ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस ५वा
शहरात कधीतरी वीज गेली की एकतर वीजवितरण कंपनीच्या नावानं लग्गेच शिमगा आणि फटाफट इन्व्हर्टर चालू.
आणि सध्या तर काय *लॉकडाऊन* ! !
आम्ही गावी असलो ना की अगदी ठरलेल्या वेळेवर रात्री ८.३० ला दोनपाच मिनिटांसाठी वीज जाते. थ्री फेज टू सिंगल फेज किंवा .. सिंगल फेज टू थ्री फेज .. चेंज ओव्हर ...
आम्ही चिडतो का ? तर नाही..
सवयीचा भाग म्हणून सहनही करीत असू का ? तर तसंही काही, खरंच नाही !
उलट,
खाडखाड दार उघडत
पुढच्या अंगणात पळत जातो ..
आता सध्या शहरांत घराच्या बाहेर पाऊलही टाकता येत नाही. इथं कसं बैठं घर अन् थोडं अंगण. आजुबाजूला सारं निर्मनुष्य वातावरण.
सगळीकडे मिट्ट अंधार असतो.
तुम्ही सारे ' पुढं कसं होणार ? सगळाच अंधार दिसतोय.. ' म्हणत काळजी करत बसाल आणि आम्ही, वर, आकाशात पाहू लागणार !
आहाहा ..
आभाळभर चांदणं असतं ! !
अगणित चांदण्यांचे जणू लुकलुकणारे डोळे आम्हांला पाहात असल्याचा भास होतो.
कधी तर असं वाटतं, की दुरून या चांदण्या हळूच कानी जणू पुटपुटत असाव्यात.
' कशाला चिंता करतोस वेड्या ' ,
आम्ही डोळे परमात्म्याचे, नजर आमुची तुझ्यावरी,
नजरेला घे जरा सरावुनि अंधाराची सवय करी.
पळ हे जातील भरभर भरभर
उषादेवीला फुटेल पाझर
घेऊन येईल ती डोईवर
कलश सुखाचा तुजसाठी रे
अंधाराचा फोडुनि डोंगर...
आपण माणसं ना स्वतःला अति शहाणे समजतो. खरंय ना ?
सध्या काय तर सारेच घरकोंबडे.
याचा वैताग, त्याचा वैताग ! यांच्यावर टीका, त्यांना नावं ठेव...
सोशल मीडिया, टीव्ही पाहून चिडचिड. पण मग वाचन करावं ना ! वाचनावरून एका छानश्या लेखातला विचार आठवला ...
" बायबलात अशी एक कथा आहे, की प्रारंभी मानवाच्या सगळ्या मुलांची एक भाषा होती. त्यामुळे मुंग्यांप्रमाणे त्यांची संघशक्ती, कर्तृत्वशक्ती मोठी अचाट होती. मुंग्यांनी हा हा म्हणता वारूळ तयार करावे, तसे स्वर्गाप्रत जाण्यासाठी ती मुले बँबेल या नावाचा गगनभेदी मनोरा करू लागली.तो झपाट्याने पुरा होत असल्याचे पाहून स्वर्गातल्या बापाला वाटले, की आता कांही आपल्या विश्वव्यवस्थेची धडगत नाही. माणसांच्या लीला मृत्युलोकाच्या मर्यादेत ठीक आहेत. स्वर्गात त्यांचा उपद्रव नको. म्हणून त्याने, ' तुम्हांला नाना भाषा येवोत ' असा शाप दिला. मूर्ख मानवांना वाटले, हा वर आहे ! भाषा अवगत झाली, तशी त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण परिणाम काय झाला ? एकाची भाषा दुसऱ्याला समजेना.सर्वत्र एकच गोंधळ उडून गेला.त्यांची फाटाफूट झाली. संघशक्ती मोडली. कलह माजले. बांधलेला मनोरा कालांतराने पडला आणि माणसाची कर्तृत्वशक्ती क्षीण होऊन बडबडत राहण्यातच त्याला इतिकर्तव्यता वाटू लागली.."
चांदण्यांचे कवडसे या बा.भ.बोरकर यांच्या पुस्तकातील माझा मौनवार या लेखातील हा तो विचार आठवला.
येतंय का कांही लक्षात ?
बेलवलकर गृहनिर्माण
१ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment