Tuesday, 25 August 2020

पुस्तक परिचय ४९

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


   ' कला हा एक महत्वाचा मानवी व्यापार आहे. वाणी हे जसे विचारांच्या देवघेवीचे साधन, तसे कला हे भावनाप्रदानाचे साधन आहे. 

    ती खरी कला, की जी सद्भावना निर्माण करते.

    ज्या कलाकृतीमुळे हृदयात भावना उचंबळत नाही, ती कलाकृती खरी जिवंत कलाच नव्हे. ते कलेचे सोंग आहे. ती खोटी कला आहे.' 

    

             कला म्हणजे काय?


लिओ टॉलस्टॉय यांच्या व्हॉट इज आर्ट ?

- या पुस्तकाच्या साने गुरुजी यांनी मराठीत केलेल्या अनुवादात कला म्हणजे काय, या विषयी लिहिलेला उपरोक्त विचार, हा या महत्वाच्या ग्रंथाचे साने गुरुजींनी दिलेले थोडक्यात सार होय.

    १९३४ साली साने गुरुजी जेव्हा धुळे येथील तुरुंगात होते तेव्हा गुरुजींनी टॉलस्टॉय यांच्या या ग्रंथाचे भाषांतर करण्यास सुरुवात केली. 

      या ग्रंथाच्या प्रस्तावनेत गुरुजींनी त्यांना टॉलस्टॉय यांचे सर्वच ग्रंथ आवडत असल्याचे नमूद केले आहे. ' कला म्हणजे काय? ' हा महर्षी टॉलस्टॉय यांचा सर्वांत महत्वाचा ग्रंथ असून जवळजवळ ४० वर्षे टॉलस्टॉय या विषयाचे मनन करीत होते. टॉलस्टॉय यांनी कलेवरची, सौंदर्यशास्त्रावरची, साऱ्या युरोपियन भाषांतील प्रमुख पुस्तके वाचली. टॉलस्टॉय यांचे सांगणे आहे की, "ग्रंथ एकदा वाचा, दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा. पहिल्याने वाचल्यावर जे समजले असेल, त्याच्या प्रकाशात दुसऱ्यांदा वाचा; त्या वाचलेल्या प्रकाशात पुन्हा वाचा. असे करीत गेले म्हणजे ग्रंथकाराचे खरे हृदय तुम्हांला सापडेल. एकदाच वाचून तुम्हांला कल्पना नीट आली नाही तर कंटाळू नका."

     या पुस्तकाच्या पहिल्या भागात, सौंदर्यविषयक प्रक्रियांचा सारांश, सौंदर्यावर उभारलेल्या कलेच्या व्याख्या, कला : सुखासाठी का धर्मासाठी ? कला हृदयस्पर्शी केव्हा होईल? भविष्यकालीन कला, या आणि अशा एकोणीस विविध प्रकरणात चर्चा केलेली असून, दुसऱ्या भागात पॉर्लेझच्या कादंबरीची प्रस्तावना, शाळेतील मुले व कला,  असे पाच विषय आहेत.

    पुस्तकात ठळकपणे नमूद केलेले पुढील काही विचार कलाप्रेमी वाचकांनी आपल्या स्मरण नोंदवहीत जरूर नोंदवून ठेवावेत, असे आहेत.

    "स्वतःला जो पूर्वी अनुभव आला, तोच अनुभव स्वतःमध्ये पुन्हा जागृत करून मग रेखा, रंग, गती, सूर, शब्द, हावभाव इत्यादी साधनांच्या द्वारा तोच अनुभव दुसऱ्यांनाही अनुभवावयास लावावयाचे, दुसऱ्यांनाही तोच तितकाच उत्कट असा अनुभव आणून द्यावयाचा हे कलेचे काम आहे."

     "कला हे मानवांचे हृदयैक्य करणारे, ऐकात्म्य करणारे बलवान साधन आहे, कलेने आपणांस दुसऱ्यांसही स्वतःच्या भावनांत मिळवून घेता येते. म्हणूनच व्यक्ती किंवा समाज यांच्या उन्नतीसाठी कला अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जीवनात कलेचे फार महत्व आहे." 


     खरं तर एक तरी अंगी असावी आणि ती जीवापाड जपत विकसित करीत राहावे असं आम्हांला नेहमीच वाटतं. नसेल आपल्यात कला, तर एखाद्या कलेचा किंवा समोर येणाऱ्या प्रत्येक कलेचा, त्या कलेची निर्मिती करणाऱ्या कलाकाराचा आदर करीत, रसास्वाद घ्यायला शिकावे.

    चित्रकला, संगीत, साहित्यलेखन, कथन, अभिनय, क्रीडा या सर्वच कलांमधून आनंद मिळतो. अनेक अडथळ्यांना तोंड देत यशस्वी जीवन जगण्याची आणि त्यातून समाधान मिळवण्याची सुद्धा एक कला आहे. अनेक अडथळे कुशलतेने पार करीत ध्येयाप्रत पोहोचणे ही कला ज्याला जमली तो सदासर्वदा आनंदी राहील. 


      लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागानंतर येणारा चौथा भाग काय नवीनपण घेऊन येत अनुभव देणार आहे हे आज उद्या कळेलच. घाटातून, बोगद्यातून प्रवास करताना चालक संयमाने वाहन चालवत असेल तर हे अडथळे सहज पार करीत इष्ट गावी सुरक्षित पोहोचेल. तसंच आहे या सध्याच्या संकटकाळाचं. यातून लवकरच तावून सुलाखून आपण बाहेर पडणार आहोत ही उमेद बाळगू या, दुसऱ्यांतही उमेद जागवू या. 

     शुभेच्छा. खूप शुभेच्छा..

              ॥ शुभं भवतु ॥ 


बेलवलकर गृहनिर्माण

१४ मे २०२०

No comments:

Post a Comment