ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस १४ वा
' जे न देखे रवी, ते देखे कवी ' असं एकदा गुरुजी म्हणाले होते, ते आठवलं. आता यावर उदाहरण आत्ता नाही सांगता येणार. का काय विचारताय ? नाही आठवत. हो पण यावरून लेखकाच्या शब्द वळवण्याविषयी म्हणा किंवा शब्दांचा हव्वा तस्सा वापर करण्याचे कौशल्य म्हणा, यावर आज मात्र बोलावं वाटलं.
' जे भाषापंडिता न सुचे
तिथे कौशल्य दिसे लेखकाचे '
असं म्हणावंसं वाटलं, जेंव्हा, आमच्या वाचनात, ' प्रिया पहाटते आहे ', असे वाक्य आले.
एक गंमतीची आठवण सांगतो. अवघड अशा एका कठीण प्रसंगातल्या या आठवणीला गंमत म्हणायचे की कसे, हे वाचकाने ठरवायचे. तर, मुद्द्याचं काय की शाळेची परीक्षा जवळ आली होती, पहाटे उठून अभ्यास करायचा हा नियम. उठलो होतो साधारण पहाटे चारला. आई, वडील, बहीण, भाऊ झोपलेले. हातात अभ्यासाचं पुस्तक धरलेलं आणि पुस्तकात कादंबरी!! तेवढ्यात धडधड धडधड असा आवाज होऊन हादरे बसू लागले. वडील ताडकन उठत म्हणाले, 'भूकंप sss' .. कसंबसं पुस्तक लपवलं. अडणाणीतल्या वयांत लपूनछपून वाचावी अशी कादंबरी शृंगारिकच असणार ना !
तर, अशी वाचनाची जोपासलेली आवड.
अनेक लेखकांची पुस्तके वाचली. कथा, रहस्यकथा, कादंबऱ्या.. यांव न ट्यांव .. विविध लेखकांच्या विविध शैली, कल्पनाविलास, कथाभाग रंगविण्याच्या खुबी, भाषासौंदर्य इत्यादी इत्यादी ..
परंतु, ' प्रिया पहाटते आहे ' असं वाक्य, या वाक्यात दडलेला कल्पनाविलास प्रथमच वाचण्यात आला. भूकंपाचा धक्का नाही म्हणता येणार या वाक्याला, पण धक्कादायक गोड गुदगुल्या जाणवल्या. कारण लेख शृंगारिक! वाचून दाखवू थोडासा ? ...
'.....तिची सतेज कांती, तिचे काळेभोर डोळे, तिची छानदार उंची आणि त्यामुळे आलेला डौल, तिचे जास्वंदी रंगाचे पातळ ओठ, तिचं लयदार चालणं, तिच्या केसांचं भुरभुरणं तुमचं मन नकळत खिळवून टाकतं.
अशावेळी तुम्ही जर तुमच्यासमोर असलेल्या वेळकाढू भिडूला "काय कंडा पोरगी आहे" असं अपातत: म्हणालात तर नक्की समजावं की तुमच्या मनात त्या मुलीविषयी प्रेम नाही.मनात फक्त दडपला गेलेला उग्र शरीरविकार आहे. अशावेळी तुमचं हसणं, तुमच्या शरीराच्या हालचाली, तुमची दृष्टी कुणाही मुलीला आकर्षक प्रेमभरी वाटणार नाही, तिरस्करणीय वाटेल. तिच्याही मनात तुम्हांला त्या क्षणी पाहता प्रेम उद्भवणं अशक्य आहे.
जर तुम्ही तिच्या तशा येण्यानं आतून हलून गेलात, तुमच्या खोल अंतर्यामात एक हळूच थरथर निर्माण झाली, जिवात एक भावमुग्ध कमळ उमलल्यासारखं वाटलं, चिवड्यासारख्या चटकदार गप्पांतून तुमचं लक्ष उडालं नि मंत्रमुग्ध झाल्यासारखं मन भारून गेलं; तर नक्की समजावं की उद्याच्या प्रियेची ती पहिली भेट आहे ...प्रिया पहाटते आहे.' (साभार)
वाचकमित्रांनो, स्पर्शकमळे या आनंद यादव या विख्यात साहित्यिकाच्या अठरा शृंगारिक लेखसंग्रहातले हे सुंदर लेख तुमचं मन प्रसन्न करतील, ही खात्री आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या सुंदर पुस्तकाचे मुखपृष्ठसुद्धा सुंदर आहे. ग्रंथालयातून आणण्यापेक्षा पुस्तक विकत घेऊन पुनःपुन्हा वाचावे असे हे संग्राह्य पुस्तक आहे.
लॉकडाऊन वाढला तर वाढू द्या हो. एकदाच काय तो त्या कोरोनाचा नि:पात होऊ द्या.
शुभेच्छा ..
इंग्लिशमधे सांगू ?
Best Wishes...
बेलवलकर गृहनिर्माण
१० एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment