ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस १६ वा
पाह्यलंत, लॉकडाऊन जाहीर केल्यावर दोन आठवडे केव्हा उलटून गेले ते कळलंही नाही. हां, आता १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा मुक्काम आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ' अरे देवा !!! ' असा उसासा टाकला आणि तेवढ्यात किशोरकुमारच्या एका जुन्या गाण्याची व्हिडिओ क्लिप व्हॉट्सएपवर, एका स्पेशल कॉमेंटसह मित्रानं फॉरवर्ड केली. आपला आशावाद किती प्रखर असतो, त्याचं उदाहरण दाखवणारी कॉमेंट..
"लॉकडाउन जब खत्म होगा उसके बाद बजनेवाला पहला गाना " ही ती स्पेशल कॉमेंट.
आणि क्लिपमधलं गाणं ..
"अरे भाई निकलके आ घरसे आ घरसे
अरे भाई निकलके आ घरसे आ घरसे
दुनियाकी रौनक देख फिरसे, अजी देख फिरसे .."
आधी टीव्ही बंद केला आणि खट्याळ किशोरकुमारच्या आवाजातलं आणि पडद्यावरचं त्याचं स्फूर्तीदायक असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतलं मिश्किल ठुमकत गायलेलं, मन प्रसन्न करणारं हे गाणं आधी ऐकून घेतलं. चित्तवृत्ती उल्हसित झाल्या.
हातातलं पॉकेटसाईज छोटं पुस्तक पुन्हा उघडलं.
खलील जिब्रान या मूळ लेबाननला जन्मलेल्या परंतु नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या तत्ववेत्ता, साहित्यकार आणि चित्रकार असलेल्या लेखकाचं, श्रीपाद जोशी यांनी मराठीत अनुवादीत केलेलं *बंडखोर आत्मे* हे पुस्तक बऱ्याच दिवसांपूर्वी विकत घेतलं होतं. या लॉकडाऊनच्या काळात त्याच्या वाचनाचा योग होता म्हणायचं! प्रस्तावना वाचल्यावर अर्थातच कुतूहल जागं झालं आणि बघता बघता, ' गुलबदन ', ' नववधू ', 'थडग्यांचा आक्रोश ' या कथा झटपट वाचूनही झाल्या.
खलील जिब्रान - १८८३ ते १९३१. जीवन आणि जीवनातील सारे कर्म हाच त्याचा धर्म होता. तो म्हणतो, ' The Church is within you. You yourself are your priest. All that is worthwhile is a free spirit.'
' व्यक्तीच्या जीवनप्रेरणा जितक्या उत्कट आणि प्रामाणिक बनत जातील तितके व्यक्तीचे व्यक्तित्व कमी होत जाते आणि ती विश्वमय होऊ लागते. व्यक्तीला विश्वमय बनविणाऱ्या या प्रेरणा खलील जिब्रानच्या भाषेत सांगायच्या तर ' Faith, love and work ' या होत.
जिब्रानने गुलबदनमध्ये रंगवलेली स्त्री म्हणते, ' परंतु मी उठले. स्त्रीजातीच्या या मूर्खपणातून मी स्वतःला सोडवून घेतलं.मी माझ्या पंखांना दुर्बलतेच्या नि गुलामीच्या पाशांतून मुक्त केलं; आणि प्रीतीच्या नि स्वातंत्र्याच्या वातावरणात मी विहार करु लागले.आता मी सच्चरित्र आणि शीलवान आहे ...'
' थडग्यांचा आक्रोश ', मध्ये जिब्रान अमीराच्या न्यायव्यवस्थेवर बोलतो.
' तीन माणसांना तुरुंगाने गुन्हेगार ठरविले, कारण ते दुर्बळ होते; आणि कायद्याने त्यांना यमसदनी पाठविले, कारण तो बलवान होता ...एका माणसाने दुसऱ्या माणसाचा खून केला म्हणून तो खुनी ठरला; परंतु जेव्हा अमीराने खुनी इसमाचा खून करविला तेव्हा तो न्यायाचा पुतळा समजला गेला ! '
खलील जिब्रानच्या कथा समाजातल्या बंडखोर आत्म्यांचं मनोगत आपल्याला ऐकवून सुन्न करतात.
वाचकमित्रांनो, वाचन आपल्याला खूप आनंद देतं, समृद्ध करतं. जे वाचाल ते उत्तम वाचा. जे आपल्याला अंतर्मुख करेल. मनन चिंतन करायला भाग पाडेल. यापरीस आणखी काय सांगणार ... ?
अरे हो ...
लॉकडाऊन संपल्यावर पहिलं गाणं ऐकाच ऐका ...
' अरे भाई निकलके आ घरसे,
दुनियाकी रौनक देख फिरसे ..
पण सध्या मात्र, घरीच थांबा, आपली, आपल्या कुटुंबीयांची आणि साऱ्या देशाची काळजी घ्या..शुभेच्छा ...
बेलवलकर गृहनिर्माण
१२ एप्रिल २०२०
....
No comments:
Post a Comment