Friday, 31 July 2020

पुस्तक परिचय २४

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

ती : काय रे काय केलंस नाश्त्याला ? 
तो : दोन मिनिटं! ब्रेडला अमूल लावून थोडी मिरपूड टाकून आत्ता आणतो बघ. चहा झालाय.
ती : अरे तेच तेच किती दिवस खायचं ? काहीतरी वेगळं कर की! 
तो : हं ss आत्ता काय करु वेगळं ? 
ती : पलिकडे ड्रॉवरमधे इडलीचं पीठ आहे. ते घे सहा वाट्या, कोथिंबीर मिरच्या जिरं एकत्र करून मिक्सरमधून काढ. ही चटणी इडलीच्या पिठात मिक्स कर. आणि इडली लाव नेहमीप्रमाणे.

तो :(स्वतःशीच) इच्यायला वैताग! ए कोरोन्या.. तुझ्या त आ..! असा का रे बाबा आमच्या जीवावर उठलास ? ...घरी बसवलं तर बसवलंच, बायकोला डोक्यावर! 

     तर .. सध्या स्वयंपाक घरांत काम करणाऱ्या पुरुषवर्गाचे फोटो व्हॉट्सऐपवर व्हायरल होताहेत! तेव्हा डोक्यात कल्पना आली, आज कुकिंगवर एखादं पुस्तक असेल तर शोधावं. 
     सौभाग्यवतीचं कपाट उघडताच, "काय शोधताय ?" हा खणखणीत आवाजातला प्रश्न कानांवर दाणकन आपटलाच! "अगं एखादं रेसिपीवरचं पुस्तक असेल तर बघावं म्हणून तुझं कपाट उघडलं."आमचं उत्तर. "थांबा, नका विस्कटवू कपाट!" म्हणत बाईसाहेबांनी एकापाठोपाठ दोन तीन पुस्तकं पुढ्यात टाकली!.
प्रिया नाईक लिखित, ब्रेक-फास्ट,
सौ.निर्मला रहाळकर लिखित, झटपट स्वयंपाक आणि 
उषा पुरोहित संकलीत, सुगरणीचा सल्ला!

"हं sss वाचा, काय दिवे लावणार हे वाचून?" असा रिमार्कवजा टोमणाही ऐकावा लागला. 
     या बाबतीत मात्र सध्याच्या पुरुषपिढीच्या तुलनेत आम्ही खूप लक्की आहोत. आम्हांला स्वयंपाक ओट्याजवळ फिरकूच  दिलं जात नाही. याचं कारण बाईसाहेबांनी सुनेला सांगतांना आम्ही चोरून ऐकलं होतं...
" अगं चहा करायला सांगितला तर ह्यांनी दुधावरची सगळी साय खाऊन टाकली, हे म्हणजे बोक्याला आपणहून दुधाचं कपाट उघडून दिल्यासारखं झालं! आणि पोहे करायला सांगितले, तर डब्यातले निम्मे दाणे यांच्या पोटात. महागात पडतं बाई. येत तर काही नाहीच ....!  "

काय म्हणालात? ' आम्हांला शिकवा की अशी लबाडी! ' 

नाही. असतो एखादा सिक्रेट फंडा, नावडती कामं झटकून टाकण्याचा! 

   जाऊ देत आम्हांला काय करायचंय! आपण पुस्तकात काय लिहिलंय ते पाहू या.
     ब्रेक-फास्ट मध्ये महाराष्ट्रीयन, गुजराथी, पंजाबी, दाक्षिणात्य, चायनीज या विविध भागातील नाश्त्यांबरोबरच ग्रामीण भागातील, शेंगोळ्या, शिळ्या भाकरीचा चिवडा, मसाला भाकरी अशा कांही पदार्थांच्या साहित्य कृतीचाही समावेश आहे.
      झटपट स्वयंपाक या पुस्तकात भाकरी, परोठे, थालीपीठे, भात-खिचडी-पुलाव, भाज्या-सार-सांबार, तोंडी लावण्याचे पदार्थ, गोड पदार्थ, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ यांचा समावेश आहे.
      सुगरणीचा सल्ला या पुस्तकात स्वयंपाकातील उपयुक्त १२०१ टीपा आहेत. जशा की, 'बासुंदी आटवून तयार झाल्यावर त्यात एक-दोन थेंबच लिंबू रस टाकाबासुंदी छान रवाळ होते.' 
'सुकी फळे, काजू इत्यादी पदार्थांत थोडे मीठ मिसळून ठेवल्यास त्यात कीड होत नाही व ते पदार्थ जास्त दिवस चांगले राहतात.' 
     
     या लॉकडाऊनच्या काळात कित्ती नवे नवे अनुभव गाठीशी आले असतील ना ? चला, थोडा स्वयंपाक करण्याचाही हा अनुभव त्यात भरीला ....! 
तुमच्या तळमळीला शुभेच्छा ..

बेलवलकर गृहनिर्माण
२० एप्रिल २०२०

Thursday, 30 July 2020

पुस्तक परिचय २३

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     ' एक तर कथा आणि पटकथा. मुळात आजही चांगली गोष्टच विकली जाते किंवा अपील होते....बहुसंख्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या हास्य, शृंगार, वीर, करुण, रौद्र आदी नवरसांची किंवा यापैकी काहींची निश्चित व सकारात्मक निष्पत्ती ज्यातून होते ती चांगली गोष्ट होय ....' 
     ' दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे अर्थातच दिग्दर्शन.याचं कारण दिग्दर्शक हाच सिनेमाचा सर्वेसर्वा असतो...खरं तर फ़ार न बोलता केवळ दृश्यांच्या आणि चित्रचौकटींच्या माध्यमातूनच आपल्याला काय सांगायचंय ते सांगण्याचं हे माध्यम आहे. चित्रपटांच्या इतिहासात अशाच प्रतिभाशाली दिग्दर्शकांना वरचं स्थान मिळाल्याचं पाहायला मिळेल....' 
     ' तिसरी गोष्ट येते ती प्रत्यक्ष पडद्यावर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची. यांत प्रामुख्यानं अभिनय आणि क्यामेरा यांचा समावेश होतो.... याशिवाय संगीत, संकलन हेही अत्यंत महत्वाचे ...' 

     वाचायला सुरुवात केल्यावर सुजाण वाचकांच्या लग्गेच लक्षात आलं असेल की, आजचा विषय चित्रपट हा असणार. आज रविवार आहे. गेले काही दिवस आपण वार तारीख हेही विसरून गेल्यासारखं झालंय. फार फार वर्षांपूर्वी पगारानंतरचा आमचा पहिला रविवार हा खास पिक्चरसाठी राखीव असायचा. 
      पिक्चरचं वेड तसं आम्हांला फार जुन्या काळापासूनचं! इतकं की, कधी आम्ही तीन देवियां पाहता पाहता स्वतःलाच देव आनंदच्या जागी बसून, त्या लाडिक पद्धतीत मान हलवत गोडसं हसू देत, 'ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलावो ...' हे गाणं गात चमकोगिरी करतांना पाहात असू! असो ..स्वप्नंच ती! 
     वाचकमित्रांनो, गेले बावीस दिवस आम्ही रोज तुम्हांला एखाद्या चांगल्या वाचनयोग्य पुस्तकाचे नाव सुचवत आहोत. यांत युगंधर, राजा शिवछत्रपती, ययातिपासून कथा, रुबाया, शेरोशायरी, कालिदासकृत मेघदूतचा मराठी अनुवाद, खलील जिब्रानच्या कथा, शृंगारिक ललितलेख, नेपोलियनचं चरित्र, योगशास्त्र, गायत्रीविज्ञान, ज्ञानेश्वरीतलं पसायदान, शेती अशा विविध विषयांची पुस्तके होती. 
      आज पुस्तकांचं कपाट उघडल्यावर भल्यामोठया जाडजूड पुस्तकांत लपूनछपून बसलेलं आमच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं सिनेमावरील यक्षनगरी हे श्रीपाद ब्रह्मे लिखित पुस्तक दिसलं. खेचून काढलं. समजतात काय स्वतःला ही जाडजूड पुस्तकं? 
     एकतर ब्रह्मे यांची ओळख म्हणजे, आमच्या ईशाननगरीतले रहिवासी. त्यात 'लोकसत्ता,'  'सकाळ' पासून ते 'महाराष्ट्र टाइम्स' अशा मोठ्ठया वृतपत्रसमूहात त्यांची बहरत गेलेली पत्रकारिता. त्यात आमच्या ऐसी अक्षरेच्या दोन महत्वाच्या, 'वृत्तपत्रातलं साहित्य' आणि 'विनोद' अशा विशेषांकातले महत्वाचे लेखक. ' कॉफीशॉप,'  'फर्स्ट डे फर्स्ट शो' या आणि अशा पुस्तकांचे लेखक. आपल्या पत्रकारितेतल्या लहान वयांत 'चहाटळ' नावाच्या स्तंभात लेखन करणारे आणि आमच्या आवडीच्या विषयावर, म्हणजे नव्यानं सिनेमागृहात आलेल्या सिनेमाचं समीक्षण किंवा परिक्षण की काय ते लिहिणारे, ज्यावरून पिक्चर पाहायचा की नाही हे आम्ही ठरवणार! असे  अवघ्या चाळीशीतले पोक्त ब्रह्मे यांचं *यक्षनगरी* हे पुस्तक आज प्रिय वाचकांनी जरूर वाचावं यासाठी आमच्या मनानं मनापासून घेतलं.
    यक्षनगरी या पॉकेटसाईझ पुस्तकात दोन विभाग. पहिल्यात सिनेमाविषयीच्या विश्लेषणात्मक लेखांचा समावेश. ' सिनेमा कसा पाहावा ' येथपासून सिनेसृष्टीतले बदलते प्रवाह, माध्यमांतर, घडामोडी. ' लंचबॉक्स ' या हिंदी सिनेमाचं सुरेख रसग्रहण. तर, 'नक्षत्रे' या दुसऱ्या भागात अमिताभ बच्चन, अनिल  कपूर, निळू फुले, माधुरी दीक्षित यांचे विषयी, आणि मधुबाला, गुरुदत्त, मीनाकुमारी, संजीवकुमार, स्मिता पाटील या अल्पायुषी शापित गंधर्वांविषयी ब्रह्मे यांनी लिहिलंय.
     या पुस्तकात ब्रह्मे यांनी चित्रपट सृष्टीविषयीच्या माहितीचा घेतलेला धांडोळा छानसा घेतलाय. धांडोळाच म्हणतात ना ? कांही लेखकांनी हा धांडोळा शब्द वापरलेला आम्ही बऱ्याचवेळा पाहिलाय. इथे तो बरोबर की नाही हे जाणून न घेता आम्हीही दणकून टाकलाय.
     पुस्तक छोटंसं असलं तरी या आमच्याच काय तुम्हां सर्वच वाचकांच्याही आवडत्या 'सिनेमा'  विषयावर आहे. त्यामुळे सारखं सारखं न्यूज च्यानल पाहणं सोडून एखादा चांगला मराठी किंवा हिंदी चित्रपट आजच्या रविवारी तुम्ही नक्कीच पाहणार आहात ...थेटरात न्हाय .. घरात,  टीव्हीवर ! 
     आनंद द्विगुणित होणार तुमचा! नक्कीच, या लॉकडाऊनच्या काळात! 

बेलवलकर गृहनिर्माण
१९ एप्रिल २०२०

Wednesday, 29 July 2020

पुस्तक परिचय २२

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

      कथावाचन हा आमचा आवडता विषय. त्यात ती कथा विनोदी असेल, गावाकडची असेल तर आम्ही डोळे टवकारुन बसतो. द.मा.मिरासदार, गंगाधर गाडगीळ, शंकर पाटील, वसंत सबनीस हे लेखक तसे आमच्यासाठी अत्यावडीचे! .. अति आवडीचे! 
     दमांची ' व्यंकूची शिकवणी ' जेव्हा पहिल्यांदा वाचली ना,' अय हव्वा, लय भारी ' असे शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडले, अगदी कळीकाळाचं भान न राहता. मग काय, पारायणं सोडा वो, कैक वेळा वाचली. तेव्हापासूनच की काय तंबाखू खाणं आम्ही विसरूनच गेलो. म्हणजे त्या खऱ्याखुऱ्या तंबाखूत जी किक बसायची, ती तर या व्यंकूच्या शिकवणीपुढं कायच न्हाय! असंही आम्ही आमच्या कैक मित्रांना सांगितल्याचं आठवतंय. 
     गावरान बाज घिउनशान आलेल्या शंकर पाटलांनी तर आम्हांला त्यांच्या जणू  'शाळे'तनंच फिरवून आणलं. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा आमच्या वर्गातल्या सगळ्या व्रात्य मुलांच्या  खोड्यांची, मास्तरांबरोबर बोलताना वागताना त्यांनी केलेल्या इरसालपणाची आठवण तर झालीच, पण त्यातले  कांही व्रात्य मित्र अंगठे धरून उभे असल्याचेही दिसले. 
     ही सगळी विनोदी लेखक मंडळी मुळातच खूप व्रात्य, बेरकी असली पाहिजेत, असंच आम्हांला वाटतं. कारण, कथा सांगता सांगता ही मंडळी एखादा चित्रपट पाहावा अशी कथा समोर मांडतात ना की, सारं काही समोर घडतंय की काय असंच वाटावं! 
     या शंकर पाटलांच्या 'शाळेत' ल्या एका वर्गातले कांही डायलॉग्ज तुम्हांला ऐकवतोच, त्याशिवाय आम्हांला राहवणारच नाही.
     " बस, खाली बस! दुसरं कोण वाचतंया? तू वाच रं. तू वाच .."
      असं म्हणून एक गबाळं पोरगं त्यांनी उठवलं. ते पानं चाळाय लागलं तोच एक धाकटं पोरगं मोठ्यानं म्हणालं, 
     "मास्तssर, ह्यो गण्या बगा माझ्या चड्डीत हात घालतोयाss! "....
      "कुठं गेलतास इतका वेळ? "
      "म्हशीला घेऊन गेलतो."
      "आणि ही फुंकणी कशाला आणलीयास? "
       "आईनं लौकर वाडलं न्हाई म्हंताना तिची फुकणी घेऊन आलोया."
     मध्येच सगळी पोरं एकदम हसू लागली. मास्तर गण्याला मारायचे थांबून म्हणाले, "का रं, का हसता? "
      मग हळूच एक पोरगं म्हणालं, "मास्तर, गण्या चड्डीत मुतला बगा."......
        'धिंड' नावाची अशीच एका इरसाल दारुड्याची कथा, शंकर पाटील यांनी मोठया खुमासदार पद्धतीनं लिहिली आहे.
        शंकर पाटील हे  एकदम पारदर्शी लेखक. कथा, कादंबरी, वगनाट्ये, चित्रपट कथा, स्फुटलेखन असं खूप लिखाण त्यांनी करुन ठेवलंय. आत्ता शंकर पाटील यांचा वळीव हा कथासंग्रह पुन्हा एकदा वाचायला काढलाय.
     खरंच ना, या लॉकडाऊन  मध्ये कपाटात पुष्कळ पुस्तकं असल्यामुळं दिवस कसा झटकन निघून जातो ना, कळतच नाही.
     बाकी मित्रांनो तुम्ही काय म्हणताय? घरांत आहात ना? सोशल डिस्टंसिंग पाळताय ना? नाक तोंड झाकून घेताय ना? मग कसली काळजी! जातील पटकन निघून हेही लॉकडाऊनचे दिवस.
      खूप शुभेच्छा ..
  
बेलवलकर गृहनिर्माण
१८ एप्रिल २०२०

Tuesday, 28 July 2020

पुस्तक परिचय २१

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
   
     ' तेवढ्यात गर्दीतून एक अगदी म्हाताऱ्या आजी धावत दादांकडे आल्या आणि काही कळायच्या आत त्या दादांच्या पाया पडू लागल्या. दादा संकोचून मागे सरले. तर त्या म्हणाल्या, "ज्ञानेश्वरा, तू खरंच माऊली आहेस.मला साक्षात माउलीचं दर्शन झालं. माऊली जशी गाथा सांगते, तशीच तू गाथा सांगितलीस.माझी पोरं-नातवंडं शेती करायची म्हणू लागल्यावर आम्हांला वाटलं, काय झालं या पोरांना ? शेतीमधी काय ठेवलं आहे ? पण तुझं बोलणं ऐकल्यावर पटलं मला."
     दादा म्हणजे श्री.ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके, राहणार, बोडकेवाडी, तालुका मुळशी, जवळची खूण, पुणे परिसराला 'आय टी हब' म्हणून ओळख मिळवून देणारं 'हिंजवडी' येथील आय टी कंपन्यांच्या टोलेजंग इमारतींच्या गर्दीत अंग चोरून बसलेली वाडी, जि.पुणे.
     आपल्या अथक प्रयत्नानं  शेतीतही आपण 'नंदनवन' फुलवू शकतो, असा दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारा,  अवघी एक दोन एकर शेती असलेला शेतकरी.
     ऐसी अक्षरेच्या एक हितचिंतक, वाचक, अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि स्वतः एक सिद्धहस्त लेखिका असलेल्या, शिवशाहीर बाबासाहेबाना पुरंदरे यांच्या स्नुषा , डॉ.चित्रलेखा पुरंदरे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले एका एकराची अभिनव ज्ञानेश्वरी.
      या पुस्तकाचा नायक म्हणजे हे ज्ञानेश्वर बोडके. 
     हे पुस्तक वाचल्यावर ओठांवर पहिली प्रतिक्रिया आली, ती म्हणजे, असाही एक मुळशी पँटर्न! असतोच.
     आपल्या देशाला कृषिप्रधान देश अशी ओळख आहे. पूर्वी  'उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी ' हाच विचार दृढ होता. काळाच्या प्रवाहात हे समीकरण बदलत गेलं आणि जे कनिष्ठ होतं ते 'उत्तम' झालं. म्हणजे उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती, असं झालं.
     घरची शेती. परंतु ... हा परंतु म्हणजे अत्यंत बेभरवशाचा शेतीउद्योग झाल्यामुळे पोटासाठी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीसाठी जावं लागणं!  घरांत सात खाती तोंडं. आई वडील आणि चार बहिणींच्या मधला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरला शिकण्याची ओढ. मिळेल त्या वेळेत पडेल ते काम करीत ज्ञानेश्वर शिकत राहिला तो जिद्दी आईच्या पाठिंब्यावर! दैनंदिन दहा किलोमीटरहून अधिक पायपीट करणारा ज्ञानेश्वर दहावीला ८३% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. पुढे रोज वीस वीस किलोमीटरचा सायकलप्रवास करीत नोकरीत टायपिंगबरोबर पडेल ते काम करीत ज्ञानेश्वरने इंटेरियर डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 
     लग्न झालं. ज्ञानेश्वरला मात्र आपलं गहाण पडलेलं शेत खुणावत होतं. त्याचा निर्णय झाला आणि आई वडलांचा विरोध पत्करून ज्ञानेश्वरने नोकरीला रामराम केला. साठलेल्या पैशांतून सावकाराकडे गहाण पडलेला एक एकराचा तुकडा त्यानं सोडवला.  
     वाचकमित्रांनो, सर्वच कांही सांगायचं तर तुम्ही हे पुस्तक वाचणार कधी ? मात्र या पुस्तकातल्या कांही ठळक घटनांची माहिती देणारं एखादं  वाक्य किंवा थोडाफार मजकूर तुमच्यासमोर ठेवतो. 
    एखादं ध्येय, त्याच्या पूर्तीसाठी शिक्षण, परिश्रम, कष्टाची लाज न ठेवता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत प्रस्ताव तयार करणे. बँकेत पूर्ण तयारीनिशी सादर करुन दहा बारा लाखांचे कर्ज मिळवणं  आणि अवघ्या चौदा महिन्यांत पूर्ण कर्जफेड करीत, ' एका वर्षातच कर्ज फेडणारा पहिलाच शेतकरी ग्राहक,' अशी बँकेत ठळक नोंद करुन ठेवणारा प्रेरणादायी, प्रामाणिक, कष्टाळू शेतकरी म्हणजे ज्ञानेश्वर बोडके.
     त्यांच्या पुढील वाटचालीची यशोगाथा वाचतांना, मनात विचार आला की, देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या, खेळाडू, कलाकार, किर्तीमान नेता यांच्या यशोगाथा सारेच वाचतात. अशा शेतकऱ्याची यशोगाथा हीदेखील प्रेरणादायीच असते आणि ती वाचायलाच हवी. लेखिकेने आपल्या मनोगतात म्हटलंच आहे, ' आपण शेतकरी असाल तर वाचलीच पाहिजे आणि शेतकरी नसाल तरीही वाचायलाच हवी, अशी ही कहाणी.' 
     
बेलवलकर गृहनिर्माण
१७ एप्रिल २०२०

Monday, 27 July 2020

पुस्तक परिचय २०

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     "हे मन चंचल आणि अनावर आहे, परंतु अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने मनाचा निग्रह होऊ शकतो.ज्या माणसाला मनाचा संयम करता येत नाही, त्याला योग साध्य होणे कठीण; परंतु संयमी माणसाला खूप प्रयत्न केल्यास आणि योग्य उपायांनी आपल्या शक्तीला वळण लावल्यास योगावस्था प्राप्त होऊ शकते." भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या एका प्रश्नाला असे उत्तर दिले आहे.
     'योगावस्था प्राप्त होणे, योग, योगावस्था हे शब्द सर्वसामान्यांना जड वाटतात. हे आपल्याच्याने जमणार नाही, अशी ठाम समजूत काहींनी करुन घेतलेली असते. तर काहींना योगासने करण्याचा खूपच उत्साह असतो. 
      सध्या कांही वाहिन्यांवर माधवी निमकर, प्राजक्ता माळी या आघाडीच्या अभिनेत्री प्रात्यक्षिकांसह योगासनांची माहिती देत आहेत. बॉलिवूडमधल्या शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीने पूर्वी योगासनांवरील ध्वनीचित्रफितीही प्रकाशित केल्या होत्या.
      पतंजलीचे भारतीय योगशास्त्र, योगासने यांचा पाश्चिमात्य देशांतही 'योगा'पद्धतीचा म्हणून जाणीवपूर्वक अभ्यास केला जात आहे. 
       योगाभ्यास किंवा योगासने प्रशिक्षित शिक्षकांकडून शिकून त्यांच्या देखरेखीखालीच करावीत.          
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातील मिळालेल्या मोकळ्या वेळात अनेकांनी योगाभ्यासाला आवर्जून सुरुवात केली आहे.
       बी.के.एस.अय्यंगार हे योगाभ्यासाचं तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या महान शिक्षकाचं नाव आपल्याला माहीत असेलच. स्वतः अय्यंगार आता नाहीत, पण त्यांची योगासनशिक्षण संस्था पुण्यात कार्यरत आहे. बेल्लूर कृष्णमचारी सुंदरराज अय्यंगार यांना भारतसरकारने पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.
      ' लाईट ऑन योग ' असे एक पुस्तक अय्यंगार यांनी पन्नासपंचावन्न वर्षांपूर्वी लिहिले आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा, मराठी भाषिकांसाठी अत्यंत उपयुक्त असा मराठी अनुवाद, राम पटवर्धन यांनी केला आहे.  योगदीपिका या नावाचे हे योगासनांवरील मराठी पुस्तक ओरिएंट लॉंगमन या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलं आहे. प्रख्यात संगीतज्ञ यहुदी मेनुहिन या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, ' शरीर-मनाने शुद्ध, चित्त आणि इच्छा यांची एकाग्रता साधलेला, सहजतेने आणि निष्पाप मनाने, वेदीवर अर्पण करण्यासाठी दग्ध आहुती नव्हे, तर स्वतःच्या जास्तीत जास्त सामर्थ्यानुसार उंचावलेले स्वतःचे व्यक्तिमत्वच घेऊन आलेल्या अशा माणसाचे जणू नवसाचे समर्पण म्हणजे श्री.अय्यंगारप्रणीत योग '.
      या पुस्तकात प्राणायाम,  नाडीशोधन, भस्रिका, कपालभाती, उड्डियानबंध, यासह 
दोनशेहून अधिक योगासनांची तपशीलवार माहिती, स्वतः अय्यंगार यांची योगासनांच्या प्रात्यक्षिकांची छायाचित्रे, योगसंबंधित शब्दांचे विस्तृत अर्थ, अशी अतिशय उत्तम माहिती सोप्या पद्धतीत समजावून सांगितली आहे. विविध रोगांवरील उपयुक्त आसने आणि सूचना, इशारे यांचा या सुमारे ३५० पानी पुस्तकात समावेश केलेला आहे.
      सर्वच योगप्रेमी, नवशिके यांना हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक असे आहे. या पुस्तकाचा लॉकडाऊननंतर जरूर शोध घ्या आणि अभ्यासा. 
     शरीर स्वस्थ आणि निरोगी तर जीवनात सुखाची रेलचेल.
       
बेलवलकर गृहनिर्माण
१६ एप्रिल २०२०

Sunday, 26 July 2020

पुस्तक परिचय १९

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

       ' शाळेत कुणीतरी सांगितलं होतं की, नाना पेठेत प्लेगचे उंदीर पडण्यास सुरुवात झाली आहे. वर्गातलं वातावरण ती बातमी ऐकून एकदम पालटलं होतं. नेहमीच्या शांत नि संथ जीवनात एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं. शाळेतून मी घरी आलो आणि पुस्तकं कोनाड्यात ठेवता ठेवताच एखादी आनंदाची बातमी सांगावी त्याप्रमाणे आईला ओरडून म्हटले, "प्लेगचे उंदीर पडायला लागले ग ss. आता बहुधा शाळेला सुट्टी मिळेल."....
       पुस्तक वाचता वाचताच डोळा लागला. डोळ्यांवर चष्मा आणि छातीवर पुस्तक तसंच असावं बहुधा. झोपेच्या अर्धवट ग्लानीत काहीतरी खस्सकन ओढल्याचं स्वप्नांत पाहिल्यासारखं वाटलंही असावं बहुधा! 
       सकाळी उठल्या उठल्याच शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. एकतर गेले तीन आठवडे कधी नव्हे तर आम्ही सारेच घरांत! 
     "उठा sss,  दहा वाजायला आलेत. टीव्ही लावा. काय वाढून ठेवलंय ते कळेल!" 
       ' ... सर्व देव नमस्कारम् केशवम् प्रतिगच्छति ' असे बारीक सारीक श्लोक लहानपणी अनेकवेळा कानांवर पडलेत. 'कुठल्याही देवतेला नमस्कार करा, तो केशवाला पोहोचतो.' हा त्याचा आम्हांला कळलेला अर्थ. आमच्या लग्नात गुरुजींनी म्हटलेल्या या श्लोकाचा आमच्या मंडळींनी बहुधा, 
' सर्वांवर काढायचा राग नवऱ्यावर काढला की तो राग इच्छिलेल्या त्या सर्वांना बरोब्बर  पोहोचतो!' असा काढला की काय कोण जाणे. 
       सकाळपासून सुरू झालेल्या  शाब्दिक चकमकी, लॉकडाऊन वाढल्यामुळे शाब्दिक लठ्ठालठ्ठीत रूपांतरीत झाल्या. आणि नेमकी अशावेळीच आम्ही कशी काय माती खाल्ली कोण जाणे! ...
       "... हं sss ..आलिया भोगासी असावे सादर " असं दुसरीकडे तोंड वळवून आम्ही म्हटलं. एखाद्या पट्टीच्या धनुर्धरासारखा आमच्या खात्यातला बाण, अंsss भात्यातला म्हटलं तर जास्त संयुक्तिक होईल, मंडळींवर सोडला. तो परतवताना असंख्य वाक्बाण आम्हांवर सोडत एवढं त्यांनी जर्जर करुन टाकलं की,  अखेर , "अहोss आम्ही या वाढवलेल्या लॉकडाऊनला उद्देशून बोललो." असा खुलासा करीत आम्हांला सपशेल माघार घ्यावी लागली. " मी काय आज ओळखते की काय तुम्हांला ...! " 
       नशीब रात्रीचं पुस्तक सापडलं आणि पानं उघडायला सुरुवात केली आणि सहज नजर पडली नेमक्या आवडीच्या मजकुरावर ...! 
       " ते काहीही असलं तरी कोवळ्या आणि मधुर स्त्रीसौंदर्याचं प्रतीक म्हणून मी हुजूरपागेला मानतो.लहानपणी तिथल्या अमूर्त सौंदर्यानं मला जे एकदा झपाटून टाकलं आहे, त्याचा अंमल उतरलेलाच नाही. माझ्या पूर्वीच्या पिढीतल्या लोकांना बालगंधर्व म्हातारे झाल्याची कल्पनादेखील दु:सह वाटे. हुजूरपागेबद्दलच्या माझ्या भावनाही तशाच आहेत. माझ्या मनातली ती हिरवळ आहे. सगळ्या शाळांमधल्या मुली आज जरी सारख्या असल्या तरी माझ्या मनातली हुजूरपागा वेगळीच आहे. एखादं सोनचाफ्याचं फूल बाटलीत घालून हवाबंद करावं त्याप्रमाणे माझ्या मनानं हुजूरपागा जपलेली आहे. तिला वार्धक्य येणार नाही. ती नेहमी हवीहवीशीच राहील." 
     हाच तो 'हुजूरपागेतल्या मुली' या खुसखुशीत लेखातला मजकूर. आणि वाचता वाचता चुकून तोंडातून सहजच, 
'सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं' ... 
हे गाण्याचे शब्द बाहेर पडले अन् ..... 
"हां, हे घ्या गिळा!"
    मुकाटपणे पुढं आलेलं खाल्लं आणि दुसऱ्या लेखाकडे वळलो. अरे हां, सांगायचंच राह्यलं, हातात पुस्तक होतं, पुणेरी, लेखक श्री.ज.जोशी.
      पुढचा लेख वाचायला घेतला,  चार्मिंग स्त्री!...
      तुम्ही म्हणाल', ' फारच लंपट दिसताहेत हे!'  पण हा लेख वाचल्यावर तुम्हांला चार्मिंग स्त्री म्हणजे काय हे कळेल.
      मित्रांनो, श्री.ज.जोशी हे, 
'आनंदी गोपाळ ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक. त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सुरुवातीच्या कांही काळात त्यांनी कांही वृत्तपत्रातून उत्तम ललित लिखाण केलं आहे. ऐसी अक्षरेच्या  वृत्तपत्र साहित्य विशेषांकात श्री.ज. जोशी यांच्या *पुणेरी* या ललित लेख संग्रहातील एक लेखही आम्ही घेतला होता.
     वाढवलेल्या लॉकडाऊनच्या काळात घरवालीनं काही चविष्ट खायला केलं असेल तर खाताखाता हेही खुसखुशीत साहित्य जरूर वाचा.
      आणि अगदी काssही काळजी करु नका, त्या दुष्ट कोरोनाची! कारण तुम्ही सारे घरांत आहात. उगाचच बाहेर पडण्याचं धारिष्ट्य तुम्ही करणार नाही. अर्रर्र, पुणेरी वाचायला सांगतोय आणि धारिष्ट्य हा शब्द आम्ही वापरतोय!! क्षमस्व. पुणेकर शिस्तप्रिय आहेत, हे काय आम्हांला माहीत नाही ? १ ते ४ च काय, पण सध्या पुणेकर दिवस रात्र घरातच पडून आहेत. चुकलं चुकलं घरात विश्रांती घेत आहेत. कोणी घरातून कामंही करतंय. तुमच्या सहनशीलतेला सलाम. कारण पुणेकरांनीच काय मुंबईकरांनीसुद्धा कोरोनाच्या परिस्थितीचं गांभीर्य नक्कीच ओळखलंय.
     शरीराची प्रतिकारशक्ती वाढवता वाढवता मनाची शक्ती सुद्धा अशी खुशखुशीत वाचनानं वाढवा. खूप शुभेच्छा ...

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे
 १५ एप्रिल  २०२०

Saturday, 25 July 2020

पुस्तक परिचय १८

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १८ वा

    सारं जग आज कोरोना नावाच्या विषाणूच्या महाभयंकर उद्रेकानं भीषण संकटात सापडलंय. या विषाणूनं श्रीमंत गरीब, सुष्ट दुष्ट, आस्तिक नास्तिक, गोरा काळा, स्त्री पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांना एकाच तागडीत टाकलंय.
     आज पंतप्रधानांनी जाहीर केलेला पहिला एकवीस दिवसांचा लॉकडाऊन संपतोय. कोरोनाशी चालू असलेलं महायुद्ध लवकरात लवकर संपावं ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. 
    सध्या आपण रोजच आपापल्यापरीने आपापल्या देवाजवळ प्रार्थना करीत आहोत. अशा या अत्यंत बिकट काळात आठवतं ते, संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण मानवजातीसाठी मागितलेलं पसायदान..
      खरंतर प्रत्येक मराठी माणसानं ज्ञानेश्वरी एकदा तरी वाचावी. किमान, 
एकतरी ओवी अनुभवावी. 
      ज्ञानोबामाऊलीच्या गणेशाला मूर्तीरुप नाही. तर, अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारें॥ हे तीन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कवळले।  ते मियां श्रीगुरुकृपा नमिलें। आदिबीज॥(अ.१, ज्ञाने.) या ओव्यांद्वारे  शब्दब्रह्मरुपी गणेशाचे स्मरण करावे.
      ऐसी अक्षरेचे संस्थापक कै.शरच्चंद्र बेलवलकर यांनी सध्याच्या पिढीला सहज समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वरीतल्या तेरा अध्यायांतील प्रत्येक ओवीचं सुलभीकरण केलं होतं. काही कारणानं ते पूर्ण होऊ शकलं नाही. ज्ञानेश्वरीतल्या ६ व्या अध्यायातील, *माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंहि पैजासी जिंकें। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥* या १४व्या ओवीतील ध्येय डोळ्यांसमोर ठेवूनच ऐसी अक्षरेचा उपक्रम सुरू झाला.
       ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस माउलींनी आपल्या सद्गुरुंना अत्यंत प्रासादिक शब्दांत पसायदान मागितलं. पसायदान म्हणजे प्रसाद मागितला. प्रत्येक मराठी व्यक्तीनं हे पसायदान वाचावं, समजून घ्यावं, जे फारसं अवघड नाही, स्मरणात ठेवावं. शक्य असल्यास घरीं आपल्या सर्व कुटुंबियांसमवेत आवर्जून म्हणावं. त्यातल्या अर्थावर मन केंद्रित करावं. 
    
आतां विश्वात्मकें देवे। येणें  वाग्यज्ञे तोषावें।तोषोनि मज द्यावे। पसायदान हें॥ जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती  वाढो। भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचें॥ दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥ वर्षत सकळ मंगळी।ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी। भेटतु भूतां॥ चलां कल्पतरुंचे आरव। चेतनाचिंतामणीचें गांव। बोलते जे अर्णव। पीयूषाचे॥ चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन। ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु॥ किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं। भजिजो आदिपुरुखी ।अखंडित॥ आणि ग्रंथोपजीविये।विशेषी लोकी इये। दृष्टादृष्टविजये। होआवें जी॥येथ म्हणे श्रीविश्वेशरावो। हा होईल दानपसावो। येणे वरे ज्ञानदेवो। सुखिया जाला॥
 
     मित्रांनो, महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले. याच युद्धप्रसंगी गळाठून गेलेल्या अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली, आणि अर्जुनाने महायुद्धाला सामोरं जात विजय मिळवला. 
       या भगवतगीतेचे अध्याय अठरा. ज्ञानेश्वरीचेही अध्याय अठरा. ऐसी अक्षरेच्या या अठरा दिवसांच्या महायज्ञाला अठरा दिवस आज पूर्ण झाले. अजून असंख्य पुस्तकं सुचवता येतील.   
     या यज्ञाची सांगता करतांना हात जोडोनी नम्र विनंती, दर्जेदार साहित्य वाचन करा. कुणाच्याही संगतीत असतांना चार फुटांचे अंतर ठेवा. वारंवार सांगितलेल्या सूचना पाळा. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.
    तुम्हां सर्वांसाठी मनोमन प्रार्थना, " घरीं आहातच, म्हणून तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य सदैव उत्तमच राहो."
 
बेलवलकर गृहनिर्माण
॥ मिती चैत्र कृ.७ शके १९४२॥ 
 १४ एप्रिल २०२०

( ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून  आनंद -- उद्यापासून ...)

Friday, 24 July 2020

पुस्तक परिचय १७

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १७ वा

       सध्या यत्र तत्र सर्वत्र जुन्या आठवणी उफाळून वरती येऊ पाहताहेत. साठच्या दशकातील सुंदर गाणी, त्यावर केलेल्या छोट्या चित्रफिती मित्र पाठवताहेत. बहुतेकांची जुनी छायाचित्रे व्हॉट्सएपवर दिसायला लागली आहेत.      
      अस्मादिकांनीसुद्धा जुन्या छायाचित्रांचा शोध व्हॉट्सएपवर शेअर करण्यासाठी घेतला. एक छायाचित्र खूपच जुनं होतं. हसरं मूल. नुकतंच पालथं पडायला लागलेलं. पण किंतु परंतु शेअर करण्याचं धाडस नाही केलं. का काय विचारता ? विवस्त्र होतं !!! 
असो. विनोद सोडा. 
     सगळेच सध्या जुन्या काळाचा स्मरणरंजनाचा आनंद घेताहेत. मग आम्ही का मागं राहावं ? जुनं ते सोनं म्हणतात ना. म्हणून आम्ही चांगलं पंधरा सोळाशे वर्षापूर्वीचं काही साहित्य मिळतंय का त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. हयगय नाही.
      एवढ्या जुन्या काळातलं म्हणजे संस्कृतमधलं साहित्यच असायचं. तसं ऐकलं होतं कीं मराठीतलं दुर्गासप्तशती दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलं गेलंय. पण ते सारं धार्मिक. मग इतर कांही मराठीतलं असेल तर शोधाशोध करावी म्हटलं तर सध्या लॉकडाऊन ! कुठं जाऊन शोधणार? मग विचार करता करता नाव आठवलं कीं काहीतरी आपल्याकडे वेगळंच साहित्य आहे.  

*महाकविकुलगुरू कालिदासचं..!*

      कुमारसम्भव, रघुवंश ही महाकाव्ये, ऋतुसहार, मेघदूत ही खंडकाव्ये, अभिज्ञान शाकुंतलम्, मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् ही नाटके कालिदासाने लिहिलेली. पण हे सारं तर संस्कृतमध्ये ! 
       शालांत परीक्षेपर्यंत संस्कृतचा अभ्यास केला. पुढे खंडित झाला. होणारच ना ! आम्ही कुठे विद्वान-पंडित ? 
      तीनचार वर्षांपूर्वी एका ऐसी अक्षरेप्रेमी वाचकानं एका पुस्तकाची झेरॉक्स प्रत आणून दिली होती. आणि आज अगदी योगायोगानं पुस्तकसंग्रहातून हाती आली.

'कविकुलगुरू कालिदासविरचित मेघदूताचा मराठी पद्यानुवाद (मुक्तामाला)
 लेखक : शेषराव गोविंद जोशी
       साधारण साठच्या दशकातल्या या पुस्तकाची ही ३०-३१पानांची छायाप्रत! 
       मेघदूत : हिमालयातील एका यक्ष आणि यक्षिणीच्या प्रेमावर कालिदासानं लिहिलेलं खंडकाव्य. 
     मूळ संस्कृत काव्य मंदाक्रांता वृत्तामध्ये आहे. मराठी पद्यानुवाद शार्दूलविक्रिडित, पृथ्वी, दिंडी वृतांत आहे. एखाद्या जुन्या ग्रंथालयातच हे पुस्तक शोधावं लागेल. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागात अनुक्रमे ७० आणि ५८ श्लोक. यातले कांही निवडक श्लोक वाचकांसाठी इथे देतो. जेंव्हाकेव्हा पुस्तक मिळेल तेव्हा जरूर वाचावे. 

  पृथ्वी :
  मनांत मग आठवी विरहिणी प्रिया सुंदरी। 
  तिला विरहव्याकुला करिति श्रावणाच्या सरी॥ 
  तनू त्यजिल कीं भयें कुशल वृत्त द्याया तिला। 
  विचार करुनी घना चतुर दूत तो कल्पिला॥६॥ पूर्वमेघ ..

  बसूनि पवनावरी वरिवरीहि जाशी जरी। 
   करें अलक सारुनी तुजसि लक्षिती सुंदरी॥ 
   सखा तुजसि कल्पुनी मधुर भाव चित्तीं धरी। 
   घरींचि परतेल कीं रमणमूर्ति गेली दुरी॥११॥ पूर्वमेघ  ..

    शार्दूलविक्रिडित:
   जाशी शीघ्रगती दिसेल तुजला माझी प्रिया संप्रती। 
   बोटाने दिन दीन ती गणि सती झाली कृशा जी अती। 
   आशेच्यावरि जीवना जगविते ती कोमलांगी घना। 
   आशाबन्धचि अंगना विरहिणी आधार कीं जीवना॥१५॥ पूर्वमेघ ..

   तन्वंगी नवयौवना कृशकटी बिंबाधरा सुंदरी। 
   नाभीची सुषमा विलोलनयना भ्याल्या मृगीच्यापरी॥ 
   श्रोणीभारवशा मदालसगती दंतावली साजिरी। 
   ईषन्नम्र तनू उरोजविभवें आद्या कृती कीं खरी॥२४॥ उत्तरमेघ ...

    मित्रांनो, हे जरूर का वाचावं, तर सांप्रतकाळी कोणीही अस्मादिकांसारखा ट ला ट, फ ला फ जोडून कविता तयार करून पोस्ट करुन, मला कवी म्हणा असं ओरडत असतो. पण हे काव्य पहा ना. संस्कृत काव्याचा अनुवाद, तोही वृतांत ! लेखक महाशयांनी किती परिश्रमपूर्वक हे काम केलं असेल याची कल्पना यावी, म्हणून वरील चार श्लोक वाचायला दिलेत. 
    सध्या वेळ आहे तर जाणून घ्या ना मराठीतलं हे सौंदर्य.
    
    घरीच रहा, ' राहिले रे दूर घर माझे ' अशी म्हणायची वेळ येऊ नये म्हणून....

बेलवलकर गृहनिर्माण

 १३ एप्रिल २०२०

Thursday, 23 July 2020

पुस्तक परिचय १६

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १६ वा

       पाह्यलंत, लॉकडाऊन जाहीर केल्यावर दोन आठवडे केव्हा उलटून गेले ते कळलंही नाही. हां, आता १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा मुक्काम आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ' अरे देवा !!! '  असा उसासा टाकला आणि तेवढ्यात किशोरकुमारच्या एका जुन्या गाण्याची व्हिडिओ क्लिप व्हॉट्सएपवर, एका स्पेशल कॉमेंटसह मित्रानं फॉरवर्ड केली. आपला आशावाद किती प्रखर असतो, त्याचं उदाहरण दाखवणारी कॉमेंट..

"लॉकडाउन जब खत्म होगा उसके बाद बजनेवाला पहला गाना " ही ती स्पेशल कॉमेंट.
आणि क्लिपमधलं गाणं ..

"अरे भाई निकलके आ घरसे आ घरसे 
 अरे भाई निकलके आ घरसे आ घरसे 
  दुनियाकी रौनक देख फिरसे, अजी देख फिरसे .."

       आधी टीव्ही बंद केला आणि  खट्याळ किशोरकुमारच्या आवाजातलं आणि पडद्यावरचं त्याचं स्फूर्तीदायक असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतलं मिश्किल ठुमकत गायलेलं, मन प्रसन्न करणारं हे गाणं आधी ऐकून घेतलं. चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. 
     हातातलं पॉकेटसाईज छोटं पुस्तक पुन्हा उघडलं. 
     खलील जिब्रान या मूळ लेबाननला जन्मलेल्या परंतु नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या तत्ववेत्ता, साहित्यकार आणि चित्रकार असलेल्या लेखकाचं, श्रीपाद जोशी यांनी मराठीत अनुवादीत केलेलं *बंडखोर आत्मे* हे पुस्तक बऱ्याच दिवसांपूर्वी विकत घेतलं होतं. या लॉकडाऊनच्या काळात त्याच्या वाचनाचा योग होता म्हणायचं! प्रस्तावना वाचल्यावर अर्थातच कुतूहल जागं झालं आणि बघता बघता, ' गुलबदन ', ' नववधू ', 'थडग्यांचा आक्रोश ' या कथा झटपट वाचूनही झाल्या.
     खलील जिब्रान - १८८३ ते १९३१. जीवन आणि जीवनातील सारे कर्म हाच त्याचा धर्म होता. तो म्हणतो, ' The Church is within you. You yourself are your priest. All that is worthwhile is a free spirit.' 
    ' व्यक्तीच्या जीवनप्रेरणा जितक्या उत्कट आणि प्रामाणिक बनत जातील तितके व्यक्तीचे व्यक्तित्व कमी होत जाते आणि ती विश्वमय होऊ लागते. व्यक्तीला विश्वमय बनविणाऱ्या या प्रेरणा खलील जिब्रानच्या भाषेत सांगायच्या तर ' Faith, love and work ' या होत.
     जिब्रानने गुलबदनमध्ये रंगवलेली स्त्री म्हणते, ' परंतु मी उठले. स्त्रीजातीच्या या मूर्खपणातून मी स्वतःला सोडवून घेतलं.मी माझ्या पंखांना दुर्बलतेच्या नि गुलामीच्या पाशांतून मुक्त केलं; आणि प्रीतीच्या नि स्वातंत्र्याच्या वातावरणात मी विहार करु लागले.आता मी सच्चरित्र आणि शीलवान आहे ...' 
     ' थडग्यांचा आक्रोश ', मध्ये जिब्रान अमीराच्या न्यायव्यवस्थेवर बोलतो. 
      ' तीन माणसांना तुरुंगाने गुन्हेगार ठरविले, कारण ते दुर्बळ होते; आणि कायद्याने त्यांना यमसदनी पाठविले, कारण तो बलवान होता ...एका माणसाने दुसऱ्या माणसाचा खून केला म्हणून तो खुनी ठरला; परंतु जेव्हा अमीराने खुनी इसमाचा खून करविला तेव्हा तो न्यायाचा पुतळा समजला गेला ! ' 
     खलील जिब्रानच्या कथा समाजातल्या बंडखोर आत्म्यांचं मनोगत आपल्याला ऐकवून सुन्न करतात.
     वाचकमित्रांनो, वाचन आपल्याला खूप आनंद देतं, समृद्ध करतं. जे वाचाल ते उत्तम वाचा. जे आपल्याला अंतर्मुख करेल. मनन चिंतन करायला भाग पाडेल. यापरीस आणखी काय सांगणार ... ? 
    अरे हो ... 
    लॉकडाऊन संपल्यावर पहिलं गाणं ऐकाच ऐका ...
' अरे भाई निकलके आ घरसे, 
  दुनियाकी रौनक देख फिरसे ..
पण सध्या मात्र, घरीच थांबा, आपली, आपल्या कुटुंबीयांची आणि साऱ्या देशाची काळजी घ्या..शुभेच्छा ...
         
बेलवलकर गृहनिर्माण

 १२ एप्रिल २०२०
....

Wednesday, 22 July 2020

पुस्तक परिचय १५

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १५ वा
 
      हातात रिमोट घेऊन मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेतल्या वाहिन्यांवर बातम्या अथवा अन्य कार्यक्रम बघता बघता कंटाळून गेलो असता, समोरच्या टीव्ही वाहिनीवर आयफेल टॉवरची छबी  झळकली. आता हा टॉवर म्हणजे कांही एखादी चालती बोलती व्यक्ती नाही. पण, आज या टॉवरच्या छबीकडे बघताना का कुणास ठाऊक हा टॉवर अगदीच उदास एकांडा वाटला. कदाचित कोणीही आपल्यासारख्या जगतविख्यात मनोऱ्याला ढुंकूनही पाहात नसल्याची खंत वाटत असावी त्याला. अहंकार एवढा असला तरी, मान वेळावून पाहणे त्याला शक्य नसले तरी समोरुन त्याला कोणीही उत्साही पर्यटक दिसत नसल्याने बिचारा टॉवर उदास भासला. कोण येणार ना त्याला पाह्यला ?         

      फ्रान्स-नेपोलियनच्या विजयी इतिहासाची वैभवी प्रगत परंपरा लाभलेल्या या देशावर सध्या कोरोना नावाच्या विलक्षण क्रूर विषाणूनं असा काही हल्ला केलाय की या महामारीनं आज फ्रान्सला हतबुद्ध करुन ठेवलंय. हाती प्रचंड साधनं, सामग्री, प्रगत विज्ञान असं सारं असूनही या न दिसणाऱ्या राक्षसी विषाणूचा अक्राळविक्राळ विळखा अवघ्या फ्रान्सभोवती  पडलाय. हजारों फ्रेंच त्याच्या भक्ष्यस्थानी पडलेत! आणि याच्या कित्येक पटीनं याच्या संसर्गानं इस्पितळात जीवनमरणाचा संघर्ष करताहेत! 
     हा तोच का देश जिथं *Paris* नावाचं सर्वांवर भुरळ घालणारं अतिनवलाईचं जगाला मोहवून टाकणारं राजधानीचं शहर आहे ? 
      असें एकामागोमाग एक विचार मनात येत असतानाच व्हॉट्सएप नावाच्या मीडियावर एक प्रेरणा देणारा नेपोलियन बोनापार्टचा म्हणून आलेला संदेश मित्राकडून आला. 
      *नेपोलियन*..., अशक्य हा शब्दच ज्याच्या शब्दकोषात नाही असा फ्रान्सचा दिग्विजयी सेनानी.
या व्हॉट्सएप संदेशाचा गोषवारा असा ...
     ' आल्प्स पर्वत पार करण्याचा प्रयत्न ज्यांनी कुणी केला, ते कुणीच जिवंत परत आले नाहीत ' असे एका म्हातारीने नेपोलियनला सांगताच, ' चला रे सैनिकांनो, तुम्हांला आल्प्सच्या पायथ्याशी घेऊन जातो. पर्वत पाहून नंतर ठरवा आपण पुढे जायचे की नाही. जर तुम्ही नाही म्हणालात तर आपण मागे फिरू!' असे घाबरलेल्या सैनिकांना सांगताच, सारेच सैन्य उत्साहाने आपल्या नेपोलियन नावाच्या सेनानीच्या मागे निघाले.
    अनेक योजने, अनेक टेकड्या,  पर्वतशिखरे पार करीत सैन्य एका ठिकाणी आले, तेव्हा, नेपोलियनला विचारण्यात आले, 'अजून किती पुढे जायचेय ? '  नेपोलियनने उत्तर दिले, 'आल्प्स आपण कधीच पार केलाय....!' 
    कोरोना, लॉकडाऊन, यावरील भीषण बातम्यांचे सावट या  'आल्प्स' सारखेच आहे जणू!  यावर सहज मात करता येईल....' 
    खरंच ना. पुढच्या कांही दिवसांनंतर आपणही कदाचित असंच म्हणू ...
' संपली बुवा ही सक्तीची गृहबंदी.'  ' गेलं बाई ते एकदाचं कोरोना नावाचं भूत ! कळलंही नाही कसे निघून गेले ते खडतर दिवस !' 
    या व्हॉट्सएपवरील संदेशाच्या विचारातच पुस्तकाचं कपाट उघडलं. योगायोग पहा, ' हातात पुस्तक आलं, म.श्री.दीक्षितलिखित नेपोलियन चरित्र.' 
      नेहमीच्या सवयीनुसार पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधी चाळायला सुरुवात केली. सामान्यतः एखाद्या थोर  व्यक्तीचं एखादं सर्वसामान्यांना परिचित असलेलं संदेश देणारं वाक्य कुठे येतंय त्याचा पहिला शोध घेतला जातो. आम्ही तेच केलं.
    ' ..... लोदीच्या विजयाला नेपोलियनच्या जीवनात असाधारण महत्व आहे. या धाडसी विजयामुळे साऱ्या युरोपात त्याचे नाव झाले. फ्रेंच सैन्यावर या विजयाची अशी विलक्षण छाप पडली की, ते त्याला ' लिटल् कॉर्पोरल ' या लाडक्या नावाने संबोधून त्याचा जयजयकार करु लागले. बंदुकांच्या आणि तोफांच्या अग्निवर्षावात पुलावर घुसण्यापूर्वी *'Impossible- that word is not French '* हे मंत्रवाक्य तो सहज बोलून गेला होता.' 
     आपल्या छोट्याश्या मनोगतात लेखक *म.श्री.दीक्षित* म्हणतात, "जगातील जवळपास सर्व भाषांमध्ये नेपोलियनची चरित्रे लिहिली गेली, यातच जग जिंकू पाहणाऱ्या या महापुरुषाची योग्यता दिसून येते. शौर्य, धैर्य, महत्वाकांक्षा अंगी बाणलेल्या या मातृप्रेमी पुरुषाचे चरित्र माझ्या वाचनात आल्यावर मी भारावून गेलो. रगेल आणि रंगेल या दोन विशेषणांत त्याचे वर्णन करता येईल." 
      मंडळी, पुस्तक वाचायला सुरूवात करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुस्तकात आल्प्स पर्वत संदर्भातील उपरोक्त माहिती आहे किंवा नाही हे पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय कळणार नाही. पण नेपोलियनच्या नावाने आलेला हा व्हॉट्सएप संदेश तूर्त तरी आपणा सर्वांना एक आशादायी प्रेरणा देतो हे नक्की.
     जाता जाता मराठी चित्रपटातले दोन गाणी आठवली.

१. घर हीच राजधानी, 
नाही उणे कशाचे...
२. घरांत हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे ...

' तुम्हां सर्वांचं शरीरस्वास्थ्य आणि मन:स्वास्थ्य उत्तम राहो, या सदिच्छा ..

बेलवलकर गृहनिर्माण

 ११ एप्रिल २०२०

Tuesday, 21 July 2020

पुस्तक परिचय १४

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १४ वा

     ' जे न देखे रवी, ते देखे कवी '  असं एकदा गुरुजी म्हणाले होते, ते आठवलं. आता यावर उदाहरण  आत्ता नाही सांगता येणार. का काय विचारताय ? नाही आठवत. हो पण यावरून लेखकाच्या शब्द वळवण्याविषयी म्हणा किंवा शब्दांचा हव्वा तस्सा वापर करण्याचे कौशल्य म्हणा, यावर आज मात्र बोलावं वाटलं. 
     ' जे भाषापंडिता न सुचे 
    तिथे कौशल्य दिसे लेखकाचे ' 
असं म्हणावंसं वाटलं, जेंव्हा, आमच्या वाचनात, ' प्रिया पहाटते आहे ', असे वाक्य आले.
     एक गंमतीची आठवण  सांगतो. अवघड अशा एका  कठीण प्रसंगातल्या या आठवणीला गंमत म्हणायचे की कसे, हे वाचकाने ठरवायचे. तर, मुद्द्याचं काय की शाळेची परीक्षा जवळ आली होती, पहाटे उठून अभ्यास करायचा हा नियम. उठलो होतो साधारण पहाटे चारला. आई, वडील, बहीण, भाऊ झोपलेले. हातात अभ्यासाचं पुस्तक धरलेलं आणि पुस्तकात कादंबरी!! तेवढ्यात धडधड धडधड असा आवाज होऊन हादरे बसू लागले. वडील ताडकन उठत म्हणाले, 'भूकंप sss' .. कसंबसं पुस्तक लपवलं. अडणाणीतल्या वयांत लपूनछपून वाचावी अशी कादंबरी शृंगारिकच असणार ना ! 
तर, अशी वाचनाची जोपासलेली आवड.
     अनेक लेखकांची पुस्तके वाचली. कथा, रहस्यकथा, कादंबऱ्या.. यांव न ट्यांव .. विविध लेखकांच्या विविध शैली, कल्पनाविलास, कथाभाग रंगविण्याच्या खुबी, भाषासौंदर्य इत्यादी इत्यादी ..
    परंतु, ' प्रिया पहाटते आहे ' असं वाक्य, या वाक्यात दडलेला कल्पनाविलास प्रथमच वाचण्यात आला. भूकंपाचा धक्का नाही म्हणता येणार या वाक्याला, पण धक्कादायक गोड गुदगुल्या जाणवल्या. कारण लेख शृंगारिक! वाचून दाखवू थोडासा ? ...
      '.....तिची सतेज कांती, तिचे काळेभोर डोळे, तिची छानदार उंची आणि त्यामुळे आलेला डौल,  तिचे जास्वंदी रंगाचे पातळ ओठ, तिचं लयदार चालणं, तिच्या केसांचं भुरभुरणं तुमचं मन नकळत खिळवून टाकतं.
     अशावेळी तुम्ही जर तुमच्यासमोर असलेल्या वेळकाढू भिडूला "काय कंडा पोरगी आहे" असं अपातत: म्हणालात तर नक्की समजावं की तुमच्या मनात त्या मुलीविषयी प्रेम नाही.मनात फक्त दडपला गेलेला उग्र शरीरविकार आहे. अशावेळी तुमचं हसणं, तुमच्या शरीराच्या हालचाली, तुमची दृष्टी कुणाही मुलीला आकर्षक प्रेमभरी वाटणार नाही, तिरस्करणीय वाटेल. तिच्याही मनात तुम्हांला त्या क्षणी पाहता प्रेम उद्भवणं अशक्य आहे.
       जर तुम्ही तिच्या तशा येण्यानं आतून हलून गेलात, तुमच्या खोल अंतर्यामात एक हळूच थरथर निर्माण झाली, जिवात एक भावमुग्ध कमळ उमलल्यासारखं वाटलं, चिवड्यासारख्या चटकदार गप्पांतून तुमचं लक्ष उडालं नि मंत्रमुग्ध झाल्यासारखं मन भारून गेलं; तर नक्की समजावं की उद्याच्या प्रियेची ती पहिली भेट आहे ...प्रिया पहाटते आहे.'  (साभार)
      वाचकमित्रांनो, स्पर्शकमळे या आनंद यादव या विख्यात साहित्यिकाच्या अठरा शृंगारिक लेखसंग्रहातले हे सुंदर लेख तुमचं मन प्रसन्न करतील, ही खात्री आहे. 
      मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या सुंदर पुस्तकाचे मुखपृष्ठसुद्धा सुंदर आहे. ग्रंथालयातून आणण्यापेक्षा पुस्तक विकत घेऊन पुनःपुन्हा वाचावे असे हे संग्राह्य पुस्तक आहे.
     लॉकडाऊन वाढला तर वाढू द्या हो. एकदाच काय तो त्या कोरोनाचा नि:पात होऊ द्या. 
     शुभेच्छा .. 
इंग्लिशमधे सांगू ? 
Best Wishes...
      
बेलवलकर गृहनिर्माण

 १० एप्रिल २०२०

Monday, 20 July 2020

पुस्तक परिचय १३

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १३ वा

     " कुठून आणलास हा चिमटा ? "
     " मी विकत आणला आहे."
     " केवढ्याला ? "
     " तीन पैशांना."
     अमिनाने तर आक्रोशच केला. हा कसा पोरगा आहे.. दुपार होत आली. काही खाल्लं - पिलं नाही आणि हा चिमटा घेऊन आला ! 
      " एवढ्या जत्रेत तुला या चिमट्याशिवाय दुसरं काही दिसलं नाही का ? " ती रागावतच म्हणाली.
       हमीदचा तर चेहराच उतरला. अतिशय अपराधी भाव चेहऱ्यावर आणत तो म्हणाला, "तुझे हात तव्यावर भाजत होते ना .. म्हणून मी हा चिमटा आणलाय."
      आजीचा राग क्षणात विरघळला. एका वाक्यातच हमीदनं तिला जिंकलं होतं. आई-बापाविना एवढंसं पोर; पण किती समजदार, केवढा त्यागी ! खरं तर, इतरांना खेळणी घेताना पाहून आणि मिठाई खाताना पाहून या लहानग्याच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल; पण किती संयम बाळगला पिलाने. तिथंही त्याला आपल्या म्हाताऱ्या दादीचीच आठवण झाली.' 
       प्रेमचंद यांच्या ' ईदगाह ' या कथेतला हा भाग वाचतांना डोळे आपोआप पाणावले.  आजुबाजूला इतक्या हवाहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी असतांनासुद्धा छोट्या हमीदला आपल्या आजीच्या हाताला बसणारे चटके दिसत होते. त्याच्या साऱ्या संवेदना आजीसाठी होत्या. तिला तिच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्याचे डोळे सुरक्षा साधन शोधत होते. त्यापुढे त्याला त्याच्या इच्छा क:पदार्थ वाटत होत्या.
      सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळात आपल्या प्रत्येकालाच या लहानग्याच्या अशाच समंजस संयमाची गरज आहे.
      मुन्शी प्रेमचंद, एकोणीस-विसाव्या शतकातले संवेदनशील लेखक. त्यांच्या मूळ हिंदी भाषेतील कथांचा 'प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ कथा' हा संग्रह, डॉ.विशाल तायडे यांनी मराठीत अनुवादीत केलाय. 
      या संग्रहातील ही ईदगाह, नशा, दोन बैलांची कथा, अशा सर्वच बारा कथा वाचनीय आहेत.
      शाळेतल्या पाठ्यपुस्तकात मुन्शी प्रेमचंद यांच्या काही कथा अभ्यासाला होत्या. 'ऐसी अक्षरे' च्या मागील कांही अंकांमध्ये आम्ही प्रेमचंदांच्या कांही कथा आवर्जून घेतल्या होत्या.
      या संग्रहातील ' दोन बैलांची गोष्ट ' वाचकाला खूप कांही सांगून जाते. 
       वाचकमित्रांनो, गेले बारा दिवस कांही निवडक पुस्तके आम्ही तुम्हांला सुचवली आहेत. अजूनही कांही पुस्तके तुम्हांला सुचवायची आहेत. आपल्यातील प्रत्येकाला आपल्या कामाची  कितीही काळजी, गरज असली तरी, सध्या घरात बसूनच आपल्याला आपला संयम वाढवावा लागेल. आपल्या सर्वांच्याच संयमाने लवकरच मुक्त वातावरणात जाण्याचा योग जुळवून आणणं हे आपल्याच हाती आहे. 
   तोपर्यंत या वाचनछंदाला शरण जाऊ या... शुभेच्छा ..

बेलवलकर गृहनिर्माण

 ९ एप्रिल २०२०

Sunday, 19 July 2020

पुस्तक परिचय १२

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १२ वा

      शेरोशायरी म्हटलं की, आमच्यासमोर लगेच "अर्ज है ", "इर्शाद" असे शब्द उच्चारणारी मंडळी बसलेली दिसू लागतात. अशा मेहफिलमध्ये आमच्यासारखे कोणी 'अडाणी' बसले असतील तर त्या मेहेफिलीच्या  काही नियमांचे त्यांना पालन करावे लागते. म्हणजे असं की, कोणी मधेच उठून "वाहवा, वाहवा",  "क्या  बात है" असा प्रतिसाद देणारे दर्दी दिसले तर त्यांच्या सुरात आपलाही सूर मिसळून दाद द्यावी लागते. कारण एकतर शायरीतले बरेचसें शब्द डोक्यावरून गेलेले असले तरी आपल्याला काहीही समजत नाही हे दाखवायचे नसते. अर्थात एकही शेर कळलाच नाही असेही होत नाही. कारण एखादा निवेदक चटकन एखाद्या शायरचा किंवा गालीबचा शेर ऐकवतो, जो आपल्या पचनबुद्धीला सांभाळून घेतो. जसे की, 

' खता किस जबांसें करुं उनके न आनेकी ! मेरे दिलमेही जो रहते हैं! ' 

कारण या अनुभवातून आम्ही अनेकवेळा ! गेलेलो असतो. हसलात ना? स्वतःवर पण हसा ! 
आणि सरतेशेवटी निवेदक म्हणतो, 

' मेहेरबान होके बुला लो मुझे चाहो जिस वक़्त । मैं गया वक़्त नहीं की फिर आ न सकुँ ॥ ' 

हे कांही अगदीच न समजण्यासारखं नाही हं ! 
      आमची ही अडचण साधारण पस्तीस एक वर्षांपूर्वी एका मराठी शायरनं ओळखली होती. त्या काळात क्यासेट्सचा नवा फंडा आला होता. पुलं, वपु या दिग्गज व्यक्तींच्या क्यासेट्सनी रसिकांना मेजवान्याच द्यायला सुरुवात केली होती. त्यातच आणखी एक  मिश्किल नाव दाखल झालं होतं,
 *भाऊसाहेब* *पाटणकर*

"दोस्तहो मैफिल आपुली, रंगण्या जर का हवी 
आम्हां नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी 
ऐसे जरी नक्कीच, घेवू तुमच्या मुखाने ' वाहवा ' 
ती ही अशी, ज्या ' वाहवा ' ला, द्यावी आम्हीही ' वाहवा!!"

     मंडळी, 

      मराठीमध्ये अशी, 
' शेरोशायरी अमुच्या पचनी पडायला वेळ नाही लागला ...
सारंच इतकं कांही भावलं की, चार दोन शेर आम्हीही जुळवून ऐकवले समोरच्या आरशाला ...' 

हसू नका ...

     भाऊसाहेबांची निवेदनाची पद्धतसुद्धा इतकी सुंदर, की ऐकून, अगदी तस्संच शेर ऐकवण्याचं कसब त्या काळी मित्रांना ऐकवण्यासाठी अस्मादिकांनी अंगी बाणवलं होतं. असो.
      मैफिल हे भाऊसाहेब पाटणकर यांचं एक अगदी छोटेखानी, अवघ्या ६८ पानांचे पुस्तक आमच्या पुस्तकसंग्रहात एका जाडजूड पुस्तकात खुणेसाठी ठेवलेले होते. आज त्यातलेच काही शेर तुम्हांला वाचायला देतो.
' शृंगार ', ' लज्जा ', ' लावण्य ', ' नाजूकता ', ' जीवन ', ' विनोद ',  ' दार्शनिक ', ' इश्क ',  ' मृत्यू ', यावर मोठया सुरेख शब्दलालित्याने भाऊसाहेबांनी हे शेर लिहून ठेवले आहेत..
ऐका, (म्हणजे वाचा, आता हे लिहिता लिहिता आम्ही तोंडाने पुटपुटतोय, म्हणून ऐका म्हटलं)

' उन्मेष ज्यांच्या यौवनाचा, काहीच ना झाला कमी 
प्यायले जे खूप, ज्यांना वाटे परी झाली कमी
निर्मिली मी फक्त माझी, त्यांच्याचसाठी शायरी 
सांगतो इतरांस बाबा, वाचा सुखे 
' ज्ञानेश्वरी ' 

' हसतील ना कुसुमे जरी, ना जरी म्हणतील ' ये ' 
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे
भ्रमरापरी, सौंदर्यवेडे, आहो जरी ऐसे अम्ही 
इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही ' 

' टाकिसी हळुवार अपुली, नाजूक  इतुकी पाऊले 
टपकती हलकेच जैसी, पारिजाताची फुले 
नाजूकता जाणून आम्ही, आधीच होती बिछविली 
पायातळी केव्हाच तुझिया, विकल हृदये आपुली ' 

    रसिक वाचकांनो, हे तीन चार शेर वाचता वाचता कधी तुमच्या ओठांवर येतील याचा पत्ताही तुम्हांला लागणार नाही ! सर्वच शेर सुरेख आहेत. 

     लॉकडाऊन लवकरच संपून कोरोनाचा खात्मा होईल असा विश्वास व्यक्त करुन तुम्हांला तुमच्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.
      "बाबा ऑफिसमधून लवक्कर घरी या" ही वाक्ये पुन्हा ऐकण्यासाठी आपण सारेच त्या दुष्ट कोरोनाला घराबाहेर रोखुनच त्याचा नि:पात करुयात.

बेलवलकर गृहनिर्माण

 ८ एप्रिल २०२०

Saturday, 18 July 2020

पुस्तक परिचय ११

ऐसी अक्षरे: महायुद्ध कोरोनाशी

दिवस ११ वा

   ' पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या राजकीय रमीचा डाव खेळतात आणि त्या नेहमीच जिंकतात. पत्ते बरोबर नेमके कसे सरकवायचे, सिक्वेन्स अचूक कसा जुळवायचा यांत त्यांचा हातखंडा आहे.' 
    हे आम्ही सांगत नाही, जरा वाचा पुढे ..
    राजकारणात ज्यांना स्वारस्य आहे, त्यांची नजर या पहिल्याच वाक्यावर पडली की, पोटात लपलेले त्यांच्या आवडत्या विषयाचे अनेक कावळे कावकाव करु लागतील ! 
    ' महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी चौदा खासदारांनी गेल्या पाच वर्षांत लोकसभेत एक शब्दही उच्चारला नाही.' 
   ' मुख्यमंत्री अंतुले यांनी विधानसभेत आपण पंतप्रधानांना राजीनामा सादर केल्याचे जाहीर करताच लागलीच दुसऱ्या दिवशी भराभरा विमाने पकडून मंत्री दिल्लीत येऊन थडकले, एका श्रीमंत आमदाराने कांही मंत्र्यांची विमानाची तिकिटे काढली होती, असे म्हणतात......' 
     महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून १९७८- ८९ या काळात ज्येष्ठ पत्रकार *श्री.अशोक जैन* दिल्लीत काम पाहात होते. त्या काळातले त्यांचे अनेक अनुभव त्यांनी  *राजधानीतून* या आपल्या पुस्तकात लिहिले आहेत. या पुस्तकाबद्दल ते लिहितात की, ' हे पुस्तक म्हणजे केवळ बहारदार किश्शांची पोतडी मानली जाऊ नये, तर त्यातून डोकावणाऱ्या इतिहासाचा अन्वयार्थ वाचकांनी लावल्यास त्यांना आपोआपच सुसंगती लागेल.' 
    ऐसी अक्षरेच्या वृत्तपत्रातील साहित्य विशेषांकासाठी आम्ही अशा साहित्याच्या शोधात असतांना हे पुस्तक हाती आलं होतं. हा विशेषांक तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला होता.
    पुस्तक वाचतांना काही किश्शांना आधीच कंस टाकून ठेवले असल्याने, अगदी सगळेच नाही, तरी कांही किश्श्यातली नेमकी वाक्ये तुमच्याकडे पोहोचवतो. म्हणजे औत्सुक्यापोटी लॉकडाऊन उठताच पुस्तक घेण्यासाठी आपण नक्कीच पुस्तकालय किंवा ग्रंथालय गाठाल अशी तजवीजच या वाक्यांद्वारे आम्ही करुन ठेवत आहोत. 
     वाचा तर मग ...
     ' नेत्यांच्या दिल्लीच्या हवेत एक दांभिकपणाही भरलेला आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या 'इनसायडर' (अंत:स्थ) या कादंबरीतील एक वाक्य मला फार आवडतं. ते म्हणजे - 'दिल्लीत चेहरे भेटतच नाहीत, भेटतात ते सारे मुखवटे.' 

      ' सुंदरा मनामधे भरली, 
      जरा नाही ठरली, 
      हवेलीत शिरली, 
      मोत्याचा भांग ....' 
   राजधानीतील मावळणकर सभागृहात खणखणीत आवाज घुमला. रामजोशींची ही अजरामर लावणी गात होते ' शाहीर ' वसंत साठे (म्हणजे केंद्रीय रसायन खात्याचे मंत्री). श्रोत्यांमध्ये खुद्द पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री आणि खासदार मंडळी होती ....' 

    ' वाजपेयी यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच केलेले भाषण हा त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा उत्कृष्ट नमुना होता. ' एक स्वप्न भंगले म्हणून दुसरे स्वप्नच पाहायचे नाही का ? ' असा सवाल करतांना त्यांच्या वाणीतील आशावादाचे आणि ' रस्ता खूप लांब आहे, दूरचा आहे कठीण आहे. तरीही चलते रहो, चलते रहो ' असे आवाहन करतांना त्यांच्यातील आश्वासकतेचे दर्शन घडले.' 

     मंडळी, या पुस्तकात अनेक घटना, घडामोडी, अनेक बड्या नेत्यांचे वेगवेगळे किस्से जैन यांनी उत्तम पद्धतीने लिहिले आहेत. 
    या ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी सदरात विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख आम्ही करुन देत आहोत. गेल्या दहाबारा दिवसांत लॉकडाऊनमुळे पृथ्वीवरील प्रदूषण जसं झपाट्यानं कमी होऊन स्वच्छ वातावरणाचा प्रभाव वाढलाय, तद्वत असंख्य पोस्ट्सचा कंटाळा येईपर्यंत फाफटपसारा वाढवून ठेवणाऱ्या मीडिया आणि तत्सम माध्यमांमुळे झालेलं सांस्कृतिक गोष्टींवरील प्रदूषण या वाचन सवयीमुळे नक्की कमी होईल असा आम्हांला विश्वास वाटतो.
       
बेलवलकर गृहनिर्माण

 ७ एप्रिल २०२०

Friday, 17 July 2020

पुस्तक परिचय १०

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस १० वा

   ' घरे अगदी बोलू लागतात ..!' 
   ' उंच घरे, बुटकी घरे, जाडी घरे,  पातळ घरे, काळी घरे, गोरी घरे, --निळी, हिरवी, पिवळी घरे ! घरेच घरे ! आतिथ्यशील घरे आणि 'हुडुत' म्हणणारी घरे; नाजुक घरे तशीच वेडीविंद्री कुरूप घरे; लाजरी घरे आणि डोळा मोडणारी घरे; खेळकर घरे आणि प्रौढ घरे-- प्रौढ असून मिश्किल घरे ! ' 
   ' क्वचितच असे एखादे घर पाहायला मिळते की जेथे अगदी साध्या वस्तूंतून -- दगड, विटा, लाकूड यांतूनच -- बांधलेल्या त्या वास्तूकडे बघितले की असे वाटावे, येथे या भूमीवर या मातीवर प्रेम करणाऱ्या कोणाचा तरी हात त्यांच्यावरून फिरला आहे. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तित्वांची ओळख असणारा आणि त्यांच्याशी एकरूप होणारा कोणी तरी येथे आहे. भिंतीत आपला वापर झाल्याने दगड खूष असतात.आपल्या नाजुक रेषांतून विटा एक गोडवा आणतात आणि लाकडाच्या पृष्ठभागावरील अति मनोहर रेषा एक निराळीच किमया उत्पन्न करतात. आईने प्रेमाने खेळवावे इतक्या वात्सल्याने ते घर सभोवतालच्या भूमीने उचललेले असते.' 
   ' कांही घरे सकाळी बघायची असतात, कांही संध्याकाळी. सकाळच्या कोवळ्या उन्हात एखाद्या नाजुक घरावर सोनेरी झिलई येते आणि अंगणात ऊन खात चवड्यावर बसलेल्या एखाद्या बालकासारखे ते दिसते. संध्याकाळी विस्तीर्ण सपाट टेकाडावर उभे असलेले एखादे घर अथांग निळ्या पाण्यावर स्थिर झालेल्या पांढऱ्या शिडाच्या झोकात उभे असते. आणि रात्रीची शोभा तर आगळीच.' 
   ' घर हे एक अति नाजुक तंतु-वाद्य आहे. वाद्य नीट हवे--आपल्या सर्व मन:स्थितींना अनुरूप असे झंकार त्यातून निघू शकतात. आपल्या सर्व अंतर्जीवनाला ते पडसाद देऊ शकते.ते आपले स्वतःचे रुप, तुमच्या मन:स्थितीबरोबर पालटू शकते आणि ' टू कम होम् ' यांत अभिप्रेत असलेला अगतिक जीवनाचा विसावा बनू शकते. वाद्य नीट हवे, पण वाजवणाराही कुशल हवा ! 
    तुम्ही विचाराल, ' अहो हे काय घर घर चालवलंय ? दहा दिवस होऊन गेलेत घरकोंबडे झालो आहोत ! ' किंवा विचाराल, ' तुम्ही जाहिरात कंपनी काढलीय का ? ' 
     चिडलात ? 
     आम्ही सध्या काय सांगतोय की, तुम्हांला वाचण्यायोग्य सुंदर साहित्य काय असू शकते ? 
     आणि तसंही काल नऊ वाजता मोठया आनंदानं तुम्ही अनेक दिव्यांचा उजेड घरात केलात आणि घराचं पावित्र्य जपलंत. व्हिडिओ फोटोही काढले असतील. मित्र-नातेवाईकांना शेअरसुद्धा केले असतील. आज तो आनंद घरात यत्र तत्र सर्वत्र पसरून राहिला असेलच ना.
     बघता बघता कोरोनाशी महायुद्ध छेडल्याचा आजचा दहावा दिवस. एखादं छोटंसं पुस्तक कोणतं सांगावं जे तुम्हांला आवडेल हा विचार करतांना माधव आचवल यांच्या सुंदर निबंधांचं किमया हे पुस्तक हाती आलं. अनायासे अनेक दिवसांनी घरात, आपल्या जिवलग जिव्हाळ्याच्या माणसांसोबत आहात. तर मग, टीव्ही, मोबाईलवरुन नजर काढून ह्या पुस्तकातले वरचे घरासंबंधीचे सुरेख विचार वाचता वाचता हळूच वाचनसमाधी लागावी आणि भले कसेही असू देत आपलं घर, आपण आपल्या घराकडे किती सुंदर पद्धतीने पाहू शकतो, हा विचार करता यावा, हा हे पुस्तक सुचवण्यामागचा आमचा विचार. यातून घराकडची ओढ वाढतीच राहील आणि घरात राहणं अधिक आनंददायी होईल.
    आचवल म्हणतात की, हे  सगळे लेख संवेदनाविश्वाशी निगडीत आहेत आणि त्यांचा  मध्यबिंदू वास्तुकला हा आहे.
    अहो ज्या घरात तुम्ही असणार आहात ते घर तुम्हांला सदैव प्रसन्न, सात्विक आणि आनंदी वाटावं हीच तर आमची इच्छा आहे.
     
बेलवलकर गृहनिर्माण

 ६ एप्रिल २०२०

Thursday, 16 July 2020

पुस्तक परिचय ९

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस ९ वा

      कोणतंही ग्रंथप्रदर्शन असो, त्या प्रदर्शनात दोन तीनवेळा जाऊन एखादं का होईना पुस्तक खरेदी करायचंच हा आमच्या वाचनप्रेमी नावाच्या कुटुंबाचा एक कुळाचार. या प्रदर्शनात एक विभाग असतो, जिथे धार्मिक, वेद, उपनिषदे, पुराणे, आध्यात्मिक, ज्योतिष, स्तोत्रे, संकटावर मात करण्यासाठी मंत्रशक्तीने करावयाचे उपाय अशी अनेक पुस्तके मांडून ठेवलेली असतात. या पुस्तकांची विक्रीसुद्धा खूप असावी. अशा पुस्तकांचा सुद्धा एक मोठा वाचकवर्ग नक्की आहे.
      आपण वाचनासाठी पुस्तकं निवडतो, ती प्रामुख्याने कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक, चरित्रे इत्यादी. या विज्ञानयुगात नव्या पिढीला आपल्या संस्कृतीतील पौराणिक, वैदिक प्रकारच्या कोणत्याही विषयात फारसं स्वारस्य दिसत नाही. एखाद्या पाश्चात्य अभ्यासकानं आपल्या प्राचीन अभ्यासकांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाबद्दल गौरवोद्गार काढले की आपली छाती अभिमानानं फुलते. मात्र या विषयांवर अभ्यास करायला फारशी उत्सुकता दिसून येत नाही. कारण हेही असू शकेल, की या अभ्यासाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी फारसा होत नसावा ही भीती. असो.
      साधारण तीस वर्षांपूर्वी पंडित मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांनी लिहिलेलं गायत्री विज्ञान आणि उपासना हे गायत्री मंत्रावर असलेलं एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक विकत घेतलं होतं. 
       या पुस्तकात षटचक्रे, आपलेशरीर, मन आणि मंत्र, उपासना, धारणा, ध्यान व जप यासह अनेक विषय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.    

     देवावर विश्वास नसलेले कांही विद्वज्जन, पंचमुखी गायत्रीचं चित्र बघितलं की, लग्गेच, 'असं कुठं पाच तोंडं असलेलं दैवत असतं होय ? शक्यच नाही ' असं म्हणत या विषयाची खिल्ली उडवतात. पण त्यामागे नेमकं काय चिंतन असतं ते जाणून घ्यायची त्यांची तयारी-इच्छा नसते. 

मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्र्यक्षणैर्युक्तामिन्दुनिबद्धरत्नमुकुटांतत्वार्थवर्णात्मिकाम्।

      हे गायत्रीचं ध्यानरुप अभ्यासण्याची त्यांची इच्छा नसते. मग कुठं त्यांच्याशी वाद घालत वेळ घालवायचा ? 
त्यांची विचार करण्याची आपली आपली पद्धत असेल तर असू देत त्यांच्याचपाशी.
      गायत्री मंत्राचा अर्थ आपण जाणून घेऊ या. 
     ' प्रणवोत्पन्न पृथ्वी, अंतरिक्ष, व स्वर्ग यांच्याही पलिकडे असलेल्या दिव्य सूर्याच्या पापदाहक तेजाचे आम्ही ध्यान करतो, जो सूर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो ' ..
     ही प्रार्थना केवळ स्वतःसाठीच नाही तर सर्वांसाठी आहे.
     गायत्री विज्ञान हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. एवढ्याशा विवेचनात तो समजणे अवघड आहे.
      आपले माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन हे मोठे विद्वान तत्ववेत्ता होते. गायत्रीचा महिमा सांगताना त्यांनी म्हटलंय, ' गायत्री ही मानवतेला दिलेली महान देणगी आहे.यथार्थ ज्ञानाचा स्रोत तुमच्या मनांत केवळ गायत्रीने होऊ शकेल. गायत्रीची आराधना करा की, भारतीय तत्वज्ञानाच्या प्रकाशाने तुम्ही सारी मानवता उजळून काढू शकाल. शाश्वत तत्वज्ञानाचे अक्षय्य तेवणारे नंदादीप तुम्ही मानवतेच्या मनोमंदिरात लावू शकाल.' 
     
      गायत्री विज्ञान आणि उपासना हे किंजवडेकरशास्त्री  लिखित पुस्तक जरूर वाचा.

      मा.पंतप्रधान मोदी यांनी आज नऊ वाजता दिवे लावण्याची का विनंती केली असेल, याचाही खुलासा कदाचित तुम्हांला होईल.

बेलवलकर गृहनिर्माण

५ एप्रिल २०२०

Monday, 13 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस ६ वा

"सुंदरा मनामध्ये भरली ...."

खात्री आहे नुसते हे तीनचार शब्द जरी कानावर पडले-आठवले तरी कित्येक रसिक चटकन यू ट्यूब वर जाऊन रामजोशी चित्रपटातली ही लावणी ऐकतील आणि कान तृप्त करून घेतील ! 

किती सुरेख रचना आहे, नाही का ? कधी पूर्ण वाचली आहे,  रामजोशीकृत ही शृंगारिक लावणी ? 
संपूर्ण लावणी नाही देत पण एक दोन सुरेख पंक्ती सांगतो या लावणीतल्या आणि थोडं रामजोशीच्या लावण्यांबद्दलही बोलूयात. चालेल ? 

"सुंदरा .... 
जशी कळी सोनचाफ्याची न पडु पाप्याची दृष्ट सोप्याची नसल ती नार ..
अति नाजुक तनु देखणी, गुणाची खणी उभी नवखणी चढुन सकुमार ..
नाकामध्ये बुलाख सुरती चांदणी वरती चमकति परति हिच्यापुढे फार ...
हिजपुढे नको धन माल शोभवी दिठोणा गालं ...." 
(बुलाख म्हणजे मुसलमानी पद्धतीची वाटोळी नथ आणि 
दिठोणा म्हणजे गालावरचा तीळ ..)
मंडळी, ही अशी अर्धवट लावणी वाचून नाराज व्हाल. पण मग पुस्तक घेऊन तुम्ही वाचणार कधी? 
पण कांही म्हणा एका पाठोपाठ एकेक एक सुंदर शब्द रचून कविरायांनी रसिक मनाला गुंगवून टाकलंय. 
शब्द येतात तेही तालात डौलात दिमाखात ठेक्यात आणि ...
ठसक्यात ! 
स्त्री सौंदर्याचं रसरशीत वर्णन करतांना कविरायांनी त्यात कुठेही अश्लीलता वा बीभत्सता आणली नाही.

उत्तर पेशवाईत लावणी विकास पावली. साधारण इ.स.१७४४ ते १८५० या काळात अनंतफंदी, परशराम, होनाजी, रामजोशी, प्रभाकर, सगनभाऊ हे प्रतिभाशाली लावणीकार होऊन गेले.
कविराय रामजोशी यांनी दैवतवर्णनपर लावण्या, उपदेशपर लावण्या, पौराणिक लावण्या लिहिल्या आहेत. मोठया सुरेख आहेत. काही पोवाडेही लिहिलेत.
कुठलाही रसिक आधी शृंगारिक लावण्यांकडेच बहुधा वळणार ! 

आता या लाडिक लावण्यांचे हे मुखडेच किती गोड आहेत बघा ना.

जा गडे त्याला तू घाल माझी आण ..
या मदने मज गांजिले करु तरि कैसे ..

तर सांगायचे काय की, बघा मिळतंय का हे पुस्तक कुणाकडे ? 
आणि घरी गृहिणीने प्रेमाने केलेल्या विविध पदार्थांबरोबर हाही रसास्वाद घ्या.
जिव्हा आणि मन दोन्ही तृप्त ..

रामजोशीकृत लावण्या
संपादक : डॉ.वि.म.कुलकर्णी 
              डॉ.गंगाधर मोरजे 


बेलवलकर गृहनिर्माण

२ एप्रिल २०२०

Sunday, 12 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

दिवस ५वा

शहरात कधीतरी वीज गेली की एकतर वीजवितरण कंपनीच्या नावानं लग्गेच शिमगा आणि फटाफट इन्व्हर्टर चालू.
आणि सध्या तर काय *लॉकडाऊन* ! ! 

आम्ही गावी असलो ना की अगदी ठरलेल्या वेळेवर रात्री ८.३० ला दोनपाच मिनिटांसाठी वीज जाते. थ्री फेज टू सिंगल फेज किंवा .. सिंगल फेज टू थ्री फेज .. चेंज ओव्हर ...

आम्ही चिडतो का ? तर नाही..
सवयीचा भाग म्हणून सहनही करीत असू का ? तर तसंही काही, खरंच नाही ! 
उलट,  
खाडखाड दार उघडत 
पुढच्या अंगणात पळत जातो ..

आता सध्या शहरांत घराच्या बाहेर पाऊलही टाकता येत नाही. इथं कसं बैठं घर अन् थोडं अंगण. आजुबाजूला सारं निर्मनुष्य वातावरण.
सगळीकडे मिट्ट अंधार असतो.
तुम्ही सारे ' पुढं कसं होणार ? सगळाच अंधार दिसतोय.. '  म्हणत काळजी करत बसाल  आणि आम्ही, वर, आकाशात पाहू लागणार !  
आहाहा ..
आभाळभर चांदणं असतं ! ! 

अगणित चांदण्यांचे जणू लुकलुकणारे डोळे आम्हांला पाहात असल्याचा भास होतो. 
कधी तर असं वाटतं, की दुरून या चांदण्या हळूच कानी जणू पुटपुटत असाव्यात.

' कशाला चिंता करतोस वेड्या ' ,    

आम्ही डोळे परमात्म्याचे, नजर आमुची तुझ्यावरी, 
नजरेला घे जरा सरावुनि अंधाराची सवय करी.
पळ हे जातील भरभर भरभर 
उषादेवीला फुटेल पाझर 
घेऊन येईल ती डोईवर 
कलश सुखाचा तुजसाठी रे 
अंधाराचा फोडुनि डोंगर...

आपण माणसं ना स्वतःला अति शहाणे समजतो. खरंय ना ? 
सध्या काय तर सारेच घरकोंबडे.
याचा वैताग, त्याचा वैताग ! यांच्यावर टीका, त्यांना नावं ठेव...
सोशल मीडिया, टीव्ही पाहून चिडचिड. पण मग वाचन करावं ना ! वाचनावरून एका छानश्या लेखातला विचार आठवला ...
     " बायबलात अशी एक कथा आहे, की प्रारंभी मानवाच्या सगळ्या मुलांची एक भाषा होती. त्यामुळे मुंग्यांप्रमाणे त्यांची संघशक्ती, कर्तृत्वशक्ती मोठी अचाट होती. मुंग्यांनी हा हा म्हणता वारूळ तयार करावे, तसे स्वर्गाप्रत जाण्यासाठी ती मुले बँबेल या नावाचा गगनभेदी मनोरा करू लागली.तो झपाट्याने पुरा होत असल्याचे पाहून  स्वर्गातल्या बापाला वाटले, की आता कांही आपल्या विश्वव्यवस्थेची धडगत नाही. माणसांच्या लीला मृत्युलोकाच्या मर्यादेत ठीक आहेत. स्वर्गात त्यांचा उपद्रव नको. म्हणून त्याने, ' तुम्हांला नाना भाषा येवोत ' असा शाप दिला. मूर्ख मानवांना वाटले, हा वर आहे ! भाषा अवगत झाली, तशी त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण परिणाम काय झाला ? एकाची भाषा दुसऱ्याला समजेना.सर्वत्र एकच गोंधळ उडून गेला.त्यांची फाटाफूट झाली. संघशक्ती मोडली. कलह माजले. बांधलेला मनोरा कालांतराने पडला आणि माणसाची कर्तृत्वशक्ती क्षीण होऊन बडबडत राहण्यातच त्याला इतिकर्तव्यता वाटू लागली.."

चांदण्यांचे कवडसे या बा.भ.बोरकर यांच्या पुस्तकातील माझा मौनवार या लेखातील हा तो विचार आठवला.

येतंय का कांही लक्षात ? 

बेलवलकर गृहनिर्माण

१ एप्रिल २०२०

Saturday, 11 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

 दिवस ४था

खूप दिवसांपासून एक पुस्तक कुठं मिळतंय का ते पाहतोय. अनेक ग्रंथालयांत, पुस्तकालयांत,  जुन्या वाचनवेड्या पुस्तकप्रेमींकडे चौकशी करून झाली. 
उमरखय्यामच्या रुबायांचा मराठीत खूप सुंदरसा अनुवाद गजानन व्यं.वाघ यांनी केला होता.
हे पुस्तक कांही मिळालं नाही. तुम्हांला मिळालं तर नक्की वाचा.

फार फार वर्षांपूर्वीची (फार फार म्हणजे १९७३ची-साधारण ४७ वर्षांपूर्वी वगैरे ) ही गोष्ट. माझ्या हातात हे पुस्तक पडलं. 

धडाधडा एकदा दोनदा हे पुस्तक वाचून काढले. त्यातल्या थोड्या पचनी पडलेल्या रुबाया वहीत लिहून ठेवल्या होत्या. 
लॉकडाऊन आहे. वेळच वेळ. जुन्या पोतड्या, फोटोसंग्रह शोधताना ही वही हाती लागली.  आज त्या वहीची सारी पानं पार पिवळी पडलेली आहेत. माझ्यासाठी मात्र  ऐतिहासिक महत्व लाभलेली ही पिवळी पानं  वाचतांना छान वाटलं. 
त्यावेळी सारं वाचन एक वाचक म्हणूनच झालं होतं. साहित्याचा अभ्यास असतो वगैरे हे तेंव्हा तसं माझ्या कळण्यापलीकडचंच होतं. अर्थात आजही तीच परिस्थिती..
त्या गुलाबी काळातल्या मनातल्या *परि* ची *स्थिती* 
आणि आताच्या पोक्त काळातल्या मनातल्या  *परि* ची *स्थिती* 
यां दोन्ही *परि-स्थिती* त  फारशी तफावत नाहीच.
तारुण्याच्या हंगामातला तो वाचन प्रवास आणि आता हा मुरलेल्या वयांतला पिवळी पानं झालेल्या वहीतला,  लॉकडाऊनकाळातला ..

तर तुम्हां मित्रांसाठी यातल्या चार  रुबाया खास शुभेच्छांसह, का, तर तुम्हीही या पुस्तकाचा शोध घ्याल हा विश्वास.

१.
छायेत तरुच्या इथे कोर भाकरीची 
मदिरेची सुरई आणि वही कवितेची 
   अन् असता तू लाडके, बाजुला गात 
काननास येईल मौज तया स्वर्गीची 

२.
त्या वितंडवादी विश्वाच्या गुंतून 
राहू दे पंडिता ! बैस इथे येऊन ! 
   ये माझ्यासंगे जगापासुनी दूर 
जे तुला हासते त्यासच घे हासून ! 

३.
शपथेवर ज्यांनी मदिरा प्रीती त्यजिली 
त्यांचीच उभी जर असेल स्वर्गी टोळी 
    शंकाच नको ! तो असेल स्वर्ग रिकामा 
जितुकी ही माझी मूठ रिकामी ठरली ! 

४.
हा पहा उमलला गुलाब बोले हसुनी 
"या जगतामध्ये अवतरलो मी फुलुनी
    उकलून रेशमी गोफ सुकोमल तनुचे 
उधळितो जवाहिर आतिल या उद्यानी ।! "

मंडळी, तुम्हांला जर हे पुस्तक कुठे उपलब्ध असल्याचे कळले तर या सुंदर रुबाया जरूर वाचा.
पुस्तक छोटसंच आहे.
 उमर खय्यामच्या रुबाया
मराठी अनुवाद:गजानन व्यं.वाघ

बेलवलकर गृहनिर्माण

३१ मार्च २०२०

Friday, 10 July 2020

पुस्तक परिचय

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
 
दिवस ३ रा

 " संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको "

" खरंच, वाचकहो! भटकायला तरी कुठं जाणार ? हितचिंतक वाटेत भेटले तर ते चहासाठी हॉटेलात ओढतात आणि ते किमान चौघं-पाचजण असल्यामुळे मला आत ओढू शकतात. त्यामुळे आपलं घरी राहिलेलं बरं ! ' संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको ' हा लहानपणीच अनंतफंदीनं मारलेला फटका मला आजतागायत आठवतो आहे ! "

मंडळी, या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरीच बसा हा सल्ला ऐकून तुमचे कान किटले असतील ना ! पण उपरोक्त अनंतफंदीनं मारलेल्या फटक्याची आठवण करून दिली आहे ती ' मी, वाचक आणि हितचिंतक ' या जयवंत दळवी यांच्या ' उपहास कथा ' या कथासंग्रहातल्या या कथेनं.

तुमचा स्वभाव कसा आहे ? 
भिडस्त की बेधडक ? 
बेधडक असेल तर, भिडस्त स्वभावाच्या मंडळींची गंमत कशी होते ते वाचायला तुम्हांला आवडेल. 
आणि भिडस्त स्वभाव असलेल्यांनी आपली कशी कुतरओढ होते ते जाणून, बघा जमतंय का स्वभाव बदलायला ते ! 

जयवंत दळवी, या सिद्धहस्त साहित्यिकाबद्दल आम्ही काय सांगावं ? पुरुष, सूर्यास्त या आणि अशी अनेक दमदार नाटकांचे लेखन दळवी यांनी केलंय.  
गंभीर, विनोदी कथा, कादंबऱ्या असं खूप काही सकस दमदार,  विचार करायला लावणारं विपुल लेखन करणारा हा बुद्धिमान लेखक.

विनोद आपल्याला हसवतो, ताजंतवानं ठेवतो. अश्याच दळवी यांच्या 'उपहास कथा' या संग्रहातील कथा तुम्हांला नक्कीच आवडतील.

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे 
३० मार्च २०२०

Thursday, 9 July 2020

पुस्तक परिचय

ऐसीअक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
 
*दिवस* *२ रा*

कधी तरी अशीही वेळ येते की चार भिंतींच्या बाहेर येणेच शक्य होत नाही. आपण खडखडीत असतो, पण बाहेर पडता येत नाही. कधी भूतो न भविष्यति अशी तुफानी पर्जन्यवृष्टी होते आणि आपण अडकून पडतो. आपण विचार करतो एखादा दिवस करु या सहन, पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नाही.

चार दिवस उलटून गेले. मोबाईलवर व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचा कंटाळा आलाय. टीव्हीवर त्याच त्याच मालिकांचे पुनःप्रसारण आणि सतराशे साठ वाहिन्यांवरील त्याच त्या कोरोनाच्या बातम्या ऐकून कंटाळा आलाय. अचानक पुस्तकांच्या कपाटाकडे पावलं वळली आणि पुस्तकं चाळू लागलो....

...... त्या क्रूर औरंग्याच्या मगरमिठीतून आणि फुलादखानाचा विळखा तोडून आपली सुटका कशी करून घ्यायची या विचारांत शिवाजीमहाराजांची मानसिक अवस्था किती बिकट झाली असेल ? 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित *राजा* *शिवछत्रपती* पुस्तकातील *महाराज* *आणि* *औरंगजेब* हे प्रकरण मी, महाराज यातून बाहेर पडले हा इतिहास माहीत असतांनासुद्धा अत्यंत औत्सुक्याने, अधीरपणे, कमालीच्या कुतुहलाने वाचू लागलो. किती वेळा वाचलं असेल ? 

दिवसांमागून दिवस जात होते. चार भक्कम भिंतींच्या कडेकोट बंदोबस्तात राजे अडकले होते. बाहेर रक्तातल्या प्रत्येक थेंबात महाभयंकर विषाणू ठासून भरलेल्या क्रूरकर्मा औरंग्याचे निष्ठूर नीच पहारेकरी. बाहेर पाय टाकताच असंख्य जीवघेणी मनुष्यरुपातली श्वापदे.
' औरंगजेब आपला प्राण घ्यावयास टपला आहे; केव्हा तरी अचानक झडप घालून तो कोणत्याही भयंकर रीतीने ठार मारून टाकील याची जाणीव महाराजांना होती .....'
अत्यंत *संयमाने* मनांतला एकमेव *संकल्प* पूर्णत्वाला न्यायचाय या उद्देशाने महाराज त्या कडेकोट चार भिंतीत संधीची वाट पहात होते ...

वाचतांना अंगावर रोमांच उभे राहात होते आणि अनेक दिवसांच्या या कठीण प्रसंगातून महाराज सहीसलामत बाहेर पडले, हे वाचतांना तुमचा कंटाळा कुठल्याकुठे पळून जाईल आणि शिवाजीमहाराज तुम्हांला बाक्या-जीवघेण्या संकटातून बाहेर पडण्याची कशी प्रेरणा देतात त्याचा अनुभव घेता येईल ..

हा सुटकेचा थरारच नव्हे तर अवघे शिवचरित्रच तुम्हीही जरूर वाचण्यासाठी हाती घ्या, ब.मो.पुरंदरे लिखित,  *राजा* *शिवछत्रपती*

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे 
२९ मार्च २०२०

ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी

(वाचक मित्रांनो, सप्रेम नमस्कार ..२५ मार्च २०२०ला संपूर्ण देशात पहिला कुलूपबंद-लॉकडाऊन- जाहीर झाला. त्यानिमित्ताने वाचकमित्रांना मराठीतल्या विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न २८ मार्च २०२० ते १७ मे २०२० या एक्कावन्न दिवसांत आम्ही केला. पहिले अठरा दिवस कोरोनाशी महायुद्ध तर पुढील तेहतीस दिवस वाचू आनंदाने या शीर्षकाचा दुसरा भाग बेलवलकर हौसिंग च्या ऐसी अक्षरेच्या उपक्रमांतर्गत फेसबुक पेजवर अपलोड केला. माझ्या या ब्लॉगवरुन पुन्हा एकदा ही पुस्तक ओळख करून देत आहे. जरूर वाचा. प्रतिक्रियासुद्धा द्या, ही नम्र विनंती...पद्मनाभ हिंगे)

दिवस १ला

गेल्या बुधवारपासून संपूर्ण देशांत पंतप्रधानांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.  सर्वांनाच घरी बसण्याचा सक्तीचा आग्रह करण्यात आलाय. आजचा चौथा दिवस. आजपासून असेच अठरा दिवस घरी राहूनच हे कोरोनाविरुद्धचं महायुद्ध आपल्या प्रत्येकाला करायचंय. 
घरी राहण्याची मिळालेली ही संधी आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग आपण उत्तम साहित्यवाचनानं नक्कीच करु शकतो.
गेली १६ वर्षे ऐसी अक्षरेच्या माध्यमातून आम्ही सकस साहित्य वाचकांस देत आहोत. 
या सोशल मीडियाच्याद्वारे काही उत्तम साहित्य आम्ही आपणास सुचवू इच्छितो.

मंडळी, या कोरोनाशी युद्ध करण्याच्या निमित्तानं आठवलं ते महाभारतातलं कौरव-पांडवांमधील युद्ध. असंच अठरा दिवस चाललं.
' जिथे योगेश्वर कृष्ण आणि महाधनुर्धर अर्जुन आहेत तिथे विजयश्री नक्कीच ' या न्यायाने पांडव विजयी ठरले.

शिवाजी सावंत लिखित *युगंधर* वाचावयास घेतलं. सवयीनुसार पुस्तक चाळता चाळता *अर्जुन* या प्रकरणापासून नकळतच वाचन सुरू झालं. या युद्धाचा *अर्जुन* विजयी सेनानी. या प्रकरणात अर्जुनाच्या नजरेतून अनेक पात्रांची ओळख होते, विशेषकरून महातत्वज्ञानी, महायोगी, खरा स्थितप्रज्ञ अशा  श्रीकृष्णाची. अनेक घटना उलगडत जातात.
आवर्जून सांगावंसं वाटतं की, वाचकांनी या प्रकरणापासूनच वाचनास सुरुवात करावी, 
शिवाजी सावंत लिखित *युगंधरची.*

चला, आजपासून सुरू करुयात हा अठरा दिवसांचा वाचनमहायज्ञ.

पुन्हा भेटू उद्या, नव्या पुस्तकाची ओळख करून घेण्यासाठी.

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे.
२८ मार्च २०२०

Tuesday, 7 July 2020

*मोगरा*

  • *मोगरा....*
अहाहा, व्वा. 
माठातल्या थंडगार, मोगऱ्याच्या अस्तित्वानं मन प्रसन्न करणाऱ्या पाण्याचा पहिला घोट पोटात गेल्यागेल्या माझ्या ओठावर येणारे हे उदगार.  
उन्हाळ्यात वाढणारा चटका, घामेजलेलं अंग, कोरड पडलेला  घसा आणि अशा लज्जतदार पाण्याचा मस्त घोट आणि सारा शिणवठा दूर.

कोपऱ्यावरच्या फुलाच्या दुकानावरुन जातांना मोगऱ्याच्या त्या धुंद वासात रेंगाळणारं मन आपोआप पावलांची गती रोखतं.

सिग्नल चौकात गाडीची काच खाली करून झटपट गजरेवाल्याकडून हाती असलेल्या नोटेच्या बदल्यात हिरवा बाण लागायच्या आत शिताफीनं येतील तेवढे गजरे घेण्याची धांदल, घेतलेले गजरे दबले जाऊ नये याची खबरदारी, घरी जाण्याची कोण घाई. श्शी सालं हे ट्राफिक. 

आणि घरी गेल्यावर अचानक तिला खूष करण्यातली गंमत ज्याला अनुभवता येते ना तो खरा रसिक प्रेमी.

एवढंसं मेलं नाजूकसं सफेद फूल,  त्याची मनाला किती पडे भूल ! बहराला येतं आणि लागते वसंताची चाहूल ! ! 

*मोगरा...* काय त्याचं कौतुक ! 
त्याची नावं विशेषणं तरी किती ! 
मल्लिका, नवमल्लिका,  अनंतमल्लिका, मदनबाण, प्रमोदिनी, जस्मिन, बेला, मालती....

एखादी, आपल्या भरगच्च केशसांभारात मोगऱ्याचा  गजरा माळलेली मोठया डौलात चालणारी सुंदरी झटकन शेजारून जाते आणि वाऱ्याची झुळूक तो सुगंधित सुवास खुळावून टाकतो.. 

तो पक्का डामरट निलाजरा *मोगरा....*

मोगऱ्या मोगऱ्या निलाजऱ्या, या चावट करणाऱ्या खोड्या तुझ्याच रे साऱ्या. एवढंसं कोवळं तुझं रुप बारकुल्या, खुशाल खुणावतं अन् वेडंपिसं करून दाखवतं वाकुल्या.
अशी काय रे तुझी हिंमत चुरगाळलं तर संपून जाशील.पण काय तुझी जादू ? जिथं असशील तिथं आम्हांला मर्दुमुकी विसरायला लावशील ! किती रे वात्रटपणा करशील, गुंगवून ठेवशील आणि वर गोड गोड पापं करायला लावशील ! !

मोगऱ्या चावट्या, तुला चेटुक करायला काहीच रे कसं वाटत नाही ! सुगंधानं घायाळ करतोस आणि स्वतः मात्र नामानिराळा राहतोस......

सहज सुचलं म्हणून तर नक्कीच पण या इवल्याश्या मोगऱ्यानं नेहमीच खुळावलंय म्हणूनही ...

पद्मनाभ हिंगे