Thursday, 30 July 2020

पुस्तक परिचय २३

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     ' एक तर कथा आणि पटकथा. मुळात आजही चांगली गोष्टच विकली जाते किंवा अपील होते....बहुसंख्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या हास्य, शृंगार, वीर, करुण, रौद्र आदी नवरसांची किंवा यापैकी काहींची निश्चित व सकारात्मक निष्पत्ती ज्यातून होते ती चांगली गोष्ट होय ....' 
     ' दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे अर्थातच दिग्दर्शन.याचं कारण दिग्दर्शक हाच सिनेमाचा सर्वेसर्वा असतो...खरं तर फ़ार न बोलता केवळ दृश्यांच्या आणि चित्रचौकटींच्या माध्यमातूनच आपल्याला काय सांगायचंय ते सांगण्याचं हे माध्यम आहे. चित्रपटांच्या इतिहासात अशाच प्रतिभाशाली दिग्दर्शकांना वरचं स्थान मिळाल्याचं पाहायला मिळेल....' 
     ' तिसरी गोष्ट येते ती प्रत्यक्ष पडद्यावर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची. यांत प्रामुख्यानं अभिनय आणि क्यामेरा यांचा समावेश होतो.... याशिवाय संगीत, संकलन हेही अत्यंत महत्वाचे ...' 

     वाचायला सुरुवात केल्यावर सुजाण वाचकांच्या लग्गेच लक्षात आलं असेल की, आजचा विषय चित्रपट हा असणार. आज रविवार आहे. गेले काही दिवस आपण वार तारीख हेही विसरून गेल्यासारखं झालंय. फार फार वर्षांपूर्वी पगारानंतरचा आमचा पहिला रविवार हा खास पिक्चरसाठी राखीव असायचा. 
      पिक्चरचं वेड तसं आम्हांला फार जुन्या काळापासूनचं! इतकं की, कधी आम्ही तीन देवियां पाहता पाहता स्वतःलाच देव आनंदच्या जागी बसून, त्या लाडिक पद्धतीत मान हलवत गोडसं हसू देत, 'ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलावो ...' हे गाणं गात चमकोगिरी करतांना पाहात असू! असो ..स्वप्नंच ती! 
     वाचकमित्रांनो, गेले बावीस दिवस आम्ही रोज तुम्हांला एखाद्या चांगल्या वाचनयोग्य पुस्तकाचे नाव सुचवत आहोत. यांत युगंधर, राजा शिवछत्रपती, ययातिपासून कथा, रुबाया, शेरोशायरी, कालिदासकृत मेघदूतचा मराठी अनुवाद, खलील जिब्रानच्या कथा, शृंगारिक ललितलेख, नेपोलियनचं चरित्र, योगशास्त्र, गायत्रीविज्ञान, ज्ञानेश्वरीतलं पसायदान, शेती अशा विविध विषयांची पुस्तके होती. 
      आज पुस्तकांचं कपाट उघडल्यावर भल्यामोठया जाडजूड पुस्तकांत लपूनछपून बसलेलं आमच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं सिनेमावरील यक्षनगरी हे श्रीपाद ब्रह्मे लिखित पुस्तक दिसलं. खेचून काढलं. समजतात काय स्वतःला ही जाडजूड पुस्तकं? 
     एकतर ब्रह्मे यांची ओळख म्हणजे, आमच्या ईशाननगरीतले रहिवासी. त्यात 'लोकसत्ता,'  'सकाळ' पासून ते 'महाराष्ट्र टाइम्स' अशा मोठ्ठया वृतपत्रसमूहात त्यांची बहरत गेलेली पत्रकारिता. त्यात आमच्या ऐसी अक्षरेच्या दोन महत्वाच्या, 'वृत्तपत्रातलं साहित्य' आणि 'विनोद' अशा विशेषांकातले महत्वाचे लेखक. ' कॉफीशॉप,'  'फर्स्ट डे फर्स्ट शो' या आणि अशा पुस्तकांचे लेखक. आपल्या पत्रकारितेतल्या लहान वयांत 'चहाटळ' नावाच्या स्तंभात लेखन करणारे आणि आमच्या आवडीच्या विषयावर, म्हणजे नव्यानं सिनेमागृहात आलेल्या सिनेमाचं समीक्षण किंवा परिक्षण की काय ते लिहिणारे, ज्यावरून पिक्चर पाहायचा की नाही हे आम्ही ठरवणार! असे  अवघ्या चाळीशीतले पोक्त ब्रह्मे यांचं *यक्षनगरी* हे पुस्तक आज प्रिय वाचकांनी जरूर वाचावं यासाठी आमच्या मनानं मनापासून घेतलं.
    यक्षनगरी या पॉकेटसाईझ पुस्तकात दोन विभाग. पहिल्यात सिनेमाविषयीच्या विश्लेषणात्मक लेखांचा समावेश. ' सिनेमा कसा पाहावा ' येथपासून सिनेसृष्टीतले बदलते प्रवाह, माध्यमांतर, घडामोडी. ' लंचबॉक्स ' या हिंदी सिनेमाचं सुरेख रसग्रहण. तर, 'नक्षत्रे' या दुसऱ्या भागात अमिताभ बच्चन, अनिल  कपूर, निळू फुले, माधुरी दीक्षित यांचे विषयी, आणि मधुबाला, गुरुदत्त, मीनाकुमारी, संजीवकुमार, स्मिता पाटील या अल्पायुषी शापित गंधर्वांविषयी ब्रह्मे यांनी लिहिलंय.
     या पुस्तकात ब्रह्मे यांनी चित्रपट सृष्टीविषयीच्या माहितीचा घेतलेला धांडोळा छानसा घेतलाय. धांडोळाच म्हणतात ना ? कांही लेखकांनी हा धांडोळा शब्द वापरलेला आम्ही बऱ्याचवेळा पाहिलाय. इथे तो बरोबर की नाही हे जाणून न घेता आम्हीही दणकून टाकलाय.
     पुस्तक छोटंसं असलं तरी या आमच्याच काय तुम्हां सर्वच वाचकांच्याही आवडत्या 'सिनेमा'  विषयावर आहे. त्यामुळे सारखं सारखं न्यूज च्यानल पाहणं सोडून एखादा चांगला मराठी किंवा हिंदी चित्रपट आजच्या रविवारी तुम्ही नक्कीच पाहणार आहात ...थेटरात न्हाय .. घरात,  टीव्हीवर ! 
     आनंद द्विगुणित होणार तुमचा! नक्कीच, या लॉकडाऊनच्या काळात! 

बेलवलकर गृहनिर्माण
१९ एप्रिल २०२०

1 comment: