ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
राजकारण किंवा समाजकारण म्हटलं कीं काहींना चर्चा, वादविवाद यासाठी स्फुरण चढतं, काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येते, तर काहींना या विषयांत स्वारस्य नसतं. या चर्चेत मत मतांतरे वाद विवाद इत्यादी ठरलेलेच असते. यांत आणखी दोन शब्द आपला फार मोठा प्रभाव पाडतात. आणि ते म्हणजे, पुरोगामी आणि प्रतिगामी.
सर्वसाधारणपणे सामान्यांना पुरोगामी म्हणजे समाजवादी, खांद्यावर शबनम लटकावून समाजसुधारणेचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि प्रतिगामी म्हणजे पुरोगामी व्यक्तीला विरोध करणारी, धर्म पाळणारी मंडळी अशी वाटतात.
आज या विषयावर थोडा विचार करायला लावणारे आणि त्यासाठी पुरोगामित्व म्हणजे काय? हे समजावून सांगणारे श्रुती तांबे यांनी लिहिलेल्या याच शीर्षकाच्या पुस्तकाबाबत जाणून घेऊयात.
पुरोगामी हा आजचा विषय वेगळा आहे. आपण सारेच आज घरांत बसलोय. एरवी कामाचे ठिकाणी जाण्यायेण्यास लागणारा वेळ अधिक प्रत्यक्ष कामाचा वेळ, असे किमान साडेनऊ दहा तास आणि त्यासाठीच्या तयारी- धावपळीसाठी घरी लागणारा पाऊण एक तास, असा गेले ३१ दिवस दररोज लागणारा वेळ आपण घरात बसून काढलाय. अजून किती दिवस हे चालेल माहीत नाही. या ३१ दिवसांच्या काळात कुणी वाचन केलंय, कुणी चित्रं काढलीत, कुणी योगासने केलीत, कुणी बैठे खेळ, कुणी स्वयंपाक, कुणी धुणी भांडी तर कुणी हे तर कुणी ते करतंय!
लॉकडाऊनचा काळ संपल्यावर जेव्हा पुन्हा आपण कामांत गुंतवून घेऊ तेव्हा हा असा मोकळा ढाकळा वेळ परत अनुभवता येईलच हे सांगता येणार नाही. या काळात आपण असं कधी एखाद्या विषयावर मनन चिंतन केल्याचं आठवतंय? उत्तरं काय दोन्ही प्रकारची असू शकतील, हो किंवा नाही.
तर या पुरोगामित्व म्हणजे काय? या छोट्या पुस्तकातील विषयाबद्दल थोडं जाणून घेऊ. चर्चा करायला हरकत काय? तटस्थ वृत्तीने चर्चा करायची. अंगाशी येतंय असं वाटलं तर एखाद्या प्रसिद्ध अंकाच्या पहिल्या पानावर, ' लेखकांच्या मतांशी आम्ही सहमत असूच असे नाही ' हे लिहिलेलं असतं, तसं म्हणून टाकायचं! बस इतकंच.
तर, पुरोगामी म्हणजे काळाबरोबर पुढे जाणारे आणि प्रसंगी काळाच्याही पुढे पाहू शकणारे, दूरवरचा वेध घेणारे, प्रगतीचा ध्यास घेतलेले ते पुरोगामी. म्हणून याच अर्थाचा,
' प्रागतिक ' हाही शब्द वापरतात. मानवी मुक्तीचा ध्यास घेतलेले असा अर्थही यातून निघतो. प्रतिगामी म्हणजे मागे जाणारे, उलटे चालणारे. पारंपरिक विचारांचे पालन एखाद्या कर्मकांडाप्रमाणे करणारे.
लेखिकेने पुस्तकात पुरोगामित्वाचे घटक, धर्म, सरंजामशाही, राष्ट्र-राष्ट्रवाद भांडवलशाही, जातिसंस्था, विषमता या संज्ञा समजावून सांगायचा थोडक्यात प्रयत्न केलाय. वैदिक काळातील चार्वाकदर्शनातील इहवाद सुखवाद याबाबतचे प्रागतिक विचार मांडले आहेत.
पुस्तक साधारण २००१ च्या दरम्यान प्रकाशित झालंय. आता आपल्या परिवर्तनशील समाजात बराच फरक पडलाय, हे आपल्यालाही कळून येत आहे. समाज मनोवृत्तीमध्ये अनेक बदल झाल्याचे जाणवते आहे.
पुरोगामित्वाचा आदर्शपणा सांगताना लेखिकेने कांही प्रश्न, वाचकानी स्वतःलाच विचारून त्याची उत्तरं स्वतःलाच द्यावीत अशा अपेक्षेने विचारले आहेत.
वरती जसं म्हटलंय तसं कधीतरी ज्या समाजात आपण राहतो त्याविषयी थोडं चिंतन करण्यासाठी पुस्तक नक्की वाचावं. तटस्थतेनं. आम्हांला विचाराल तर, शहरी लोक बऱ्याच प्रमाणात पुरोगामी विचारातच वावरत असतात. अर्थात हे आमचं मत आहे. या लॉकडाऊनच्या काळात आपण स्वतः किती जबाबदारीने वागलोय हे स्वतःच स्वतःला विचारायचं.
मित्रांनो वाचन महत्वाचंच. मग ते विनोदी असो, कादंबरी असो, ऐतिहासिक असो. अशाही विषयांवर जरूर वाचावं. त्यासाठी हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. आणि नेहमी प्रमाणे प्रश्न. 'घरात आहात ना?' असाल तर नक्कीच सुरक्षित असाल.
बेलवलकर गृहनिर्माण
२५ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment