ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस ४था
खूप दिवसांपासून एक पुस्तक कुठं मिळतंय का ते पाहतोय. अनेक ग्रंथालयांत, पुस्तकालयांत, जुन्या वाचनवेड्या पुस्तकप्रेमींकडे चौकशी करून झाली.
उमरखय्यामच्या रुबायांचा मराठीत खूप सुंदरसा अनुवाद गजानन व्यं.वाघ यांनी केला होता.
हे पुस्तक कांही मिळालं नाही. तुम्हांला मिळालं तर नक्की वाचा.
फार फार वर्षांपूर्वीची (फार फार म्हणजे १९७३ची-साधारण ४७ वर्षांपूर्वी वगैरे ) ही गोष्ट. माझ्या हातात हे पुस्तक पडलं.
धडाधडा एकदा दोनदा हे पुस्तक वाचून काढले. त्यातल्या थोड्या पचनी पडलेल्या रुबाया वहीत लिहून ठेवल्या होत्या.
लॉकडाऊन आहे. वेळच वेळ. जुन्या पोतड्या, फोटोसंग्रह शोधताना ही वही हाती लागली. आज त्या वहीची सारी पानं पार पिवळी पडलेली आहेत. माझ्यासाठी मात्र ऐतिहासिक महत्व लाभलेली ही पिवळी पानं वाचतांना छान वाटलं.
त्यावेळी सारं वाचन एक वाचक म्हणूनच झालं होतं. साहित्याचा अभ्यास असतो वगैरे हे तेंव्हा तसं माझ्या कळण्यापलीकडचंच होतं. अर्थात आजही तीच परिस्थिती..
त्या गुलाबी काळातल्या मनातल्या *परि* ची *स्थिती*
आणि आताच्या पोक्त काळातल्या मनातल्या *परि* ची *स्थिती*
यां दोन्ही *परि-स्थिती* त फारशी तफावत नाहीच.
तारुण्याच्या हंगामातला तो वाचन प्रवास आणि आता हा मुरलेल्या वयांतला पिवळी पानं झालेल्या वहीतला, लॉकडाऊनकाळातला ..
तर तुम्हां मित्रांसाठी यातल्या चार रुबाया खास शुभेच्छांसह, का, तर तुम्हीही या पुस्तकाचा शोध घ्याल हा विश्वास.
१.
छायेत तरुच्या इथे कोर भाकरीची
मदिरेची सुरई आणि वही कवितेची
अन् असता तू लाडके, बाजुला गात
काननास येईल मौज तया स्वर्गीची
२.
त्या वितंडवादी विश्वाच्या गुंतून
राहू दे पंडिता ! बैस इथे येऊन !
ये माझ्यासंगे जगापासुनी दूर
जे तुला हासते त्यासच घे हासून !
३.
शपथेवर ज्यांनी मदिरा प्रीती त्यजिली
त्यांचीच उभी जर असेल स्वर्गी टोळी
शंकाच नको ! तो असेल स्वर्ग रिकामा
जितुकी ही माझी मूठ रिकामी ठरली !
४.
हा पहा उमलला गुलाब बोले हसुनी
"या जगतामध्ये अवतरलो मी फुलुनी
उकलून रेशमी गोफ सुकोमल तनुचे
उधळितो जवाहिर आतिल या उद्यानी ।! "
मंडळी, तुम्हांला जर हे पुस्तक कुठे उपलब्ध असल्याचे कळले तर या सुंदर रुबाया जरूर वाचा.
पुस्तक छोटसंच आहे.
उमर खय्यामच्या रुबाया
मराठी अनुवाद:गजानन व्यं.वाघ
बेलवलकर गृहनिर्माण
३१ मार्च २०२०
No comments:
Post a Comment