Thursday, 27 August 2020

पुस्तक परिचय ५१

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     शाळेतल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता कशा घोकंपट्टी करीत पाठ झालेल्या असायच्या. पण त्यांचं रसग्रहण करा, असं परिक्षेत आलं की मती कुंठित व्हायची. जागच्या जागी अडेलतट्टू सारखी खिळून राह्यची. शिकवता शिकवता गुरुजींनी किंवा बाईंनी विचारलं की, सांगा, कविला यातून काय सुचवायचंय? असा प्रश्न आला की, भले मोठ्ठे प्रश्नचिन्ह समोर उभे राहिलेले दिसायचे! 

     पण कुणी शहाण्या अभ्यासू व्यक्तीनं कविता समजावून सांगितली की मग मात्र लक्षात राहायची. त्या कवितेला कुणी चाल लावून म्हणू लागलं की कविता आपोआप समजू लागायची. 

     आणि मग कुणी विश्शेष व्यक्ती भेटली की कविता करायची खुमखुमी यायची. कविता करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या यमक जुळवणीसाठी आम्ही तर कित्येक कागदं कित्येकदा टरकावली सुद्धा. तासनतास लिहिल्यावर कळायचं, हे काही आपल्या कुवतीचं काम नाही! गड्या हा आपला प्रांत नाही. मग उधारउसनवार, चित्रपट गीतांची! 

     सांगायचं काय की, ते भलेभले नामवंत कवी, विंदा करंदीकर, ग्रेस, वसंत बापट, कुसुमाग्रज यांच्या कवितांचा अर्थ कुणी समजावून सांगितला की डोक्यात कविता घुसायची. खरं बोलून टाकायला काय हरकत आहे, नाही का? 

    कुसुमाग्रजांचा, रसयात्रा, हा कविता संग्रह कालपरवापासून घेऊन बसलोय. कविता वाचली की मागील शंकर वैद्य यांची टिप वाचायची. स्वतः शंकर वैद्य कवी. त्यामुळे समजून घ्यायला सोप्पं जातं. मुळात कुसुमाग्रजांच्या कवितेवर स्वतःचं काही भाष्य करण्याची आमची योग्यता, पात्रता नाही, पण वाचता वाचता समोर बातम्या चालू होत्या आणि योगायोगानं त्यातील ती मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांतून गावाकडे पायी जाणाऱ्या प्रवासी मजुरांची छायाचित्रे, चित्रफीत दाखवली जात होती. पुस्तकातल्या पानावर कुसुमाग्रजांची ' शेवटचे पान ' ही कविता होती. कडवं होतं, 

    ' जाणारच का - सुखात जा तर

      बाग मोहरो तव वाटेवर

माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून  

      प्रवासी, पहा जरा परतून ' 

   वास्तविक, ह्या कवितेत कुसुमाग्रजांनी ध्येयवादी पुरुषावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रीचे चित्र रेखाटले आहे. इथे नेमक्या याच ओळी या कोरोनामुळे आपल्या गावी परतणाऱ्या या मजुरांना लागू पडत असल्याचं जाणवलं.

   *रसयात्रा* मध्ये कुसुमाग्रजांच्या निवडक ७९ कविता आहेत. यांत तुम्हांआम्हांला माहीत असलेल्या कविता आहेत. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा,' 'वेडात मराठे वीर दौडले सात, 'नवलाख तळपती दीप विजेचे येथ,' 'रण काय भयानक लोळे आग जळात! आदळती, वळती, आवळती क्रोधात, जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व आषाढघनाशी झुंजे वादळवात!' ही 'अहि-नकुल' - साप मुंगसाच्या जीवघेण्या लढतीची कविता, 'जालियनवाला बाग' अशा प्रसिद्ध कविता आहेत.

 'की स्वर्गातुन कोसळलेला,  सूड-समाधान 

         मिळाया प्रमत्त सैतान 

  जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती 

         करी हे तांडव थैमान ' 

या ' कोलंबसाचे गर्वगीत ' कवितेतील कडवे वाचताना सद्यस्थिती चटकन डोळ्यांसमोर आली. कवितेच्या शेवटाला आलेल्या प्रेरणा देणाऱ्या कडव्यातील ओळी, सतत मनातल्या मनात घोळू लागल्या.

 "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा ..."

    कुसुमाग्रजांची 'कणा'  ही कविता साऱ्यांना सदैव प्रेरणा देणारी आहे. ही कविता या कविता संग्रहात नाही, परंतु आजच्या परिस्थितीनं घायाळ झालेल्यांना नैतिक बळ देणारी आहे, म्हणून इथे उद्धृत करतो.

लॉकडाऊन चार उद्यापासून सुरू होतंय. अजून किती दिवस हातावर हात ठेवून बसायचंय याची कोणी आजतरी कल्पना करु शकत नाही. रुतलेला आयुष्याचा गाडा बाहेर काढायला शरीरात आणि मनात बळ असायला हवं.


    ' मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा 

     पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ' 

     कित्येकांना असं बळ देणारं पण कोणी तरी हवं.

   

बेलवलकर गृहनिर्माण

१७ मे २०२०

Wednesday, 26 August 2020

पुस्तक परिचय ५०

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


   रंगभूमीचा राजहंस तो, 

   उचलती रमणी ज्याचा नखरा 

   पोषाखाच्या माशूक तऱ्हा 


   कुंदकळ्याची नाजुक वेणी 

   ऐशी अधरी दंत श्रेणी

   मानलचक ती तर जिवघेणी 

   भोळी खुळी रंगात गवसती.

             ...कवि माधव ज्युलियन

     नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचं हे नेमकं, देखणं, लोभस, यथार्थ वर्णन. बालगंधर्वांचा रंगमंचावरील मोहक सहज सुंदर वावर म्हणजे, स्त्रीला लाजवील असा सौंदर्याचा आविष्कार. ही सुंदर लोभस मूर्ती महाराष्ट्राला, मराठी रंगभूमी आणि संगीतक्षेत्राला ईश्वराकडून मिळालेली अभूतपूर्व, अद्भुत देणगी! आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, "गेल्या दहा हजार वर्षांत बालगंधर्वांसारखा महान कलावंत झाला नाही!"

    गंधर्वगाथा ह्या  बालगंधर्वांवरील भा.द.खेर यांच्या कादंबरीतून समोर आलेले बालगंधर्व, त्यांच्या जीवनातील अनेक घटना उलगडून सांगतात. या कादंबरीत बालगंधर्वांविषयी पुष्कळशी माहिती रसिकांना वाचायला मिळते.

    मूळचे देशपांडे हे राजहंस कसे झाले याची एक मनोरंजक कथा या कादंबरीत येते. बालगंधर्वांच्या बालपणापासूनच्या अनेक आठवणींसह लेखकाने,  *गंधर्वगाथा* या पुस्तकात साऱ्या पासष्टहून अधिक प्रकरणांत बालगंधर्वांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. हा जीवनपट बालगंधर्व यांच्याचं स्वकथनातून वाचकांपर्यंत आणला आहे. त्यामुळे स्वतः बालगंधर्व हेच आपल्याशी बोलत असल्याचा आनंद अनुभव वाचकाला मिळतो. 

    अतीव गोड गळा लाभलेल्या छोट्या नारायणाचे गाणे लोकमान्य मोठया तद्रुपतेने ऐकताना नारायणाच्या चुलत्याना म्हणाले, " किती रे सुरेख गायला हा! याला ' बालगंधर्व ' म्हणावं लागेल! "

     बालगंधर्व यांच्या गाण्यावर केवळ भारतीयच श्रोते नाही तर, परदेशी श्रोतेही त्यांच्या गोड गाण्यावर प्रसन्न होत असत. स्टनिस्लावस्की या रशियन माणसानं बालगंधर्वांचं गाणं ऐकून म्हटलं आहे की, ' संगीत नटाचं सारं कर्तृत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असतं. माणसाचं स्वरयंत्र कमालीचं नाजुक आणि संवेदनशील असतं. तसं बालगंधर्वांचं होतं!'  

    बालगंधर्वांनी आयुष्यात वैभव आणि विपन्नावस्था दोन्हींचा अनुभव घेतला. प्रा.व.दि.कुलकर्णी त्यांच्या विषयी लिहितात -- ' ऐन वैभवाच्या काळात बालगंधर्व कधी मिजासखोर बनले नाहीत की विपन्नावस्थेत हीनदीन झाले नाहीत.' 

    बालगंधर्वांचा नाट्यमंचावर प्रवेश झाला आणि त्यांच्या गाण्याचा, स्त्रीवेशातील सौंदर्याचा आणि अभिनयाचा रसिक प्रेक्षकांवरचा प्रभाव वाढू लागला. त्यांचं नाव सर्वच महाराष्ट्रात गाजू लागलं. काकासाहेब खाडिलकरांनी बालगंधर्वांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं त्यांचं पहिलं नाटक ' मानापमान ' शंभर टक्के चांगलं वठल्यानं त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. नवं गंधर्वयुग सुरू झालं होतं. मात्र याच नाट्यप्रयोगाच्या पहिल्याच खेळाचे दिवशी बालगंधर्वांच्या तान्ह्या कन्येच्या मृत्युनं गंधर्वांना मोठाच धक्का बसला. अशा अतिअवघड प्रसंगीसुद्धा त्यांनी नाटकाचा पूर्ण प्रयोग सादर केला होता.  

    गंधर्वगाथा वाचताना त्यात प्रेक्षकांच्या साद प्रतिसादाचे उल्लेख जीवनातील चढ उतार कसे असतात ते किती आनंद आणि वेदना देतात त्याची पुढील उदाहरणे आपल्याला अंतर्मुख करतात.


     ' दूरदूरचे प्रेक्षक आमच्यावर सुवर्णालंकारांचा वर्षाव करीत असत आणि तिकिटं मागत असत. त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना तिकिटं मिळणं दुरापास्त होऊ लागलं. बाहेरगावाचे प्रेक्षक तारेनं तिकिटांसाठी पैसे पाठवू लागले. आमच्या सव्वादोन महिन्यातील विदर्भाच्या मुक्कामात बावन्न हजार रुपये उत्पन्न झालं. लोक गंमतीनं म्हणू लागले, ' बालगंधर्व आमची अमरावती लुटून नेणार असं दिसतंय!' 

    ' सारे प्रेक्षक रंगमंचावर चढून ओरडू लागले, "कुठाय ती कान्होपात्रा? आम्हांला तिचं दर्शन घ्यायचंय!" गलका वाढत चालला. म्यानेजर गोंधळून गेले. मी (बालगंधर्व) कान्होपात्रेच्या वेषातच स्टेजवर आलो. साऱ्या प्रेक्षकांनी कान्होपात्रेच्या पायावर डोकं टेकलं!' मी बोलतच होतो, 'अहो हे काय करता? मी कान्होपात्रा नाही!' प्रेक्षकातून एवढेच शब्द आले, ' आमचं काम झालं! आम्ही चाललो!' 

     ' काळानं किती उलटसुलट करून टाकलं होतं? पूर्वी प्रेक्षकांचे माझ्या वाटेकडे डोळे लागून राहिलेले असत. आता माझे डोळे श्रोत्यांकडे लागलेले होते. पूर्वी मी रंगपटाकडे जाताना मला बघण्यासाठी प्रेक्षक दुतर्फा गर्दीत करून उभे राहात असत. आणि मी श्रोत्यांना बघण्यासाठी इथे बसलो आहे. पण एकही श्रोता माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हता!' 


    वाचक मित्रांनो, जीवन हे असंच आहे. माणूस सामान्य असो वा कीर्तीच्या शिखरावर जाऊन आलेला असो. काळ उन्हाळी पावसाळीचे अनुभव देतोच. आपलंच बघा ना. सारेच घरात अडकून पडलोय, कंटाळून गेलोय. पण अशासारख्या अवस्था कोणाला चुकल्यात. आपणच समजायचं आपल्याला गरुडपंखांचं वरदान मिळालंय. आता नाही पण वेळ येताच पुन्हा त्या पंखांत बळ येईल आणि आपण उड्डाण करू.

      वेळ येईल तेव्हाच, पण नक्की येईल! तोपर्यंत *गंधर्वगाथा* सारखी अशी सुंदर पुस्तकं, चरित्रं वाचत राहू या. 


बेलवलकर गृहनिर्माण

१६ मे २०२०

Tuesday, 25 August 2020

पुस्तक परिचय ४९

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


   ' कला हा एक महत्वाचा मानवी व्यापार आहे. वाणी हे जसे विचारांच्या देवघेवीचे साधन, तसे कला हे भावनाप्रदानाचे साधन आहे. 

    ती खरी कला, की जी सद्भावना निर्माण करते.

    ज्या कलाकृतीमुळे हृदयात भावना उचंबळत नाही, ती कलाकृती खरी जिवंत कलाच नव्हे. ते कलेचे सोंग आहे. ती खोटी कला आहे.' 

    

             कला म्हणजे काय?


लिओ टॉलस्टॉय यांच्या व्हॉट इज आर्ट ?

- या पुस्तकाच्या साने गुरुजी यांनी मराठीत केलेल्या अनुवादात कला म्हणजे काय, या विषयी लिहिलेला उपरोक्त विचार, हा या महत्वाच्या ग्रंथाचे साने गुरुजींनी दिलेले थोडक्यात सार होय.

    १९३४ साली साने गुरुजी जेव्हा धुळे येथील तुरुंगात होते तेव्हा गुरुजींनी टॉलस्टॉय यांच्या या ग्रंथाचे भाषांतर करण्यास सुरुवात केली. 

      या ग्रंथाच्या प्रस्तावनेत गुरुजींनी त्यांना टॉलस्टॉय यांचे सर्वच ग्रंथ आवडत असल्याचे नमूद केले आहे. ' कला म्हणजे काय? ' हा महर्षी टॉलस्टॉय यांचा सर्वांत महत्वाचा ग्रंथ असून जवळजवळ ४० वर्षे टॉलस्टॉय या विषयाचे मनन करीत होते. टॉलस्टॉय यांनी कलेवरची, सौंदर्यशास्त्रावरची, साऱ्या युरोपियन भाषांतील प्रमुख पुस्तके वाचली. टॉलस्टॉय यांचे सांगणे आहे की, "ग्रंथ एकदा वाचा, दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा. पहिल्याने वाचल्यावर जे समजले असेल, त्याच्या प्रकाशात दुसऱ्यांदा वाचा; त्या वाचलेल्या प्रकाशात पुन्हा वाचा. असे करीत गेले म्हणजे ग्रंथकाराचे खरे हृदय तुम्हांला सापडेल. एकदाच वाचून तुम्हांला कल्पना नीट आली नाही तर कंटाळू नका."

     या पुस्तकाच्या पहिल्या भागात, सौंदर्यविषयक प्रक्रियांचा सारांश, सौंदर्यावर उभारलेल्या कलेच्या व्याख्या, कला : सुखासाठी का धर्मासाठी ? कला हृदयस्पर्शी केव्हा होईल? भविष्यकालीन कला, या आणि अशा एकोणीस विविध प्रकरणात चर्चा केलेली असून, दुसऱ्या भागात पॉर्लेझच्या कादंबरीची प्रस्तावना, शाळेतील मुले व कला,  असे पाच विषय आहेत.

    पुस्तकात ठळकपणे नमूद केलेले पुढील काही विचार कलाप्रेमी वाचकांनी आपल्या स्मरण नोंदवहीत जरूर नोंदवून ठेवावेत, असे आहेत.

    "स्वतःला जो पूर्वी अनुभव आला, तोच अनुभव स्वतःमध्ये पुन्हा जागृत करून मग रेखा, रंग, गती, सूर, शब्द, हावभाव इत्यादी साधनांच्या द्वारा तोच अनुभव दुसऱ्यांनाही अनुभवावयास लावावयाचे, दुसऱ्यांनाही तोच तितकाच उत्कट असा अनुभव आणून द्यावयाचा हे कलेचे काम आहे."

     "कला हे मानवांचे हृदयैक्य करणारे, ऐकात्म्य करणारे बलवान साधन आहे, कलेने आपणांस दुसऱ्यांसही स्वतःच्या भावनांत मिळवून घेता येते. म्हणूनच व्यक्ती किंवा समाज यांच्या उन्नतीसाठी कला अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जीवनात कलेचे फार महत्व आहे." 


     खरं तर एक तरी अंगी असावी आणि ती जीवापाड जपत विकसित करीत राहावे असं आम्हांला नेहमीच वाटतं. नसेल आपल्यात कला, तर एखाद्या कलेचा किंवा समोर येणाऱ्या प्रत्येक कलेचा, त्या कलेची निर्मिती करणाऱ्या कलाकाराचा आदर करीत, रसास्वाद घ्यायला शिकावे.

    चित्रकला, संगीत, साहित्यलेखन, कथन, अभिनय, क्रीडा या सर्वच कलांमधून आनंद मिळतो. अनेक अडथळ्यांना तोंड देत यशस्वी जीवन जगण्याची आणि त्यातून समाधान मिळवण्याची सुद्धा एक कला आहे. अनेक अडथळे कुशलतेने पार करीत ध्येयाप्रत पोहोचणे ही कला ज्याला जमली तो सदासर्वदा आनंदी राहील. 


      लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागानंतर येणारा चौथा भाग काय नवीनपण घेऊन येत अनुभव देणार आहे हे आज उद्या कळेलच. घाटातून, बोगद्यातून प्रवास करताना चालक संयमाने वाहन चालवत असेल तर हे अडथळे सहज पार करीत इष्ट गावी सुरक्षित पोहोचेल. तसंच आहे या सध्याच्या संकटकाळाचं. यातून लवकरच तावून सुलाखून आपण बाहेर पडणार आहोत ही उमेद बाळगू या, दुसऱ्यांतही उमेद जागवू या. 

     शुभेच्छा. खूप शुभेच्छा..

              ॥ शुभं भवतु ॥ 


बेलवलकर गृहनिर्माण

१४ मे २०२०

Monday, 24 August 2020

पुस्तक परिचय ४८

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     

      ' बाराचे टोल देऊन भिंतीवरचं घड्याळ शांतपणे किटकिट करीत काट्यांना पुढं पुढं ढकलत होतं. पंधरा वीस मिनिटं होऊन गेली होती. बाहेर ऊन मी म्हणत होतं. अंगणातलं वाळवण उलट पुलट करीत काकी मनाशीच बोलत होत्या, ' बाईss, काय हे ऊन!' ओसरीत पंख्याखाली खुर्ची टाकून काकांचं पुस्तक वाचन चालू होतं. अधून मधून डोळे मिटल्यासारखे करत ते हळूच एखादी डुलकी खात होते. ' झोप येतेय तर आत जाऊन पडा..' अशा काकींच्या आवाजाला,' छे छे झोपलो नाहीये, वाचून  डोळ्यांना ताण येऊ नये म्हणून डोळे मिटले होते. तसंही मी दुपारी झोपत नाही हे माहिताय ना ? ' प्रत्युत्तर देत काकांनी परत पुस्तकात डोकं खुपसलं ...' 

    

       साधारण अशी सुरुवात म्हणजे एखाद्या कथासंग्रहातल्या कुठल्यातरी एखाद्या कथेची सुरुवात हे समजतं. कथा रंगवत, परिच्छेद पांगवत, एखाद्या मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबात आता लेखक काहीतरी घडवून आणणार आणि आणि तुम्हांआम्हां वाचकांना आनंद देणार! 

     प्रत्येक लेखकाची गोष्ट सांगण्याची आपली आपली पद्धत असते. 'जी.ए.कुलकर्णी' जरा गूढतेकडे जाणार. 'द.मा.मिरासदार' त्यांच्या श्टायलित हसरे शब्द पेरीत कथा पुढं नेणार. 'शंकर पाटलां' ची खेड्यातली गोष्ट गावरान शब्दांत खुलत जाणार.'व्यंकटेश माडगूळकर' आणखी वेगळ्याच धाटणीची मांडणी करीत पुढं काय होतंय या उत्सुकतेत तुम्हांला अलगद गुंतवणार. 

    कुणाच्या कथेची प्रकृती गंभीर, कुणाची रानवट, कुणाची खुद्खुदवणारी वाक्यपेरणी. कुणाची भाषा गुलाबी शब्दांची, प्रेमशृंगाराची, तर कुणाची जीवनसार सांगणारी.कुणाच्या दीर्घ तर कुणाच्या लघुकथा. 

      कथावाचन तसं मस्तच. कादंबरी सारखं प्रत्येक प्रकरण उत्कंठा वाढवीत शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लांबण यात नसतं. कथेचं कसं असतं, तिच्यात कादंबरीसारखी असंख्य वळणं घेत, अनेक उपकथानकं जोडत जाणारी तऱ्हा नसते! कथा रंगत रंगवत नेत नेत चटकन शेवटाला जाणारी. पण वाचकाला खिळवून ठेवणं ही मात्र कथालेखकाच्या प्रतिभेची करामत.

     प्रत्येक लेखकाची बदलत जाणारी भाषाशैली, मांडणी पद्धत वेगवेगळी. मराठी कथात पहा ना, वैदर्भीय कथाकाराची भाषाशैली वेगळी, सोलापुरी लेखक लिहिताना वेगळ्या भाषाशैलीत गोष्ट सांगणार. कोल्हापुरी कुठंतरी पायतानानं हाणणार. पुणेरी शुद्ध तुपातले शब्द लिहित, इतरांकडे तुच्छतेनं कटाक्ष टाकतच कथा लिहिणार. कोकणी मालवणी कानांत एवढे गोड शब्द ओतणार की, वाचक असं मस्त आपल्याला बोलता येईल का याचा विचार करीत वाचत राहणार! 

       गंधर्व ह्या बाळकृष्ण प्रभूदेसाई यांच्या कथासंग्रहातल्या कथांची शैली ही कोकणी कडे जाणारी.

       उण्यापुऱ्या छत्तीस सदतीस वर्षांचं अल्प आयुष्य लाभलेल्या प्रभुदेसाई यांचा साधारण सत्तरच्या दशकातला हा कथासंग्रह. गंधर्व, अतिथी, शाळेचे दिवस, श्राद्ध, शांतवन, मास्तरांची यात्रा, पांगारा, नग्न पेटती उन्हे, शिवकळा, भटवाडी या दहा कथांचा यात समावेश आहे. मौज, दीपावली, सत्यकथा, साधना या दिवाळी अंकांमधून निवडलेल्या या कथा. 

      मंडळी, या कथांमधील माणसांचं जीवन आपल्या दैनंदिन आयुष्याशी जुळणारं असो नसो, त्यातल्या माणसांचे स्वभाव आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या माणसांसारखे वा त्यांच्या स्वभावाच्या जवळ जाणारे असू शकतातही. त्यांची दु:खं, वेदना, समस्या, इच्छा या लेखक त्याच्या त्याच्या ताकतीनुसार शब्दबद्ध करीत असतो. या कथा कधी विरंगुळा देतात तर कधी चिंतनही करायला लावतात. 

     गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या लंब्याचवड्या सक्तीच्या सुट्टीने आपल्याला काही बरे वाईट अनुभव दिले असतील. ते कितपत मनाला लावून घ्यायचे वा आठवणीत जपून ठेवायचे हे आपल्यावर आहे.

      हळूहळू आभाळ मोकळं होऊ पाहतंय. आशेचे किरण काळा पडदा भेदून येतील असं जाणवू लागलंय. मुळात बेशिस्त असलेले बेशिस्तासारखेच वागणार हे लक्षात ठेवून त्यांच्यापासून चार हात म्हणजे जवळपास दोन मीटर दूर राहून आपण आपली काळजी घेऊन स्वतःला सांभाळू. ' असंगाशी संग प्राणांशी गाठ ' नकोय. अशीही सवय लागलीच आहे शिस्तीची-स्वच्छतेची, तर ती कायम ठेवू. आमच्या शुभेच्छा आहेतच.


बेलवलकर गृहनिर्माण

१३ मे २०२०

Sunday, 23 August 2020

पुस्तक परिचय ४७

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     

 ' देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देवालयी 

   देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई..' 

     का कुणास ठाऊक, पण सकाळपासून कानामनांत हेच भक्तिगीत घुमतंय. या भक्तिगीतावरून अनेक विचार आज मनात येऊ लागले.

     आपल्या भारतीय संस्कृतीत एवढे देव आहेत ना तेवढे पाश्चात्य देशांतल्या काही देशांची मिळून  लोकसंख्याही नसेल! 

     देवाच्या प्रार्थनेसाठी जेवढी स्तोत्रे आपल्याकडे उपलब्ध असतील ना तेवढे भारतेतर देशांत तत्वज्ञानाचे ग्रंथ तरी असतील की नाही कोण जाणे!

     आता, या स्तोत्रांमध्ये साहित्य असतं का? असा प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचं नाही, किंवा असा कोणताही वाद आम्हांला उत्पन्न करायचा नाही, तर..

     ' देव - ईश्वर - भगवंत ' नावाच्या विभागात प्रार्थनेच्या माध्यमातून लिहिलं गेलेलं, संतांच्या ओव्या, अभंग, भक्तिगीतं, भारूडं असं विविध प्रकार असलेलं साहित्य याबद्दल काही जे आवर्जून सांगावंसं वाटतं त्याबद्दल बोलायचं आहे.

     भारतीय संस्कृतीत गद्य स्वरूपात प्रार्थना आमच्या ऐकिवात पाहण्यात नाहीत. (चित्रपटातल्या देवाला दम देणाऱ्या गद्य प्रार्थनांबद्दल आम्हांला काहीही भाष्य करावयाचे नाही..) मात्र, बहुतेक सर्व प्रार्थना या काव्यबद्ध असतात. काव्यबद्ध मधला 'बद्ध' हा शब्द नियमाला अनुसरूनच हे संतकाव्य असते असा अर्थ दर्शवितो. मागील एका वृत्तदर्पण नावाच्या पुस्तकाबद्दल सांगताना ओवी, अभंगादी रचनांमध्ये काय नियम असतात, हे त्यात सांगितले आहे.

      ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा, गोरोबा, एकनाथ, समर्थ रामदास, जनाबाई, मुक्ताई, बहिणाई या अत्यंत उच्च प्रतिभेच्या संतांनी रचलेल्या रचना पहा, हवं तर अभ्यासा.

    संत चोखोबा जेव्हा म्हणतात की, ' ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ नदी डोंगी परि जळ नोहे डोंगे। काय भुललासी वरलिया रंगे॥ चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा॥ ' तेव्हा या काव्याचा अर्थ जाणून घेतला की लक्षात येतं ते,  तात्कालिन कनिष्ठ आणि उपेक्षित समाजांतसुद्धा किती उच्च प्रतिभा होती. ह्या आणि अशा रचनांमध्ये गेयता असते. संतवाणी-अभंगवाणी तुमच्या कानावर पडत असेलच.

      डॉ.मुकुंद दातार यांनी लिहिलेलं एकनाथांची बोधवाणी हे पुस्तक वाचत असताना कळलं की एकनाथांची साहित्यसंपदा किती मोठी आहे. डॉ.दातार लिहितात, 'संतश्रेष्ठ एकनाथांनी, आपल्या ६६ वर्षांच्या जीवनक्रमात विपुल आणि विविध प्रकारची वाङ्मय निर्मिती केली. नाथांनी भागवतापासून भारुडांपर्यंत वाङ्मयसंपदा-काव्यसृष्टी निर्माण केली. त्यात स्फुट कविता, आध्यात्मिक चरित्रपर, आख्यानपर प्रकरणे, भाष्यग्रंथ  आहेत. नाथांची एकूण काव्यसंपदा म्हणजे एका अर्थाने, साहित्य संपदेचा ' नाथसागर ' च आहे! एकनाथांची ग्रंथांतर्गत असणारी, ओवीसंख्या पन्नास हजार आहे, तर त्यांची अभंगसंख्या चार हजारांहून अधिक आहे.' 

     नाथांची भारूडं सुंदर रूपकात्मक आहेत. व्यवहारातील उदाहरण देताना एकनाथ एखाद्या सुनेच्यामुखी 'सत्वर पाव ग मला ..' सारखी भारूडं घालतात. यातून श्रोत्यांचं मनोरंजन करीत सहज बोध करतात.' अहंकाररुपी सासरा, देहबुद्धीरुपी सासू, द्वेष आणि अविवेकरुपी नवरा यातून मला मोकळं कर,' अशा पद्धतीनं लोकांना ते समजावतात! 

     एकनाथांची बोधवाणी या पुस्तकात छोटी छोटीशी ५३ प्रकरणे चर्चिली आहेत, जी सर्व सामान्यांना चटकन समजतात! 

       वास्तविक, संतांची शिकवण ही काही उतारवयात समजून घेण्याची गोष्ट नाही तर परिपक्वतेकडे वाटचाल करण्यासाठी जितक्या लवकर आपण या शिकवणीला समजून घेऊ, तितकी ही शिकवण समाधानी जीवनप्रवासासाठी उत्तम ठरत राहील आणि जीवनात आनंद समाधान मिळत राहील. 

      ऐसी अक्षरेचा २०१७ मधील एक विशेषांक संत साहित्य परिचय विशेषांक म्हणून आम्ही प्रकाशित केला होता. संतसाहित्य कसे जीवनमार्गदर्शक असते हे थोडक्यात समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता.

      वाचक मित्रांनो, गेले कित्येक दिवस टीव्ही, मोबाईल, घरातले खेळ, स्वयंपाक, गप्पाटप्पा, क्वचित वैताग, कंटाळा, थोडे वाचन करत करत आपण सारेच १७ मे ची वाट पहात आहोत. कीर्तन ऐकणे हेही टीव्ही वर शक्य असते. शक्य झाल्यास एखादा अभंग ओवी जरूर वाचून ऐकून पहा. त्याचीही गोडी लागेल. छान वाटेल.

     

बेलवलकर गृहनिर्माण

१२ मे २०२०

Saturday, 22 August 2020

पुस्तक परिचय ४६

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


       ' इतर दासदासींपेक्षा तिला महाराणीबद्दल वेगळंच काही माहीत आहे. मंजिरी स्वतःच्या अशा भावनेच्या कोषात शिरली की स्वप्नात असल्यासारखी दिसायची. मंद, झोपाळू हसू तिच्या चेहऱ्यावर असायचं. महाराणीचे केस आणि ती- यापलीकडचं मग काहीच तिला महत्वाचं नसायचं. पहिल्या दिवशी ते मोकळे भरपूर केस तिनं जेव्हा हातात घेतले, तेव्हा ती अगदी सळसळून गेली. नुकती न्हालेली, ताज्या त्वचेची, अगदी अनलंकृत अशी एक प्रौढ स्त्री. तिचे सावळे उघडे खांदे, मोकळी उंच मान, पाठीची खोल पन्हळ आणि कमरेच्या वस्त्रापर्यंत पसरुन रुळणारे ते सुगंधी काळेभोर केस. मंजिरी आपल्या स्वामिनीच्या तशा पाठमोऱ्या अस्तित्वावर लोभावून गेली. त्या केसांच्या स्पर्शानं सुखावली....' 

     महाराणी द्रौपदीच्या प्रौढ वयातल्या केसांचं हे मोहक वर्णन वाचताना समोर प्रकट होऊ पाहतं ते द्रौपदीच्या तारुण्यातलं विलोभनीय रुप! 

     एखाद्या विलक्षण स्त्रीच्या उतार वयातल्या सौंदर्याचं असंही वर्णन होऊ शकतं? 

    हे सामर्थ्य असतं त्या समर्थ लेखणीचं.

      -----

      ' होय रे श्रीरंगा, मी अजून खेळते जुने खेळ. लहानपणचे सगळे खेळ म्हातारपणी पुन्हा खेळावेसे वाटतात बघ. मी अजून कधी तरी सूर्य बुडाल्यावर जाते यमुनेवर. पाणी आणायचं नसतं आता. नुसतीच जाते. कदंबाखाली बसते थोडा वेळ. डोळे मिटले तिथे बसून, की वाटतं, कुठून तरी सख्यांचा आवाज येईल ' साई सुट्ट्यो ' म्हणून. मग मी उठेन.त्यांना शोधत जाईन इकडे तिकडे आणि अचानक एखाद्या झाडामागून तूच पकडशील माझा हात, ओढून घेशील आणि नेशील तिकडे वेळूंमध्ये. सख्या वेड्या लपलेल्या तशाच. माझी चाहूल घेत...' 

     ' राधेs' कृष्णानं अतिकोवळेपणानं तिच्या गालाला स्पर्श केला.

     ' मला कळतं रे की, असे भास होणं बरं नव्हे. पण कधी कधी वाटतं की, अशा भासांच्या खेळात तेवढी मी खरीखुरी जगते. तिथल्या तेवढ्या आनंदावर इतर सगळं तरून जातं. तुला नाही रे कधी असं होत? ' 

     उतार वयातली तारुण्यातल्या आठवणीत रमलेली राधा डोळ्यांसमोर आणायची. तिच्या ह्या आठवणीतून हळुवार बाहेर काढत उतारवयातल्या या दुराव्याच्या व्यथा जाणून घ्यायच्या आणि नेमक्या शब्दांत मांडायच्या. प्रतिभेबरहुकूम लेखणीला लिहितं करायचं ही तर सिद्धहस्त साहित्यिकाची हातोटी! 

      ------

     " माझ्या मनाला शांती कधी मिळेल हो ? तडफड संपेल कधी ? " कुंती सौम्य हसली. ओंजळीत तोंड लपवून गदगदणारी द्रौपदी तिनं त्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. अन् तशी तिची कल्पनाही केली नव्हती. पण तिला तिच्या रडण्याचं नवल वाटलं नाही. समजुतीच्या स्वरात ती म्हणाली, 

      "शांतीचं दुसरं नाव बाईच्या लेखी बरेचदा ' समर्पण ' असतं, हे तुला माहीत आहे ? मागचा-पुढचा विचार न करता कशावर तरी ओवाळून टाकायचं स्वतःला, आणि तृप्त होऊन संपूनच जायचं. तू अशी संपणारी नाहीस. सरळपणे कशाचाच स्वीकार स्वतःला संपवत केला नाहीस तू. तुला तुझं स्वत्व राखणं ही गोष्ट फार थोर आहे बये, पण कायमची अशांत ठेवणारी आहे. तुझी सुटका नाही तडफडण्यातून."

     ------

     द्रौपदी, राधा, कुंती या तीन महाभारतकालीन स्त्रियांच्या तीन व्यथा-कहाण्या, अतिशय संयमी भाषेत येतात, डॉ.अरुणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा या पुस्तकात.

      

      ऐसी अक्षरेसाठी गेल्या दीड दशकांहून अधिक काळ अभिमानास्पद अशा अनेक आठवणींनी भरून गेलाय आणि हा उपक्रम आपल्याच नादात बहरून आलाय. याचं कारण म्हणजे अनेक सिद्धहस्त साहित्यिकांची विविध निमित्ताने उपस्थिती, सहभाग आणि त्यांच्या साहित्याची प्रेरणा.

     डॉ.अरुणा ढेरे आणि ऐसी अक्षरे यांचे नाते असेच, अगदी जिव्हाळ्याचे. 

     

    २०१९ च्या जानेवारीत यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अरुणा ढेरे यांची एकमताने निवड झाली. या निमित्ताने आम्ही ऐसी अक्षरेचा डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे गौरव विशेषांक एका देखण्या सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केला होता. त्यावेळी अरुणाताईंच्या विनम्रतेचं दर्शन झालं आणि 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या उक्तीचा अनुभव आला.

    

     लॉकडाऊन-३मुळे वैतागून गेलेल्या आपणा सर्वांनाच अरुणाताईंचं,  त्यांच्या 'अर्ध्यावाटेवर' कथासंग्रहातल्या ह्या उताऱ्यातलं हे स्वप्न नवी प्रेरणा देईल.  

       " मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच दूर क्षितिजावर कुठेतरी एक स्वप्न दिसत असतं. त्याचा वेध घेऊन आपण पुढे पुढे जात असतो. असं दूरस्थ स्वप्न आपल्याला हुरहूर लावतं. अस्वस्थ, असमाधानी ठेवतं, पण तेच आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असतं. त्या स्वप्नासाठीच रोज सकाळी आपण झोपेतून जागे होतो. निदान मी तरी तशी होते. रोज सकाळी मला जाग येते ती याच विचारानं, की अजूनही काहीतरी अनपेक्षित, अभूतपूर्व, सुंदर, अद्भुत घडणार आहे. लवकरच, कदाचित आजदेखील!"


बेलवलकर गृहनिर्माण

११ मे २०२०

Friday, 21 August 2020

पुस्तक परिचय ४५

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     अनेक पांढरपेशी व्यक्ती आपल्या व्यावसायिक जीवनात उदंड पैसे साठवून ठेवतात. इथं बचत, तिथं मुदत ठेवी, विमा, शेअर्स, मुच्युअल फंड, पेन्शन फंड इत्यादी इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात. का? तर, भविष्याची चिंता! करोत बापडे! 

      काळजी करु नका, आज या पुस्तक चर्चेत गुंतवणूकविशेष हे सदर नाही, कोणतेही या विषयातले अर्थगुंतवणुकीचे पुस्तक आम्ही सुचविणार नाही.       

     आर्थिक गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांना स्वतःलाच पैसे कुठे गुंतवावेत याचा शोध घेता येतो. त्यांना हा असा सल्ला देण्याची काहीच गरज नाही, हे स्वानुभवावरून आम्ही सांगतो.                        आम्ही मात्र भविष्यकालीन गुंतवणूक उत्तमोत्तम ग्रंथखरेदीत  करून ठेवली आहे, यात नित्य भर पडतच असते. 

     एक सल्ला मात्र आम्ही विनामूल्य देऊ इच्छितो. दैनंदिन जीवनात मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत काय वाचावं? कोणती पुस्तकं आज विकत घेऊन ठेवावीत? कोणत्या पुस्तकात आपल्याला साठवून ठेवता येईल असे विचारधन मिळेल? वाचनसंस्कृती कशी जतन करता येईल? आपल्या मुलाबाळांवर कोणत्या पुस्तकांच्या वाचनाने उत्तम संस्कार होतील ? यादी मोठी आहे. हे विचारधन अमूल्य आहे. त्याची किंमत करणं अवघड आहे, म्हणून सल्ला विनामूल्य.

     तुम्हांला म्हणून सांगतो, मोकळ्या वेळेत आम्ही ग्रंथविक्री भांडारात जाण्याची सवय लावून घेतली, त्याचं मधुर फळ आज या लॉकडाऊनच्या काळात आम्हाला  चाखता येतंय. 

      आमच्या कुवतीनुसार पुस्तकपेढीइतकी खूप जरी नाही, तरी बरीच पुस्तकसंपदा गाठीशी असल्याचं समाधान आहे. या पुस्तकसंपत्तीमुळे अनेक भावनांचा रसास्वाद घेत आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची संजीवनी आम्हांला मिळाली आहे. एखाद्या उदासवेळी, अशी वेळ येतच नाही, कारण वाचनानं आम्हांला कायम उत्साही ठेवण्याची शक्ती दिली आहे; तरी पण, एखाद्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथाकादंबरीच्या वाचनानं आम्हाला डोळ्यांतल्या अश्रूंना वाट करून देता येणं शक्य होतं. 

     खळखळून हसणं ही आमच्या कार्यालयातल्या जॉलीवूड संघटनेची मुख्य अट. कारण आम्ही सारे उत्तम विनोदी पुस्तकंवाचनप्रेमी आहोतच. गंभीर, सकस अभिवाचन हे आमच्या वाचनधर्मातलं एक महत्वाचं धर्मतत्व आहे. 

    असो. हे सांगायचं कारण म्हणजे, पुस्तककपाट उघडलं की, आज काय वाचायचा मूड आहे त्यावरून आपोआपच बोटं पुस्तकं निवडतात. 

     आज निवडलेलं पुस्तक आहे, सुप्रसिद्ध कवयित्री आणि कथालेखिका, नीरजा लिखित चिंतन-शलाका

      ऐसी अक्षरेचा वृत्तपत्रातील  साहित्य या विशेषांकासाठी आम्ही जेव्हा उत्तम साहित्याच्या शोधात होतो, त्यावेळी हे पुस्तक आम्हांला मिळाले. लोकसत्ता या प्रमुख आणि प्रसिद्ध वृत्तपत्रातल्या साहित्य संस्कृती या सदरात दोन हजार एक च्या दरम्यान प्रकाशित झालेले ४२ लेख या ललित लेख संग्रहात आहेत. 

    लोकसत्तामधील अनेक साहित्यिक सदरे वाचनीय आणि संग्रहणीय असतात. अनेक मान्यवर साहित्यिक या वृत्तपत्रासाठी लिहितात. 

      चिंतन-शलाका या पुस्तकात नीरजा यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत.

       विसाव्या शतकातल्या मराठीतल्या समृद्ध साहित्याच्या वारश्याचा परामर्श घेत लेखिकेनं नव्या सहस्रकातल्या नव्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे, ' गेल्या सहस्रकानं दिलेला समृद्ध वारसा घेऊनच आपल्याला पुढं जायचं आहे. या नवीन सहस्रकावर आपल्या नावाचा ठसा उमटवायचा आहे. अशा वेळी आज सर्व सृजनशील लेखककवींवर एक मोठी जबाबदारी आली आहे असं मला वाटतं. ही जबाबदारी साधीसुधी नाही.' 

    सारेच लेख वाचनीय, चिंतनीय आहेत. वृत्तपत्रातील सदरात असल्याने लेखाला शब्दसंख्येचं बंधन असतं. त्या चौकटीत राहून आपले विचार नेमके मांडण्याचा लेखिकेने चांगला प्रयत्न केला आहे.

     उठेल हो लवकरच लॉकडाऊन. गाडी मूळपदावर यायला वेळ लागेल. तोवर जे चांगले हाती येईल त्या साहित्याचे जरूर वाचन करा. वाचन संस्कार वाया जात नाहीत. 

      आज रविवार आहे. पुढच्या रविवार पर्यंत परिस्थितीत पुष्कळ सुधारणा होईल अशी आशा व्यक्त करु या आणि मे सतरा नंतर खतरा दूर होत जाईल अशी अपेक्षा ठेवू या. तोवर, 


हम भी है, तुम भी हो, 

दोनों है .....

अपनेही घरोंमें ...


बेलवलकर गृहनिर्माण

१० मे २०२०

Thursday, 20 August 2020

पुस्तक परिचय ४४

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


      गेल्या शेसव्वाशे वर्षांत मराठी  साहित्यातील असंख्य पुस्तके प्रकाशित झाली. काही पुस्तकांच्या नशिबी एकच आवृत्ती होती तर काही पुस्तकांवर वाचकांच्या एवढ्या उड्या पडल्या की त्या पुस्तकांच्या अनेको आवृत्ती काढाव्या लागल्या. 

      एखाद्या ग्रंथालयात गेल्यावर वाचनसंस्कृतीत नव्याने पदार्पण करणाऱ्याला, विशेषतः नव्या पिढीतल्या उमद्या, चिकित्सक वृत्तीच्या वाचकाला, नेमकं कोणतं पुस्तक वाचावं असा प्रश्न पडू शकतो. १६-१७ वर्षांपूर्वीपासून ऐसी अक्षरेच्या माध्यमातून आम्ही सुरेख, सुंदर, उद्बोधक असे साहित्य नेमके निवडून वाचकांस देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

      सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ऐसी अक्षरेच्या एका वेगळ्याच विषयावरील विशेषांकाचे प्रकाशन लांबणीवर पडले आहे. मात्र वाचकांस या लॉकडाऊन नंतर कोणती पुस्तके आवर्जून वाचायला हवीत याविषयी २८ मार्च पासून रोज आम्ही एका नव्या पुस्तकाची ओळख करून देत आहोत. समीक्षणात्मक ओळख करून न देता त्या पुस्तकातली काही उत्तम वाक्ये, प्रसंगांची थोडक्यात माहिती देऊन, काव्य संग्रह असेल तर काही कवितांतील एखादे कडवे लिहून पुस्तकाची ओळख आम्ही करून देत आहोत.

     आज जो काव्यसंग्रह,  वाचनात विशेष गोडी असलेल्या, काव्यप्रेमी आणि चिकित्सक वृत्तीच्या वाचकांसाठी सुचवू इच्छित आहोत, त्याचं नाव आहे, 

बाळ सीताराम मर्ढेकरांची कविता

     मराठी साहित्यात विशेष रुची असणाऱ्या, अभ्यासू वृत्तीच्या वाचकांना मर्ढेकर या मोठया कवीची नक्की ओळख असेल. मर्ढेकर म्हटलं की त्यांच्या त्या कवितेची पहिली ओळ तात्काळ आठवते. ' पिपांत मेले ओल्या उंदीर; ...' कविता पूर्ण वाचली की त्यातील किड्यामकोड्यासारखे जीवन जगणाऱ्यांची व्यथा कळते.

  'पिपांत मेले ओल्या उंदीर;

   माना पडल्या, मुरगळल्याविण;

    ओठांवरती ओठ मिळाले;

    माना पडल्या, आसक्तीविण.

 गरिब बिचारे बिळांत जगले, 

 पिपांत मेले उचकी देऊन;

       दिवस सांडला घाऱ्या डोळी 

       गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

   जगायची पण सक्ती आहे;

   मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे, 

काचेचे पण; 

                         मधाळ पोळे 

             ओठांवरती जमले तेही 

             बेकलाइटी, बेकलाइटी ! 

        ओठांवरती ओठ लागले ;

        पिपांत उंदिर न्हाले ! न्हाले !'

                   *बा. सी. मर्ढेकर* 


   काही कविता समजत नाहीत, दुर्बोध वाटतात. अशा कविता जरा एकाहून अधिकवेळा वाचल्या तर त्यातील अर्थ उमगू लागतो. 

    या पुस्तकाच्या शेवटी शेवटी मर्ढेकर म्हणतात, 

    " शब्दांवर थोडी हुकमत असली आणि लय तोंडवळणी पडली म्हणजे लिहिणं फारसं कठीण नसतं.त्यापलीकडे काही पुढील लिखाणात आहे किंवा नाही हे वाचकच ठरविणार. त्यांचं मत अनुकूल पडलं नाही तर लेखकानं योग्य तो बोध घ्यावा. पण ' भूमिके ' चा टोप चढवून आणि तळटीपांचे पैंजण घालून नकटीला शारदेचं सोंग घ्यायला लावणं हा त्यावर तोडगा खास नाही."

     या कोरोनाच्या निमित्ताने थोडंसं अंतर्मुख होऊन चिंतन केलं तर लक्षात येतं की, माणूस लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, काळा वा गोरा, प्रगत देशातील असो वा मागास देशातील, अमेरिकन-युरोपियन पाश्चात्य असो आफ्रिकन- आशियाई असो, 'इस कोरोनाने किसीको भी नहीं छोडा...' मर्ढेकरांची यातील एक मोठी कविता वाचताना लक्षात येतं..., 

   ' मी एक मुंगी, हा एक मुंगी, 

     तो एक मुंगी, तू एक मुंगी, 

     ही एक मुंगी, ती एक मुंगी,            

     पांच एथल्या, पांच फिरंगी ....


     अशा एथल्या संसारांत

     जगण्याचाही चुकला पाढा;

     आणि शेवटी परिस्थितीचा 

     गळ्या खालती उतरे काढा.' 

कवितेच्या शेवटी मर्ढेकर लिहितात ...

' --सर्वे जन्तु रुटिना:। सर्वे जन्तु निराशया:।सर्वे छिद्राणि पंचन्तु। मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत्॥ ' 


या कवितेच्या निर्मितीच्या वेळी असलेली सामाजिक परिस्थिती पाहून मर्ढेकरांनी ही कविता लिहिली असेल. 


     आपण मात्र सारेच सध्याच्या संकट काळात आशावादी राहून पुनःपुन्हा म्हणू या,


"सर्वेsपि सुखिनः सन्तु।

    सर्वे सन्तु निरामया:। 

      सर्वे भद्राणि पश्यन्तु। 

        मा कश्चिद् दु:खमाप्नुयात ॥"


बेलवलकर गृहनिर्माण

९ मे २०२०

Wednesday, 19 August 2020

पुस्तक परिचय ४३

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


      ' आता ती सारे विभ्रम विसरली होती.स्वतःला विसरली होती. तिचा निवारा तिला मिळाला होता....' 

      एखाद्या कथेत शोभणारा हा मजकूर असावा असं वाटतं ना? चला, पुढे वाचू या.

      ' ....याच झाडांचा पाला तिच्या बाळांना पोसणार होता. दुसरे कुठले अन्न त्यांना आवडणार नव्हते, मानवणार नव्हते. तिने सारी हालचाल थांबवली. फांदीवर डोके टेकले. तिथून ते आता ती कधीच उचलणार नव्हती. आणि मग प्राणपणाने तिने, जिला ती डोळ्यांनी कधीच पाहू शकणार नव्हती, त्या संततीचे आवाहन केले. पांढऱ्या अंड्यांच्या रांगा सरकत-सरकत तिच्या अंगांतून येऊन फांदीवर स्थिरावू लागल्या आणि त्या अंड्यांच्या ठिपक्यांनी अतीव चमत्कारिक आकृती त्या अकराच्या घटकेवर रेखाटून ठेवल्या. अदृश्य आणि तरी कधीही पुसल्या न जाणाऱ्या अशा.' 

      हे वर्णन आहे फुलपाखराच्या मादीचे! आणि लेखाचे नाव आहे 'फिकट पिवळे पीस' 

      ' त्या सावल्यांनी त्या आंब्याच्या झाडाभोवती आपला लहरी, विक्षिप्त पण मनोहर फेर धरला होता. जाणारायेणारांच्या अंगावर त्या कशा उडून बसत होत्या. फिरून जमिनीवर घसरून पडत होत्या.' 

      हे असे ' सावल्यांचे ' निरीक्षण करणे आणि लीलया शब्दबद्ध करणे, मोठया उत्सुकतेने वाचक पुढे काय या उत्कंठेने वाचत राहील अशी सुंदर मांडणी करणे हे असामान्य प्रतिभेचेच काम असणार यात शंकाच नाही. 

      ' सकाळी अकराची ' वेळ असो, ' सोनेरी उन्हाची तिरीप '  असो, ' ढगाच्या आत सावल्या पडल्याने एक चमत्कारिक नाटकच त्या पडक्या चिमुकल्या घरात चाललेले भासत होते,' ..हे  सावल्यांविषयीचे वर्णन असो. हे सारे तुमच्या आमच्या समोर चालणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी. या साऱ्या घडामोडींकडे आपलं कधी लक्षही जात नाही! पण इतकं बारीक सारीक निरीक्षण करीत त्याची सुसंगत वर्णनं शब्दबद्ध करणं हे फक्त अजोड प्रतिभाशक्तीचंच काम असू शकतं. आम्हांला तर वाटतं, ' ही जी लेखणी आहे, ती जर मिळाली तर सरळ देव्हाऱ्यात ठेवून रोज श्रद्धेनं पुजावी!'  

     भावमुद्रा हा दुर्गा भागवत यांचा ललित लेख संग्रह वाचताना मनात याच भावना उमटल्या. 

      दुर्गाबाईंची साहित्य निर्मिती मोठी आहे. जो विषय घेतील त्यावरील त्यांचं संशोधन, चिंतन आणि त्यावरील त्यांच्या विचारांची विविध बारकाव्यांसह यथास्थित मांडणी वाचक असो वा अभ्यासक यांच्यासाठी उत्कृष्ट उदाहरणेच. 

     ऐसी अक्षरेमध्ये आम्ही दुर्गाबाईंचे पोरकी पोरे, चैत्रसखा वैशाख, संसाराच्या उंबरठ्यावर, उनपाऊस, सवाष्ण, तुळस असं साहित्य वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करून त्यांच्या लेखनाचा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.  

     भावमुद्रामध्ये पाहुणी हा, अतुल शरीरसौष्ठव आणि आरोग्य असून, दुर्दम्य जीवनासक्ती असूनही आपल्या देहाला व मनाला पूर्णपणे आत्मकेंद्रित करून निर्मितीच्या साऱ्या साऱ्या क्षेत्रापासून कसोशीने अलिप्त राहणाऱ्या, अति क्षुद्र आणि तरीही अद्भुत असे व्यक्तिमत्व असलेल्या, दोनदा विधवा झालेल्या इंदिराबाई नावाच्या एकाच व्यक्तीत कसं पहायला मिळतं हे, आजपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वीचं एक नामी उदाहरण देणारा लेख वाचनीय आहे. दुर्गाबाईंचा प्रत्येक लेख वाचनीय कसा होतो हे पाहण्यासाठी भावमुद्रा जरूर वाचावं.

     

बेलवलकर गृहनिर्माण

८ मे २०२०

Tuesday, 18 August 2020

पुस्तक परिचय ४२

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     आमचं शिक्षण तसं मराठी माध्यमातूनच झालं. अवांतर वाचन मराठीच असायचं. शाळेच्या ग्रंथालयात जे काही वाचू ते मराठी. त्यामुळे इंग्रजी वाचन इंग्रजी विषयाच्या अभ्यासापुरतं. तसे ' टारझन ' या मालिकेचे दहा अनुवादीत भाग शाळेच्या ग्रंथालयात वाचून काढले होते. पण ते इंग्रजीतून नसल्याने, त्याविषयी काय बोलणार? 

      पुढे महाविद्यालयात गेल्यानंतर अवतीभवती सगळीच इंग्रजाळलेली कार्टी! सारखी आपली कॉन्व्हेंटी इंग्रजी बोलायची. पंचाईत व्हायची हो. आता ही सारी कार्टी अगदी शुद्ध इंग्रजी बोलायची की रेटून बोलायची हे कळायच्या आत पुढचं वाक्य टाकायची! कसं का असेना आपल्याला असं फडाफडाफडाफडा इंग्रजी बोलता यायला पाहिजे, हे मनानं ठरवलं होतं. कोणी म्हटलं इंग्रजी वाचन करायला हवं. मग मस्तपैकी ब्रिटिश कौन्सिल ग्रंथालयाची पायरी चढलो आणि सभासद फी भरली. 

      गल्लीत आलो, तेव्हा एका करंट्यानं विचारलं, ' मग आज कॉलेजला गेला होताsssस की, कुठला पिक्चर टाकला?' आम्ही छाती काढून बोललो, 'कॉलेजलाच जातो, पिक्चरला नाही! आणि हो, आज ब्रिटिश कौन्सिलची मेंबरशिप घ्यायला गेलो होतो. समजलं?'  

      ब्रिटिश कौन्सिलमधून कोणती पुस्तकं घ्यायची वाचायला हे कुठं कळत होतं? काऊंटरवरची बाई अशी झोकात इंग्रजी बोलायची की त त प प व्हायचं! त्यात एखादी कडक श्टायलिश पोरगी तिला विचारायची, ' Excuse me mam, where can I get Arthur Conan Doyle  section ? ' बोंबला! त्यात आम्ही पक्के तात्या! तिच्याकडे ती कशी इंग्रजी बोलते हे शिक्षण म्हणून पाहात बसायचीही सोय नसायची! उगाच इंग्रजीत अंगावर यायची! ' काय बघतूस रं माज्याकडं..इंग्रजीत सांगू का!' असं म्हणणारी आर्चीपण नव्हती त्या काळी! काही दिवस गेलो खरे ब्रिटिश कौन्सिलमध्ये. पण आमचा फुगा फुटला होता. 

      सांगायचं काय की, इंग्रजी वाचन शून्य. मग कुठला  शेक्सपियर, कुठला जेम्स ह्याडली चेस, कुठला सॉमरसेट मॉम अन् कुठला ऑर्थर कॉनन डायल? आणि डिक्शनरी घेऊन कधी वाचणार आम्ही, ऑथेल्लो, शेरलॉक होम्स? कौन्सिलमधले चाळीस पन्नास पानी वर्तमान पत्र नुसतं हातात धरून चाळत बसायचो... गेले ते दिवस ...

      एकदा सहज एका पुस्तकप्रदर्शनात गेलो असता, तिथे ऑर्थर कॉनन डायलच्या शेरलॉक होम्स कथांचे मराठीत अनुवाद केलेले पुस्तक दिसले .... झ..ड..प घातली. हयगय न्हाय. जेव्हा जमेल तेव्हा घ्यावं वाचून. म्हणजे कोणी कधी चर्चा केलीच इंग्रजी लेखकांची तर आपल्याला काहीच बोलता येऊ नये, असं नको व्हायला! असो...

     आता बोलू या ऑर्थर कॉनन डायलच्या, ' मेमॉयर्स ऑफ शेरलॉक होम्स ' या कथासंग्रहाविषयी.  मराठीमध्ये *विवेक जोशी* यांनी या कथा अनुवादीत केल्या आहेत. शेरलॉक होम्स हे ऑर्थर कॉनन डायल यांचं मुख्य पात्र. होम्स एक अत्यंत हुशार गुप्तहेर. या कथासंग्रहात डायल यांनी होम्सच्या कामगिरीवर लिहिलेल्या, सिल्व्हर ब्लेझ, यलो फेस, स्टॉक ब्रोकर्स क्लार्क, ग्लोरिया स्कॉट, मसग्रेव्ह रिच्युअल, रिगेट स्क्वायर, रेसिडेंट पेशंट अशा अकरा अनुवादीत कथा घेतल्या आहेत. 

      मराठीत बाबूराव अर्नाळकर, एस.एम.काशीकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप, द.पां.खांबेटे, रत्नाकर मतकरी अशा अनेक दिग्गज लेखकांनी गुप्त हेर कथा, रहस्यकथा, गूढ कथा लिहिल्या आहेत. अशा कथा लिहिणाऱ्या लेखकांच्या कल्पनाशक्तीचं नेहमी कौतुक करावंसं वाटतं. एक छोटे कथानक सुचल्यावर मोठया कौशल्याने हे कथानक खुलवण्याची, फुलवण्याची सुंदर किमया आपल्या कथेत ते करतात. गुप्तहेर किंवा रहस्यकथांमध्ये वाचकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्याचं सामर्थ्य या लेखकांत होते. अशा कथांचा नायक हा नेहमीच चाणाक्ष, धाडसी, उत्तम आणि बिनचूक तर्क करणाराच असतो. इतरांच्या लक्षात न आलेल्या अथवा दुर्लक्ष केलेल्या साध्या सोप्या घटनांचे धागेदोरे घेऊन कथानायक अत्यंत हुशारीने निर्णयाप्रत येतो. 

      आमची जशी ब्रिटिश कौन्सिलच्या मेंबरशिपमुळे झालेली फजिती झाली, तशी या उत्तम गुप्तहेर असलेल्या  शेरलॉक होम्सच्या फजितीची एक कथाही या पुस्तकात वाचायला मिळाली.

       मेमॉयर्स ऑफ शेरलॉक होम्सच्या मूळ इंग्रजी कथा आम्ही कधीच वाचल्या नव्हत्या. ऑर्थर कॉनन डायलचं नाव मात्र अनेक वेळा अनेकांच्या तोंडून उत्तम लेखक म्हणून ऐकलं होतंच. मराठीतल्या गुप्तहेर कथा,  रहस्य कथा वाचण्याची आवड होतीच. साधारण शंभर पानांच्या आतबाहेर असलेल्या झुंजार कथा, धनंजयकथा, गरुडकथा, सागरकथा असलेलं पुस्तक दोन अडीच तासांत वाचून व्हायचं. याचं कारण वाचनवेड. या वाचनवेडामुळे वेळ तर मज्जेत जातो हा अनुभव. या अशा कथांच्या वाचनामुळे विचारपद्धतीवर काही परिणाम होतो की नाही हे नाही सांगता येणार. पण तुम्ही वाचायला हरकत नाही.

        

बेलवलकर गृहनिर्माण

७ मे २०२०

Monday, 17 August 2020

पुस्तक परिचय ४१

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


   जो नियमांत असे तो सुखात वसे 

   हसतमुख तो सदा प्रसन्न दिसे ...


     आईशप्पथ काय जमलंय काव्य, काही न करता सव्यापसव्य, शब्द कसे सुचलेत दिव्य! 

      

    वा वा वा, चक्क सुचलं कीं काव्य! 

    आम्हांला नेहमी वाटायचं की आम्हांला कविता स्फुरतात! यमक जुळवत, शब्द कवितेत बांधता येतात, इत्यादी इत्यादी. फार फार वर्षांपूर्वी, एक दिवस एक कविता, मुक्तछंदात आम्हांला सुचली. इतकी गोड वाटली, आम्हालाच की, सगळ्यांना दाखवत सुटलो. आमच्या एका स्नेह्यानं ती वाचली,  प्रणीत कुलकर्णी त्यांचं नाव, म्हणाले, 'मीटरमध्ये बसवायला हवी!' 'म्हणजे ? नाही समजलं ' आम्ही प्रश्नार्थक मुद्रेनं विचारलं.

     आता ही चर्चा इथं नाही वाढवत. कारण कविता जरा लांब पळाली, आमच्यापासून! कुलकर्णी स्वतः मात्र उत्तम गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. असो.

      मुद्दा काय की, कविता ही लयीत असायला हवी, नियमांत बसायला हवी. हा मुद्दा पटल्यामुळे आमचं कवितेच्या नादी लागणं सोडल्यात जमा झालं. 

       शाळेत असल्यापासून सगळ्या कविता, ओव्या, श्लोक अगदी मोठ्ठयांदा तालासुरात म्हणत म्हणत पाठ व्हायच्या. अगदी आज अनेको वर्षांनंतरसुद्धा सारे शब्द न चुकता ओठांवर आले की कौतुक वाटते त्या विशिष्ट नियमबद्ध काव्याचे. जसे की, 

    ' सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो 

     कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ' 

किंवा ..

    ' क्षणोक्षणी पडे उठे परि बळे उडे बापडे..' 

अथवा ... 

    ' कांही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी ..' 


      आता हे आठवायचं कारण असे की पूर्वी, कविता वृत्तात बांधलेल्या असायच्या, तो अभ्यासाचा विषय आज असा सुचला की, वृत्तदर्पण या नावाचं कै.परशुराम बल्लाळ गोडबोले यांनी शके १७८२, म्हणजे, इ.स.१८६०-६१ मध्ये रचलेले हे पुस्तक खूप दिवसांनी आज पुन्हा वाचायला घेतले. 

    नमूनि देवदेवातें। रसिकस्वांततर्पण॥ 

    बालबोधार्थ करितों। अल्प हे वृत्तदर्पण॥ 

    छंदें वृत्तें संस्कृतांत। वर्णिली असती मुळीं॥ 

    पाहून त्याच रीतीनें। देशभाषेंत सांगतों॥ 

    या पद्यानेच पुस्तकविषयाला रचनाकाराने सुरुवात केली आहे. 

    एखादा वाचक जर औत्सुक्याने हे पुस्तक वाचू लागेल तर त्यात त्याला नक्कीच स्वारस्य निर्माण होईल असे आम्हांस वाटते. आपल्यापैकी कित्येकांना गमतीगमतीत असं काव्यात बोलायला आवडतं, अशांना तर या वृत्तविषयात नक्कीच रुची असेल.

     आपण शाळेत मराठी शिकताना या गणवृत्तांची ओळख होते. य यमाचा न नमन। त ताराप र राधिका॥ म मानावा स समरा। ज जनास भ भास्कर॥ गणवृत्तांत हे गण महत्वाचे. लक्षात ठेवण्यासाठी आम्हांला शाळेत, *यमाताराजभानसलगं,* म्हणजे, यमाता, मातारा, ताराज राजभा,जभान, भानस,नसल,  सलगं.. असंही शिकवून ठेवल्याचं आठवतंय.

     *वृत्तदर्पण* मध्ये अभंग, दिंडी, साकी, ओवी, दोहा, घनाक्षरी, घुंगरवाळा, आनंदकंद, सुनीत याबरोबर पृथ्वी, मंदारमाला, मंदाक्रांता, शार्दूल-विक्रीडित, इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, भुजंगप्रयात,  वसंततिलका, शिखरिणी आदी अनेक वृत्तांची सोदाहरण आणि रंजक माहिती दिली आहे.

   *सुनीत* वरुन आठवलं. बहुधा ' यज्ञ ' ही भा.द.खेर-शैलजा राजे लिखित सावरकरांवरील कादंबरी असावी. कादंबरीतलं सावरकरांनी अंदमानातल्या दुष्ट तुरुंगाधिकारी 'बारी' च्या, ' सावरकर, त्या शेजारच्या कैद्यानं ३० पौंड तेल काढलं, आणि तुझं अजून दोनतीन पौंड कमीच कसं ? ' या प्रश्नाला दिलेलं बाणेदार उत्तर आठवलं. सावरकर म्हणतात, 'त्या कैद्याला एक सुनीत (सॉनेट) रचायला सांगा, त्याला नाही जमणार, जे मी पाच मिनिटात रचून दाखवतो...! '  

   

    म्हणावें तयाला भुजंगप्रयात। क्रमानेंच येती य चारी जयांत॥ पदी ज्याचिया अक्षरें येति बारा। रमानायका दु:ख माझे निवारा॥ अशाप्रकारे नियमवृत्तातच शब्दाक्षरे रचून भुजंगप्रयातची इथे  ओळख करून दिली आहे. उदाहरण अर्थातच, मनाचे श्लोक. 

  ' मना सज्जना भक्तिपंथेचि जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ ..' 

     

    म्हणति कवि तयाला मालिनी वृत्त तेव्हां॥ 

    न न म य य असे हे संघ येतात जेव्हां॥ 

    प्रतिचरणिहि पंध्रा अक्षरे हीं तयाची॥ 

    हरिहर-चरणाला आपुले हीत याची॥ 

     या मालिनी वृताच्या उदाहरणादाखल शाकुंतल नाटकातलं हे पद घेतले आहे.

    तरुवर सुफलांच्या आगमी नम्र होती॥ 

    जलदहि जलभारे खालती फार येती॥ 

    सुपुरुष विनयाते भाग्यकाली धरीती॥ 

    उपकृति करित्यांची जाणिजे हीच रीती॥ 


     विवाह समारंभाला गेलो की, आपले कान, ' तदेव लग्नं सुदिनं ..' ह्या ओळी ऐकण्याची वाट पाहात असतात. त्याआधी मंगलाष्टकं एका ठराविक लयीत म्हटली जात असतात. छान वाटत असतं कानांना, जर ती व्यवस्थित म्हटली जात असतील!  ती मंगलाष्टकं ज्या चालीत म्हटली जातात ते वृत्त असतं - शार्दूल-विक्रीडित ...

  आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित॥ 

   मा सा जा स त ता ग येति गण हे पादास कीं जोडित॥ 

   एकोणीस पहा गणूनि चरणीं येतात हीं अक्षरें॥ 

   तेज:पुंज नभोगणी पसरली रत्ने पहा नक्षरे॥ 


चरणात १९ अक्षरे, गण म स ज स त त ग 

उदाहरण दिलंय मोरोपंतांच्या काव्याचं. 

  जो लोकत्रितयी फिरे स्थिर नसे ताटीं जसा पारद॥ 

   स्वांतध्येयपदीच निश्चल भवांभोधीत पार-द॥ 

   जो वर्णे गगनोदरी क्षण दिसे पूर्णेंदु कीं शारद॥ 

   श्रीशांत:पुरचत्वरीच उतरे तो सन्मुनी नारद॥   


   तर वाचकमित्रांनो, आपलं जुनं काव्य हे असं वृत्तात बांधलेलं असायचं. सोपं नाही आपली कविता अशी नियमांत बांधणे. तशी प्रतिभाशाली उत्तुंग कल्पनाविलास करणारी कविमंडळी उगाच नाही अशा काव्यरचना तयार करती झाली जी काव्ये पिढ्यानपिढ्या वाचली, अभ्यासली जातात.


  घरांत बसुनी निवांत हसुनी तुम्ही लोक जी । 

  खुशाल असता कशास करता,  नको काळजी ॥ 


बेलवलकर गृहनिर्माण

६ मे २०२०

Sunday, 16 August 2020

पुस्तक परिचय ४०

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     My Dear Brothers And Sisters ....आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिकागोच्या धर्मपरिषदेसाठी भारतातून गेलेल्या स्वामी विवेकानंदांनी साऱ्या अमेरिकनांची मने जिंकली.

      बरेच विषय, वेगवेगळे लेखक, कवी यांच्या कथा, कविता असं शक्य तितकं बहुढंगी बहुरंगी  साहित्य गेल्या ३८ दिवसांत वाचकांस आम्ही सुचवीत आहोत. नवीन कोणता विषय किंवा लेखक आजच्या दिवसासाठी निश्चित करावा, यासाठी पुस्तककपाटात पाहता पाहता दोन पुस्तकं नजरेत भरली. एक दोन अडीचशे पानांचं आणि दुसरं  छप्पन पानांचं! आणि आठवले हे  शालेय जीवनापासून ऐकलेले दिव्य शब्द.

      स्वामी विवेकानंद यांचेविषयी आपल्या सर्वांना अतिशय आदर आणि अभिमानही आहे. याहून  अधिक आपल्याला स्वामीजींच्या विचारांविषयी काय माहीत आहे, असा प्रश्न जेव्हा स्वतःला विचारला तेव्हा स्वतःबद्दल थोडीशी नाराजीच वाटली. हातातली दोन्ही पुस्तकंसुद्धा अद्याप वाचायची राहून गेल्याची खंत वाटली. 'ज्ञानयोग' पुस्तक आजच्या आज वाचून त्यावर काही लिहिणं एवढी आपली पात्रता नसल्याची जाणीव झाली. दुसरं *ज्ञानमार्गावरील प्रवचने* लगेचच वाचून काढणे शक्य असल्याने बसल्या बैठकीत वाचून पूर्ण केले.

      स्वामीजी अमेरिकेत असताना त्यांची ज्ञानमार्गावर झालेली प्रवचने त्यांच्या शिष्या कुमारी एस्.ई.वॉल्डो यांनी ती लिहून घेतली होती. स्वामीजींचे गुरुबंधू स्वामी सारदानंद जेव्हा इ.स. १८९६ मध्ये प्रचारकार्यासाठी अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी वॉल्डो यांच्या वहीतून ही प्रवचने लिहून घेतली होती. तोच नऊ प्रवचनांचा संग्रह.

     वाचताना आवडलेल्या, भावलेल्या, पुनःपुन्हा वाचायला हव्या अशा वाक्य-परिच्छेदांवर खुणा करण्याची सवय. बहुतेक सर्वच पानांवर असंख्य खुणा झाल्या. कोणत्या निवडून वाचकांना सांगायच्या ही मोठीच समस्या झाली. तरी एखाददोन वाक्ये किंवा परिच्छेद इथं घेण्याचा मोह आवरेना.

      ' नि:स्वार्थ भावाचा अर्थ निकृष्ट किंवा भासमान 'अहं 'चा त्याग करणे हा आहे.' 

      ' मनच आपल्यापुढे शरीर, लिंगभेद, संप्रदाय, जाति, बंधन इत्यादी भ्रम उपस्थित करीत असते.म्हणून मनाला सत्याचा साक्षात्कार होईपर्यंत त्याला सतत सत्य सांगत राहिले पाहिजे. आपले सत्यस्वरूप हे आनंदमय आहे.' 

     ' मानवी जीवनाची दोन उद्दिष्टे किंवा लक्ष्ये आहेत - खरे ज्ञान किंवा विज्ञान आणि आनंद.

     ' आर्यांच्या दृष्टीने धर्मात स्त्रीपुरुषभेदाला स्थान नाही.वेदांमध्ये व उपनिषदांमध्ये आपल्याला असे दिसून येते की स्त्रिया सर्वश्रेष्ठ सत्यांचा उपदेश करीत व पुरुषांप्रमाणे त्यांनाही मान दिला जाई.'  

     असं बरंचसं वाचायला देता आलं असतं. पण ते जवळपास पुस्तकाइतकंच झालं असतं.

      हे पुस्तक वाचा म्हणून सांगावंसं वाटलं तर ते प्रत्येकाने वाचायलाच हवं म्हणून.

     कधी एकटेपण माणसाला छळतं, तर कधी विचार नैराश्याकडे झुकू लागतात. अगतिकता त्रास देते. अशावेळी अंतर्मुख होऊन विवेकानंदांसारख्या थोर तत्वज्ञानी व्यक्तीचे सहज सुंदर विचार आपल्यातलं चैतन्य फुलवतात. मनाला आलेली मरगळ त्यांच्या साध्या साध्या वाक्यांतल्या संदेशांनी दूर होते. अगदी सहजच आपण अंतर्मुख होतो. आपणच आपले मार्ग शोधून काढतो. समस्यांवर मात तरी करतो, नाहीतर परिस्थितीचा स्वीकार करून सामोरे जातो. 

     आम्ही काही तत्वज्ञ नाही. पण तुम्हीही हे पुस्तक जरूर वाचावं. आज ना उद्या मार्ग दाखवण्याइतके समर्थ विचार या पुस्तकात आहेत अशी आमची पक्की खात्री आहे.

      

बेलवलकर गृहनिर्माण

५ मे २०२०

Saturday, 15 August 2020

पुस्तक परिचय ३९

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


     रॉय किणीकर, तसं साहित्य क्षेत्रात, नव्या वाचकवृंदात अभावानंच माहीत असलेलं नाव. ऐसी अक्षरेच्या मे-जून २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या अंकाच्या अतिथी संपादक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्यांनी रॉय किणीकर यांच्या उत्तररात्र या काव्यसंग्रहातील काही छोट्या कविता घेण्याविषयी सुचविले होते. 

      उत्तररात्र हे छोटे पुस्तक जेंव्हा हाती आले, त्यातल्या सर्वच कविता अगदी चार चार ओळींच्याच दिसल्या. 


    शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता 

    कोषात जाउनी झोपा मारीत बाता 

    रस रूप गंध अन् स्पर्श पाहुणे आले 

    घर माझे नाही, त्यांचे आता झाले ॥ 


     एकेक कडव्यातल्या या कविता वाचताना, या अर्थपूर्ण असल्याचे लक्षात आले. वाचकाला सहज समजू शकणाऱ्या या रुबाया, वाचता वाचता ओठांवर ती सहज सुरेल लय घेऊनच येऊ लागल्या.


    हे असेच लिहिणे, असेच असते गाणे 

    जरि नसले अश्रू असेच आहे रडणे 

    का असे, तसे का, नका विचारू आता 

    तो निघून गेला उत्तर देता देता ॥ 


    हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ 

    या विदूषकाला नाही रडाया वेळ 

    लावून मुखवटे नवा खेळ चल लावू 

    ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ ॥ 


     अशी विषण्णता किणीकरांच्या काव्यात दिसून येते.

      लेखन हाच किणीकरांचा पिंड, व्यवसाय. किणीकरांनी काही मराठी चित्रपटांच्या कथा, पटकथा संवाद लेखन केलं आहे.१० वर्षे दीपावली या प्रसिद्ध वार्षिकाचे ते संस्थापक, संपादक होते. त्यांचं जीवन थोडं अजबच होतं म्हणायचं. उत्तररात्र पुस्तकाच्या प्रस्तावनेत, त्याला 'कोलाज' असं म्हटलंय, रॉय किणीकर यांच्याविषयी लिहिताना असं म्हटलंय की, त्यांनी लेखक असूनही सरसकट आपली लेखणी राबवली नाही. व्यवहारी जगणे हे तर त्यांच्या स्वभावात नव्हते. रात्री-अपरात्री एस.टी. स्टँडवरच्या झकास वातावरणात ते पुस्तकं वाचीत असत. एस.टी.स्टँडबाबत ते म्हणायचे, "एस.टी.स्टँडसारखी सुंदर जागा नसते. कुठली कुठली किती प्रकारची माणसं येत असतात. आणि कशाकशासाठी कुठंकुठं जात असतात. किती असंख्य प्रकारचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. आपण आपले कुठल्यातरी एखाद्या बाकड्यावर बसून बघत राहावं. फार काही बघायला मिळतं." 

      भंगड, विचारवंत, मित्र, बाप, नवरा, संपादक, लेखक आणि कलंदर - अशी त्यांची अनेक रुपे होती. 

    रॉय किणीकर यांचं लेखन चिंतनशील आहे. सुरवातीला किणीकरांची, बहुधा त्यांच्याच हस्ताक्षरातली रुबाई बघा.


    हा देह तुझा पण देहातिल तू कोण 

    हा देह तुझा पण देहाविण तू कोण 

    हा देह जन्मतो वाढत जातो सरतो 

    ना जन्म मरण ना देहातिल तो म्हणतो ॥ 

    

    दिसणार कसा भाकरीत लपला देव 

    भाकरी करपली, करपुनि गेला देव 

    मायावी स्वार्थी कृतघ्न आहे धरती 

    एकाला साखर, एकाच्या तोंडी माती ॥ 


    या रुबाया वाचताना, पूर्वी उमरखय्यामच्या रुबाया वाचत असताना, आम्हांलाही काही सुचलेलं तुम्ही वाचाल ? नाही वाचाच. काय आहे की, उद्यापासून पुन्हा एकदा, ' ये रे माझ्या मागल्या अन् ताक कण्या चांगल्या! ' असं झालंय खरं. थोडेथोडके नाही तर चक्क चाळीस दिवस घरी बसून काढलेत. आणि आता अजून १४ दिवस ? कसं व्हायचं देशाचं, आपलं, अश्या काळज्या नका करू. आम्ही म्हणतो, 


  'डोक्यास लावुनी हात कुणी बैसला 

  चिंता करतो विश्वाची या कसला 

  क्षण दोन मिळाले मौज कराया इहलोकी 

  घे आनंद लुटोनी, जाणे कुठे, न कळे कुणाला॥ 


     या लॉकडाऊनमुळे घरच्यांच्या सहवासात किती सुरेख काळ गेला असेल. आता पुन्हा रहाटगाडगं सुरू झालं की कुठे एवढा वेळ मिळणार आहे घरासाठी द्यायला? घरात असल्याने सुरक्षित आहात, ही देवाचीच कृपा समजायची. पण तोपर्यंत आपल्याला काय वाचायचंय त्या त्या आम्ही सुचवलेल्या पुस्तकांच्या यादीत हे रॉय किणीकर लिखित उत्तररात्र हे ही समाविष्ट करा.

    

बेलवलकर गृहनिर्माण

४ मे २०२०

Friday, 14 August 2020

पुस्तक परिचय ३८

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

 

     "....तेवढी पॉवर आहे त्यांची."

     "हो. पण तुमच्याजवळ आहेत म्हणजे? "

     "पुढलं तर ऐकाल? "

    आता काय सांगावं या विचारात मी पडलो.

     "सांगा ना." सासरेबुवा उतावीळ.

     "फार ...म्हणजे फारच मोठा चमत्कार आहे! हां, आठवला. सकाळी उशाखाली बघतो तो तर काय? त्यांची लंगोटी. किरमुजी रंगाची. म्हटलं, म्हणजे काकामहाराज खरोखरच जवळ आहेत! मी लंगोटीला नमस्कार केला ..."

    थांबून पाहिलं तर सासरेबुवांनी वर पाहून हात जोडलेले.

    "धन्य...धन्य! तुमच्यापाशी ती लंगोटी..."

    "लंगोटी नाही, प्रसाद म्हणा!"

    "... बाळासाहेब, त्या प्रसादाचं दर्शन..."

    "कसं शक्य आहे?.. तो प्रसाद मी रोज पँटमध्ये वापरतोय!सासरेबुवांनी च्यायला खाली वाकून मला नमस्कार केला! 

     

      खुदुखुदु हसू फुटत होतं, तसं आमची 'मंडळी' आमच्याकडे प्रश्नार्थक डोळ्यांनी ह्यांनी काय एवढं इनोदी वाचलं म्हणून पाहात होत्या! आम्ही शं.ना.नवरे लिखित पर्वणी कथासंग्रहातील पर्वणी ही कथा वाचत होतो. 

     शन्ना, एक मिश्किल, हसतमुख देखणं आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. ऐसी अक्षरेचे जानी दोस्त! हो, कारण त्यांच्या कित्येक चटपटीत कथा-लेखनाने ऐसी अक्षरेची मान उंचावलीये.

      नाटककार, लेखक, पटकथाकार  शन्ना..ऐसी अक्षरेचे फँन.. हो, फँनच होते.

      भारताच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑगस्ट २००६ मध्ये काढलेल्या ऐसी अक्षरेच्या विशेषांकाच्या प्रकाशनासाठी आमच्या विनंतीला मान देऊन शन्ना 'भरपावसांत' (त्यांच्याच मिश्किल शब्दांत) आवर्जून आले होते. आपल्या खुसखुशीत मनोगतात शन्नांनी पै(व्हीआयपी) पाहुणा (सामान्य अतिथी), अठरा विश्वे दारिद्र्य (म्हणजे वर्षभर सतत दारिद्र्य), विठ्ठलाच्या आरतीतले 'दर्शन हेळामात्रे' (क्षणमात्रे) अशा शब्दांचे अर्थ उलगडून सांगितले होते. गणपतीच्या आरतीमधील, 'कंठी झळके माळ मुक्ताफळांची' या ओळीतील मुक्ताफळे म्हणजे, जसे, काही वर्ण ओष्ठव्य, तालव्य, दंतव्य तसे कंठातून आणि काही मोत्यासमान दिसणाऱ्या दातांतून जन्म घेतात, इथे 'मुक्ताफळे' म्हणजे 'तोंडाचे शब्द' असा अर्थ शन्नांनी समजावून सांगितला होता.

     शन्ना उत्कृष्ट नाटककार, पटकथालेखक, कादंबरीकार होते. त्यांचे अनेक कथासंग्रह लोकप्रिय झाले. शन्नांनी वर्तमानपत्रांमध्ये केलेले स्तंभलेखन खुसखुशीत असायचे.

     शन्नांच्या पर्वणी या  कथासंग्रहात विनोदी, मिश्किल अशा वेगवेगळ्या ढंगाच्या कथा आहेत. दोनचार उदाहरणं देतो. पर्वणी या पहिल्याच कथेत,  'महाराज' नावाच्या ढोंगावर, थोतांडावर शन्नांनी मजेशीर जोडे हाणले आहेत. 'गालबोट' मध्ये नवराबायकोच्या तीस वर्षाच्या संसारानंतर उभयतांच्या मनातलं किल्मिष हळुवारपणे शब्दबद्ध केलंय. 'आईस्क्रीम' कथेतला गोपीनाथ उर्फ गोपीचंद याचा वारंवार होणारा प्रेमभंग गंमतीशीर पद्धतीनं कथन केलाय. तर 'बोलनगरी' ही कथा  व्हेंट्रीलॉक्विस्ट या कलेवरील आहे. व्हेंट्रीलॉक्विस्ट म्हणजे शब्दभ्रम किंवा जुन्या मराठीत गारुडीवाणी.

     शन्नांचं सर्वच साहित्य वाचकाला आनंद देणारं आहे. मिळेल ते, मिळेल तेव्हा जरूर वाचा. हे तर आम्ही तुम्हांला नेहमीच सांगतो. 

    आता लॉकडाऊन उठला असता तर बरं झालं असतं, असं आपल्या साऱ्यांनाच वाटत होतं. पण शासनानं दोन आठवडे लॉकडाऊन वाढवला. जाऊ द्या झालं. ठेविले कोरोनाने घरांत बंदिस्त। चित्तीं राहुनी घरी समाधानी, वाढवू स्वतःवरी भिस्त .. नाही जमलं ना? पण असु देत, नाही खोडत. लिहिणाऱ्याला नीट जमलं नाही, आणि काय, ते हे, एवढं तरी तुमच्या लक्षात राहील! पर्वणी मधली 'आईस्क्रीम' वाचा, म्हणजे हसाल.. स्वतःवरही ...! 


बेलवलकर गृहनिर्माण

३ मे २०२०

Thursday, 13 August 2020

पुस्तक परिचय ३७

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     

      " आदर्श लेखनाचे काही मापदंड आहेत. पहिला म्हणजे त्या लेखनाने शाश्वत सत्याला गळामिठी मारलीच पाहिजे. दुनियेत काही शाश्वत सत्य असतात. माणसाला निर्मळाची ओढ लागणं, निरामयतेचं आकर्षण असणं हे एक शाश्वत सत्य आहे.तुकाराम महाराजांचा अभंग तुमच्या काळजाला भिडतो, तो का? कबीराचा रोखठोक दोहा तुम्हांला क्षणभर भानावर आणतो, तो का? कारण या ठिकाणी शाश्वताची ठिणगी आहे. सृष्टीतलं हे शाश्वत सत्य सतत शब्दांत पकडणं आणि आपल्या ललित लेखनात त्याचा काव्यात्म, कलात्म आविष्कार करणं हे माझ्यासारख्या पोटार्थी लेखकाचं काम नव्हे. त्यासाठी एखादा टागोर किंवा कवी केशवसुत लागतो. ते गरुडाचं काम आहे."

     मागं, ऐसी अक्षरेच्या दिवाळी २००४ च्या दिवाळी अंकासाठी आम्ही द.मा.मिरासदार, मधुमंगेश  कर्णिक, वि.आ.बुवा, शं.ना.नवरे, सुभाष भेंडे, रवींद्र पिंगे या प्रथितयश लेखकांना त्यांनी लिहिलेली, त्यांना आवडलेली एखादी कथा, ललित लेख ऐसी अक्षरेसाठी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्याअंकासाठी रवींद्र पिंगे यांनी पाठवलेल्या त्यांच्या आवडत्या  'तिसरा हात ' या लेखासोबत वरीलप्रमाणे आपल्या मनोगताची सुरुवात केली होती. 

    आज रवींद्रायन हे रवींद्र पिंगे यांचं पुस्तक वाचायला घेतलं, तेव्हा हे आठवलं. ऐसी अक्षरेच्या उपक्रमाचं त्यांना भारी कौतुक होतं. कै.शरच्चंद्र बेलवलकर यांच्यासोबत त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता तेव्हा आणि एकदा ते असेच पुण्यात आले असता कार्यालयात आले होते तेव्हा त्यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या होत्या.

     पिंगे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख असं विपुल साहित्य लेखन केलं आहे.

     ऐसी अक्षरेच्या काही अंकांत  पिंगे यांचे ' चर्चिलची संध्याकाळ,' ' हेमिंग्वेचे क्षणदर्शन,' ' हार्डीची प्रेमयात्रा,' ' आनंदाची फुले,' एस.जी. वेल्स ' आम्ही पुनःप्रकाशित केले आहेत. रवींद्र पिंगे यांच्या लेखांनी ऐसी अक्षरेचं साहित्यिक ऐश्वर्य खुलवलं आहे.

     रवींद्रायन मध्ये ३७ छोटे मोठे लेख आहेत. अगदी 'चहा पिता पिता' यासारख्या विषयावरही पिंगे लिहितात. वडलांना कर्करोगाची लागण झाली तेव्हा त्यांना क्ष-किरणांच्या फवाऱ्यासाठी नेलं असता डॉक्टर म्हणाले होते, "आत्ता हे ताठ शरीराने यंत्रासमोर जातील, पण दीड दोन मिनिटात घायाळ होतील, ते परतले की त्यांना आधार द्या!" वडील त्याच तरतरीत अवस्थेत बाहेर आले, त्यांना ' विश्रांती घ्या ' असे म्हणताच ते म्हणाले, "कशासाठी?" रस्त्यावर आलो तसे वडील म्हणाले, "मला चहा दे, उडपी, इराण्याकडचा नको, दक्षिणी ब्राह्मणाच्या उपहारगृहातलाच हवा!" ही वडलांची हृद्य आठवण पिंगे सांगतात. तर ' माझा लेखनप्रवास मध्ये लिहिताना ते म्हणतात, ' आई एकदा सहज बोलून गेली, 'रवी, तू इस्टेट केली नाहीस हे दिसतंच आहे, पण तुझे नाव हीच तुझी इस्टेट असेल!' 

     ' चंद्र सूर्य मावळले ' मध्ये,  त्यांनी बोलण्याच्या ओघात कवीच्या वैगुण्यावर बोट ठेवलं असता पुलंनी त्यांना सावध करीत  जे सांगितलं त्यावर पिंगे लिहितात, ' भाई म्हणाले, "पिंगे, एक लक्षात ठेव. कुणाचं कधीही वर्म काढू नकोस, ते तुझं काम नाही. समजा एखाद्यानं तुला एक हजार ओळींचं खंडकाव्यआणून दिलं नि त्यातल्या फक्त दोनच ओळी चांगल्या असतील, तर तू फक्त त्या दोन चांगल्या ओळींची भलामण कर. आपण कीर्तनकाराचा रोल करायचा. समीक्षकाचा नाही.' 

     पिंगेंनी खूप भटकंती केली. जे जे पाहिलं, दिसलं, भावलं त्यावर ते लिहित राहिले. 

     जेंव्हा हे रवींद्र पिंगेंचं हे रवींद्रायन मिळेल तेव्हा जरूर वाचा. 

      गेल्या महिना सव्वा महिन्यातल्या संसारातल्या अनेक गोष्टींमधल्या खाचाखोच्यांची बक्कळ माहिती गाठीशी असेलच  तुमच्या! बघू या, ३ मे उद्याच आहे. राहू या आशावादी..


बेलवलकर गृहनिर्माण

२ मे २०२०

Tuesday, 11 August 2020

पुस्तक परिचय ३५

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


      शब्द--निसर्गाने फक्त आणि फक्त मानवालाच दिलेले हे  वरदान. शब्दांत पुरातन काळापासून असंख्य ऋषीमुनी, शास्त्रज्ञ-तत्वज्ञानी-संशोधक अशा  थोर व्यक्तींनी ज्ञान-तत्वज्ञान, इतिहास, येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीसाठी नि:स्वार्थपणे साठवून ठेवलेला आहे. 

     शब्दांतून राग-लोभ, स्वार्थ-परमार्थ, असूया, दंभ, लबाडी, चिंता, चिंतन, आदेश, विनंती, न्याय, असं बरंच काही व्यक्त होतं. साहित्य, शास्त्र, गीत शब्दांतून प्रकटतात. शब्द घेऊन येतात रौद्ररस, वीररस, शृंगाररस, भक्तिरस आदी नवरस.

     गोड शब्द, तिखट शब्द, कडवट शब्द, मधाळ शब्द अशा शब्दांनासुद्धा वेगवेगळ्या चवी असतात! या आणि अशा अनेक चवी चाखण्यासाठी कानांनाही जिव्हा फुटतात.

      बाळमुखातून येणाऱ्या पहिल्या शब्दाची सारेच आतुरतेने वाट पाहतात. बोबड्या बालस्वरांशी मोठेही बोबडं बोलतच संवाद साधत बालस्वरांचा मधुर श्रवणानंद कानांत साठवू पाहतात.

 

  ' ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल

    वसंत-वैभव-गाते कोकिल 

    बालस्वरांनी करुनी किलबिल 

       गायने ऋतुराजा भारिती ..

    कुश लव रामायण गाती ..

    

    सात स्वरांच्या स्वर्गामधुनी 

    नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी 

    यज्ञ-मंडपी आल्या उतरुनी 

       संगमी श्रोतेजन नाहती..

    कुश लव रामायण गाती ..' 


   असे हे बालस्वरांनी गायलेल्या  ग.दि.माडगूळकर नावाच्या आधुनिक वाल्मिकीच्या रामायणातील कर्णमधुर स्वर्गीय शब्द.

     १९५५च्या रामनवमीपासून  पुणे आकाशवाणी केंद्रावर वर्षभर चाललेल्या या अवीट गोडी लाभलेल्या ५६ गीतांच्या रामायणानं मराठी रामभक्तांनाच नव्हे तर साहित्यिक, संगीत रसिकांना रामायण काळात नेऊन ठेवलं!


     इक्ष्वाकू कुळातल्या सामर्थ्यवान धर्मपरायण महाराजा दशरथाला काहीच कमी नव्हते..

   ' दशरथास त्या तीघी भार्या 

    सुवंशजा त्या सुमुखी आर्या 

    सिद्ध पतीच्या सेवाकार्या 

बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी 

    तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमी 

    तिन्ही लोकिंचे सुख ये धामी 

  एक उणेपण गृहस्थाश्रमी

पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी 


दशरथासह साऱ्या अयोध्यावासी यांच्या या शल्यापासून ते, 


    ' वनात विजनी मरूभूमीवर 

     वाढवीन मी हा वंशांकुर..' 


या सीतामाईला लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेवरुन वनात सोडण्यापर्यंतचा हा सर्व काळ,  माडगूळकर नावाच्या प्रतिभावंताने अवघ्या ५६ गीतांत कथन केला आहे! ही या आधुनिक शब्दप्रभू वाल्मिकीच्या माधुर्य घेऊन आलेल्या शब्दांची किमया आहे. हे शब्द अनेक भाषांत तीच लय पकडून अनुवादीत झाले. हे शब्द गेली पासष्ट वर्षे अनेक गायक गायिकांच्या गोड गळ्यातून शेकडो वर्षे रसिक भक्तांच्या कानांना श्रवणानंद देत थेट हृदयांत वस्ती करून राहतील, इतक्या मधुर संगीतात बाबुजी-सुधीर फडके यांनी साखरआंब्यासारखे अमृतमय करीत घोळवून ठेवले आहेत.

    मिती वैशाख शुद्ध तृतीया शके १८८५ म्हणजे इ.स. १९६३ पासून गेली ५७ वर्षे हे *ग.दि.माडगूळकर रचित गीत रामायण* अनेक भाविकांच्या हाती जाऊन त्यांना तृप्त करीत दिमाखाने आमच्या घरी पावित्र्य राखून बसलेले आहे.

    साहित्य रसिक मित्रांनो, या *गदिमारचित गीत रामायणाचे* पारायण तर असंख्यांनी केले आहे, असंख्य करीत आहेत, करीत राहतील. विश्वास आहे; तुम्हीही केलं असेल. नसेल, तर आवर्जून करा.

     आपण सारे घरातच आहोत तर *गदिमांच्याच* शब्दांतील एक लोकप्रिय गीत, शेवटी थोडासा शब्दबदल करीत, गदिमाही या शब्दबदलास अनुमती देतील, भक्तिभावे गाऊ या. हे *शब्द* जगातील सर्वच मानवजातीला उपकारक ठरतील आणि रक्षणही करतील ही दृढ श्रद्धा.

     ' रामचंद्र स्वामी माझा 

      राम अयोध्येचा राजा 

      राम सज्जनांचा त्राता 

      हाती धनु पृष्ठी भाता 

      राम दुर्जनांचा वैरी 

      राम कोरोनासी मारी ' 


बेलवलकर गृहनिर्माण

३० एप्रिल २०२०

Monday, 10 August 2020

पुस्तक परिचय ३४

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

      

       ' मेकपसाठी मास्तरांसमोर बसताना काहीतरी गंभीर असं वाटत होतं. हातावर भाकरी थापटतात तशा गालांना थापट्या देऊन मास्तरांनी आमची तोंडं रंगवली. आरसा आसपास नसल्यानं काय चाललंय समजत नव्हतं. पण काहीतरी सुंदर होत आहे, आपण आता इंद्र किंवा ब्रह्मदेवच होणार आहोत, असं त्या थापट्या खाताना वाटत होतं. भुवयांना काळा रंग देताना आपले डोळे तलवारीसारखे पाणीदार होत आहेत असं वाटत होतं.मेकप संपल्यावर मास्तर "चला" असं म्हणाले तेव्हा मी आता तरंगत स्टेजवर जाणार असं मला वाटत होतं.' ...

     लंपन, शारदा संगीत विद्यालयाविषयी सांगत होता आणि एकदम शाळेत असताना स्नेहसंमेलनात जाऊन बसल्याचा भास झाला. आपल्याही आयुष्यात लंपनसारखे मोठे गोड आणि जादुई दिवस होते ते आठवलं. ती उत्सुकता, संगीतशिक्षकांनी शिकवलेल्या,  'नमने वाहून स्तवने उधळा जयजयकार करा, बंधूंनो जयजयकार करा । सकल जनांचा विकास येतो आज आपुल्या घरा ॥ ' या स्वागतपर पद्याच्या ओळी न अडखळता आपोआप ओठांवर आल्या. शाळेचे दिवस, ते अजाणते वय आणि त्या काळातल्या कितीतरी सुखद आठवणी भराभर येऊ लागल्या. 

    लंपन..., प्रकाश नारायण संत यांच्या लंपनशी आमच्या ऐसी अक्षरेशी तशी जुनीच दोस्ती. एकदा लंपननं आम्हांला फुलाची गोष्ट सांगितली. एकदा कंठा सांगितली. स्पर्श सांगताना वडलांच्या जाण्यानं लंपन रडवेला झाला होता. वंटमुरीकर देसायांच्या चोरट्या बोक्याची गंमत सांगता सांगता लंपनने, "आई घरात असली, की आपण एखाद्या उबदार दुलईत गुरफटून बसलो आहोत असं सारखं वाटायचं. शिवाय माझ्या मनातले सगळे विचार तिला नेमके कसे समजतात कोण जाणे?" असंही निरागसपणे विचारलं होतं. आणि  मग हेही सांगितलं की,  'त्याच्यासह मांडीवर बसलेली धाकटी बहीण मनी आणि छोटा भाऊ बिट्ट्या असे सारी आईने जवळ घेतल्यावर लंपनने तिला विचारलं, "आमच्या तिघांचं तुला वजन झालं का ग? " आई हसली आणि म्हणाली, "ते वजन नाही लंपन, ते माझं प्रेमाचं ओझं आहे .."

     प्रकाश नारायण संत यांनी वनवास या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात लंपन या संवेदनशील, कल्पक, शोधक वृत्तीच्या विविध कलागुणांचे उपजत लेणे लाभलेल्या, गावात वाढणाऱ्या मुलाचे भावविश्व समर्थपणे शब्दबद्ध केलं आहे. वनवास मधील लंपनचा घराबाहेरील विश्वाचा थोडासा पुढचा भाग त्यांच्या *शारदा संगीत* या कथासंग्रहामध्ये येतो.

      शारदा संगीत मधल्या परचक्र, आगगाडीच्या रुळावर, रानी का बाग, घसरगुंडी, शारदा संगीत या साऱ्याच कथा आवर्जून वाचावयास हव्यात अशा आहेत.

      परचक्र मधले बेरकी बंक्या, इरसाल हिरा, लबाड अण्णा यांच्याबद्दल लंपन सांगतो. शारदा संगीत या कथेत म्हापसेकर या त्याच्या संगीतशिक्षकाच्या मुलीच्या आजारपणात त्यांच्या अनुपस्थितीत संगीतवर्गातील आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी पौगंडावस्थेत येत असलेला लंपन छान सांभाळतो.

     आपल्याला गुरू म्हणणाऱ्या श्रीमंत आणि निवृत्त अधिकारी असलेल्या आणि ज्यांना आपण केवळ ' जमखंडीकर ' अशी हाक मारतो त्या ज्येष्ठ जमखंडीकरांची योग्यता कळल्यावर, ' ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत ' याची जाणीव लंपनला होते आणि भिऊन त्याच्या छातीत धडधडायला लागल्याचं लंपन सांगतो.

     प्रत्येक कथेतील मांडणी इतकी सुरेख आहे की छोट्या लंपनची गोष्ट पूर्ण वाचल्याशिवाय पुस्तक सोडवत नाही. हे *शारदा संगीत* या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य. सर्व कथांचा काळ असेल साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचा. त्यामुळे लंपनच्या खेळात गोट्या, विटीदांडू, भोवरा अशा खेळांचा उल्लेख येतो, ते खेळ आजच्या युगातल्या लंपनच्या वयातील मुलांना माहीत असतील असे नाहीत. सध्या घरी आहातच तर, आज तुमच्यापैकी ज्यांच्या घरांत लंपनच्या वयांतली मुलं आहेत, त्याना या लोभस लंपनची ओळख जरूर करून द्या. कार्टून तर आजकालची मुलं  रोजच पाहात असतील. लंपनशी त्यांची मैत्री त्यांच्या फायद्याची असेल. 

इडापिडा टळो आणि सर्वांवरील कोरोनाचं संकट लवकरात लवकर कायमचं दूर होवो.

     

बेलवलकर गृहनिर्माण

२९ एप्रिल २०२०

Sunday, 9 August 2020

पुस्तक परिचय ३३

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


      ' एवढा वेळ होईपर्यंत शहरातल्या प्रत्येक माणसाला समजून चुकलं होतं की मराठी फौज खरोखरच राजधानीजवळ आली.शहरात एकच हलकल्लोळ माजला. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी स्थिती झाली. जो तो पळायला पाहात होता. पण दिल्लीच्या साऱ्या वाटा मराठ्यांनी रोखून धरल्या होत्या. सकाळपर्यंत वाट पाहावी नाहीतर मराठी फौजांनी शहरात घुसावं असा बाजीरावांचा इरादा होता.....

      शहरातून आढ्यतेने बाहेर पडलेल्या मोगली आसामींना नेस्तनाबूत करायला मराठ्यांना एक घटकेचा अवधी पुरा होता. झालेल्या झुंजामध्ये मोगलांचे शिवसिंग आणि अमीरखान ठार पडले.मीर हसनखान कोका जखमी झाला आणि शहरात पळून गेला. बाकीचे मनसबदार न लढताच शहरामध्ये पळून वेशीची कवाडं बंद करून बसले.मल्हाररावांनी त्वेषानं बदला घेतला. मोगलांचे हजार स्वार होळकरांनी कापून काढले.....  मल्हारराव म्हणाले, "श्रीमंत, प्रत्यक्ष राजधानीत आम्ही घुसून मोगलांचं नाक कापण्याचं काम आपोआपच झालं आहे. शहराचे सारे दरवाजे बंद करून बादशहा एखाद्या भेकडासारखा जनानखान्यात लपून बसला आहे. आणखी त्याचं  नाक ते काय कापायचं? "

      ऐसी अक्षरेचा २०१० च्या मे मध्ये काढलेल्या महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी  वर्षानिमित्त खास विशेषांक चाळताना 'मोगलांचं नाक कापलं'  हा ना.सं.इनामदार यांच्या ' राऊ ' कादंबरीतला हा भाग काल  सकाळपासून दोनदा वाचला.

राहावेना म्हणून पुस्तककपाटातून राऊ काल पुन्हा वाचायला घेतली. 

     अवघ्या विसाव्या वर्षी बाजीरावांनी पेशवाईची वस्त्रं अंगावर घेतली आणि डोक्यावर डोंगराएवढी जबाबदारी येऊन पडली. मनगटात जोर, मनात  आदरणीय दैवत छत्रपती शिवराय. महाराजांवरील दृढ श्रद्धा. महाराजांचीच प्रेरणा घेऊन श्रीमंत बाजीराव पेशवे हरएक रण गाजवत सुसाट वेगानं एक एक मुलुख पादाक्रांत करीत होते. तो सारा इतिहास ना.सं.इनामदारांनी राऊ कादंबरीत जिवंत उभा केलाय. कादंबरीची भाषा, ओघवता आलेख, सुंदर मांडणी यामुळे ही कादंबरी वाचकप्रिय झाली. एकदा वाचली की पुन्हा वाचायची ओढ लागावी अशी ही सुंदर ऐतिहासिक कादंबरी. नव्या पिढीने आवर्जून वाचावी अशी प्रेरणादायी कादंबरी. बहुतेक प्रत्येक मराठी वाचकाच्या संग्रही असलेल्या ह्या कादंबरीचं, या मोकळ्या वेळात कुटुंबियांसह अभिवाचन करावं अशी प्रेमळ सूचना करावीशी वाटली.

       परवाच आमचे स्नेही, प्रसिद्ध निवेदक आणि ऐसी अक्षरेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख सहभाग असलेल्या राजेश दामले यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी १९९० च्या सुमारास पुणे आकाशवाणी केंद्रावर राऊ कादंबरीचं नाट्यरूपांतर करून मालिका सादर केली होती, त्याबद्दलची पोस्ट शेअर केली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे आकाशवाणी केंद्राच्या मुख्य वाहिनीवर म्हणजे,  मध्यम लहरी 378 अंश किंवा 792 किलो हर्ट्झवर ही मालिका आजपासून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी ११ वाजता स्नेहबंध कार्यक्रमातून पुनःप्रसारित होत आहे. 

     तसेच आकाशवाणीचे  News On AIR App डाऊनलोड करूनही ही मालिका तुम्ही पाहू शकाल.

     रोज रोज त्याच बातम्या, तेच तेच विनोदी कार्यक्रम आणि तत्सम पुनःप्रसारित होणाऱ्या टीव्ही मालिका बघून कंटाळलेल्या  आमच्या वाचकमित्रांनी ह्या मालिकेच्या रुपांतरीत मालिकेचा  श्रवणानंदसुद्धा जरूर जरूर घ्यावा. ही प्रेमपूर्वक विनंती. 

    युद्ध म्हणजे साक्षात मृत्युलाच सामोरं जात त्यालाच माघार घ्यायला लावत विजयश्री खेचून आणायची. सध्या आपल्या सर्वांचंच कोरोनाशी महायुद्ध  चालू आहे. युद्धात महायुद्धात कुठलाच हलगर्जीपणा चालत नाही, हे आम्ही पुनःपुन्हा सांगायची गरजच नाही, कारण तुम्ही सारेच ह्या कोरोनाशी चाललेल्या महायुद्धातले एक सैनिक आहात. या महायुद्धाचे सर्व नियम तुम्ही पाळता आहातच. आमच्या शुभेच्छांचे पाठबळ आहेच.

  

बेलवलकर गृहनिर्माण

२८ एप्रिल २०२०

Saturday, 8 August 2020

पुस्तक परिचय ३२

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


    ऐसी अक्षरे....ज्ञानोबा माऊलींच्या वरदस्पर्शाने पुनीत झालेली, आत्मविश्वास वाढवणारी, रसिकांकडून हमखास दाद प्रतिसाद मिळवून देणारी पाच अक्षरे! या दोन समर्थ अमृतमयी शब्दांत मराठी स्वाभिमान, मराठी साहित्याचा सुगंध, मराठी साहित्याचे सौंदर्य, मराठी मार्दव, मराठी आदरातिथ्य, घरंदाज मराठीपण असं भलं मोठं शुभंकर अवकाश भरलंय. प्रत्येक अंकात, गेल्या शेसव्वाशे वर्षांतल्या सिद्धहस्त लेखकांचं दर्जेदार साहित्य वाचायला, अभ्यासायला मिळतं. यात पुनःप्रकाशित उत्तमोत्तम कथा, कविता, ललित लेख यांचा समावेश असतो.

     ऐसी अक्षरेतील उत्तम साहित्याने आमच्या परिवारात नित्य नव्याने येणाऱ्या रसिक स्नेह्यांना कायमचं जोडून ठेवलं जातंय.

     किती तरी थोरामोठ्यांनी ऐसी अक्षरेचा गौरव केला, भरभरून कौतुक केलं. यामध्ये छत्रपती शिवरायांचा देदीप्यमान, तेज:पुंज इतिहास घराघरांत पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रा.ग.जाधव आणि अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे, नाटककार शं.ना.नवरे, पानिपतकार विश्वास पाटील, मोनिका गजेंद्रगडकर, राजकीय क्षेत्रात सदैव झळकणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईकनिंबाळकर, विनोद तावडे, गिरीश बापट, मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे, लोकप्रिय गायक राहूल देशपांडे, महेश काळे ह्या सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. ऐसी अक्षरेच्या निमंत्रणाला मान देऊन ऐसी अक्षरेच्या कौतुक सोहोळ्यासाठी ही मोठी माणसे आवर्जून उपस्थित राहिली.

     कला क्षेत्रातील मंडळी तर अतिथी संपादक म्हणून सामील झाली. संगीतकार कौशल इनामदार, चित्रपटक्षेत्रातील मान्यवर अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, लेखक दिग्दर्शक अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेता गीतकार जितेंद्र जोशी आणि हो, लोकमान्य टिळक - काशिनाथ घाणेकर - बालगंधर्व यांच्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकार करणारे लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक सुबोध भावे, समाजसेविका रेणू गावसकर हेही ऐसी अक्षरेसाठी लिहिते झाले. 

     मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, श्रीनिवास कुलकर्णी, रविंद्र पिंगे, वि.आ.बुवा, अच्युत गोडबोले अशा अनेक सिद्धहस्त लेखकांनी ऐसी अक्षरेचं केलेलं कौतुक आम्हांला भरगच्च बळ देत राहिलं.

      ऐसी अक्षरेचे विविध विषयांवर प्रकाशित झालेले विशेषांक वाचकांच्या पूर्ण पसंतीस उतरले. विषय तरी किती विविध. साठाव्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं काढलेला विशेषांक विविध विषयांवर काढलेल्या विशेष  अंकांतला पहिला अंक ठरला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्तचा विशेषांकही वाचकांस विशेष भावला. पुढे दिवाळी विशेषांकांव्यतिरिक्त असे अनेक विशेषांक मोठया दिमाखात प्रकाशित होऊ लागले.

     प्रेमकथा, गूढकथा, अनुवादीत कथा, महिला विशेषांक, व्यंकटेश माडगूळकरलिखित साहित्यावरचा विशेषांक, ऐसी अक्षरेचे शतकमहोत्सवी, दशकपूर्ती, शिवशाहीर पुरंदरे गौरव विशेषांक, डॉ.आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्तचा आत्मोद्धार विशेषांक, डॉ.जयंत नारळीकर सन्मान विशेषांक, विनोद, संतसाहित्य परिचय, साहित्य चित्रपट माध्यमांतर, वृत्तपत्र साहित्य, शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य, नाट्य चित्रपट कलावंतांचं साहित्य, असे विविध विषयक विशेषांक प्रकाशित झाले. पुढेही असे अनेक विषय येतीलच.

 

    वाचक मित्रांनो, ऐसी अक्षरेचा अंक असो वा विशेषांक, वाचकांसाठी विनामूल्यच आहे. कोणतीही वर्गणी नाही. ईमेलवर अंक-विशेषांक मागवून घेता येतो. 

     

     आम्ही वाट बघतोय आमचं कार्यालय कधी उघडता येईल याची. ज्या वाचकांना छापील प्रत हवी असल्यास कार्यालयात उपलब्धतेनुसार मिळेल, नसेल तर ईमेल वर मिळेल.

      मायबोली मराठीसाठी काही करण्याचा आनंद आमच्यासाठी महत्वाचा, नव्या तरूण वाचकांसाठी, जुन्या जाणत्या साहित्यप्रेमींसाठी ऐसी अक्षरेचा प्रत्येक अंक म्हणजे उत्तम साहित्याचा नजराणाच. 

      ऐसी अक्षरे वाचा, वाचनसंस्कृतीची जोपासना करा.


बेलवलकर गृहनिर्माण

१५ मे २०२०

Friday, 7 August 2020

पुस्तक परिचय ३१

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


प्रिय 'क्ष ' 

     पप्याकडून तुझी लग्नपत्रिका मिळाली! अशी पोचती केली तू की, जसा मी कुणीच नाही तुझा! पप्याजवळ तर तू सर्वकाही सांगत होतीस ना! आज...आठवताहेत तुझ्या शपथा; म्हणायची, 'य', तुझ्यासाठी मी हे सारे जग त्यागून देईन! ....

                                      तुझा, 

                                         'य' 


प्रिय लतास, 

       "लता प्रेमाचं जग हे वास्तव जगापेक्षा वेगळं असतं. प्रेमिकांच्या डोळ्यांपुढे कल्पनांची भिंत उभी असते त्यामुळे समोरचं जग त्यांना दिसत नाही. लोक यालाच प्रेम आंधळं असतं असं म्हणतात.... मी तुला शब्दालंकारांनी नटलेल्या शब्दांनी व शेरशायरीनी भुरळ घालणार नाही... तुला चंद्राचा व चांदण्यांचा गजराही मिळणार नाही..लता, तू नावाप्रमाणे वेल होऊन मला आधार देशील का ? ......

                                   तुझाच, 

                                         .....

प्रिती पुष्पास, 

    पत्र लिहिण्यास कारण असे एकच -- काल तू आली माझ्या स्वप्नी, विचार उमलला मनी, लिहावी एक कहाणी ....काल अंगणात उभा होतो मी एकांतात, विचार होता फक्त तुझाच माझ्या मनात ....

                                       एक भ्रमर 

                      चाखण्यास आतूर आहे 

                                       मकरंद                       


प्रिय...


    तू दृष्टीआड झालास की, मनाला आवरही घालता येत नाही .. माझ्या हृदयस्वामीला कधी भेटेन असे मला झाले आहे...

                         उत्तराच्या प्रतिक्षेत, 

                 फक्त तुझीच आणि तुझीच 

             हृदय-स्वामिनी, प्राणप्रिय सखी

                                  "कविता"


     काय वाचकमित्रांनो, कधी लिहिली आहेत का प्रेमपत्रे, तुमच्या स्वप्नसुंदरीला? की, पाठवता, फक्त व्हॉट्सएपवर स्मायली! आम्ही तर तुम्हांला, प्रियकरानं प्रेयसीला, 'भेटायला ये'  हा निरोप द्यायला कालिदासाच्या नायकानं मेघालाच निरोप्या केल्याचं, सांगितलं होतं, आठवतंय, ' मेघदूत?' 

      तुमच्या प्रेयसीनं, ' कबूतर जा जा..'  म्हणत तुम्हांला पत्र पाठवलंय? सांगा ना,  तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला गोड गुलाबी कागदावर हृदयाची बॉर्डर आखून त्यात तुम्ही पत्र लिहून पाठवलंत का कधी? 

     नाही सांगायचं, लाजायला होतंय? बरं ss. असू दे असू दे. 

    इथं आम्हांला एक पुस्तक सापडलंय, *प्रेम पत्रांचा संग्रह!* एक अनोखं पुस्तक! 

    आज पुण्यात भले कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊनच्या या काळात सारे हाडाचे रसिक म्हणा किंवा रसिकता ज्यांच्या  रोमारोमात भिनली आहे, अशा पुणेकरांना घरांत बसलेले असू देत. त्यांना तुम्हीच खवचट म्हणा, दुपारी १ ते ४ हटकून विश्रांती घेणारे म्हणून खिजवा. विक्षिप्त म्हणा. कितीही टीका करा. टवाळी करा. रसिक पुणेकर ही जगन्मान्यता, मक्तेदारी पुणेकरांकडेच जाते. भले कुणी म्हणोत की प्रसिद्धीसाठी पुणेकर, 

'घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कूर्यात रासभरोहणं। 

येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषों भवेत!' 

असं काहीही करतात. 

पण पुण्यात जे वेगळेपण आहे ना ते इतरांमध्ये नाही म्हणून जळू नका म्हणावं! 

    अहोss, असंख्य समाजसेवी संस्था पुण्यात जन्म घेतात. रौप्य-सुवर्ण-शतकमहोत्सव साजऱ्या करतात. सवाईगंधर्वला होणारी रसिकांची गर्दी आणि त्यांनी दिलेली दाद अनुभवण्यासाठी अवघ्या कलाजगतातले दिग्गज आणि युवाकलाकार या कार्यक्रमात हजेरी लावून कला सादर करण्यासाठी धडपडत असतात! 

     अशाच पुण्यातल्या *युवामाहेश्वरी* नामक संस्थेनं १९८८मध्ये प्रेमपत्र लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. १७ ते ५६ वयातल्या प्रेमवेड्या सर्वसामान्य पुणेकरांनी या स्पर्धेला दणकून प्रतिसाद दिल्यानं आयोजकांनी निवडक पत्रांच्या संग्रहाचं पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं. ते हे पुस्तक! विशेष म्हणजे या स्पर्धेचे परिक्षक होते *थोर साहित्यिक कै.शंकर पाटील!* 

      या प्रेमपत्र संग्रहातल्या एका पत्रलेखिकेने लिहिलेल्या हृदयस्पर्शी पत्रातला थोडा भाग आवर्जून इथे देतो. वाचाच..


प्रिय आनंद, 

    आज तुझी सारखी आठवण येतेय. सकाळी रेडिओनं करुन दिली ती. 'तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे..' 

    आठवते तुला पाकयुद्ध? तुझा सैनिकी पेशा! कित्येक दिवस तुझा समुद्र संचार चाले. माझा जीव तुझ्यासाठी कसनुसा होई. एक रात्र तुम्हांला घरी सोडलं होतं. तू ओढीनं धावत स्टेशन गाठलंस. लोकल नव्हती. प्ल्याटफॉर्मवर झोपलास. पहिल्या लोकलनं येऊन भेटलास.अर्ध्या तासाची ओझरती भेट. पण प्रीतीचे लक्ष लक्ष दीप उजळून गेली.

    स्त्रीनं प्रीती असावं, पुरुषानं पराक्रम......

                           सदैव तुझीच, 

                                   ----

      सिद्धहस्त लेखकांचं प्रेमावरचं लिखाण वाचायला आवडतंच सगळ्यांना. पण सर्वसामान्यांना सुद्धा रसिक हृदय असतंच. पट्टीच्या लेखकाला त्याची प्रतिभा साथ देते. सामान्यांना त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हृदय, विश्वास आणि सहवास पुरतो. सध्या तुम्हां आम्हां सर्वांनाच घरी आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा भरभरून आनंद घेता येतोय. हे प्रेम पत्रांचा संग्रह नामक पुस्तक जेव्हा केव्हा तुम्हांला मिळेल तेव्हा तुम्ही वाचालच. तूर्तास निवडक पत्रातली काही वाक्ये वाचून हा आनंद घ्या.

   घरी राहा. प्रेमात राहा. पुढे आहेच रोजची धावपळ, वेळेची कमतरता. मग त्यावेळी ह्या आठवणी सुखावत राहतील.


 बेलवलकर गृहनिर्माण

२७  एप्रिल २०२०

Thursday, 6 August 2020

पुस्तक परिचय ३०

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. एक बुलंद अष्टपैलू व्यक्तिमत्व हीच अत्र्यांची ओळख. शिक्षक, पत्रकार, लेखक, वक्ते, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, राजकारणी असा  अनेक क्षेत्रात आपल्या बुलंद व्यक्तिमत्वाचा लीलया ठसा उमटविणारं हे अफलातून व्यक्तिमत्व.
     अत्र्यांचे भन्नाट विनोद, अत्र्यांच्या, श्रोत्यांनी तुडुंबगर्दीने, हशा टाळ्या घेत गाजणाऱ्या सभा. अत्र्यांचा विलक्षण बेधडक  हजरजबाबीपणा. अत्र्यांचे मराठा दैनिकात प्रसिद्ध झालेले हृदयस्पर्शी मृत्युलेख. अत्र्यांची झेंडूची फुले मधली इरसाल  विडंबनकाव्ये. तो मी नव्हेच, डॉक्टर लागू, बुवा तेथे बाया, मोरूची मावशी, मी मंत्री झालो, साष्टांग नमस्कार ही रसिकमान्य नाटके. पहिला राष्ट्रपती पुरस्काराचा मानकरी ठरलेला आचार्य अत्रे दिग्दर्शित साने गुरुजीलिखित, श्यामची आई आणि महात्मा जोतिबा फुले हे चित्रपट, असं प्रचंड मोठं काम करुन ठेवलेलं हे व्यक्तिमत्व. सामान्यवर्गात विलक्षण म्हणून ख्यातकीर्त असलेलं व्यक्तिमत्व.
     आचार्य अत्रे यांनी मी उभा आहे या नाटकात निवडणूक ह्या विषयावर उमेदवार, लोकप्रतिनिधी, मतदार, वृत्तपत्रसंपादक, तथाकथित कामगारनेते यांच्या स्वार्थी मनोवृत्ती दाखवल्या आहेत. सडेतोडपणे बोलण्यास आणि लिहिण्यास अत्रे कोणाचीही भीडभाड ठेवीत नसत. निवडणुकीच्या राजकारणात सत्ता हेच महत्वाचं मानलं जातं आणि त्यासाठी तत्वे टोप्या अगदी सहज फिरवल्या जातात. या नाटकातील अत्र्यांनी लिहिलेली कांही वाक्ये परिस्थितीचं किती यथार्थ वर्णन करतात, किती बोलकी आहेत, ते पाहूयात.
     ' काही जरूर नाही आता तसल्या जाहीरनाम्याची! आमचा जाहीरनामा नाशिकच्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापतो आहे हल्ली! ' 
     ' म्हणजे काय? ' 
     ' नाही तुमच्या ध्यानात आलं? दहा रुपयांची कोरी करकरीत निळी नोट हा आमचा जाहीरनामा! अगदी निरक्षर माणसालादेखील वाचता येईल असा हा जाहीरनामा आहे.' 
      ' ही - ही पाहिलीत निवडणूक! भावाभावात, बापलेकात, नवराबायकोत, मित्रामित्रात, प्रेमाच्या नात्यात जन्माचं विष कालवणारी ही पाहिलीत निवडणूक? ' 
    ' मतदारांचे हे असले इरसाल नमुने पाहिले म्हणजे देशाच्या भविष्याविषयी अंत:करण साशंक होतं -- अन् मन उद्विग्न होतं! ' 
    पराभूत भ्रष्टाचारी नेत्याच्या पराभवावर अत्रे जळजळीत भाष्य करतात, ' आमच्या बायका पोरांचे जे शिव्याशाप आणि तळतळाट तुम्ही घेतलेत त्याचा हा सूड आहे! गरिबांना राग येत नाही  -- गरीब कधी संतापत नाही! पण एकदा त्यांचा रागाचा ज्वालामुखी पेटला म्हणजे जगातल्या साऱ्या श्रीमंतांच्या संपत्तीचा स्वाहाकार झाल्याशिवाय राहणार नाही! दहा रुपयांची नोट दिली की गरिबांचं पोट विकत घेता येतं अशी आजपर्यंत तुम्ही आम्हां गरिबांची बदनामी करीत होता -- आमच्या गरिबीची-आमच्या असहायतेची हेटाळणी करीत होता-- त्याचा हा सूड आहे समजलात! ' 
     वाचकमित्रांनो, हसत हसत दुरवस्थेची रेवडी उडवणे हे  अत्र्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. तुम्हांआम्हां सुजाण मतदारांना हा अनुभव येतोच. पण आपण यावर भाष्य करीत नाही. गप्प बसून राहतो. अत्र्यांचे हे नाटक १९३९ साली पुण्याच्या तत्कालीन विजयानंद थिएटरमध्ये प्रथम सादर झाले. ऐंशी वर्षांनंतरच्या आजच्या वर्तमानात कितीसा फरक पडलाय ते आपल्याला माहितच आहे.
    नाटकाचं पुस्तक मिळेल तेव्हा जरूर वाचा. 
    आपण सारेच त्या सुखद काळाच्या प्रतिक्षेत आहोत, कधी एकदा या करंट्या कोरोनाचा समूळ नि:पात होतोय आणि सारं जग पुन्हा आपल्या गजबजल्या वातावरणात रुळून जातंय! तोपर्यंत, 
' घर हीच राजधानी, नाही उणे कशाचे ... ' 
आज अक्षय्य तृतीया :

सर्वेपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित दु:खमाप्नुयात ॥ ह्या सदिच्छा..
     
बेलवलकर गृहनिर्माण
२६ एप्रिल २०२०
॥मिती वैशाख शुद्ध तृतीया शके १९४२॥

Wednesday, 5 August 2020

पुस्तक परिचय २९

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

      राजकारण किंवा समाजकारण म्हटलं कीं काहींना चर्चा, वादविवाद यासाठी स्फुरण चढतं, काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येते, तर काहींना या विषयांत स्वारस्य नसतं. या चर्चेत मत मतांतरे वाद विवाद इत्यादी ठरलेलेच असते. यांत आणखी दोन शब्द आपला फार मोठा प्रभाव पाडतात. आणि ते म्हणजे, पुरोगामी आणि प्रतिगामी.
     सर्वसाधारणपणे सामान्यांना पुरोगामी म्हणजे समाजवादी, खांद्यावर शबनम लटकावून समाजसुधारणेचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि प्रतिगामी म्हणजे पुरोगामी व्यक्तीला विरोध करणारी, धर्म पाळणारी मंडळी अशी वाटतात. 
      आज या विषयावर थोडा विचार करायला लावणारे आणि त्यासाठी  पुरोगामित्व म्हणजे काय? हे समजावून सांगणारे श्रुती तांबे यांनी लिहिलेल्या याच शीर्षकाच्या पुस्तकाबाबत जाणून घेऊयात. 
     पुरोगामी हा आजचा विषय वेगळा आहे. आपण सारेच आज घरांत बसलोय. एरवी कामाचे ठिकाणी जाण्यायेण्यास लागणारा वेळ अधिक प्रत्यक्ष कामाचा वेळ, असे किमान साडेनऊ दहा तास आणि त्यासाठीच्या तयारी- धावपळीसाठी घरी लागणारा पाऊण एक तास, असा गेले ३१ दिवस दररोज लागणारा वेळ आपण घरात बसून काढलाय. अजून किती दिवस हे चालेल माहीत नाही. या ३१ दिवसांच्या काळात कुणी वाचन केलंय, कुणी चित्रं काढलीत, कुणी योगासने केलीत, कुणी बैठे खेळ, कुणी स्वयंपाक, कुणी धुणी भांडी तर कुणी हे तर कुणी ते करतंय! 
     लॉकडाऊनचा काळ संपल्यावर जेव्हा पुन्हा आपण कामांत गुंतवून घेऊ तेव्हा हा असा मोकळा ढाकळा वेळ परत अनुभवता येईलच हे सांगता येणार नाही. या काळात आपण असं कधी एखाद्या विषयावर मनन चिंतन केल्याचं आठवतंय? उत्तरं काय दोन्ही प्रकारची असू शकतील, हो किंवा नाही. 
     तर या पुरोगामित्व म्हणजे काय? या छोट्या पुस्तकातील विषयाबद्दल थोडं जाणून घेऊ. चर्चा करायला हरकत काय? तटस्थ वृत्तीने चर्चा करायची. अंगाशी येतंय असं वाटलं तर एखाद्या प्रसिद्ध अंकाच्या पहिल्या पानावर, ' लेखकांच्या मतांशी आम्ही सहमत असूच असे नाही ' हे लिहिलेलं असतं, तसं म्हणून टाकायचं! बस इतकंच. 
      तर, पुरोगामी म्हणजे काळाबरोबर पुढे जाणारे आणि प्रसंगी काळाच्याही पुढे पाहू शकणारे, दूरवरचा वेध घेणारे, प्रगतीचा ध्यास घेतलेले ते पुरोगामी. म्हणून याच अर्थाचा, 
' प्रागतिक ' हाही शब्द वापरतात. मानवी मुक्तीचा ध्यास घेतलेले असा अर्थही यातून निघतो. प्रतिगामी म्हणजे मागे जाणारे, उलटे चालणारे. पारंपरिक विचारांचे पालन एखाद्या कर्मकांडाप्रमाणे करणारे.
     लेखिकेने पुस्तकात पुरोगामित्वाचे घटक, धर्म, सरंजामशाही, राष्ट्र-राष्ट्रवाद भांडवलशाही, जातिसंस्था, विषमता या संज्ञा समजावून सांगायचा थोडक्यात प्रयत्न केलाय. वैदिक काळातील चार्वाकदर्शनातील इहवाद सुखवाद याबाबतचे प्रागतिक विचार मांडले आहेत.
      पुस्तक साधारण २००१ च्या दरम्यान प्रकाशित झालंय. आता आपल्या परिवर्तनशील समाजात बराच फरक पडलाय, हे आपल्यालाही कळून येत आहे. समाज मनोवृत्तीमध्ये अनेक बदल झाल्याचे जाणवते आहे.    
     पुरोगामित्वाचा आदर्शपणा सांगताना लेखिकेने कांही प्रश्न,  वाचकानी स्वतःलाच विचारून त्याची उत्तरं स्वतःलाच द्यावीत अशा अपेक्षेने विचारले आहेत. 
     वरती जसं म्हटलंय तसं कधीतरी ज्या समाजात आपण राहतो त्याविषयी थोडं चिंतन करण्यासाठी पुस्तक नक्की वाचावं. तटस्थतेनं. आम्हांला विचाराल तर, शहरी लोक बऱ्याच  प्रमाणात पुरोगामी विचारातच वावरत असतात. अर्थात हे आमचं मत आहे. या लॉकडाऊनच्या काळात आपण स्वतः किती जबाबदारीने वागलोय हे स्वतःच स्वतःला विचारायचं. 
      मित्रांनो वाचन महत्वाचंच. मग ते विनोदी असो, कादंबरी असो, ऐतिहासिक असो. अशाही विषयांवर जरूर वाचावं. त्यासाठी हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. आणि नेहमी प्रमाणे प्रश्न.  'घरात आहात ना?' असाल तर नक्कीच सुरक्षित असाल.
     
बेलवलकर गृहनिर्माण
२५ एप्रिल २०२०

Tuesday, 4 August 2020

पुस्तक परिचय २८

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

      *ऐसी अक्षरेचा* वृत्तपत्रातील साहित्यावरील एक विशेषांक प्रकाशित झाला होता. वृत्तपत्रात येणारं साहित्य या अंकात घ्यायचं म्हणजे नेमकं काय घ्यायचं आणि ते कोठून मिळवायचं असा एक प्रश्न त्यावेळी उभा होता. पण मग लक्षात आलं कीं अनेक लेखक वृत्तपत्रात स्तंभलेखन करतात. कांही वर्तमानपत्रात दररोज एखादं सदर असतं. सर्वच वृत्तपत्रे दर रविवारी पुरवणी प्रसिद्ध करतात. या पुरवण्यांत विविध विषयांवर अनेक प्रसिद्ध साहित्यिक आपले विचार, आपले अनुभव, भेटलेली विविध लक्षवेधी माणसे यांवर लिहितात. असा लेखांचा आणि लेखकांचा शोध घेताना अनेक जुन्या नव्या लेखक लेखिकांचे लेख आम्हांला मिळाले. काही स्तंभलेखकांच्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांची प्रकाशित झालेली पुस्तके हाती आली. 
     ऐसी अक्षरेची, मराठीतील उत्कृष्ट साहित्य पुनःप्रकाशित करणारं दर्जेदार नियतकालिक अशी वाचकांच्या मनात असलेली प्रतिमा जपत, उत्तम लेख निवडण्याची आमची तळमळ सार्थ करणारं दर्जेदार साहित्य आम्हांला अनेक पुस्तकांतून  उपलब्ध झालं. 
       या शोधकार्यात धागा हे सिसिलिया कार्व्हालो या लेखिकेचे पुस्तक पुण्यातल्या एका प्रसिद्ध पुस्तकविक्रेत्याच्या ओळीने पुस्तके लावलेल्या दर्शनी  कपाटात आम्हांला मिळालं.         
     सिसिलिया कार्व्हालो हे नाव तर अमराठी! हे पुस्तक अनुवादीत आहे का, असा प्रश्नही वाचकांना पडेल. 
      चाळता चाळता तिथेच बसल्याजागी, 'हृदय संवाद,' 'इये मराठीचिये नगरी,' 'मोले घातले रडाया ' असे तीनचार लेख वाचूनही झाले. या पुस्तकातले दोन तीन लेख आपल्याला सहजच विशेषांकात घेता येतील असा मनोमन निर्णय झाला. 
     अकोल्यातल्या एका कार्यक्रमात विख्यात गायक, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी, सिसिलिया कार्व्हालो यांना आश्चर्यपूर्वक प्रश्न विचारला होता, "तुम्ही इतकं सुंदर मराठी कसं बोलता हो? " तेव्हा बाईं म्हणाल्या, "आमची मातृभाषा मराठी आहे. वसईतील बहुसंख्य ख्रिस्ती मराठी भाषक आहेत!" 
      सिसिलिया ही इटलीत संगीताची देवता म्हणून गणली गेली आहे. अशी लेखिकेने आपल्या नावाची एका लेखात ओळख सांगितली आहे.
      *धागा* हे सदर ' मुंबई सकाळच्या ' ' ठाणे टुडे ' या पुरवणीत आठ महिने चालले. त्यातील कांही लेख आणि 'सकाळच्या ' ' सप्तरंग ' पुरवणीतील कार्व्हालो यांचे निवडक लेख या ९० पानी पुस्तकात आहेत. वास्तवातील घडामोडी, दृश्यं, भेटलेली माणसे, अनुभव यावर लेखिकेने या विविध लेखांत आपली निरीक्षणे साध्या सोप्या शब्दांत नोंदवली आहेत.
     वाचनसंस्कृती, वाचनवेड यावर 'विशे' ष ह्या लेखांत, 'एकनाथ बुधाजी विशे ' या एका छत्तीस वर्षीय वाचनवेड्या पोलिसपाटलांनं बाईंचं लक्ष वेधून घेतलं. त्यावर लेखिकेने विस्तारानं लिहिलंय. इथं थोडक्यात एकनाथच्या वाचनवेडाविषयी सांगतो...
   ' हजार बाराशेच्या पलिकडे मासिक उत्पन्न नाही. बायको रोजगार हमी योजनेत काम करुन कमाई करणारी. तीन मुलं. पोटापुरती शेती. म्हणजे हातातोंडाशी गाठ. एकनाथ विशे अतिशय सहृदय आणि पट्टीचा वाचक! मनापासून वाचन करण्याचा स्वभाव. विश्वास पाटलांच्या भल्यामोठया जाडजूड पुस्तकातील लांबलचक परिच्छेद विशे याना मुखोद्गत आहेत! भलीमोठी पुस्तक तर त्यांनी विकतच आणलेली आहेत.' 
      आपलं अल्पउत्पन्न असूनही विशे यांच्या त्यांनी जपलेल्या वाचनवेडाचा इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. 
     ' एक सुरेल भेट ' या लेखात लता मंगेशकर यांच्या भेटीविषयी लिहिताना लेखिकेने दीदी यांच्या सहज साधेपणाबद्दल लिहिलंय.
       धागा अगदी जातायेता पटकन वाचता येतील अशा सुंदर, मर्यादित शब्दांच्या छोट्या लेखांचा संग्रह आहे. वाचकाना आवडेल असा.

     ऐसी अक्षरे हा वाचकांना उत्तम साहित्याची सतत मेजवानी देणारा सेवाव्रती उपक्रम आहे. ह्यातली शब्दसृष्टी अनोखी आहे, आनंददायी आहे.                 

     ह्या अक्षरवाङ्मयात असलेल्या शब्दसृष्टीविषयी एका लेखात लेखिका म्हणते, 
    " कबीराचा एक दोहा मला आवडतो, 
         शब्द शब्द सब को ये काहे 
         शब्द के हात ना पांव 
         एक शब्द ओषध करे 
         एक शब्द करे घांव 
    शब्द : मग ते लिखित स्वरूपाचे असोत वा मौखिक स्वरूपाचे ... आणि कुणाचेही असोत, त्याची अभिव्यक्ती वा उच्चारण... माणसाला निरोगी बनवते... रोगमुक्त करते... वा जखमाही करते. जखमा झाल्यावर त्यावर लेप लावायलाही शब्दच धावून येतात."

     वाचकमित्रांनो, दोन दिवसांनी अक्षय्य तृतीया आहे.

      'लवकरात लवकर, कोरोना पळो, जळो, आणि मानवावर आलेलं हे संकट कायमचं टळो...
     ...आणि सर्वांसाठी अक्षय्य सुखाचे आनंदाचे दिवस येवोत, या प्रामाणिक मन:पूर्वक शब्दां सह भरगोस सदिच्छा....' 

बेलवलकर गृहनिर्माण
२४ एप्रिल २०२०

Monday, 3 August 2020

पुस्तक परिचय २७

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
     
      ' हिरोशिमात स्फोटानंतरचं पहिलं घर बांधायची जिद्द सिद्ध केली ती काझुओच्या पंचाहत्तर वर्षांच्या बापानं.
  "आम्ही मरणपुरीचा जीवननगरीत कायापालट करू."
   काझुओलाही त्यानं चुचकारलं, "असा धीर काय सोडतोस? चल आपण घर बांधायला घेऊ."
   दोन घरांच्यामध्ये असलेलं त्यांचं घर पिरगाळलं गेलं होतं. बाप-लेक त्या घराच्या तुळया, खांब घेऊन त्यातलं काय वापरता येईल हे पाहू लागले तेव्हा लोकांना वाटलं, ' वेडे आहेत झालं! ' घराचा पाया झाला, भिंती चढल्या, छप्पर बसलं, तरी त्यांची तशीच संभावना होत होती.स्फोटाच्या बत्तिसाव्या दिवशी त्यांचं घर उभं राहिलं.ते नव्या हिरोशिमातलं प्रथम घर ठरलं!
   पहिल्या दिवशी नव्या घरी झोपताना काझुओची धाकटी बहीण कुजबुजली, "दादा बघ, आपल्या छपराला फटी आहेत ना, त्यांतून चांदण्या लुकलुकतायत.".....' 
   वाचू आनंदे - कुमार गट दोन या माधुरी पुरंदरे संपादित पुस्तकातील धुमारे ही पद्मजा फाटक, माधव नेरुरकर लिखित ही गोष्ट पुन्हा एकदा वाचली. सर्वस्व गमावलेल्या हिरोशिमातल्या या कहाणीनं काय शिकवलं आपल्याला? जपान मधल्या हिरोशिमावर १९४५ मध्ये अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे लाखों माणसं तात्काळ मरण पावली, कित्येक नंतर झिजून मेली. या बेचिराख अवस्थेतून जपानी पुन्हा नव्या जिद्दीने, नव्या दमाने उभे राहिले.

    ' नारळीचे फळ गोमटें । वरी पाहता दिसें करवंटें । भीतरी नेटेपाटें । उत्तम दिसे ॥ 
    कीं कर्दळीफळ पक्वघडी । वरीवरी पाहतां सालडी । भीतरी अमृतरस गोडी । तैसी वाणी मराठी ॥ 
   जे संस्कृताचा गर्व घेती । आणि प्राकृतातें निंदिती । ते गर्विष्ठ अहंकृती । आपस्वार्थी बोलके ॥ 
    जे वरीवरी पाहतां । फळाची करिती उपेक्षिता । ते वंचिती भीतरार्था। अल्पमतीचे जाण पां॥ 
तैसी उखरवाणी मऱ्हाटी । परी भीतरार्थी घालितां दृष्टी । होइजे सुख संतुष्टी । स्वानुभज्ञान ॥ ' 

   इ.स.१३५८-१४१८ या कालावधीतल्या अज्ञानसिद्ध या कवीने लिहिलेली  'मराठीची महती' या पुस्तकात वाचायला मिळते. 
   वाचू आनंदे या पुस्तकाच्या पहिल्या भागात ९ ते ११ वयोगटातील मुलांसाठी 'बाल गट-१' आणि १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी कुमार गट - २ अशा वाचनयोग्य पुस्तकांच्या निर्मितीत नंदिता वागळे यांनी साहाय्य केलंय.
    शिक्षक - पालकांसाठी दोन शब्द या पुस्तकाच्या प्रयोजनाबद्दल बोलताना, ' ही मालिका म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास नव्हे. मुलांनी जे वाचायला हवे आणि जे त्यांना वाचायला आवडेल असे आम्हांला वाटले अशा साहित्यामधून काही उतारे आणि कविता निवडून या पुस्तकात संग्रहित केलेल्यांना आहेत' असे नमूद करण्यात आले आहे.
      पुस्तकात विष्णुशास्त्री चिपळूणकर, ज्योतिबा फुले, ग.दि.माडगूळकर, ग.प्र.प्रधान, सोपानदेव चौधरी राम गणेश गडकरी, वि.दा.सावरकर, वि.वा.शिरवाडकर, प्र.के.अत्रे, संत बहिणाबाई या नामवंतांच्या साहित्यातून निवडक वाचनीय असे उतारे, कविता, नाट्यप्रवेश घेतले आहे.
   वर उल्लेखिलेल्या १२ते१५ वयोगटातील मुलांसाठी पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

बेलवलकर गृहनिर्माण
२३ एप्रिल २०२०

Sunday, 2 August 2020

पुस्तक परिचय २६

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

         नी सा ग म प
         प ग रे सा नि
         ध नी रे ग सा .. 
तुझे आभाळाचे रुप, माझा देह माती माय। कधी करपले दूध, कधी दाटलेली साय। उभे भांडण जन्माशी, तरी गाथा सांभाळीला। तुझ्या थोरवीचा आहे, माझ्या माथ्यावर टिळा। जगण्याच्या समईत, तुझ्या अभंगाच्या वाती। वादळात चालताना तू, माझा रे सांगाती। 
     ह्या दूरदर्शनच्या एका वाहिनीवरील एका मालिकेच्या *देवकी पंडित* यांच्या गोड गळ्यातून आणि आमच्या स्मरणातील माहितीप्रमाणे  *दासू वैद्यांच्या* प्रतिभेतून आलेले हे, शीर्षक गीताचे स्वर आणि शब्द कानांवर पडले की भान हरपायला व्हायचं. आपल्यालासुद्धा इतकं गोड गाता यावं असं वाटायचं. आधीही वाटायचंच. पण आपण काहीच का गाऊ शकत नाही, याचा मनस्वी खेद वाटायचा, रागही यायचा आजही येतो, आणि येतच राहील. 
     चांगलं आठवतं, तिसरी चौथीच्या वर्गात असतांना एक कविता वर्गात म्हणून दाखवली असता, वर्गशिक्षक आणि संगीतशिक्षक असलेले भावे गुरुजी म्हणाले होते, ' अरे तुझा आवाज चांगला आहे!'... नंतर त्या वर्षीच्या स्नेहसंमेलनात प्रभात सिनेमागृहाच्या मंचावर उभं राहून, ' नमने वाहून स्तवने उधळा..' हे स्वागतपर पद्य गाण्याची संधी मिळाली. पण गायन तिथंच थांबलं. शिकावंसं खूप वाटायचं, पण ....
      दहा बारा वर्षांपूर्वी पुन्हा एकदा संगीताचा क्लास लावला, पण ... तो प्रयत्नसुद्धा तिथेच थांबला.
     दूरदर्शनचा शिरकाव होईपर्यंत रेडिओ आणि रेडिओवरची गाणी ऐकणं हीच सवय असल्यानं, असंख्य गाणी ऐकून ऐकून तोंडपाठ व्हायची, जी आजही चालीसकट आमच्या आणि आमच्या कांही मित्रांच्या लक्षात आहेत. या नव्या ऑनलाईन-वेबच्या जमान्यात शेकडो गाणी डाऊनलोड केली गेली. पाच सहा वर्षांपूर्वी रोज एक मराठी वा हिंदी गीत, त्यावरील विशेष टिपणीसह व्हॉट्सएप् मित्रांना पाठवत हे गाण्याचं आम्ही जपलेलं वेड मित्रांनाही खूप भावलं होतं. 
     आणि एकदा असंच पुस्तक प्रदर्शनात फिरत असतांना, *ओळख संगीत शास्त्राची* या *डॉ.भाग्यश्री कुलकर्णी लिखित* पुस्तकावर नजर पडली.....
     वेद-पौराणिक काळापासून, अमीर खूश्रू, तन्नामिश्र (तानसेन), बैजू, हरिदास स्वामी, रवींद्रनाथ टागोर असा संगीतप्रवासाचा थोडक्यात इतिहास सांगत हे पुस्तक विख्यात गायकांबद्दल, गीतकारांबद्दल, प्रसिद्ध संगीतघराण्यांबद्दल माहिती देतं.
     संगीतातल्या धृपद, धमार, ख्याल, तराना, ठुमरी, टप्पा, चीज, गझल, कव्वाली, अभंग, लावणी, पोवाडा, भजन, कीर्तन भक्तीगीत, भावगीत, इंडियन पॉप-रॉक, चित्रपट गीत अशा विविध गीत प्रकारांची माहिती या पुस्तकातून मिळते.
     यमन रागाचे आरोह अवरोह पकड याची माहिती आणि त्यावर आधारीत, ' जिया ले गयो जी मोरा सावरिया, '  भूप रागातील आरोह अवरोह पकड आणि त्यावरील, ' पंछी बनू उडते फिरू.' हमीर रागातील आरोह अवरोह पकड आणि त्यावरील, ' मधुबनमें राधिका नाचे रे' ही आणि अशी कांही सुंदर उदाहरणे या पुस्तकात दिली आहेत.
      संगीत ही गुरुमुखी विद्या आहे ग्रंथ वाचून ही कला साध्य होत नाही. असं जरी असलं, तरी या शास्त्राची ओळख होणं हेही महत्वाचंच ना! हे पुस्तक ते काम करतं.
     वाचकमित्रांनो थोडे दिवस सहन करायचेत या कठीण लॉकडाऊन काळाचे. पण त्यातही अशी पुस्तके जर हाती आली, त्यांची माहिती जरी मिळाली तर नक्कीच संगीतवेड्या रसिकांना आवडेल. 
     सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे संगीत म्हणजे ईश्वराच्या आभाळाच्या रूपागत आहे. आपण खूप थिटे आहोत. मात्र संगीत हे अवघड काळात मन रिझवत धीर देणारे ठरते, या आमच्या मताशी तुम्हीही सहमत असाल अशी खात्री आहे.
      
बेलवलकर गृहनिर्माण
२२ एप्रिल २०२०