ऐसी अक्षरे : घेऊ वाचनातून आनंद
शब्द--निसर्गाने फक्त आणि फक्त मानवालाच दिलेले हे वरदान. शब्दांत पुरातन काळापासून असंख्य ऋषीमुनी, शास्त्रज्ञ-तत्वज्ञानी-संशोधक अशा थोर व्यक्तींनी ज्ञान-तत्वज्ञान, इतिहास, येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीसाठी नि:स्वार्थपणे साठवून ठेवलेला आहे.
शब्दांतून राग-लोभ, स्वार्थ-परमार्थ, असूया, दंभ, लबाडी, चिंता, चिंतन, आदेश, विनंती, न्याय, असं बरंच काही व्यक्त होतं. साहित्य, शास्त्र, गीत शब्दांतून प्रकटतात. शब्द घेऊन येतात रौद्ररस, वीररस, शृंगाररस, भक्तिरस आदी नवरस.
गोड शब्द, तिखट शब्द, कडवट शब्द, मधाळ शब्द अशा शब्दांनासुद्धा वेगवेगळ्या चवी असतात! या आणि अशा अनेक चवी चाखण्यासाठी कानांनाही जिव्हा फुटतात.
बाळमुखातून येणाऱ्या पहिल्या शब्दाची सारेच आतुरतेने वाट पाहतात. बोबड्या बालस्वरांशी मोठेही बोबडं बोलतच संवाद साधत बालस्वरांचा मधुर श्रवणानंद कानांत साठवू पाहतात.
' ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत-वैभव-गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायने ऋतुराजा भारिती ..
कुश लव रामायण गाती ..
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपी आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती..
कुश लव रामायण गाती ..'
असे हे बालस्वरांनी गायलेल्या ग.दि.माडगूळकर नावाच्या आधुनिक वाल्मिकीच्या रामायणातील कर्णमधुर स्वर्गीय शब्द.
१९५५च्या रामनवमीपासून पुणे आकाशवाणी केंद्रावर वर्षभर चाललेल्या या अवीट गोडी लाभलेल्या ५६ गीतांच्या रामायणानं मराठी रामभक्तांनाच नव्हे तर साहित्यिक, संगीत रसिकांना रामायण काळात नेऊन ठेवलं!
इक्ष्वाकू कुळातल्या सामर्थ्यवान धर्मपरायण महाराजा दशरथाला काहीच कमी नव्हते..
' दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी
तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमी
तिन्ही लोकिंचे सुख ये धामी
एक उणेपण गृहस्थाश्रमी
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी
दशरथासह साऱ्या अयोध्यावासी यांच्या या शल्यापासून ते,
' वनात विजनी मरूभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर..'
या सीतामाईला लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेवरुन वनात सोडण्यापर्यंतचा हा सर्व काळ, माडगूळकर नावाच्या प्रतिभावंताने अवघ्या ५६ गीतांत कथन केला आहे! ही या आधुनिक शब्दप्रभू वाल्मिकीच्या माधुर्य घेऊन आलेल्या शब्दांची किमया आहे. हे शब्द अनेक भाषांत तीच लय पकडून अनुवादीत झाले. हे शब्द गेली पासष्ट वर्षे अनेक गायक गायिकांच्या गोड गळ्यातून शेकडो वर्षे रसिक भक्तांच्या कानांना श्रवणानंद देत थेट हृदयांत वस्ती करून राहतील, इतक्या मधुर संगीतात बाबुजी-सुधीर फडके यांनी साखरआंब्यासारखे अमृतमय करीत घोळवून ठेवले आहेत.
मिती वैशाख शुद्ध तृतीया शके १८८५ म्हणजे इ.स. १९६३ पासून गेली ५७ वर्षे हे *ग.दि.माडगूळकर रचित गीत रामायण* अनेक भाविकांच्या हाती जाऊन त्यांना तृप्त करीत दिमाखाने आमच्या घरी पावित्र्य राखून बसलेले आहे.
साहित्य रसिक मित्रांनो, या *गदिमारचित गीत रामायणाचे* पारायण तर असंख्यांनी केले आहे, असंख्य करीत आहेत, करीत राहतील. विश्वास आहे; तुम्हीही केलं असेल. नसेल, तर आवर्जून करा.
आपण सारे घरातच आहोत तर *गदिमांच्याच* शब्दांतील एक लोकप्रिय गीत, शेवटी थोडासा शब्दबदल करीत, गदिमाही या शब्दबदलास अनुमती देतील, भक्तिभावे गाऊ या. हे *शब्द* जगातील सर्वच मानवजातीला उपकारक ठरतील आणि रक्षणही करतील ही दृढ श्रद्धा.
' रामचंद्र स्वामी माझा
राम अयोध्येचा राजा
राम सज्जनांचा त्राता
हाती धनु पृष्ठी भाता
राम दुर्जनांचा वैरी
राम कोरोनासी मारी '
बेलवलकर गृहनिर्माण
३० एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment