ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
' एवढा वेळ होईपर्यंत शहरातल्या प्रत्येक माणसाला समजून चुकलं होतं की मराठी फौज खरोखरच राजधानीजवळ आली.शहरात एकच हलकल्लोळ माजला. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी स्थिती झाली. जो तो पळायला पाहात होता. पण दिल्लीच्या साऱ्या वाटा मराठ्यांनी रोखून धरल्या होत्या. सकाळपर्यंत वाट पाहावी नाहीतर मराठी फौजांनी शहरात घुसावं असा बाजीरावांचा इरादा होता.....
शहरातून आढ्यतेने बाहेर पडलेल्या मोगली आसामींना नेस्तनाबूत करायला मराठ्यांना एक घटकेचा अवधी पुरा होता. झालेल्या झुंजामध्ये मोगलांचे शिवसिंग आणि अमीरखान ठार पडले.मीर हसनखान कोका जखमी झाला आणि शहरात पळून गेला. बाकीचे मनसबदार न लढताच शहरामध्ये पळून वेशीची कवाडं बंद करून बसले.मल्हाररावांनी त्वेषानं बदला घेतला. मोगलांचे हजार स्वार होळकरांनी कापून काढले..... मल्हारराव म्हणाले, "श्रीमंत, प्रत्यक्ष राजधानीत आम्ही घुसून मोगलांचं नाक कापण्याचं काम आपोआपच झालं आहे. शहराचे सारे दरवाजे बंद करून बादशहा एखाद्या भेकडासारखा जनानखान्यात लपून बसला आहे. आणखी त्याचं नाक ते काय कापायचं? "
ऐसी अक्षरेचा २०१० च्या मे मध्ये काढलेल्या महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त खास विशेषांक चाळताना 'मोगलांचं नाक कापलं' हा ना.सं.इनामदार यांच्या ' राऊ ' कादंबरीतला हा भाग काल सकाळपासून दोनदा वाचला.
राहावेना म्हणून पुस्तककपाटातून राऊ काल पुन्हा वाचायला घेतली.
अवघ्या विसाव्या वर्षी बाजीरावांनी पेशवाईची वस्त्रं अंगावर घेतली आणि डोक्यावर डोंगराएवढी जबाबदारी येऊन पडली. मनगटात जोर, मनात आदरणीय दैवत छत्रपती शिवराय. महाराजांवरील दृढ श्रद्धा. महाराजांचीच प्रेरणा घेऊन श्रीमंत बाजीराव पेशवे हरएक रण गाजवत सुसाट वेगानं एक एक मुलुख पादाक्रांत करीत होते. तो सारा इतिहास ना.सं.इनामदारांनी राऊ कादंबरीत जिवंत उभा केलाय. कादंबरीची भाषा, ओघवता आलेख, सुंदर मांडणी यामुळे ही कादंबरी वाचकप्रिय झाली. एकदा वाचली की पुन्हा वाचायची ओढ लागावी अशी ही सुंदर ऐतिहासिक कादंबरी. नव्या पिढीने आवर्जून वाचावी अशी प्रेरणादायी कादंबरी. बहुतेक प्रत्येक मराठी वाचकाच्या संग्रही असलेल्या ह्या कादंबरीचं, या मोकळ्या वेळात कुटुंबियांसह अभिवाचन करावं अशी प्रेमळ सूचना करावीशी वाटली.
परवाच आमचे स्नेही, प्रसिद्ध निवेदक आणि ऐसी अक्षरेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख सहभाग असलेल्या राजेश दामले यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी १९९० च्या सुमारास पुणे आकाशवाणी केंद्रावर राऊ कादंबरीचं नाट्यरूपांतर करून मालिका सादर केली होती, त्याबद्दलची पोस्ट शेअर केली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे आकाशवाणी केंद्राच्या मुख्य वाहिनीवर म्हणजे, मध्यम लहरी 378 अंश किंवा 792 किलो हर्ट्झवर ही मालिका आजपासून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी ११ वाजता स्नेहबंध कार्यक्रमातून पुनःप्रसारित होत आहे.
तसेच आकाशवाणीचे News On AIR App डाऊनलोड करूनही ही मालिका तुम्ही पाहू शकाल.
रोज रोज त्याच बातम्या, तेच तेच विनोदी कार्यक्रम आणि तत्सम पुनःप्रसारित होणाऱ्या टीव्ही मालिका बघून कंटाळलेल्या आमच्या वाचकमित्रांनी ह्या मालिकेच्या रुपांतरीत मालिकेचा श्रवणानंदसुद्धा जरूर जरूर घ्यावा. ही प्रेमपूर्वक विनंती.
युद्ध म्हणजे साक्षात मृत्युलाच सामोरं जात त्यालाच माघार घ्यायला लावत विजयश्री खेचून आणायची. सध्या आपल्या सर्वांचंच कोरोनाशी महायुद्ध चालू आहे. युद्धात महायुद्धात कुठलाच हलगर्जीपणा चालत नाही, हे आम्ही पुनःपुन्हा सांगायची गरजच नाही, कारण तुम्ही सारेच ह्या कोरोनाशी चाललेल्या महायुद्धातले एक सैनिक आहात. या महायुद्धाचे सर्व नियम तुम्ही पाळता आहातच. आमच्या शुभेच्छांचे पाठबळ आहेच.
बेलवलकर गृहनिर्माण
२८ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment