ऐसी अक्षरे : महायुद्ध कोरोनाशी
दिवस १५ वा
हातात रिमोट घेऊन मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेतल्या वाहिन्यांवर बातम्या अथवा अन्य कार्यक्रम बघता बघता कंटाळून गेलो असता, समोरच्या टीव्ही वाहिनीवर आयफेल टॉवरची छबी झळकली. आता हा टॉवर म्हणजे कांही एखादी चालती बोलती व्यक्ती नाही. पण, आज या टॉवरच्या छबीकडे बघताना का कुणास ठाऊक हा टॉवर अगदीच उदास एकांडा वाटला. कदाचित कोणीही आपल्यासारख्या जगतविख्यात मनोऱ्याला ढुंकूनही पाहात नसल्याची खंत वाटत असावी त्याला. अहंकार एवढा असला तरी, मान वेळावून पाहणे त्याला शक्य नसले तरी समोरुन त्याला कोणीही उत्साही पर्यटक दिसत नसल्याने बिचारा टॉवर उदास भासला. कोण येणार ना त्याला पाह्यला ?
फ्रान्स-नेपोलियनच्या विजयी इतिहासाची वैभवी प्रगत परंपरा लाभलेल्या या देशावर सध्या कोरोना नावाच्या विलक्षण क्रूर विषाणूनं असा काही हल्ला केलाय की या महामारीनं आज फ्रान्सला हतबुद्ध करुन ठेवलंय. हाती प्रचंड साधनं, सामग्री, प्रगत विज्ञान असं सारं असूनही या न दिसणाऱ्या राक्षसी विषाणूचा अक्राळविक्राळ विळखा अवघ्या फ्रान्सभोवती पडलाय. हजारों फ्रेंच त्याच्या भक्ष्यस्थानी पडलेत! आणि याच्या कित्येक पटीनं याच्या संसर्गानं इस्पितळात जीवनमरणाचा संघर्ष करताहेत!
हा तोच का देश जिथं *Paris* नावाचं सर्वांवर भुरळ घालणारं अतिनवलाईचं जगाला मोहवून टाकणारं राजधानीचं शहर आहे ?
असें एकामागोमाग एक विचार मनात येत असतानाच व्हॉट्सएप नावाच्या मीडियावर एक प्रेरणा देणारा नेपोलियन बोनापार्टचा म्हणून आलेला संदेश मित्राकडून आला.
*नेपोलियन*..., अशक्य हा शब्दच ज्याच्या शब्दकोषात नाही असा फ्रान्सचा दिग्विजयी सेनानी.
या व्हॉट्सएप संदेशाचा गोषवारा असा ...
' आल्प्स पर्वत पार करण्याचा प्रयत्न ज्यांनी कुणी केला, ते कुणीच जिवंत परत आले नाहीत ' असे एका म्हातारीने नेपोलियनला सांगताच, ' चला रे सैनिकांनो, तुम्हांला आल्प्सच्या पायथ्याशी घेऊन जातो. पर्वत पाहून नंतर ठरवा आपण पुढे जायचे की नाही. जर तुम्ही नाही म्हणालात तर आपण मागे फिरू!' असे घाबरलेल्या सैनिकांना सांगताच, सारेच सैन्य उत्साहाने आपल्या नेपोलियन नावाच्या सेनानीच्या मागे निघाले.
अनेक योजने, अनेक टेकड्या, पर्वतशिखरे पार करीत सैन्य एका ठिकाणी आले, तेव्हा, नेपोलियनला विचारण्यात आले, 'अजून किती पुढे जायचेय ? ' नेपोलियनने उत्तर दिले, 'आल्प्स आपण कधीच पार केलाय....!'
कोरोना, लॉकडाऊन, यावरील भीषण बातम्यांचे सावट या 'आल्प्स' सारखेच आहे जणू! यावर सहज मात करता येईल....'
खरंच ना. पुढच्या कांही दिवसांनंतर आपणही कदाचित असंच म्हणू ...
' संपली बुवा ही सक्तीची गृहबंदी.' ' गेलं बाई ते एकदाचं कोरोना नावाचं भूत ! कळलंही नाही कसे निघून गेले ते खडतर दिवस !'
या व्हॉट्सएपवरील संदेशाच्या विचारातच पुस्तकाचं कपाट उघडलं. योगायोग पहा, ' हातात पुस्तक आलं, म.श्री.दीक्षितलिखित नेपोलियन चरित्र.'
नेहमीच्या सवयीनुसार पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधी चाळायला सुरुवात केली. सामान्यतः एखाद्या थोर व्यक्तीचं एखादं सर्वसामान्यांना परिचित असलेलं संदेश देणारं वाक्य कुठे येतंय त्याचा पहिला शोध घेतला जातो. आम्ही तेच केलं.
' ..... लोदीच्या विजयाला नेपोलियनच्या जीवनात असाधारण महत्व आहे. या धाडसी विजयामुळे साऱ्या युरोपात त्याचे नाव झाले. फ्रेंच सैन्यावर या विजयाची अशी विलक्षण छाप पडली की, ते त्याला ' लिटल् कॉर्पोरल ' या लाडक्या नावाने संबोधून त्याचा जयजयकार करु लागले. बंदुकांच्या आणि तोफांच्या अग्निवर्षावात पुलावर घुसण्यापूर्वी *'Impossible- that word is not French '* हे मंत्रवाक्य तो सहज बोलून गेला होता.'
आपल्या छोट्याश्या मनोगतात लेखक *म.श्री.दीक्षित* म्हणतात, "जगातील जवळपास सर्व भाषांमध्ये नेपोलियनची चरित्रे लिहिली गेली, यातच जग जिंकू पाहणाऱ्या या महापुरुषाची योग्यता दिसून येते. शौर्य, धैर्य, महत्वाकांक्षा अंगी बाणलेल्या या मातृप्रेमी पुरुषाचे चरित्र माझ्या वाचनात आल्यावर मी भारावून गेलो. रगेल आणि रंगेल या दोन विशेषणांत त्याचे वर्णन करता येईल."
मंडळी, पुस्तक वाचायला सुरूवात करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुस्तकात आल्प्स पर्वत संदर्भातील उपरोक्त माहिती आहे किंवा नाही हे पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय कळणार नाही. पण नेपोलियनच्या नावाने आलेला हा व्हॉट्सएप संदेश तूर्त तरी आपणा सर्वांना एक आशादायी प्रेरणा देतो हे नक्की.
जाता जाता मराठी चित्रपटातले दोन गाणी आठवली.
१. घर हीच राजधानी,
नाही उणे कशाचे...
२. घरांत हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे ...
' तुम्हां सर्वांचं शरीरस्वास्थ्य आणि मन:स्वास्थ्य उत्तम राहो, या सदिच्छा ..
बेलवलकर गृहनिर्माण
११ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment