Monday, 17 August 2020

पुस्तक परिचय ४१

 ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद


   जो नियमांत असे तो सुखात वसे 

   हसतमुख तो सदा प्रसन्न दिसे ...


     आईशप्पथ काय जमलंय काव्य, काही न करता सव्यापसव्य, शब्द कसे सुचलेत दिव्य! 

      

    वा वा वा, चक्क सुचलं कीं काव्य! 

    आम्हांला नेहमी वाटायचं की आम्हांला कविता स्फुरतात! यमक जुळवत, शब्द कवितेत बांधता येतात, इत्यादी इत्यादी. फार फार वर्षांपूर्वी, एक दिवस एक कविता, मुक्तछंदात आम्हांला सुचली. इतकी गोड वाटली, आम्हालाच की, सगळ्यांना दाखवत सुटलो. आमच्या एका स्नेह्यानं ती वाचली,  प्रणीत कुलकर्णी त्यांचं नाव, म्हणाले, 'मीटरमध्ये बसवायला हवी!' 'म्हणजे ? नाही समजलं ' आम्ही प्रश्नार्थक मुद्रेनं विचारलं.

     आता ही चर्चा इथं नाही वाढवत. कारण कविता जरा लांब पळाली, आमच्यापासून! कुलकर्णी स्वतः मात्र उत्तम गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. असो.

      मुद्दा काय की, कविता ही लयीत असायला हवी, नियमांत बसायला हवी. हा मुद्दा पटल्यामुळे आमचं कवितेच्या नादी लागणं सोडल्यात जमा झालं. 

       शाळेत असल्यापासून सगळ्या कविता, ओव्या, श्लोक अगदी मोठ्ठयांदा तालासुरात म्हणत म्हणत पाठ व्हायच्या. अगदी आज अनेको वर्षांनंतरसुद्धा सारे शब्द न चुकता ओठांवर आले की कौतुक वाटते त्या विशिष्ट नियमबद्ध काव्याचे. जसे की, 

    ' सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो 

     कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ' 

किंवा ..

    ' क्षणोक्षणी पडे उठे परि बळे उडे बापडे..' 

अथवा ... 

    ' कांही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी ..' 


      आता हे आठवायचं कारण असे की पूर्वी, कविता वृत्तात बांधलेल्या असायच्या, तो अभ्यासाचा विषय आज असा सुचला की, वृत्तदर्पण या नावाचं कै.परशुराम बल्लाळ गोडबोले यांनी शके १७८२, म्हणजे, इ.स.१८६०-६१ मध्ये रचलेले हे पुस्तक खूप दिवसांनी आज पुन्हा वाचायला घेतले. 

    नमूनि देवदेवातें। रसिकस्वांततर्पण॥ 

    बालबोधार्थ करितों। अल्प हे वृत्तदर्पण॥ 

    छंदें वृत्तें संस्कृतांत। वर्णिली असती मुळीं॥ 

    पाहून त्याच रीतीनें। देशभाषेंत सांगतों॥ 

    या पद्यानेच पुस्तकविषयाला रचनाकाराने सुरुवात केली आहे. 

    एखादा वाचक जर औत्सुक्याने हे पुस्तक वाचू लागेल तर त्यात त्याला नक्कीच स्वारस्य निर्माण होईल असे आम्हांस वाटते. आपल्यापैकी कित्येकांना गमतीगमतीत असं काव्यात बोलायला आवडतं, अशांना तर या वृत्तविषयात नक्कीच रुची असेल.

     आपण शाळेत मराठी शिकताना या गणवृत्तांची ओळख होते. य यमाचा न नमन। त ताराप र राधिका॥ म मानावा स समरा। ज जनास भ भास्कर॥ गणवृत्तांत हे गण महत्वाचे. लक्षात ठेवण्यासाठी आम्हांला शाळेत, *यमाताराजभानसलगं,* म्हणजे, यमाता, मातारा, ताराज राजभा,जभान, भानस,नसल,  सलगं.. असंही शिकवून ठेवल्याचं आठवतंय.

     *वृत्तदर्पण* मध्ये अभंग, दिंडी, साकी, ओवी, दोहा, घनाक्षरी, घुंगरवाळा, आनंदकंद, सुनीत याबरोबर पृथ्वी, मंदारमाला, मंदाक्रांता, शार्दूल-विक्रीडित, इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, भुजंगप्रयात,  वसंततिलका, शिखरिणी आदी अनेक वृत्तांची सोदाहरण आणि रंजक माहिती दिली आहे.

   *सुनीत* वरुन आठवलं. बहुधा ' यज्ञ ' ही भा.द.खेर-शैलजा राजे लिखित सावरकरांवरील कादंबरी असावी. कादंबरीतलं सावरकरांनी अंदमानातल्या दुष्ट तुरुंगाधिकारी 'बारी' च्या, ' सावरकर, त्या शेजारच्या कैद्यानं ३० पौंड तेल काढलं, आणि तुझं अजून दोनतीन पौंड कमीच कसं ? ' या प्रश्नाला दिलेलं बाणेदार उत्तर आठवलं. सावरकर म्हणतात, 'त्या कैद्याला एक सुनीत (सॉनेट) रचायला सांगा, त्याला नाही जमणार, जे मी पाच मिनिटात रचून दाखवतो...! '  

   

    म्हणावें तयाला भुजंगप्रयात। क्रमानेंच येती य चारी जयांत॥ पदी ज्याचिया अक्षरें येति बारा। रमानायका दु:ख माझे निवारा॥ अशाप्रकारे नियमवृत्तातच शब्दाक्षरे रचून भुजंगप्रयातची इथे  ओळख करून दिली आहे. उदाहरण अर्थातच, मनाचे श्लोक. 

  ' मना सज्जना भक्तिपंथेचि जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ ..' 

     

    म्हणति कवि तयाला मालिनी वृत्त तेव्हां॥ 

    न न म य य असे हे संघ येतात जेव्हां॥ 

    प्रतिचरणिहि पंध्रा अक्षरे हीं तयाची॥ 

    हरिहर-चरणाला आपुले हीत याची॥ 

     या मालिनी वृताच्या उदाहरणादाखल शाकुंतल नाटकातलं हे पद घेतले आहे.

    तरुवर सुफलांच्या आगमी नम्र होती॥ 

    जलदहि जलभारे खालती फार येती॥ 

    सुपुरुष विनयाते भाग्यकाली धरीती॥ 

    उपकृति करित्यांची जाणिजे हीच रीती॥ 


     विवाह समारंभाला गेलो की, आपले कान, ' तदेव लग्नं सुदिनं ..' ह्या ओळी ऐकण्याची वाट पाहात असतात. त्याआधी मंगलाष्टकं एका ठराविक लयीत म्हटली जात असतात. छान वाटत असतं कानांना, जर ती व्यवस्थित म्हटली जात असतील!  ती मंगलाष्टकं ज्या चालीत म्हटली जातात ते वृत्त असतं - शार्दूल-विक्रीडित ...

  आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित॥ 

   मा सा जा स त ता ग येति गण हे पादास कीं जोडित॥ 

   एकोणीस पहा गणूनि चरणीं येतात हीं अक्षरें॥ 

   तेज:पुंज नभोगणी पसरली रत्ने पहा नक्षरे॥ 


चरणात १९ अक्षरे, गण म स ज स त त ग 

उदाहरण दिलंय मोरोपंतांच्या काव्याचं. 

  जो लोकत्रितयी फिरे स्थिर नसे ताटीं जसा पारद॥ 

   स्वांतध्येयपदीच निश्चल भवांभोधीत पार-द॥ 

   जो वर्णे गगनोदरी क्षण दिसे पूर्णेंदु कीं शारद॥ 

   श्रीशांत:पुरचत्वरीच उतरे तो सन्मुनी नारद॥   


   तर वाचकमित्रांनो, आपलं जुनं काव्य हे असं वृत्तात बांधलेलं असायचं. सोपं नाही आपली कविता अशी नियमांत बांधणे. तशी प्रतिभाशाली उत्तुंग कल्पनाविलास करणारी कविमंडळी उगाच नाही अशा काव्यरचना तयार करती झाली जी काव्ये पिढ्यानपिढ्या वाचली, अभ्यासली जातात.


  घरांत बसुनी निवांत हसुनी तुम्ही लोक जी । 

  खुशाल असता कशास करता,  नको काळजी ॥ 


बेलवलकर गृहनिर्माण

६ मे २०२०

No comments:

Post a Comment