Thursday, 6 August 2020

पुस्तक परिचय ३०

ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद

     आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. एक बुलंद अष्टपैलू व्यक्तिमत्व हीच अत्र्यांची ओळख. शिक्षक, पत्रकार, लेखक, वक्ते, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, राजकारणी असा  अनेक क्षेत्रात आपल्या बुलंद व्यक्तिमत्वाचा लीलया ठसा उमटविणारं हे अफलातून व्यक्तिमत्व.
     अत्र्यांचे भन्नाट विनोद, अत्र्यांच्या, श्रोत्यांनी तुडुंबगर्दीने, हशा टाळ्या घेत गाजणाऱ्या सभा. अत्र्यांचा विलक्षण बेधडक  हजरजबाबीपणा. अत्र्यांचे मराठा दैनिकात प्रसिद्ध झालेले हृदयस्पर्शी मृत्युलेख. अत्र्यांची झेंडूची फुले मधली इरसाल  विडंबनकाव्ये. तो मी नव्हेच, डॉक्टर लागू, बुवा तेथे बाया, मोरूची मावशी, मी मंत्री झालो, साष्टांग नमस्कार ही रसिकमान्य नाटके. पहिला राष्ट्रपती पुरस्काराचा मानकरी ठरलेला आचार्य अत्रे दिग्दर्शित साने गुरुजीलिखित, श्यामची आई आणि महात्मा जोतिबा फुले हे चित्रपट, असं प्रचंड मोठं काम करुन ठेवलेलं हे व्यक्तिमत्व. सामान्यवर्गात विलक्षण म्हणून ख्यातकीर्त असलेलं व्यक्तिमत्व.
     आचार्य अत्रे यांनी मी उभा आहे या नाटकात निवडणूक ह्या विषयावर उमेदवार, लोकप्रतिनिधी, मतदार, वृत्तपत्रसंपादक, तथाकथित कामगारनेते यांच्या स्वार्थी मनोवृत्ती दाखवल्या आहेत. सडेतोडपणे बोलण्यास आणि लिहिण्यास अत्रे कोणाचीही भीडभाड ठेवीत नसत. निवडणुकीच्या राजकारणात सत्ता हेच महत्वाचं मानलं जातं आणि त्यासाठी तत्वे टोप्या अगदी सहज फिरवल्या जातात. या नाटकातील अत्र्यांनी लिहिलेली कांही वाक्ये परिस्थितीचं किती यथार्थ वर्णन करतात, किती बोलकी आहेत, ते पाहूयात.
     ' काही जरूर नाही आता तसल्या जाहीरनाम्याची! आमचा जाहीरनामा नाशिकच्या सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापतो आहे हल्ली! ' 
     ' म्हणजे काय? ' 
     ' नाही तुमच्या ध्यानात आलं? दहा रुपयांची कोरी करकरीत निळी नोट हा आमचा जाहीरनामा! अगदी निरक्षर माणसालादेखील वाचता येईल असा हा जाहीरनामा आहे.' 
      ' ही - ही पाहिलीत निवडणूक! भावाभावात, बापलेकात, नवराबायकोत, मित्रामित्रात, प्रेमाच्या नात्यात जन्माचं विष कालवणारी ही पाहिलीत निवडणूक? ' 
    ' मतदारांचे हे असले इरसाल नमुने पाहिले म्हणजे देशाच्या भविष्याविषयी अंत:करण साशंक होतं -- अन् मन उद्विग्न होतं! ' 
    पराभूत भ्रष्टाचारी नेत्याच्या पराभवावर अत्रे जळजळीत भाष्य करतात, ' आमच्या बायका पोरांचे जे शिव्याशाप आणि तळतळाट तुम्ही घेतलेत त्याचा हा सूड आहे! गरिबांना राग येत नाही  -- गरीब कधी संतापत नाही! पण एकदा त्यांचा रागाचा ज्वालामुखी पेटला म्हणजे जगातल्या साऱ्या श्रीमंतांच्या संपत्तीचा स्वाहाकार झाल्याशिवाय राहणार नाही! दहा रुपयांची नोट दिली की गरिबांचं पोट विकत घेता येतं अशी आजपर्यंत तुम्ही आम्हां गरिबांची बदनामी करीत होता -- आमच्या गरिबीची-आमच्या असहायतेची हेटाळणी करीत होता-- त्याचा हा सूड आहे समजलात! ' 
     वाचकमित्रांनो, हसत हसत दुरवस्थेची रेवडी उडवणे हे  अत्र्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. तुम्हांआम्हां सुजाण मतदारांना हा अनुभव येतोच. पण आपण यावर भाष्य करीत नाही. गप्प बसून राहतो. अत्र्यांचे हे नाटक १९३९ साली पुण्याच्या तत्कालीन विजयानंद थिएटरमध्ये प्रथम सादर झाले. ऐंशी वर्षांनंतरच्या आजच्या वर्तमानात कितीसा फरक पडलाय ते आपल्याला माहितच आहे.
    नाटकाचं पुस्तक मिळेल तेव्हा जरूर वाचा. 
    आपण सारेच त्या सुखद काळाच्या प्रतिक्षेत आहोत, कधी एकदा या करंट्या कोरोनाचा समूळ नि:पात होतोय आणि सारं जग पुन्हा आपल्या गजबजल्या वातावरणात रुळून जातंय! तोपर्यंत, 
' घर हीच राजधानी, नाही उणे कशाचे ... ' 
आज अक्षय्य तृतीया :

सर्वेपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित दु:खमाप्नुयात ॥ ह्या सदिच्छा..
     
बेलवलकर गृहनिर्माण
२६ एप्रिल २०२०
॥मिती वैशाख शुद्ध तृतीया शके १९४२॥

No comments:

Post a Comment