ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
' आता ती सारे विभ्रम विसरली होती.स्वतःला विसरली होती. तिचा निवारा तिला मिळाला होता....'
एखाद्या कथेत शोभणारा हा मजकूर असावा असं वाटतं ना? चला, पुढे वाचू या.
' ....याच झाडांचा पाला तिच्या बाळांना पोसणार होता. दुसरे कुठले अन्न त्यांना आवडणार नव्हते, मानवणार नव्हते. तिने सारी हालचाल थांबवली. फांदीवर डोके टेकले. तिथून ते आता ती कधीच उचलणार नव्हती. आणि मग प्राणपणाने तिने, जिला ती डोळ्यांनी कधीच पाहू शकणार नव्हती, त्या संततीचे आवाहन केले. पांढऱ्या अंड्यांच्या रांगा सरकत-सरकत तिच्या अंगांतून येऊन फांदीवर स्थिरावू लागल्या आणि त्या अंड्यांच्या ठिपक्यांनी अतीव चमत्कारिक आकृती त्या अकराच्या घटकेवर रेखाटून ठेवल्या. अदृश्य आणि तरी कधीही पुसल्या न जाणाऱ्या अशा.'
हे वर्णन आहे फुलपाखराच्या मादीचे! आणि लेखाचे नाव आहे 'फिकट पिवळे पीस'
' त्या सावल्यांनी त्या आंब्याच्या झाडाभोवती आपला लहरी, विक्षिप्त पण मनोहर फेर धरला होता. जाणारायेणारांच्या अंगावर त्या कशा उडून बसत होत्या. फिरून जमिनीवर घसरून पडत होत्या.'
हे असे ' सावल्यांचे ' निरीक्षण करणे आणि लीलया शब्दबद्ध करणे, मोठया उत्सुकतेने वाचक पुढे काय या उत्कंठेने वाचत राहील अशी सुंदर मांडणी करणे हे असामान्य प्रतिभेचेच काम असणार यात शंकाच नाही.
' सकाळी अकराची ' वेळ असो, ' सोनेरी उन्हाची तिरीप ' असो, ' ढगाच्या आत सावल्या पडल्याने एक चमत्कारिक नाटकच त्या पडक्या चिमुकल्या घरात चाललेले भासत होते,' ..हे सावल्यांविषयीचे वर्णन असो. हे सारे तुमच्या आमच्या समोर चालणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी. या साऱ्या घडामोडींकडे आपलं कधी लक्षही जात नाही! पण इतकं बारीक सारीक निरीक्षण करीत त्याची सुसंगत वर्णनं शब्दबद्ध करणं हे फक्त अजोड प्रतिभाशक्तीचंच काम असू शकतं. आम्हांला तर वाटतं, ' ही जी लेखणी आहे, ती जर मिळाली तर सरळ देव्हाऱ्यात ठेवून रोज श्रद्धेनं पुजावी!'
भावमुद्रा हा दुर्गा भागवत यांचा ललित लेख संग्रह वाचताना मनात याच भावना उमटल्या.
दुर्गाबाईंची साहित्य निर्मिती मोठी आहे. जो विषय घेतील त्यावरील त्यांचं संशोधन, चिंतन आणि त्यावरील त्यांच्या विचारांची विविध बारकाव्यांसह यथास्थित मांडणी वाचक असो वा अभ्यासक यांच्यासाठी उत्कृष्ट उदाहरणेच.
ऐसी अक्षरेमध्ये आम्ही दुर्गाबाईंचे पोरकी पोरे, चैत्रसखा वैशाख, संसाराच्या उंबरठ्यावर, उनपाऊस, सवाष्ण, तुळस असं साहित्य वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करून त्यांच्या लेखनाचा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
भावमुद्रामध्ये पाहुणी हा, अतुल शरीरसौष्ठव आणि आरोग्य असून, दुर्दम्य जीवनासक्ती असूनही आपल्या देहाला व मनाला पूर्णपणे आत्मकेंद्रित करून निर्मितीच्या साऱ्या साऱ्या क्षेत्रापासून कसोशीने अलिप्त राहणाऱ्या, अति क्षुद्र आणि तरीही अद्भुत असे व्यक्तिमत्व असलेल्या, दोनदा विधवा झालेल्या इंदिराबाई नावाच्या एकाच व्यक्तीत कसं पहायला मिळतं हे, आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वीचं एक नामी उदाहरण देणारा लेख वाचनीय आहे. दुर्गाबाईंचा प्रत्येक लेख वाचनीय कसा होतो हे पाहण्यासाठी भावमुद्रा जरूर वाचावं.
बेलवलकर गृहनिर्माण
८ मे २०२०
No comments:
Post a Comment