ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
' देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देवालयी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई..'
का कुणास ठाऊक, पण सकाळपासून कानामनांत हेच भक्तिगीत घुमतंय. या भक्तिगीतावरून अनेक विचार आज मनात येऊ लागले.
आपल्या भारतीय संस्कृतीत एवढे देव आहेत ना तेवढे पाश्चात्य देशांतल्या काही देशांची मिळून लोकसंख्याही नसेल!
देवाच्या प्रार्थनेसाठी जेवढी स्तोत्रे आपल्याकडे उपलब्ध असतील ना तेवढे भारतेतर देशांत तत्वज्ञानाचे ग्रंथ तरी असतील की नाही कोण जाणे!
आता, या स्तोत्रांमध्ये साहित्य असतं का? असा प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचं नाही, किंवा असा कोणताही वाद आम्हांला उत्पन्न करायचा नाही, तर..
' देव - ईश्वर - भगवंत ' नावाच्या विभागात प्रार्थनेच्या माध्यमातून लिहिलं गेलेलं, संतांच्या ओव्या, अभंग, भक्तिगीतं, भारूडं असं विविध प्रकार असलेलं साहित्य याबद्दल काही जे आवर्जून सांगावंसं वाटतं त्याबद्दल बोलायचं आहे.
भारतीय संस्कृतीत गद्य स्वरूपात प्रार्थना आमच्या ऐकिवात पाहण्यात नाहीत. (चित्रपटातल्या देवाला दम देणाऱ्या गद्य प्रार्थनांबद्दल आम्हांला काहीही भाष्य करावयाचे नाही..) मात्र, बहुतेक सर्व प्रार्थना या काव्यबद्ध असतात. काव्यबद्ध मधला 'बद्ध' हा शब्द नियमाला अनुसरूनच हे संतकाव्य असते असा अर्थ दर्शवितो. मागील एका वृत्तदर्पण नावाच्या पुस्तकाबद्दल सांगताना ओवी, अभंगादी रचनांमध्ये काय नियम असतात, हे त्यात सांगितले आहे.
ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा, गोरोबा, एकनाथ, समर्थ रामदास, जनाबाई, मुक्ताई, बहिणाई या अत्यंत उच्च प्रतिभेच्या संतांनी रचलेल्या रचना पहा, हवं तर अभ्यासा.
संत चोखोबा जेव्हा म्हणतात की, ' ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ नदी डोंगी परि जळ नोहे डोंगे। काय भुललासी वरलिया रंगे॥ चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ ' तेव्हा या काव्याचा अर्थ जाणून घेतला की लक्षात येतं ते, तात्कालिन कनिष्ठ आणि उपेक्षित समाजांतसुद्धा किती उच्च प्रतिभा होती. ह्या आणि अशा रचनांमध्ये गेयता असते. संतवाणी-अभंगवाणी तुमच्या कानावर पडत असेलच.
डॉ.मुकुंद दातार यांनी लिहिलेलं एकनाथांची बोधवाणी हे पुस्तक वाचत असताना कळलं की एकनाथांची साहित्यसंपदा किती मोठी आहे. डॉ.दातार लिहितात, 'संतश्रेष्ठ एकनाथांनी, आपल्या ६६ वर्षांच्या जीवनक्रमात विपुल आणि विविध प्रकारची वाङ्मय निर्मिती केली. नाथांनी भागवतापासून भारुडांपर्यंत वाङ्मयसंपदा-काव्यसृष्टी निर्माण केली. त्यात स्फुट कविता, आध्यात्मिक चरित्रपर, आख्यानपर प्रकरणे, भाष्यग्रंथ आहेत. नाथांची एकूण काव्यसंपदा म्हणजे एका अर्थाने, साहित्य संपदेचा ' नाथसागर ' च आहे! एकनाथांची ग्रंथांतर्गत असणारी, ओवीसंख्या पन्नास हजार आहे, तर त्यांची अभंगसंख्या चार हजारांहून अधिक आहे.'
नाथांची भारूडं सुंदर रूपकात्मक आहेत. व्यवहारातील उदाहरण देताना एकनाथ एखाद्या सुनेच्यामुखी 'सत्वर पाव ग मला ..' सारखी भारूडं घालतात. यातून श्रोत्यांचं मनोरंजन करीत सहज बोध करतात.' अहंकाररुपी सासरा, देहबुद्धीरुपी सासू, द्वेष आणि अविवेकरुपी नवरा यातून मला मोकळं कर,' अशा पद्धतीनं लोकांना ते समजावतात!
एकनाथांची बोधवाणी या पुस्तकात छोटी छोटीशी ५३ प्रकरणे चर्चिली आहेत, जी सर्व सामान्यांना चटकन समजतात!
वास्तविक, संतांची शिकवण ही काही उतारवयात समजून घेण्याची गोष्ट नाही तर परिपक्वतेकडे वाटचाल करण्यासाठी जितक्या लवकर आपण या शिकवणीला समजून घेऊ, तितकी ही शिकवण समाधानी जीवनप्रवासासाठी उत्तम ठरत राहील आणि जीवनात आनंद समाधान मिळत राहील.
ऐसी अक्षरेचा २०१७ मधील एक विशेषांक संत साहित्य परिचय विशेषांक म्हणून आम्ही प्रकाशित केला होता. संतसाहित्य कसे जीवनमार्गदर्शक असते हे थोडक्यात समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता.
वाचक मित्रांनो, गेले कित्येक दिवस टीव्ही, मोबाईल, घरातले खेळ, स्वयंपाक, गप्पाटप्पा, क्वचित वैताग, कंटाळा, थोडे वाचन करत करत आपण सारेच १७ मे ची वाट पहात आहोत. कीर्तन ऐकणे हेही टीव्ही वर शक्य असते. शक्य झाल्यास एखादा अभंग ओवी जरूर वाचून ऐकून पहा. त्याचीही गोडी लागेल. छान वाटेल.
बेलवलकर गृहनिर्माण
१२ मे २०२०
No comments:
Post a Comment