ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस १३ वा
" कुठून आणलास हा चिमटा ? "
" मी विकत आणला आहे."
" केवढ्याला ? "
" तीन पैशांना."
अमिनाने तर आक्रोशच केला. हा कसा पोरगा आहे.. दुपार होत आली. काही खाल्लं - पिलं नाही आणि हा चिमटा घेऊन आला !
" एवढ्या जत्रेत तुला या चिमट्याशिवाय दुसरं काही दिसलं नाही का ? " ती रागावतच म्हणाली.
हमीदचा तर चेहराच उतरला. अतिशय अपराधी भाव चेहऱ्यावर आणत तो म्हणाला, "तुझे हात तव्यावर भाजत होते ना .. म्हणून मी हा चिमटा आणलाय."
आजीचा राग क्षणात विरघळला. एका वाक्यातच हमीदनं तिला जिंकलं होतं. आई-बापाविना एवढंसं पोर; पण किती समजदार, केवढा त्यागी ! खरं तर, इतरांना खेळणी घेताना पाहून आणि मिठाई खाताना पाहून या लहानग्याच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल; पण किती संयम बाळगला पिलाने. तिथंही त्याला आपल्या म्हाताऱ्या दादीचीच आठवण झाली.'
प्रेमचंद यांच्या ' ईदगाह ' या कथेतला हा भाग वाचतांना डोळे आपोआप पाणावले. आजुबाजूला इतक्या हवाहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी असतांनासुद्धा छोट्या हमीदला आपल्या आजीच्या हाताला बसणारे चटके दिसत होते. त्याच्या साऱ्या संवेदना आजीसाठी होत्या. तिला तिच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्याचे डोळे सुरक्षा साधन शोधत होते. त्यापुढे त्याला त्याच्या इच्छा क:पदार्थ वाटत होत्या.
सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळात आपल्या प्रत्येकालाच या लहानग्याच्या अशाच समंजस संयमाची गरज आहे.
मुन्शी प्रेमचंद, एकोणीस-विसाव्या शतकातले संवेदनशील लेखक. त्यांच्या मूळ हिंदी भाषेतील कथांचा 'प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ कथा' हा संग्रह, डॉ.विशाल तायडे यांनी मराठीत अनुवादीत केलाय.
या संग्रहातील ही ईदगाह, नशा, दोन बैलांची कथा, अशा सर्वच बारा कथा वाचनीय आहेत.
शाळेतल्या पाठ्यपुस्तकात मुन्शी प्रेमचंद यांच्या काही कथा अभ्यासाला होत्या. 'ऐसी अक्षरे' च्या मागील कांही अंकांमध्ये आम्ही प्रेमचंदांच्या कांही कथा आवर्जून घेतल्या होत्या.
या संग्रहातील ' दोन बैलांची गोष्ट ' वाचकाला खूप कांही सांगून जाते.
वाचकमित्रांनो, गेले बारा दिवस कांही निवडक पुस्तके आम्ही तुम्हांला सुचवली आहेत. अजूनही कांही पुस्तके तुम्हांला सुचवायची आहेत. आपल्यातील प्रत्येकाला आपल्या कामाची कितीही काळजी, गरज असली तरी, सध्या घरात बसूनच आपल्याला आपला संयम वाढवावा लागेल. आपल्या सर्वांच्याच संयमाने लवकरच मुक्त वातावरणात जाण्याचा योग जुळवून आणणं हे आपल्याच हाती आहे.
तोपर्यंत या वाचनछंदाला शरण जाऊ या... शुभेच्छा ..
बेलवलकर गृहनिर्माण
९ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment