Saturday, 1 August 2020

पुस्तक परिचय २५

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
      
      प्रभावी व्यक्तिमत्व नावाचे जेमतेम ४५ पानांचे पुस्तक-पुस्तिका म्हटलं तर जास्त संयुक्तिक होईल-बऱ्याच दिवसांपासून कपाटात होतं. वाचायचं राहून गेलं होतं. 'विवेकानंद केंद्र प्रकाशनाचे' हे पुस्तक वाचायला घेतले आणि तासाभरात वाचून संपवलेसुद्धा. इतकी वर्षे आपण हे पुस्तक आणूनसुद्धा का वाचले नाही हा प्रश्न आम्हांलाच पडला! 
     मुख्य म्हणजे पुस्तकात व्यावसायिक दृष्टीकोणाचा विचार करीत, अमुक करा, तमुक करा असे कुठलेही सल्ले दिलेले नाहीत. तर स्वतःला जाणून घ्या, स्वतःमध्ये काय चांगले काय वाईट आहे हे जाणून घ्या. स्वतःतली शक्ती, दौर्बल्य जाणून घ्या, असा आरसा अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न डॉ.अशोक निरफराके आणि प्रा.वनिता पटवर्धन या लेखकद्वयीने केला आहे. अशोक निरफराके हे नाव वाचल्यावर पंचावन्न वर्षांपूर्वी हे नाव वर्तमानपत्रात पहिल्या पानावर, शालांत परिक्षेत पुण्याचा अशोक निरफराके राज्यात सर्वप्रथम ह्या बातमीचा मथळा चटकन डोळ्यांसमोर आला. ही अतिशयोक्ती नाही. खरोखरीच हे नाव तेव्हापासून आजतागायत आमच्या स्मरणात आहे.
     पुस्तक वाचल्यानंतर आपण काय वाचलं असा प्रश्न जेंव्हा स्वतःला विचारला, तेव्हा आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर आलं. उद्धरेदात्मनाssत्मानम्..
     भगवतगीतेतल्या आत्मसंयमयोग नावाच्या सहाव्या अध्यायातला हा पाचवा श्लोक.
उद्धरेदात्मनाssत्मानम् नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मन:॥
याचा थोडक्यात मतितार्थ : स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. आपणच आपले बंधू असून आपणच आपले शत्रु असतो.
       थोडक्यात म्हणजे गुरुवर्य वामनराव पै यांच्या प्रसिद्ध तत्वानुसार, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.
      या पुस्तकात व्यक्तिमत्वाचे स्वरूप, बाह्यांग, अंतरंग, केंद्र यातील अन्नमयकोश, प्राणमयकोश, मनोमयकोश, विज्ञानमयकोश, आनंदमयकोश या संज्ञा म्हणजे काय, तसेच मी कोण? हे थोडक्यात समजावून सांगितले आहे. पुस्तकातील कांही विशेष वाक्यांवर खुणा करुन ठेवल्या, मात्र या सर्वच इथे देणे शक्य नाही. पुस्तकाच्या परिशिष्टात अन्नमय, प्राणमय आदी कोषानुसार वाचकाला विचारलेले प्रश्न त्याला आपण नेमके कोठे आणि कसे आहोत याची माहिती देतील. कारण प्रश्नांची उत्तरे त्याने स्वतःची स्वतःलाच द्यायची आहेत.
     देखणे व्यक्तिमत्व ही विख्यात कवी *बा.भ.बोरकर यांची या पुस्तकात घेतलेली कविताच वाचकाला सारं कांही सांगून जाते.

' देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे। गोरटे की सावळे या मोल नाही फारसे॥ तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा। वोळीती दु:खे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा॥ देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे। आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे॥ देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे। मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे॥ देखणी ती पाउले जी  ध्यासपंथे चालती। वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती॥ देखणे ते स्कंध ज्यां ये सूळ नेता स्वेच्छया। लाभला आदेश प्राणां निश्चये पाळावया देखणी ती जीवने जी तृप्तिची तीर्थोदके। चांदणे ज्यांतून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे॥ देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा। अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा॥ 

    या पुस्तकातील सारसर्वस्व, म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व कसं असावं हे या सुंदर कवितेतच सामावून भरलंय. 
     वाचकमित्रांनो, आपल्या व्यक्तिमत्वात अशी प्रगल्भता आणायला हवी हा विचार जरी मनात आला ना, तरी या लॉकडाऊनच्या काळातील सारी खिन्नता दूर जाईल आणि मन प्रसन्नतेने मार्ग शोधीत आनंदमार्गावर वाटचाल करु लागेल, असा विश्वास वाटतो.
     
बेलवलकर गृहनिर्माण
२१ एप्रिल २०२०

No comments:

Post a Comment