ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
ऐसी अक्षरे....ज्ञानोबा माऊलींच्या वरदस्पर्शाने पुनीत झालेली, आत्मविश्वास वाढवणारी, रसिकांकडून हमखास दाद प्रतिसाद मिळवून देणारी पाच अक्षरे! या दोन समर्थ अमृतमयी शब्दांत मराठी स्वाभिमान, मराठी साहित्याचा सुगंध, मराठी साहित्याचे सौंदर्य, मराठी मार्दव, मराठी आदरातिथ्य, घरंदाज मराठीपण असं भलं मोठं शुभंकर अवकाश भरलंय. प्रत्येक अंकात, गेल्या शेसव्वाशे वर्षांतल्या सिद्धहस्त लेखकांचं दर्जेदार साहित्य वाचायला, अभ्यासायला मिळतं. यात पुनःप्रकाशित उत्तमोत्तम कथा, कविता, ललित लेख यांचा समावेश असतो.
ऐसी अक्षरेतील उत्तम साहित्याने आमच्या परिवारात नित्य नव्याने येणाऱ्या रसिक स्नेह्यांना कायमचं जोडून ठेवलं जातंय.
किती तरी थोरामोठ्यांनी ऐसी अक्षरेचा गौरव केला, भरभरून कौतुक केलं. यामध्ये छत्रपती शिवरायांचा देदीप्यमान, तेज:पुंज इतिहास घराघरांत पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रा.ग.जाधव आणि अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे, नाटककार शं.ना.नवरे, पानिपतकार विश्वास पाटील, मोनिका गजेंद्रगडकर, राजकीय क्षेत्रात सदैव झळकणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईकनिंबाळकर, विनोद तावडे, गिरीश बापट, मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे, लोकप्रिय गायक राहूल देशपांडे, महेश काळे ह्या सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. ऐसी अक्षरेच्या निमंत्रणाला मान देऊन ऐसी अक्षरेच्या कौतुक सोहोळ्यासाठी ही मोठी माणसे आवर्जून उपस्थित राहिली.
कला क्षेत्रातील मंडळी तर अतिथी संपादक म्हणून सामील झाली. संगीतकार कौशल इनामदार, चित्रपटक्षेत्रातील मान्यवर अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, लेखक दिग्दर्शक अभिनेता गिरीश कुलकर्णी, अभिनेता गीतकार जितेंद्र जोशी आणि हो, लोकमान्य टिळक - काशिनाथ घाणेकर - बालगंधर्व यांच्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकार करणारे लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक सुबोध भावे, समाजसेविका रेणू गावसकर हेही ऐसी अक्षरेसाठी लिहिते झाले.
मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, श्रीनिवास कुलकर्णी, रविंद्र पिंगे, वि.आ.बुवा, अच्युत गोडबोले अशा अनेक सिद्धहस्त लेखकांनी ऐसी अक्षरेचं केलेलं कौतुक आम्हांला भरगच्च बळ देत राहिलं.
ऐसी अक्षरेचे विविध विषयांवर प्रकाशित झालेले विशेषांक वाचकांच्या पूर्ण पसंतीस उतरले. विषय तरी किती विविध. साठाव्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं काढलेला विशेषांक विविध विषयांवर काढलेल्या विशेष अंकांतला पहिला अंक ठरला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्तचा विशेषांकही वाचकांस विशेष भावला. पुढे दिवाळी विशेषांकांव्यतिरिक्त असे अनेक विशेषांक मोठया दिमाखात प्रकाशित होऊ लागले.
प्रेमकथा, गूढकथा, अनुवादीत कथा, महिला विशेषांक, व्यंकटेश माडगूळकरलिखित साहित्यावरचा विशेषांक, ऐसी अक्षरेचे शतकमहोत्सवी, दशकपूर्ती, शिवशाहीर पुरंदरे गौरव विशेषांक, डॉ.आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्तचा आत्मोद्धार विशेषांक, डॉ.जयंत नारळीकर सन्मान विशेषांक, विनोद, संतसाहित्य परिचय, साहित्य चित्रपट माध्यमांतर, वृत्तपत्र साहित्य, शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य, नाट्य चित्रपट कलावंतांचं साहित्य, असे विविध विषयक विशेषांक प्रकाशित झाले. पुढेही असे अनेक विषय येतीलच.
वाचक मित्रांनो, ऐसी अक्षरेचा अंक असो वा विशेषांक, वाचकांसाठी विनामूल्यच आहे. कोणतीही वर्गणी नाही. ईमेलवर अंक-विशेषांक मागवून घेता येतो.
आम्ही वाट बघतोय आमचं कार्यालय कधी उघडता येईल याची. ज्या वाचकांना छापील प्रत हवी असल्यास कार्यालयात उपलब्धतेनुसार मिळेल, नसेल तर ईमेल वर मिळेल.
मायबोली मराठीसाठी काही करण्याचा आनंद आमच्यासाठी महत्वाचा, नव्या तरूण वाचकांसाठी, जुन्या जाणत्या साहित्यप्रेमींसाठी ऐसी अक्षरेचा प्रत्येक अंक म्हणजे उत्तम साहित्याचा नजराणाच.
ऐसी अक्षरे वाचा, वाचनसंस्कृतीची जोपासना करा.
बेलवलकर गृहनिर्माण
१५ मे २०२०
No comments:
Post a Comment