Thursday, 13 August 2020

पुस्तक परिचय ३७

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     

      " आदर्श लेखनाचे काही मापदंड आहेत. पहिला म्हणजे त्या लेखनाने शाश्वत सत्याला गळामिठी मारलीच पाहिजे. दुनियेत काही शाश्वत सत्य असतात. माणसाला निर्मळाची ओढ लागणं, निरामयतेचं आकर्षण असणं हे एक शाश्वत सत्य आहे.तुकाराम महाराजांचा अभंग तुमच्या काळजाला भिडतो, तो का? कबीराचा रोखठोक दोहा तुम्हांला क्षणभर भानावर आणतो, तो का? कारण या ठिकाणी शाश्वताची ठिणगी आहे. सृष्टीतलं हे शाश्वत सत्य सतत शब्दांत पकडणं आणि आपल्या ललित लेखनात त्याचा काव्यात्म, कलात्म आविष्कार करणं हे माझ्यासारख्या पोटार्थी लेखकाचं काम नव्हे. त्यासाठी एखादा टागोर किंवा कवी केशवसुत लागतो. ते गरुडाचं काम आहे."

     मागं, ऐसी अक्षरेच्या दिवाळी २००४ च्या दिवाळी अंकासाठी आम्ही द.मा.मिरासदार, मधुमंगेश  कर्णिक, वि.आ.बुवा, शं.ना.नवरे, सुभाष भेंडे, रवींद्र पिंगे या प्रथितयश लेखकांना त्यांनी लिहिलेली, त्यांना आवडलेली एखादी कथा, ललित लेख ऐसी अक्षरेसाठी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्याअंकासाठी रवींद्र पिंगे यांनी पाठवलेल्या त्यांच्या आवडत्या  'तिसरा हात ' या लेखासोबत वरीलप्रमाणे आपल्या मनोगताची सुरुवात केली होती. 

    आज रवींद्रायन हे रवींद्र पिंगे यांचं पुस्तक वाचायला घेतलं, तेव्हा हे आठवलं. ऐसी अक्षरेच्या उपक्रमाचं त्यांना भारी कौतुक होतं. कै.शरच्चंद्र बेलवलकर यांच्यासोबत त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता तेव्हा आणि एकदा ते असेच पुण्यात आले असता कार्यालयात आले होते तेव्हा त्यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या होत्या.

     पिंगे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख असं विपुल साहित्य लेखन केलं आहे.

     ऐसी अक्षरेच्या काही अंकांत  पिंगे यांचे ' चर्चिलची संध्याकाळ,' ' हेमिंग्वेचे क्षणदर्शन,' ' हार्डीची प्रेमयात्रा,' ' आनंदाची फुले,' एस.जी. वेल्स ' आम्ही पुनःप्रकाशित केले आहेत. रवींद्र पिंगे यांच्या लेखांनी ऐसी अक्षरेचं साहित्यिक ऐश्वर्य खुलवलं आहे.

     रवींद्रायन मध्ये ३७ छोटे मोठे लेख आहेत. अगदी 'चहा पिता पिता' यासारख्या विषयावरही पिंगे लिहितात. वडलांना कर्करोगाची लागण झाली तेव्हा त्यांना क्ष-किरणांच्या फवाऱ्यासाठी नेलं असता डॉक्टर म्हणाले होते, "आत्ता हे ताठ शरीराने यंत्रासमोर जातील, पण दीड दोन मिनिटात घायाळ होतील, ते परतले की त्यांना आधार द्या!" वडील त्याच तरतरीत अवस्थेत बाहेर आले, त्यांना ' विश्रांती घ्या ' असे म्हणताच ते म्हणाले, "कशासाठी?" रस्त्यावर आलो तसे वडील म्हणाले, "मला चहा दे, उडपी, इराण्याकडचा नको, दक्षिणी ब्राह्मणाच्या उपहारगृहातलाच हवा!" ही वडलांची हृद्य आठवण पिंगे सांगतात. तर ' माझा लेखनप्रवास मध्ये लिहिताना ते म्हणतात, ' आई एकदा सहज बोलून गेली, 'रवी, तू इस्टेट केली नाहीस हे दिसतंच आहे, पण तुझे नाव हीच तुझी इस्टेट असेल!' 

     ' चंद्र सूर्य मावळले ' मध्ये,  त्यांनी बोलण्याच्या ओघात कवीच्या वैगुण्यावर बोट ठेवलं असता पुलंनी त्यांना सावध करीत  जे सांगितलं त्यावर पिंगे लिहितात, ' भाई म्हणाले, "पिंगे, एक लक्षात ठेव. कुणाचं कधीही वर्म काढू नकोस, ते तुझं काम नाही. समजा एखाद्यानं तुला एक हजार ओळींचं खंडकाव्यआणून दिलं नि त्यातल्या फक्त दोनच ओळी चांगल्या असतील, तर तू फक्त त्या दोन चांगल्या ओळींची भलामण कर. आपण कीर्तनकाराचा रोल करायचा. समीक्षकाचा नाही.' 

     पिंगेंनी खूप भटकंती केली. जे जे पाहिलं, दिसलं, भावलं त्यावर ते लिहित राहिले. 

     जेंव्हा हे रवींद्र पिंगेंचं हे रवींद्रायन मिळेल तेव्हा जरूर वाचा. 

      गेल्या महिना सव्वा महिन्यातल्या संसारातल्या अनेक गोष्टींमधल्या खाचाखोच्यांची बक्कळ माहिती गाठीशी असेलच  तुमच्या! बघू या, ३ मे उद्याच आहे. राहू या आशावादी..


बेलवलकर गृहनिर्माण

२ मे २०२०

No comments:

Post a Comment