ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
प्रिय 'क्ष '
पप्याकडून तुझी लग्नपत्रिका मिळाली! अशी पोचती केली तू की, जसा मी कुणीच नाही तुझा! पप्याजवळ तर तू सर्वकाही सांगत होतीस ना! आज...आठवताहेत तुझ्या शपथा; म्हणायची, 'य', तुझ्यासाठी मी हे सारे जग त्यागून देईन! ....
तुझा,
'य'
प्रिय लतास,
"लता प्रेमाचं जग हे वास्तव जगापेक्षा वेगळं असतं. प्रेमिकांच्या डोळ्यांपुढे कल्पनांची भिंत उभी असते त्यामुळे समोरचं जग त्यांना दिसत नाही. लोक यालाच प्रेम आंधळं असतं असं म्हणतात.... मी तुला शब्दालंकारांनी नटलेल्या शब्दांनी व शेरशायरीनी भुरळ घालणार नाही... तुला चंद्राचा व चांदण्यांचा गजराही मिळणार नाही..लता, तू नावाप्रमाणे वेल होऊन मला आधार देशील का ? ......
तुझाच,
.....
प्रिती पुष्पास,
पत्र लिहिण्यास कारण असे एकच -- काल तू आली माझ्या स्वप्नी, विचार उमलला मनी, लिहावी एक कहाणी ....काल अंगणात उभा होतो मी एकांतात, विचार होता फक्त तुझाच माझ्या मनात ....
एक भ्रमर
चाखण्यास आतूर आहे
मकरंद
प्रिय...
तू दृष्टीआड झालास की, मनाला आवरही घालता येत नाही .. माझ्या हृदयस्वामीला कधी भेटेन असे मला झाले आहे...
उत्तराच्या प्रतिक्षेत,
फक्त तुझीच आणि तुझीच
हृदय-स्वामिनी, प्राणप्रिय सखी
"कविता"
काय वाचकमित्रांनो, कधी लिहिली आहेत का प्रेमपत्रे, तुमच्या स्वप्नसुंदरीला? की, पाठवता, फक्त व्हॉट्सएपवर स्मायली! आम्ही तर तुम्हांला, प्रियकरानं प्रेयसीला, 'भेटायला ये' हा निरोप द्यायला कालिदासाच्या नायकानं मेघालाच निरोप्या केल्याचं, सांगितलं होतं, आठवतंय, ' मेघदूत?'
तुमच्या प्रेयसीनं, ' कबूतर जा जा..' म्हणत तुम्हांला पत्र पाठवलंय? सांगा ना, तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला गोड गुलाबी कागदावर हृदयाची बॉर्डर आखून त्यात तुम्ही पत्र लिहून पाठवलंत का कधी?
नाही सांगायचं, लाजायला होतंय? बरं ss. असू दे असू दे.
इथं आम्हांला एक पुस्तक सापडलंय, *प्रेम पत्रांचा संग्रह!* एक अनोखं पुस्तक!
आज पुण्यात भले कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊनच्या या काळात सारे हाडाचे रसिक म्हणा किंवा रसिकता ज्यांच्या रोमारोमात भिनली आहे, अशा पुणेकरांना घरांत बसलेले असू देत. त्यांना तुम्हीच खवचट म्हणा, दुपारी १ ते ४ हटकून विश्रांती घेणारे म्हणून खिजवा. विक्षिप्त म्हणा. कितीही टीका करा. टवाळी करा. रसिक पुणेकर ही जगन्मान्यता, मक्तेदारी पुणेकरांकडेच जाते. भले कुणी म्हणोत की प्रसिद्धीसाठी पुणेकर,
'घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कूर्यात रासभरोहणं।
येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषों भवेत!'
असं काहीही करतात.
पण पुण्यात जे वेगळेपण आहे ना ते इतरांमध्ये नाही म्हणून जळू नका म्हणावं!
अहोss, असंख्य समाजसेवी संस्था पुण्यात जन्म घेतात. रौप्य-सुवर्ण-शतकमहोत्सव साजऱ्या करतात. सवाईगंधर्वला होणारी रसिकांची गर्दी आणि त्यांनी दिलेली दाद अनुभवण्यासाठी अवघ्या कलाजगतातले दिग्गज आणि युवाकलाकार या कार्यक्रमात हजेरी लावून कला सादर करण्यासाठी धडपडत असतात!
अशाच पुण्यातल्या *युवामाहेश्वरी* नामक संस्थेनं १९८८मध्ये प्रेमपत्र लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. १७ ते ५६ वयातल्या प्रेमवेड्या सर्वसामान्य पुणेकरांनी या स्पर्धेला दणकून प्रतिसाद दिल्यानं आयोजकांनी निवडक पत्रांच्या संग्रहाचं पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं. ते हे पुस्तक! विशेष म्हणजे या स्पर्धेचे परिक्षक होते *थोर साहित्यिक कै.शंकर पाटील!*
या प्रेमपत्र संग्रहातल्या एका पत्रलेखिकेने लिहिलेल्या हृदयस्पर्शी पत्रातला थोडा भाग आवर्जून इथे देतो. वाचाच..
प्रिय आनंद,
आज तुझी सारखी आठवण येतेय. सकाळी रेडिओनं करुन दिली ती. 'तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे..'
आठवते तुला पाकयुद्ध? तुझा सैनिकी पेशा! कित्येक दिवस तुझा समुद्र संचार चाले. माझा जीव तुझ्यासाठी कसनुसा होई. एक रात्र तुम्हांला घरी सोडलं होतं. तू ओढीनं धावत स्टेशन गाठलंस. लोकल नव्हती. प्ल्याटफॉर्मवर झोपलास. पहिल्या लोकलनं येऊन भेटलास.अर्ध्या तासाची ओझरती भेट. पण प्रीतीचे लक्ष लक्ष दीप उजळून गेली.
स्त्रीनं प्रीती असावं, पुरुषानं पराक्रम......
सदैव तुझीच,
----
सिद्धहस्त लेखकांचं प्रेमावरचं लिखाण वाचायला आवडतंच सगळ्यांना. पण सर्वसामान्यांना सुद्धा रसिक हृदय असतंच. पट्टीच्या लेखकाला त्याची प्रतिभा साथ देते. सामान्यांना त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हृदय, विश्वास आणि सहवास पुरतो. सध्या तुम्हां आम्हां सर्वांनाच घरी आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा भरभरून आनंद घेता येतोय. हे प्रेम पत्रांचा संग्रह नामक पुस्तक जेव्हा केव्हा तुम्हांला मिळेल तेव्हा तुम्ही वाचालच. तूर्तास निवडक पत्रातली काही वाक्ये वाचून हा आनंद घ्या.
घरी राहा. प्रेमात राहा. पुढे आहेच रोजची धावपळ, वेळेची कमतरता. मग त्यावेळी ह्या आठवणी सुखावत राहतील.
बेलवलकर गृहनिर्माण
२७ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment