ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस १२ वा
शेरोशायरी म्हटलं की, आमच्यासमोर लगेच "अर्ज है ", "इर्शाद" असे शब्द उच्चारणारी मंडळी बसलेली दिसू लागतात. अशा मेहफिलमध्ये आमच्यासारखे कोणी 'अडाणी' बसले असतील तर त्या मेहेफिलीच्या काही नियमांचे त्यांना पालन करावे लागते. म्हणजे असं की, कोणी मधेच उठून "वाहवा, वाहवा", "क्या बात है" असा प्रतिसाद देणारे दर्दी दिसले तर त्यांच्या सुरात आपलाही सूर मिसळून दाद द्यावी लागते. कारण एकतर शायरीतले बरेचसें शब्द डोक्यावरून गेलेले असले तरी आपल्याला काहीही समजत नाही हे दाखवायचे नसते. अर्थात एकही शेर कळलाच नाही असेही होत नाही. कारण एखादा निवेदक चटकन एखाद्या शायरचा किंवा गालीबचा शेर ऐकवतो, जो आपल्या पचनबुद्धीला सांभाळून घेतो. जसे की,
' खता किस जबांसें करुं उनके न आनेकी ! मेरे दिलमेही जो रहते हैं! '
कारण या अनुभवातून आम्ही अनेकवेळा ! गेलेलो असतो. हसलात ना? स्वतःवर पण हसा !
आणि सरतेशेवटी निवेदक म्हणतो,
' मेहेरबान होके बुला लो मुझे चाहो जिस वक़्त । मैं गया वक़्त नहीं की फिर आ न सकुँ ॥ '
हे कांही अगदीच न समजण्यासारखं नाही हं !
आमची ही अडचण साधारण पस्तीस एक वर्षांपूर्वी एका मराठी शायरनं ओळखली होती. त्या काळात क्यासेट्सचा नवा फंडा आला होता. पुलं, वपु या दिग्गज व्यक्तींच्या क्यासेट्सनी रसिकांना मेजवान्याच द्यायला सुरुवात केली होती. त्यातच आणखी एक मिश्किल नाव दाखल झालं होतं,
*भाऊसाहेब* *पाटणकर*
"दोस्तहो मैफिल आपुली, रंगण्या जर का हवी
आम्हां नको सौजन्य, तुमची जिंदादिली नुसती हवी
ऐसे जरी नक्कीच, घेवू तुमच्या मुखाने ' वाहवा '
ती ही अशी, ज्या ' वाहवा ' ला, द्यावी आम्हीही ' वाहवा!!"
मंडळी,
मराठीमध्ये अशी,
' शेरोशायरी अमुच्या पचनी पडायला वेळ नाही लागला ...
सारंच इतकं कांही भावलं की, चार दोन शेर आम्हीही जुळवून ऐकवले समोरच्या आरशाला ...'
हसू नका ...
भाऊसाहेबांची निवेदनाची पद्धतसुद्धा इतकी सुंदर, की ऐकून, अगदी तस्संच शेर ऐकवण्याचं कसब त्या काळी मित्रांना ऐकवण्यासाठी अस्मादिकांनी अंगी बाणवलं होतं. असो.
मैफिल हे भाऊसाहेब पाटणकर यांचं एक अगदी छोटेखानी, अवघ्या ६८ पानांचे पुस्तक आमच्या पुस्तकसंग्रहात एका जाडजूड पुस्तकात खुणेसाठी ठेवलेले होते. आज त्यातलेच काही शेर तुम्हांला वाचायला देतो.
' शृंगार ', ' लज्जा ', ' लावण्य ', ' नाजूकता ', ' जीवन ', ' विनोद ', ' दार्शनिक ', ' इश्क ', ' मृत्यू ', यावर मोठया सुरेख शब्दलालित्याने भाऊसाहेबांनी हे शेर लिहून ठेवले आहेत..
ऐका, (म्हणजे वाचा, आता हे लिहिता लिहिता आम्ही तोंडाने पुटपुटतोय, म्हणून ऐका म्हटलं)
' उन्मेष ज्यांच्या यौवनाचा, काहीच ना झाला कमी
प्यायले जे खूप, ज्यांना वाटे परी झाली कमी
निर्मिली मी फक्त माझी, त्यांच्याचसाठी शायरी
सांगतो इतरांस बाबा, वाचा सुखे
' ज्ञानेश्वरी '
' हसतील ना कुसुमे जरी, ना जरी म्हणतील ' ये '
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे
भ्रमरापरी, सौंदर्यवेडे, आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही '
' टाकिसी हळुवार अपुली, नाजूक इतुकी पाऊले
टपकती हलकेच जैसी, पारिजाताची फुले
नाजूकता जाणून आम्ही, आधीच होती बिछविली
पायातळी केव्हाच तुझिया, विकल हृदये आपुली '
रसिक वाचकांनो, हे तीन चार शेर वाचता वाचता कधी तुमच्या ओठांवर येतील याचा पत्ताही तुम्हांला लागणार नाही ! सर्वच शेर सुरेख आहेत.
लॉकडाऊन लवकरच संपून कोरोनाचा खात्मा होईल असा विश्वास व्यक्त करुन तुम्हांला तुमच्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.
"बाबा ऑफिसमधून लवक्कर घरी या" ही वाक्ये पुन्हा ऐकण्यासाठी आपण सारेच त्या दुष्ट कोरोनाला घराबाहेर रोखुनच त्याचा नि:पात करुयात.
बेलवलकर गृहनिर्माण
८ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment