- *मोगरा....*
अहाहा, व्वा.
माठातल्या थंडगार, मोगऱ्याच्या अस्तित्वानं मन प्रसन्न करणाऱ्या पाण्याचा पहिला घोट पोटात गेल्यागेल्या माझ्या ओठावर येणारे हे उदगार.
उन्हाळ्यात वाढणारा चटका, घामेजलेलं अंग, कोरड पडलेला घसा आणि अशा लज्जतदार पाण्याचा मस्त घोट आणि सारा शिणवठा दूर.
कोपऱ्यावरच्या फुलाच्या दुकानावरुन जातांना मोगऱ्याच्या त्या धुंद वासात रेंगाळणारं मन आपोआप पावलांची गती रोखतं.
सिग्नल चौकात गाडीची काच खाली करून झटपट गजरेवाल्याकडून हाती असलेल्या नोटेच्या बदल्यात हिरवा बाण लागायच्या आत शिताफीनं येतील तेवढे गजरे घेण्याची धांदल, घेतलेले गजरे दबले जाऊ नये याची खबरदारी, घरी जाण्याची कोण घाई. श्शी सालं हे ट्राफिक.
आणि घरी गेल्यावर अचानक तिला खूष करण्यातली गंमत ज्याला अनुभवता येते ना तो खरा रसिक प्रेमी.
एवढंसं मेलं नाजूकसं सफेद फूल, त्याची मनाला किती पडे भूल ! बहराला येतं आणि लागते वसंताची चाहूल ! !
*मोगरा...* काय त्याचं कौतुक !
त्याची नावं विशेषणं तरी किती !
मल्लिका, नवमल्लिका, अनंतमल्लिका, मदनबाण, प्रमोदिनी, जस्मिन, बेला, मालती....
एखादी, आपल्या भरगच्च केशसांभारात मोगऱ्याचा गजरा माळलेली मोठया डौलात चालणारी सुंदरी झटकन शेजारून जाते आणि वाऱ्याची झुळूक तो सुगंधित सुवास खुळावून टाकतो..
तो पक्का डामरट निलाजरा *मोगरा....*
मोगऱ्या मोगऱ्या निलाजऱ्या, या चावट करणाऱ्या खोड्या तुझ्याच रे साऱ्या. एवढंसं कोवळं तुझं रुप बारकुल्या, खुशाल खुणावतं अन् वेडंपिसं करून दाखवतं वाकुल्या.
अशी काय रे तुझी हिंमत चुरगाळलं तर संपून जाशील.पण काय तुझी जादू ? जिथं असशील तिथं आम्हांला मर्दुमुकी विसरायला लावशील ! किती रे वात्रटपणा करशील, गुंगवून ठेवशील आणि वर गोड गोड पापं करायला लावशील ! !
मोगऱ्या चावट्या, तुला चेटुक करायला काहीच रे कसं वाटत नाही ! सुगंधानं घायाळ करतोस आणि स्वतः मात्र नामानिराळा राहतोस......
सहज सुचलं म्हणून तर नक्कीच पण या इवल्याश्या मोगऱ्यानं नेहमीच खुळावलंय म्हणूनही ...
पद्मनाभ हिंगे
No comments:
Post a Comment