ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
नी सा ग म प
प ग रे सा नि
ध नी रे ग सा ..
तुझे आभाळाचे रुप, माझा देह माती माय। कधी करपले दूध, कधी दाटलेली साय। उभे भांडण जन्माशी, तरी गाथा सांभाळीला। तुझ्या थोरवीचा आहे, माझ्या माथ्यावर टिळा। जगण्याच्या समईत, तुझ्या अभंगाच्या वाती। वादळात चालताना तू, माझा रे सांगाती।
ह्या दूरदर्शनच्या एका वाहिनीवरील एका मालिकेच्या *देवकी पंडित* यांच्या गोड गळ्यातून आणि आमच्या स्मरणातील माहितीप्रमाणे *दासू वैद्यांच्या* प्रतिभेतून आलेले हे, शीर्षक गीताचे स्वर आणि शब्द कानांवर पडले की भान हरपायला व्हायचं. आपल्यालासुद्धा इतकं गोड गाता यावं असं वाटायचं. आधीही वाटायचंच. पण आपण काहीच का गाऊ शकत नाही, याचा मनस्वी खेद वाटायचा, रागही यायचा आजही येतो, आणि येतच राहील.
चांगलं आठवतं, तिसरी चौथीच्या वर्गात असतांना एक कविता वर्गात म्हणून दाखवली असता, वर्गशिक्षक आणि संगीतशिक्षक असलेले भावे गुरुजी म्हणाले होते, ' अरे तुझा आवाज चांगला आहे!'... नंतर त्या वर्षीच्या स्नेहसंमेलनात प्रभात सिनेमागृहाच्या मंचावर उभं राहून, ' नमने वाहून स्तवने उधळा..' हे स्वागतपर पद्य गाण्याची संधी मिळाली. पण गायन तिथंच थांबलं. शिकावंसं खूप वाटायचं, पण ....
दहा बारा वर्षांपूर्वी पुन्हा एकदा संगीताचा क्लास लावला, पण ... तो प्रयत्नसुद्धा तिथेच थांबला.
दूरदर्शनचा शिरकाव होईपर्यंत रेडिओ आणि रेडिओवरची गाणी ऐकणं हीच सवय असल्यानं, असंख्य गाणी ऐकून ऐकून तोंडपाठ व्हायची, जी आजही चालीसकट आमच्या आणि आमच्या कांही मित्रांच्या लक्षात आहेत. या नव्या ऑनलाईन-वेबच्या जमान्यात शेकडो गाणी डाऊनलोड केली गेली. पाच सहा वर्षांपूर्वी रोज एक मराठी वा हिंदी गीत, त्यावरील विशेष टिपणीसह व्हॉट्सएप् मित्रांना पाठवत हे गाण्याचं आम्ही जपलेलं वेड मित्रांनाही खूप भावलं होतं.
आणि एकदा असंच पुस्तक प्रदर्शनात फिरत असतांना, *ओळख संगीत शास्त्राची* या *डॉ.भाग्यश्री कुलकर्णी लिखित* पुस्तकावर नजर पडली.....
वेद-पौराणिक काळापासून, अमीर खूश्रू, तन्नामिश्र (तानसेन), बैजू, हरिदास स्वामी, रवींद्रनाथ टागोर असा संगीतप्रवासाचा थोडक्यात इतिहास सांगत हे पुस्तक विख्यात गायकांबद्दल, गीतकारांबद्दल, प्रसिद्ध संगीतघराण्यांबद्दल माहिती देतं.
संगीतातल्या धृपद, धमार, ख्याल, तराना, ठुमरी, टप्पा, चीज, गझल, कव्वाली, अभंग, लावणी, पोवाडा, भजन, कीर्तन भक्तीगीत, भावगीत, इंडियन पॉप-रॉक, चित्रपट गीत अशा विविध गीत प्रकारांची माहिती या पुस्तकातून मिळते.
यमन रागाचे आरोह अवरोह पकड याची माहिती आणि त्यावर आधारीत, ' जिया ले गयो जी मोरा सावरिया, ' भूप रागातील आरोह अवरोह पकड आणि त्यावरील, ' पंछी बनू उडते फिरू.' हमीर रागातील आरोह अवरोह पकड आणि त्यावरील, ' मधुबनमें राधिका नाचे रे' ही आणि अशी कांही सुंदर उदाहरणे या पुस्तकात दिली आहेत.
संगीत ही गुरुमुखी विद्या आहे ग्रंथ वाचून ही कला साध्य होत नाही. असं जरी असलं, तरी या शास्त्राची ओळख होणं हेही महत्वाचंच ना! हे पुस्तक ते काम करतं.
वाचकमित्रांनो थोडे दिवस सहन करायचेत या कठीण लॉकडाऊन काळाचे. पण त्यातही अशी पुस्तके जर हाती आली, त्यांची माहिती जरी मिळाली तर नक्कीच संगीतवेड्या रसिकांना आवडेल.
सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे संगीत म्हणजे ईश्वराच्या आभाळाच्या रूपागत आहे. आपण खूप थिटे आहोत. मात्र संगीत हे अवघड काळात मन रिझवत धीर देणारे ठरते, या आमच्या मताशी तुम्हीही सहमत असाल अशी खात्री आहे.
बेलवलकर गृहनिर्माण
२२ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment