Sunday, 26 July 2020

पुस्तक परिचय १९

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

       ' शाळेत कुणीतरी सांगितलं होतं की, नाना पेठेत प्लेगचे उंदीर पडण्यास सुरुवात झाली आहे. वर्गातलं वातावरण ती बातमी ऐकून एकदम पालटलं होतं. नेहमीच्या शांत नि संथ जीवनात एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं. शाळेतून मी घरी आलो आणि पुस्तकं कोनाड्यात ठेवता ठेवताच एखादी आनंदाची बातमी सांगावी त्याप्रमाणे आईला ओरडून म्हटले, "प्लेगचे उंदीर पडायला लागले ग ss. आता बहुधा शाळेला सुट्टी मिळेल."....
       पुस्तक वाचता वाचताच डोळा लागला. डोळ्यांवर चष्मा आणि छातीवर पुस्तक तसंच असावं बहुधा. झोपेच्या अर्धवट ग्लानीत काहीतरी खस्सकन ओढल्याचं स्वप्नांत पाहिल्यासारखं वाटलंही असावं बहुधा! 
       सकाळी उठल्या उठल्याच शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. एकतर गेले तीन आठवडे कधी नव्हे तर आम्ही सारेच घरांत! 
     "उठा sss,  दहा वाजायला आलेत. टीव्ही लावा. काय वाढून ठेवलंय ते कळेल!" 
       ' ... सर्व देव नमस्कारम् केशवम् प्रतिगच्छति ' असे बारीक सारीक श्लोक लहानपणी अनेकवेळा कानांवर पडलेत. 'कुठल्याही देवतेला नमस्कार करा, तो केशवाला पोहोचतो.' हा त्याचा आम्हांला कळलेला अर्थ. आमच्या लग्नात गुरुजींनी म्हटलेल्या या श्लोकाचा आमच्या मंडळींनी बहुधा, 
' सर्वांवर काढायचा राग नवऱ्यावर काढला की तो राग इच्छिलेल्या त्या सर्वांना बरोब्बर  पोहोचतो!' असा काढला की काय कोण जाणे. 
       सकाळपासून सुरू झालेल्या  शाब्दिक चकमकी, लॉकडाऊन वाढल्यामुळे शाब्दिक लठ्ठालठ्ठीत रूपांतरीत झाल्या. आणि नेमकी अशावेळीच आम्ही कशी काय माती खाल्ली कोण जाणे! ...
       "... हं sss ..आलिया भोगासी असावे सादर " असं दुसरीकडे तोंड वळवून आम्ही म्हटलं. एखाद्या पट्टीच्या धनुर्धरासारखा आमच्या खात्यातला बाण, अंsss भात्यातला म्हटलं तर जास्त संयुक्तिक होईल, मंडळींवर सोडला. तो परतवताना असंख्य वाक्बाण आम्हांवर सोडत एवढं त्यांनी जर्जर करुन टाकलं की,  अखेर , "अहोss आम्ही या वाढवलेल्या लॉकडाऊनला उद्देशून बोललो." असा खुलासा करीत आम्हांला सपशेल माघार घ्यावी लागली. " मी काय आज ओळखते की काय तुम्हांला ...! " 
       नशीब रात्रीचं पुस्तक सापडलं आणि पानं उघडायला सुरुवात केली आणि सहज नजर पडली नेमक्या आवडीच्या मजकुरावर ...! 
       " ते काहीही असलं तरी कोवळ्या आणि मधुर स्त्रीसौंदर्याचं प्रतीक म्हणून मी हुजूरपागेला मानतो.लहानपणी तिथल्या अमूर्त सौंदर्यानं मला जे एकदा झपाटून टाकलं आहे, त्याचा अंमल उतरलेलाच नाही. माझ्या पूर्वीच्या पिढीतल्या लोकांना बालगंधर्व म्हातारे झाल्याची कल्पनादेखील दु:सह वाटे. हुजूरपागेबद्दलच्या माझ्या भावनाही तशाच आहेत. माझ्या मनातली ती हिरवळ आहे. सगळ्या शाळांमधल्या मुली आज जरी सारख्या असल्या तरी माझ्या मनातली हुजूरपागा वेगळीच आहे. एखादं सोनचाफ्याचं फूल बाटलीत घालून हवाबंद करावं त्याप्रमाणे माझ्या मनानं हुजूरपागा जपलेली आहे. तिला वार्धक्य येणार नाही. ती नेहमी हवीहवीशीच राहील." 
     हाच तो 'हुजूरपागेतल्या मुली' या खुसखुशीत लेखातला मजकूर. आणि वाचता वाचता चुकून तोंडातून सहजच, 
'सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं' ... 
हे गाण्याचे शब्द बाहेर पडले अन् ..... 
"हां, हे घ्या गिळा!"
    मुकाटपणे पुढं आलेलं खाल्लं आणि दुसऱ्या लेखाकडे वळलो. अरे हां, सांगायचंच राह्यलं, हातात पुस्तक होतं, पुणेरी, लेखक श्री.ज.जोशी.
      पुढचा लेख वाचायला घेतला,  चार्मिंग स्त्री!...
      तुम्ही म्हणाल', ' फारच लंपट दिसताहेत हे!'  पण हा लेख वाचल्यावर तुम्हांला चार्मिंग स्त्री म्हणजे काय हे कळेल.
      मित्रांनो, श्री.ज.जोशी हे, 
'आनंदी गोपाळ ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक. त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सुरुवातीच्या कांही काळात त्यांनी कांही वृत्तपत्रातून उत्तम ललित लिखाण केलं आहे. ऐसी अक्षरेच्या  वृत्तपत्र साहित्य विशेषांकात श्री.ज. जोशी यांच्या *पुणेरी* या ललित लेख संग्रहातील एक लेखही आम्ही घेतला होता.
     वाढवलेल्या लॉकडाऊनच्या काळात घरवालीनं काही चविष्ट खायला केलं असेल तर खाताखाता हेही खुसखुशीत साहित्य जरूर वाचा.
      आणि अगदी काssही काळजी करु नका, त्या दुष्ट कोरोनाची! कारण तुम्ही सारे घरांत आहात. उगाचच बाहेर पडण्याचं धारिष्ट्य तुम्ही करणार नाही. अर्रर्र, पुणेरी वाचायला सांगतोय आणि धारिष्ट्य हा शब्द आम्ही वापरतोय!! क्षमस्व. पुणेकर शिस्तप्रिय आहेत, हे काय आम्हांला माहीत नाही ? १ ते ४ च काय, पण सध्या पुणेकर दिवस रात्र घरातच पडून आहेत. चुकलं चुकलं घरात विश्रांती घेत आहेत. कोणी घरातून कामंही करतंय. तुमच्या सहनशीलतेला सलाम. कारण पुणेकरांनीच काय मुंबईकरांनीसुद्धा कोरोनाच्या परिस्थितीचं गांभीर्य नक्कीच ओळखलंय.
     शरीराची प्रतिकारशक्ती वाढवता वाढवता मनाची शक्ती सुद्धा अशी खुशखुशीत वाचनानं वाढवा. खूप शुभेच्छा ...

बेलवलकर गृहनिर्माण, पुणे
 १५ एप्रिल  २०२०

No comments:

Post a Comment