ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
' बाराचे टोल देऊन भिंतीवरचं घड्याळ शांतपणे किटकिट करीत काट्यांना पुढं पुढं ढकलत होतं. पंधरा वीस मिनिटं होऊन गेली होती. बाहेर ऊन मी म्हणत होतं. अंगणातलं वाळवण उलट पुलट करीत काकी मनाशीच बोलत होत्या, ' बाईss, काय हे ऊन!' ओसरीत पंख्याखाली खुर्ची टाकून काकांचं पुस्तक वाचन चालू होतं. अधून मधून डोळे मिटल्यासारखे करत ते हळूच एखादी डुलकी खात होते. ' झोप येतेय तर आत जाऊन पडा..' अशा काकींच्या आवाजाला,' छे छे झोपलो नाहीये, वाचून डोळ्यांना ताण येऊ नये म्हणून डोळे मिटले होते. तसंही मी दुपारी झोपत नाही हे माहिताय ना ? ' प्रत्युत्तर देत काकांनी परत पुस्तकात डोकं खुपसलं ...'
साधारण अशी सुरुवात म्हणजे एखाद्या कथासंग्रहातल्या कुठल्यातरी एखाद्या कथेची सुरुवात हे समजतं. कथा रंगवत, परिच्छेद पांगवत, एखाद्या मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबात आता लेखक काहीतरी घडवून आणणार आणि आणि तुम्हांआम्हां वाचकांना आनंद देणार!
प्रत्येक लेखकाची गोष्ट सांगण्याची आपली आपली पद्धत असते. 'जी.ए.कुलकर्णी' जरा गूढतेकडे जाणार. 'द.मा.मिरासदार' त्यांच्या श्टायलित हसरे शब्द पेरीत कथा पुढं नेणार. 'शंकर पाटलां' ची खेड्यातली गोष्ट गावरान शब्दांत खुलत जाणार.'व्यंकटेश माडगूळकर' आणखी वेगळ्याच धाटणीची मांडणी करीत पुढं काय होतंय या उत्सुकतेत तुम्हांला अलगद गुंतवणार.
कुणाच्या कथेची प्रकृती गंभीर, कुणाची रानवट, कुणाची खुद्खुदवणारी वाक्यपेरणी. कुणाची भाषा गुलाबी शब्दांची, प्रेमशृंगाराची, तर कुणाची जीवनसार सांगणारी.कुणाच्या दीर्घ तर कुणाच्या लघुकथा.
कथावाचन तसं मस्तच. कादंबरी सारखं प्रत्येक प्रकरण उत्कंठा वाढवीत शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लांबण यात नसतं. कथेचं कसं असतं, तिच्यात कादंबरीसारखी असंख्य वळणं घेत, अनेक उपकथानकं जोडत जाणारी तऱ्हा नसते! कथा रंगत रंगवत नेत नेत चटकन शेवटाला जाणारी. पण वाचकाला खिळवून ठेवणं ही मात्र कथालेखकाच्या प्रतिभेची करामत.
प्रत्येक लेखकाची बदलत जाणारी भाषाशैली, मांडणी पद्धत वेगवेगळी. मराठी कथात पहा ना, वैदर्भीय कथाकाराची भाषाशैली वेगळी, सोलापुरी लेखक लिहिताना वेगळ्या भाषाशैलीत गोष्ट सांगणार. कोल्हापुरी कुठंतरी पायतानानं हाणणार. पुणेरी शुद्ध तुपातले शब्द लिहित, इतरांकडे तुच्छतेनं कटाक्ष टाकतच कथा लिहिणार. कोकणी मालवणी कानांत एवढे गोड शब्द ओतणार की, वाचक असं मस्त आपल्याला बोलता येईल का याचा विचार करीत वाचत राहणार!
गंधर्व ह्या बाळकृष्ण प्रभूदेसाई यांच्या कथासंग्रहातल्या कथांची शैली ही कोकणी कडे जाणारी.
उण्यापुऱ्या छत्तीस सदतीस वर्षांचं अल्प आयुष्य लाभलेल्या प्रभुदेसाई यांचा साधारण सत्तरच्या दशकातला हा कथासंग्रह. गंधर्व, अतिथी, शाळेचे दिवस, श्राद्ध, शांतवन, मास्तरांची यात्रा, पांगारा, नग्न पेटती उन्हे, शिवकळा, भटवाडी या दहा कथांचा यात समावेश आहे. मौज, दीपावली, सत्यकथा, साधना या दिवाळी अंकांमधून निवडलेल्या या कथा.
मंडळी, या कथांमधील माणसांचं जीवन आपल्या दैनंदिन आयुष्याशी जुळणारं असो नसो, त्यातल्या माणसांचे स्वभाव आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या माणसांसारखे वा त्यांच्या स्वभावाच्या जवळ जाणारे असू शकतातही. त्यांची दु:खं, वेदना, समस्या, इच्छा या लेखक त्याच्या त्याच्या ताकतीनुसार शब्दबद्ध करीत असतो. या कथा कधी विरंगुळा देतात तर कधी चिंतनही करायला लावतात.
गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या लंब्याचवड्या सक्तीच्या सुट्टीने आपल्याला काही बरे वाईट अनुभव दिले असतील. ते कितपत मनाला लावून घ्यायचे वा आठवणीत जपून ठेवायचे हे आपल्यावर आहे.
हळूहळू आभाळ मोकळं होऊ पाहतंय. आशेचे किरण काळा पडदा भेदून येतील असं जाणवू लागलंय. मुळात बेशिस्त असलेले बेशिस्तासारखेच वागणार हे लक्षात ठेवून त्यांच्यापासून चार हात म्हणजे जवळपास दोन मीटर दूर राहून आपण आपली काळजी घेऊन स्वतःला सांभाळू. ' असंगाशी संग प्राणांशी गाठ ' नकोय. अशीही सवय लागलीच आहे शिस्तीची-स्वच्छतेची, तर ती कायम ठेवू. आमच्या शुभेच्छा आहेतच.
बेलवलकर गृहनिर्माण
१३ मे २०२०
No comments:
Post a Comment