून व्हायचं. याचं कारण वाचनवेड. या वाचनवेडामुळे वेळ तर मज्जेत जातो हा अनुभव. या अशा कथांच्या वाचनामुळे विचारपद्धतीवर काही परिणाम होतो की नाही हे नाही सांगता येणार. पण तुम्ही वाचायला हरकत नाही.

        

बेलवलकर गृहनिर्माण

७ मे २०२०