ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
रंगभूमीचा राजहंस तो,
उचलती रमणी ज्याचा नखरा
पोषाखाच्या माशूक तऱ्हा
कुंदकळ्याची नाजुक वेणी
ऐशी अधरी दंत श्रेणी
मानलचक ती तर जिवघेणी
भोळी खुळी रंगात गवसती.
...कवि माधव ज्युलियन
नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचं हे नेमकं, देखणं, लोभस, यथार्थ वर्णन. बालगंधर्वांचा रंगमंचावरील मोहक सहज सुंदर वावर म्हणजे, स्त्रीला लाजवील असा सौंदर्याचा आविष्कार. ही सुंदर लोभस मूर्ती महाराष्ट्राला, मराठी रंगभूमी आणि संगीतक्षेत्राला ईश्वराकडून मिळालेली अभूतपूर्व, अद्भुत देणगी! आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, "गेल्या दहा हजार वर्षांत बालगंधर्वांसारखा महान कलावंत झाला नाही!"
गंधर्वगाथा ह्या बालगंधर्वांवरील भा.द.खेर यांच्या कादंबरीतून समोर आलेले बालगंधर्व, त्यांच्या जीवनातील अनेक घटना उलगडून सांगतात. या कादंबरीत बालगंधर्वांविषयी पुष्कळशी माहिती रसिकांना वाचायला मिळते.
मूळचे देशपांडे हे राजहंस कसे झाले याची एक मनोरंजक कथा या कादंबरीत येते. बालगंधर्वांच्या बालपणापासूनच्या अनेक आठवणींसह लेखकाने, *गंधर्वगाथा* या पुस्तकात साऱ्या पासष्टहून अधिक प्रकरणांत बालगंधर्वांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. हा जीवनपट बालगंधर्व यांच्याचं स्वकथनातून वाचकांपर्यंत आणला आहे. त्यामुळे स्वतः बालगंधर्व हेच आपल्याशी बोलत असल्याचा आनंद अनुभव वाचकाला मिळतो.
अतीव गोड गळा लाभलेल्या छोट्या नारायणाचे गाणे लोकमान्य मोठया तद्रुपतेने ऐकताना नारायणाच्या चुलत्याना म्हणाले, " किती रे सुरेख गायला हा! याला ' बालगंधर्व ' म्हणावं लागेल! "
बालगंधर्व यांच्या गाण्यावर केवळ भारतीयच श्रोते नाही तर, परदेशी श्रोतेही त्यांच्या गोड गाण्यावर प्रसन्न होत असत. स्टनिस्लावस्की या रशियन माणसानं बालगंधर्वांचं गाणं ऐकून म्हटलं आहे की, ' संगीत नटाचं सारं कर्तृत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असतं. माणसाचं स्वरयंत्र कमालीचं नाजुक आणि संवेदनशील असतं. तसं बालगंधर्वांचं होतं!'
बालगंधर्वांनी आयुष्यात वैभव आणि विपन्नावस्था दोन्हींचा अनुभव घेतला. प्रा.व.दि.कुलकर्णी त्यांच्या विषयी लिहितात -- ' ऐन वैभवाच्या काळात बालगंधर्व कधी मिजासखोर बनले नाहीत की विपन्नावस्थेत हीनदीन झाले नाहीत.'
बालगंधर्वांचा नाट्यमंचावर प्रवेश झाला आणि त्यांच्या गाण्याचा, स्त्रीवेशातील सौंदर्याचा आणि अभिनयाचा रसिक प्रेक्षकांवरचा प्रभाव वाढू लागला. त्यांचं नाव सर्वच महाराष्ट्रात गाजू लागलं. काकासाहेब खाडिलकरांनी बालगंधर्वांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं त्यांचं पहिलं नाटक ' मानापमान ' शंभर टक्के चांगलं वठल्यानं त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. नवं गंधर्वयुग सुरू झालं होतं. मात्र याच नाट्यप्रयोगाच्या पहिल्याच खेळाचे दिवशी बालगंधर्वांच्या तान्ह्या कन्येच्या मृत्युनं गंधर्वांना मोठाच धक्का बसला. अशा अतिअवघड प्रसंगीसुद्धा त्यांनी नाटकाचा पूर्ण प्रयोग सादर केला होता.
गंधर्वगाथा वाचताना त्यात प्रेक्षकांच्या साद प्रतिसादाचे उल्लेख जीवनातील चढ उतार कसे असतात ते किती आनंद आणि वेदना देतात त्याची पुढील उदाहरणे आपल्याला अंतर्मुख करतात.
' दूरदूरचे प्रेक्षक आमच्यावर सुवर्णालंकारांचा वर्षाव करीत असत आणि तिकिटं मागत असत. त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना तिकिटं मिळणं दुरापास्त होऊ लागलं. बाहेरगावाचे प्रेक्षक तारेनं तिकिटांसाठी पैसे पाठवू लागले. आमच्या सव्वादोन महिन्यातील विदर्भाच्या मुक्कामात बावन्न हजार रुपये उत्पन्न झालं. लोक गंमतीनं म्हणू लागले, ' बालगंधर्व आमची अमरावती लुटून नेणार असं दिसतंय!'
' सारे प्रेक्षक रंगमंचावर चढून ओरडू लागले, "कुठाय ती कान्होपात्रा? आम्हांला तिचं दर्शन घ्यायचंय!" गलका वाढत चालला. म्यानेजर गोंधळून गेले. मी (बालगंधर्व) कान्होपात्रेच्या वेषातच स्टेजवर आलो. साऱ्या प्रेक्षकांनी कान्होपात्रेच्या पायावर डोकं टेकलं!' मी बोलतच होतो, 'अहो हे काय करता? मी कान्होपात्रा नाही!' प्रेक्षकातून एवढेच शब्द आले, ' आमचं काम झालं! आम्ही चाललो!'
' काळानं किती उलटसुलट करून टाकलं होतं? पूर्वी प्रेक्षकांचे माझ्या वाटेकडे डोळे लागून राहिलेले असत. आता माझे डोळे श्रोत्यांकडे लागलेले होते. पूर्वी मी रंगपटाकडे जाताना मला बघण्यासाठी प्रेक्षक दुतर्फा गर्दीत करून उभे राहात असत. आणि मी श्रोत्यांना बघण्यासाठी इथे बसलो आहे. पण एकही श्रोता माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हता!'
वाचक मित्रांनो, जीवन हे असंच आहे. माणूस सामान्य असो वा कीर्तीच्या शिखरावर जाऊन आलेला असो. काळ उन्हाळी पावसाळीचे अनुभव देतोच. आपलंच बघा ना. सारेच घरात अडकून पडलोय, कंटाळून गेलोय. पण अशासारख्या अवस्था कोणाला चुकल्यात. आपणच समजायचं आपल्याला गरुडपंखांचं वरदान मिळालंय. आता नाही पण वेळ येताच पुन्हा त्या पंखांत बळ येईल आणि आपण उड्डाण करू.
वेळ येईल तेव्हाच, पण नक्की येईल! तोपर्यंत *गंधर्वगाथा* सारखी अशी सुंदर पुस्तकं, चरित्रं वाचत राहू या.
बेलवलकर गृहनिर्माण
१६ मे २०२०
No comments:
Post a Comment